तक्रारकर्त्यातर्फे वकील :- ॲड. डी.एस. वानखडे
विरुध्दपक्ष क्रमांक 1 तर्फे वकील :- ॲड. आर.आर. पाली
विरुध्दपक्ष क्रमांक 2 तर्फे वकील :- ॲड. राजेश देशमुख
( मा. अध्यक्षा सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला )
::: आ दे श प त्र :::
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ता मौजे भापूर येथे राहत असून शेती व्यवसाय करतो. दिनांक 23-12-2011 रोजी विरुध्दपक्षाकडून टाटा कंपनीची नॅनो 2012 एसटीडी मॉडेल रु. 1,63,492/- च्या मोबदल्यात विकत घेतली.
सदरहू गाडी विकत घेण्याकरिता तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्रमांक 2 जे विरुध्दपक्ष क्रमांक 1 चे अधिकृत वाहन विक्रेता असून त्यांच्या शोरुम मध्ये तक्रारकर्ता चार चाकी कार खरेदी करण्यासाठी गेले होते. सदरहू कार टाटा नॅनो एसटीडी बीएस ही खरेदी करायची होती. परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्याला टाटा नॅनोचे 2011 व 2012 चे मॉडेल दाखविले नाही व सदर मॉडेल विषयी असलेल्या सुट बद्दल माहिती दिली. माहिती देतेवेळी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी सांगितले की, 2011 चे मॉडेल जर आपण खरेदी केले तर, तक्रारकर्त्याला 20,000/- रुपयाची सूट मिळेल तसेच 2012 चे टाटा नॅनो एसटीडी मॉडेल खरेदी केले तर 10,000/- रुपयाची सूट मिळेल. तेव्हा तक्रारकर्त्याने 2012 चे टाटा एसटीडी मॉडेल निवडले आणि 2012 च्या मॉडेलचे कागदपत्रे बनविण्यात आले. परंतु, टाटा नॅनो एसटीडी गाडी ताब्यात देतांना तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने 2011 चे टाटा एसटीडी मॉडेल देण्यात आले. पण तक्रारकर्त्याला जे कागदपत्र देण्यात आले त्या कागदावर चेसीस नंबरवर व्हाईटनर लावलेले आढळून आले व खोडतोड केल्याचे दिसले. यावरुन विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी बनावट कागदपत्र तयार करुन 2011 चे टाटा नॅनो एसटीडी मॉडेल तक्रारकर्त्याचे ताब्यात देण्यात आले.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे लाल रंगाच्या मॉडेलची मागणी केली होती. तरी देखील तक्रारकर्त्याला एस. आर. एन. व्हाईट रंगाचे मॉडेल देण्यात आले, ही सर्व कार्यवाही टाटा नॅनो एसटीडी मॉडेल व कागदपत्रे बनवितांना करण्यात आली तसेच तक्रारकर्त्याला रु. 10,000/- चा लाभ देण्यात आला. परंतु, मॉडेल मात्र 2011 चे देण्यात आले. यावरुन विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्याची फसवणूक केली. त्यावेळेस सदरहू गाडी तक्रारकर्ता हा पहिल्यांदाच विकत घेत होता त्यामुळे तक्रारकर्त्याला गाडीचे जास्त ज्ञान नव्हते व तक्रारकर्त्याची फसवणूक झाली याबद्दल तक्रारकर्त्याला त्यावेळेस कळाले नाही. परंतु, गाडीचा ताबा घेतल्यानंतर तक्रारकर्त्याने काही दिवसातच तिची पूर्ण चौकशी केली असता वरील बाब त्याचे निदर्शनास आली, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडे चौकशी केली असता त्यांनी विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्याकडे जाण्यास सांगितले व सर्व व्यवहार त्यांच्यासोबतच करावे, असे कळविले. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांचेकडे वेळोवेळी तक्रारकर्ता गेला असता त्यांनी तक्रारकर्त्याची तक्रार घेण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्त्याने वकिलामार्फत विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांना रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठविली व ती त्यांनी मिळाली. परंतु, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही व असे कळविले की, आपण योग्य त्या कोर्टात दाद मागावी. करिता तक्रारकर्ता वरीलप्रमाणे झालेल्या फसवणुकीबद्दल सदरहू तक्रार दाखल करीत आहे.
तक्रारकर्त्याने मोठी रक्कम खर्च करुन सदरहू गाडी विकत घेतली आहे. तसेच गाडीची रक्कम जमविण्याकरिता खूप तडजोड केली आहे व मोठया आशेने गाडी विकत घेतली आहे. परंतु, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी कागदपत्रांवर खोडतोड करुन तक्रारकर्त्याला जुन्या मॉडेलची गाडी दिली आहे व तक्रारकर्त्याची फसवणूक केली आहे.
सबब, तक्रारकर्त्याची प्रार्थना अशी की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात यावी व तक्रारकर्त्याला टाटा नॅनो एसटीडी 2012 चे लाल रंगाचे मॉडेल विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 कडून देण्याचा आदेश पारित व्हावा. तसेच रु. 10,000/- अतिरिक्त जुन्या मॉडेल गाडीची सूट वगळली, ती 18 टक्के व्याजासह देण्याचा आदेश पारित व्हावा. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु. 50,000/- व सदर तक्रारीचा खर्च रु. 5,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकंदर 08 दस्तऐवज पुरावा म्हणून दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 चा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची मंचातर्फे नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारकर्त्याचे संपूर्ण कथन फेटाळत, अधिकच्या कथनात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्याकडून टाटा नॅनो गाडी विकत घेण्याकरिता कर्ज मागितले होते व कर्ज घेतेवेळी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 सोबत लेखी करारनामा केला होता. त्या करारनाम्यामधील क्लॉज क्रमांक 3.1 नुसार तक्रारकर्त्याने करारनाम्यातील शर्ती व अटी मधील एका शर्तीपैकी तक्रारकर्त्याने असे कबूल केले आहे की, जर वाहनामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष किंवा अपघात इत्यादी कारणामुळे तक्रारकर्त्यास कर्जाचे मासिक हप्ते हे थांबवता येणार नाही आणि विरुध्दपक्ष क्रमांक 1 तक्रारकर्त्यास त्यांनी दिलेल्या कर्जाच्या किस्ती मागू शकतील.
विरुध्दपक्ष क्रमांक 1 ही वित्तीय कंपनी असून विरुध्दपक्ष क्रमांक 2 हे टाटा नॅनो गाडीचे अधिकृत विक्रेते आहेत. विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांचा एकमेकांसोबत कुठलाही संबंध नाही. तक्रारकर्त्याने टाटा नॅनो ही गाडी विकत घेतांना विरुध्दपक्ष क्रमांक 1 कडून कर्ज घेतले आहे. सदरहू तक्रार ही विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांच्याविरुध्द असून त्यामध्ये विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे आरोप लावलेले नाहीत. सदरहू तक्रारीशी विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचा कुठलाही संबंध नाही. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ही वित्तीय संस्था असून तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ग्राहक व विक्रेता असे नाते नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 विरुध्द सदरची तक्रार ग्राहक मंचामध्ये चालू शकत नाही. म्हणून तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 चा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची मंचातर्फे नोटीस प्राप्त झाल्यानंतर विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारकर्त्याचे संपूर्ण कथन फेटाळत, अधिकच्या कथनात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्ता दिनांक 13-12-2011 रोजी विरुध्दपक्षाकडून नॅनो गाडीच्या 2012 च्या मॉडेलचे कोटेशन घेवून गेला. कोटेशन फॉर्ममध्ये टाटा मोटर्सने पाठविलेल्या दर पत्रकानुसार 2012 चे मॉडेलची किंमत व खर्च दर्शविलेला आहे. कोटेशन फॉर्मच्या मागच्या बाजुला अटी दिलेल्या आहेत व अट क्रमांक 2 प्रमाणे वित्तीय कंपनीकडून किंवा बँकेकडून गाडीच्या किंमतीचे ड्राफट विरुध्दपक्षाला देण्याआधी विरुध्दपक्षाकडे गाडीचे मॉडेल उपलब्ध आहे किंवा नाही याबद्दल शहानिशा करुन विरुध्दपक्षाकडे चौकशी केली पाहिजे. तक्रारकर्त्याने दिनांक 05-01-2012 रोजी रु. 1500/- देवून नॅनो 2011 च्या मॉडेलची बुकिंग केली आहे व दिनांक 14-01-2012 ला रु. 5,000/- जमा केले व दि. 25-01-2012 ला टाटा मोटर्स फायनान्स लिमिटेड यांचेकडून रु. 1,31,000/- चे कर्ज प्राप्त झाले. दिनांक 05-01-2012 रोजी तक्रारकर्त्याने गाडीची बुकिंग केली, त्यावेळेस 2012 चे मॉडेल विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे उपलब्ध नव्हते. कारण ते मॉडेल मार्केटमध्ये आलेले नव्हते. नवीन मॉडेल हे वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध होत असते. त्यामुळे दिनांक 05-01-2012 रोजी 2012 चे मॉडेलची बुकिंग करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
टाटा कंपनीने 2011 च्या मॉडेलवर फक्त 10,000/- रुपयाची सूट देण्याचे जाहीर केले होते व त्यानुसार तक्रारकर्त्याला त्याच्या गाडीवर 10,000/- रुपयाची सूट दिलेली आहे. त्यावेळेस मार्केटमध्ये 2012 चे मॉडेल आलेलेच नसल्यामुळे त्या मॉडेलवर सुट घोषित करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.
तक्रारकर्त्याने गाडीची बुकिंग करतेवेळी गाडी लाल रंगाची घेण्याचे ठरविले होते. त्यामुळे “ कमिटमेंट फॉर्मवर ” सुध्दा “ नॅनो एसटीडी रेड ” असे लिहीले आहे. परंतु, गाडीची डिलेव्हरी घेतांना तक्रारकर्त्यासोबत त्याचे कुटूंबिय सुध्दा आले होते व त्यावेळेस त्यांनी लाल रंगाच्या गाडीच्या ऐवजी शेरेन व्हाईट रंगाची गाडी घेण्याचे ठरविले होते. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी डिलेव्हरी चालानवर आधी लाल रंगाच्या गाडीचे इंजिन नंबर व चेसीस नंबर लिहिले होते. परंतु, तक्रारकर्त्याने गाडीचा रंग बदलून दुस-या रंगाची गाडी घेतल्यामुळे लाल रंगाच्या गाडीचे इंजिन नंबर व चेसीस नंबर व्हाईटनरने खोडून त्याऐवजी शेरेन व्हाईट रंगाच्या गाडीचा चेसीस नंबर व इंजिन नंबर लिहीले. तसेच विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी आधी लाल रंगाच्या गाडीचे टॅक्स इन्वाईस बनविले होते. परंतु, तक्रारकर्त्याने गाडीचा रंग बदलल्यामुळे लाल रंगाच्या गाडीचे इन्वाईस रद्द करुन त्याऐवजी शेरेन व्हाईट रंगाच्या गाडीचे इन्वाईस विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तयार केले. विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्ता यांना त्यांच्या मागणीनुसार व इच्छेनुसार गाडी दिलेली आहे.
तक्रारकर्त्याने त्याच्या गाडीला झालेल्या अपघातामुळे गाडी बदलून मिळण्याच्या दृष्टीकोनातून खोटी व चुकीची तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्याने कोणतेही कारण नसतांना रक्कम उकळण्याच्या उद्देशाने विरुध्दपक्ष यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे. तरी तक्रारकर्त्याची तक्रार रु. 10,000/- खर्चासह खारीज करण्यात यावी.
का र णे व नि ष्क र्ष
या प्रकरणातील तक्रारकर्ता यांची तक्रार, विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांचा स्वतंत्र लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले दस्तऐवज व शपथेवार साक्ष पुरावा तसेच उभयपक्षाने दाखल केलेला लेखी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमूद केला तो येणेप्रमाणे.
तक्रारकर्त्याचा युक्तीवाद असा आहे की, त्यांनी दिनांक 23-12-2011 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून टाटा कंपनीची गाडी नॅनो 20-12- एसटीडी मॉडेल रु. 1,63,492/- या रकमेत विकत घेतली. विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने तक्रारकर्त्याला नॅनो 2011 व 2012 चे मॉडेल दाखवले नाही, परंतु, असे सांगितले होते की, 2011 चे मॉडेल जर खरेदी केले तर तक्रारकर्त्याला रु. 20,000/- ची सुट मिळेल व 2012 चे टाटा नॅनो एस.टी.डी. मॉडेल खरेदी केले तर रु. 10,000/- या रकमेची सुट मिळेल तेव्हा तक्रारकर्त्याने 2012 चे टाटा एसटीडी मॉडेल निवडले व याच मॉडेलचे कागदपत्रे बनवण्यात आले. परंतु, गाडी ताब्यात दिल्यानंतर तक्रारकर्त्याच्या असे लक्षात आले की, विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी 2011 चे टाटा एस.टी.डी. मॉडेल तक्रारकर्त्याला दिले ही बाब तक्रारकर्त्याला दिलेल्या कागदपत्रांवरुन व चेसीस नंबरवर व्हाईटनर लावल्याचे व खोडतोड केल्याचे दिसते. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन तक्रारकर्त्याची फसवणूक केली तसेच तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे लाल रंगाची मॉडेलची मागणी केली होती. परंतु त्यांना एस.आर.एन. व्हाईट रंगाचे मॉडेल देण्यात आले. तक्रारकर्त्याला रु. 10,000/- चा लाभ देण्यात आला. परंतु, मॉडेल मात्र 2011 चे देण्यात आले. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्याला जुने मॉडेल देऊन रु. 20,000/- सुट असतांना देखील नवीन मॉडेल सांगून रु. 10,000/- सुट दिली आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रमांक 1 व 2 यांनी सेवेत न्युनता ठेवली आहे.
तक्रारकर्ता यांनी युक्तीवादात विरुध्दपक्ष क्रमांक 1 विरुध्द कोणतेही आक्षेप केलेले नाही. फक्त तक्रारीत असे नमूद आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी तक्रारकर्त्याला सदर वाहन घेण्याकरिता फायनान्स पुरवले आहे. त्यामुळे मंचाचे मते फायनान्स केलेली रक्कम विरुध्दपक्ष क्रमांक 1 नियमानुसार वसूल करुन घेण्यास पात्र आहे. परंतु, तक्रारीत तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रमांक 1 विरुध्द कोणतेही आक्षेप केलेले नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांचा लेखी जवाब गृहित धरुन त्यांची सेवेतील कोणतीही न्युनता नाही या निष्कर्षाप्रत हे मंच पोहचले आहे.
विरुध्दपक्ष क्रमांक 2 च्या लेखी युक्तीवादानुसार व त्यांनी दाखल केलेल्या सर्व दस्तऐवजावरुन मंचाने तक्रारकर्त्याचे वरील आरोप तपासले असता असे दिसले की, विरुध्दपक्षाने दाखल केलेला दस्त क्रमांक 1-ब “ कमिटमेंट फॉर्म ” यावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याने गाडीची बुकिंग करतेवेळी गाडी लाल रंगाची घेण्याचे ठरविले असावे कारण या फॉर्मवर नॅनो एस.टी.डी रेड असे लिहलेले आहे व रु. 10,000/- ची सुट देण्याबद्दलचा उल्लेख आहे. व उभयपक्षांच्या कथनानुसार देखील टाटा कंपनीने 2011 च्या मॉडेलवर फक्त रु. 10,000/- ची सूट देण्याचे जाहीर केले होते, असे दिसते. उभयपक्षाने दाखल केलेली डिलेवरी चलान या दस्तावर इंजिन नंबर व चेसीस नंबर व्हाईटनरने खोडल्याचे दिसते.
परंतु, याबद्दलचा विरुध्दपक्षाचा युक्तीवाद जसे की, तक्रारकर्त्याने आधी लाल रंगाची गाडी घेण्याचे ठरवले होते. परंतु, गाडीची डिलेव्हरी घेतांना त्यांनी लाल रंगाच्या गाडीऐवजी शेरेन व्हाईट रंगाची गाडी घेण्याचे ठरवले. त्यामुळे डिलेवरी चलानवर आधी ज्या लाल रंगाच्या गाडीचे चेसीस क्रमांक लिहिलेले होते ते क्रमांक व्हाईटनरने खोडून त्याऐवजी शेरेन व्हाईट क्रमांकाच्या गाडीचा चेसीस क्रमांक व इंजिन क्रमांक लिहिला गेला, हा युक्तीवाद मंचाने ग्राहय धरला आहे. कारण विरुध्दपक्षाने जे गाडीचे सर्व्हिसिंग केल्याचे कागदपत्रे रेकॉर्डवर दाखल केले. त्यावरुन देखील ही बाब सिध्द् झाली आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या या गाडीचे “ सर्व्हिस हिस्ट्री ” दस्त क्रमांक 4-ब नुसार जे दस्तऐवज दाखल केले आहे. त्यावरुन असे दिसत आहे की, तक्रारकर्त्याने सदरहू गाडी विकत घेतल्यानंतर गाडीची पहिली फ्री सर्व्हिसिंग विरुध्दपक्षाकडून दिनांक 10-03-2012 रोजी करुन घेतली आहे. त्यावेळेस तक्रारकर्त्याची चुकीचे मॉडेल दिल्याबद्दलची तक्रार नव्हती. दिनांक 22-06-2012 या सर्व्हिस डेटवरुन असे दिसते की, त्यावेळेस तक्रारकर्त्याच्या गाडीचा अपघात झाला होता व त्याबद्दलची दुरुस्ती केल्या गेली. त्यानंतर तक्रारकर्त्याने दिनांक 10-07-2012 रोजी विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून गाडीची रनिंग रिपेअर करुन घेतली होती. दिनांक 10-11-2012 या सर्व्हिस दिनांकावरुन असे दिसते की, तक्रारकर्त्याने या गाडीची दुरुस्ती फ्री सर्व्हिसिंग विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडून करुन घेतली होती. तक्रारकर्त्याने दाखल केलेले उप प्रादेशिक परिवहन मंडाळाचे या गाडीचे नोंदणी झाल्याचे दस्त दाखल केले आहे. त्यामध्ये देखील गाडीचे निर्मिती वर्ष नोव्हेंबर 2011 असे नमूद आहे. उभयपक्षाने दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन देखील असे दिसते की, तक्रारकर्त्याला गाडी खरेदी करते वेळेसच सदरहू गाडी ही 2011 चे मॉडेल असल्याचे संपूर्ण ज्ञान व माहिती होती. तक्रारकर्त्याने रेकॉर्डवर दाखल केलेले या गाडीचे कोटेशन दिनांक 23-02-2011 यांत तक्रारकर्त्याने नॅनो 2012 एसटीडी चे कोटेशन घेतले होते. परंतु, विरुध्दपक्षाने याच कोटशनची पूर्ण प्रत दाखल केली. त्यात नमूद असलेल्या अटींनुसार वित्तीय कंपनीकडून किंवा बँकेकडून गाडीच्या किंमतीचे ड्राफट विरुध्दपक्षाला देण्याआधी या गाडीचे मॉडेल उपलब्ध आहे किंवा नाही. याबद्दल शहानिशा करणे भाग आहे असे नमूद आहे व विरुध्दपक्षाच्या मते नवीन मॉडेल हे वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध होत असते त्यामुळे तक्रारकर्त्याने गाडीची बुकिंग केली. त्यावेळेस 2012 चे मॉडेल विरुध्दपक्ष क्रमांक 2 कडे उपलब्ध नव्हते हे विरुध्दपक्षाचे म्हणणे पटण्यासारखे आहे. अशा रितीने विरुध्दपक्षाने त्यांच्या युक्तीवादानुसार दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केल्यावर मंचाला स्पष्ट दिसून आले की, तक्रारकर्त्याने जानेवारी 2012 मध्ये विरुध्दपक्ष कमांक 2 कडून 2011 च्या मॉडेलची शेरेन व्हाईट रंगाची गाडी विकत घेतली होती व नवीन वर्षात जुन्या वर्षाच्या मॉडेलची गाडी विकत घेतल्यामुळे विरुध्दपक्ष क्रमांक 2 ने तक्रारकर्ता यांना रु. 10,000/- ची सुट ही दिलेली होती. त्यामुळे सदरहू गाडी अनेक दिवस वापरल्यानंतर अशाप्रकारची तक्रार करणे योग्य नाही. सबब, तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करणे योग्य राहील, असे मंचाचे मत आहे. सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अं ति म आ दे श
तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
न्यायीक खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.