निकाल
दिनांक- 03.12.2013
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष)
तक्रारदार अंगद आण्णा धन्वे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे व अप्रचलित व्यापार पध्दतीचा अवलंब केला म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 कंपनीचे टाटा सुमो हिक्टा जिप एम.एच.-23-एन-5097 सामनेवाले क्र.1 यांचेकडून खरेदी केली.तक्रारदार हे सामनेवाले क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत. सामनेवाले क्र.2 कंपनीने सदरील वाहनाची एक वर्षाची वॉरंटी अथवा 50000 किलोमिटर पर्यत वाहन चालल्यास तिच्यामध्ये काही खराबी आल्यास किंवा बिघाड झाल्यास आवश्यक ती दूरुस्ती करुन देण्याची जबाबदारी घेतली आहे. तक्रारदार यांनी सदरील वाहन खरेदी केल्यानंतर ब्रेकमध्ये समस्या निर्माण झाली. दि.1.4.2009 रोजी सर्व्हीसिंगच्या वेळी ब्रेक बुस्टर,लाइनर,टेंडेस मास्टर सिलींडर बदलून नवीन टाकले होते.दि.1.4.2009 रोजी दोन्ही बाजुच्या डिस्क बदलून टाकल्या होत्या. वाहनाची दूरुस्त करुनही ब्रेकची समस्या दुर झाली नाही. तक्रारदार यांनी ज्या ज्या वेळी वाहन सर्व्हीसिंगसाठी आणले त्या त्या वेळी तक्रारदार यांचे वाहन एक-एक महिना सामनेवाले क्र.2 यांने परत दिले नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले. वाहनाच्या सततच्या समस्यामुळे तक्रारदार यांनी भाडे वेळेवर नेला आले नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले.तक्रारदार यांनी महात्मा फुले मा.विकास महामंडळ यांचेकडून रु.4,00,000/- कर्ज घेतले. वाहन बंद राहिल्यामुळे तक्रारदार यांना व्याज भरावे लागले. सदरील वाहनामध्ये समस्या सूरुवातीपासून होती.सदरील वाहन दूरुस्तीकामी नांदेड येथे नेण्यास सांगितले.नांदेड येथे वाहन दुरुस्तीसाठी घेऊन गेले.10 दिवस वाहन दुरुस्तीसाठी गैरेजमध्ये लाऊन तक्रारदार यांना वाहन दूरुस्तीसाठी लागणारा सर्व खर्च करावा लागला. ज्या ज्या वेळी तक्रारदार यांना वाहन सर्व्हीसिंगसाठी सामनेवाले क्र.2 यांचेकडे नेले त्या त्या वेळी तक्रारदार यांनी ब्रेकची समस्या मांडली.तक्रारदार यांना वॉरंटी कालावधीमध्ये सदरील वाहनाच्या दुरस्तीचा खर्च करावा लागला. तक्रारदार यांचे त्या कालावधीतील उत्पन्न बुडाले. तक्रारदार यांना सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी दिल्या बाबत व झालेल्या नुकसान भरपाई बाबत नोटीस दिली. सामनेवाले यांनी त्यांची कोणतीही दखल घेतली नाही. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून रु.1,25,000/- नुकसान भरपाई मिळावी व त्यावर 12 टक्के व्याज मिळावे अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु.15,000/- मिळावा अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.1 टाटा मोटर्स हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.11 अन्वये आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांनी तक्रारीमध्ये जे म्हणणे मांडले आहे ते सामनेवाले यांनी नाकारलेले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही असे नमूद केले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार हा सामनेवाले क्र.1 यांचा ग्राहक नाही असे म्हटले आहे.सदरील वाहनामध्ये कोणताही उत्पादकीय दोष नव्हता व नाही. त्या बाबत तक्रारदार यांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही असे कथन केले आहे. सामनेवाले यांनी पूढे असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी सदरील वाहन हे व्यावसायीक कारणासाठी घेतले आहे. तक्रारदार हे ते वाहन भाडयाने देऊन नफा कमावत आहेत. त्यामुळे सदरील तक्रार या मंचापूढे चालू शकत नाही. सामनेवाले क्र.1 यांनी असे कथन केले आहे की,तक्रारदार यांना मॅन्यूअल मध्ये निर्देशीत केलेल्या बाबीचे पालन केले नाही. तक्रारदार यांचे चूकीमूळे ब्रेकमध्ये दोष निर्माण झाला. तक्रारदार यांना वेळोवेळी वाहनाची सर्व्हीसिंग करुन घेतली नाही. तक्रारदार यांनी सदरील वाहनाचा ब्रेकमध्ये उत्पादकीय दोष आहे ही बाब सिध्द करण्यासाठी सदरील वाहन सक्षम व्यक्तीकडून तपासून घेतली नाही अगर तसा अहवाल या मंचासमोर सादर केलेला नाही. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी दि.1..4.2009 रोजी ब्रेक बूस्टर, लाईनर, टेंडेम मास्टर सिलींडर बदलले नाही. दि.17.4.2009 रोजी प्रथम वाहन सर्व्हीसिंगसाठी आणले. त्यावेळेस तक्रारदार यांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. दि.08.06.2009 रोजी तिस-या सर्व्हीसिंगसाठी वाहन औरंगाबाद येथे नेले.त्यावेळेही तक्रारदार यांनी ब्रेक बाबत कोणतीही तक्रार केली नाही. सामनेवाले यांनी सदरील वाहन दूरुस्तीकामी कधीही एक महिना पेक्षा जास्त कालावधी करीता ठेवलेले नाही.दि.16.9.2009 रोजी चौथी फ्रि सर्व्हीसिंग करण्यात आली.त्यावेळेस तक्रारदार यांनी वाहनाचे ब्रेकमध्ये दोष आहे ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. दि.21.10.2009 रोजी तक्रारदार यांनी पुणे येथे यु.बी.भंडारी यांचे वर्कशॉपमध्ये वाहन नेले त्यावेळी ब्रेक बाबत तक्रार केली. सामनेवाले यांचे डिलरने त्या तक्रारीचे निरसन केले व दुरुस्तीही करुन दिली.दि.26.11.2009 रोजी सदरील वाहनाची सर्व्हीसिंग बीड येथे करण्यात आली. त्यावेळी ब्रेकचे दोषा बाबत तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली नाही. दि.14.12.2009 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडे सदरील वाहन नेले व सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांचे ब्रेक दोषा बाबत तक्रारदाराचे निवारण केले व दुरुस्त करुन दिले. दि.30.12.2009 रोजी सामनेवाले क्र.2 यांचेकडे पुन्हा वाहन नेण्यात आले. तक्रारदार यांचे तक्रारीचे निरासन करण्यात आले. सामनेवाले यांचे कथन की, तक्रारदार यांनी त्या त्या वेळी वाहन सर्व्हीसिंगसाठी आणले त्या त्या वेळी तक्रारदार यांनी सांगितलेले कामा बाबत लक्ष देऊन ते दूरुस्त करुन देण्यात आलेले आहे. सदरील वाहनाचे ब्रेकमध्ये दोष हा तक्रारदार यांनी वाहन निष्काळजीपणे चालविल्यामुळे होत आहे.सबब, सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांची तक्रार रदद व्हावी अशी विनंती केली आहे.
सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.9 अन्वये आपले लेखी म्हणणे सादर केले. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही असे कथन केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार यांना दि.27.10.2009 रोजी सदरील वाहनाचे ब्रेक बाबत कधीही तक्रार केली नाही. सदरील तक्रार पुणे येथील अधिकृत डिलर भंडारी यांचे वर्कशॉपमध्ये केली होती. त्या वेळी सदर वाहनाचे ब्रेक लाईनीग घासलेले होते. ते डिलरने बदलून दिले. तक्रारदार हे वाहन 43000 किलो मिटर चालल्यानंतर सामनेवाले क्र.2 यांचेकडे घेऊन आले.वाहनाची तपासणी केली असता ब्रेक बूस्टर बदलून देण्यात आले. दि.9.6.2011 रोजी सामनेवाले क्र.2 यांनी ब्रेक लाइनर, ब्रेक लिकेज बदलून दिलेले आहे. दि.9.6.2011 नंतर तक्रारदार हे सामनेवाले क्र.2यांचेकडे कधीही आले नाही. सामनेवाले क्र.2 यांनी असे कथन केले आहे की, पहिल्या सर्व्हीसिंगच्या वेळी वाहनाचे डिस्क बदलून टाकण्यात आले हे तक्रारदार यांचे कथन चूक आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे विरुध्द मोघम स्वरुपाचे आरोप केलेले आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे वाहन कधीही जास्त दिवस गैरेजमध्ये दूरुस्तीसाठी ठेवले नाही. तक्रारदार यांनी सदरील वाहन घेऊन जाण्यासाठी कधीही खर्च केलेला नाही. सामनेवाले यांनी दयावयाचे सेवेत कोणतीही त्रूटी ठेवलेली नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करावी अशी विनंती केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत नि.4 अन्वये सदरील वाहनाचे प्रादेशीक परिवहन मंडळा कडील तक्रारदार यांचें नांवे वाहन असल्या बाबत प्रमाणपत्र, सदरील वाहनाची विमा पॉलिसी, सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी वाहन सर्व्हीसिंग नेले व दूरुस्त करुन घेतले त्या बाबत कागदपत्र, सामनेवाले यांना दिलेली नोटीस हजर केली आहे. तक्रारदार यांनी स्वतःचे शपथपत्र नि.11 अन्वये दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी जवाबासोबत तक्रारदार यांचे वाहन वेळोवेळी सर्व्हीसिंगसाठी आणले व वाहनाचे कोणते कोणते काम करण्यात आले यासंबंधी संपूर्ण कागदपत्र हजर केले आहेत. तक्रारदार यांनी पुराव्यासोबत दाखल केलेले कागदपत्र सामनेवाले क्र.1 यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे वकील श्री.विर यांचा यूक्तीवाद ऐकला. सामनेवाले क्र.1 यांचे वकील श्री.थिंगळे यांचा यूक्तीवाद ऐकला, सामनेवाले क्र.2 यांहचे वकील श्री.पिसूरे यांचा यूक्तीवाद ऐकला. न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब
तक्रारदार यांनी शाबीत केली आहे काय नाही.
2. सदरील तक्रारदार यांचे वाहनातील दोष उत्पादकीय
दोष आहे काय ही बाब तक्रारदार यांनी शाबीत केली
आहे काय नाही.
3. तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई
मिळण्यास पात्र आहेत काय नाही.
4. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदार यांचे वकील यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 कंपनीचे टाटा सुमो हिक्टर जीप सामनेवाले क्र.2 यांचेकडून खरेदी केली होती. सदरील वाहनाचे ब्रेकमध्ये सुरुवातीपासून दोष आढळून येत होता. सदरील दोष वेळोवेळी सामनेवाले क्र.2 यांचे निदर्शनास आणला. वेळोवेळी सदरील वाहन दूरुस्तीकामी कार्यशाळेमध्ये न्यावे लागले. सामनेवाले यांनी मुदतीत दूरुस्ती करुन दिली नाही. बरेच दिवस वाहन सामनेवाले यांनी ठेऊन घेतले त्यामुळे तक्रारदार याचे आर्थिक नुकसान झाले. सदरील वाहनाच्या ब्रेकमध्ये उत्पादीत दोष होता. त्यामुळे तक्रारदार यांचे व्यवसायावर परिणाम झाला. तक्रारदार यांनी सदरील वाहन हे कर्ज काढून घेतले होते.तक्रारदार यांनी सदरील वाहन स्वतःचे उपजिवीका भागविण्यासाठी घेतले होते. तक्रारदार हे तक्रारीत नमूद केलेली नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
सामनेवाले यांचे वकीलांनी असा युक्तीवाद केला की, सदरील वाहनामध्ये कोणताही उत्पादित दोष नाही.तक्रारदार यांनी महत्वाच्या बाबी लपवून ठेवलेल्या आहेत. तक्रारीत तक्रारदाराने वाहनामध्ये कोणता दोष आढळून आला ही बाब स्पष्टपणे नमूद केलेली नाही. तक्रारदार हे सदरील वाहनाचे ब्रेकमध्ये दोष आहे असे म्हणतात परंतु ते सिध्द करण्यासाठी कोणत्याही तज्ञाचा अहवाल नाही तसेच सदरील वाहन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले नाही. सामनेवाले यांचे वकिलांनी असा यूक्तीवाद केला की, सामनेवाले क्र.1 यांनी जे कागदपत्र दाखल केले आहेत त्यावरुन तक्रारदार यांनी ब्रेक संबंधी प्रथम तक्रार पुणे येथील डिलर श्री.भंडारी यांचे वर्कशॉपमध्ये केली आहे. त्यावेळी वाहनाचे ब्रेक पॅक व ब्रेक लाईनर घासले होते, ते बदलून देण्यात आले. तसेच वाहनाचे 44502 किलोमिटर चालल्यानंतर ब्रेक बुस्टर वॉरंटीमध्ये बदलून देण्यात आलेले आहे. दि.9.6.2011 नंतर तक्रारदार हा सदरील वाहन घेऊन वर्कशॉपमध्ये कधीही आलेले नाहीत अगर ब्रेक बाबत तक्रार केलेली नाही. सबब, सामनेवाले यांचे वकीलाचे कथन की, तक्रारदार हे तक्रारीत नमूद केलेली नुकसान भरपाई मिळण्यास ते पात्र नाहीत.
तक्रारदार यांनी दाखल केलेला संपूर्ण पुरावा व सामनेवाले यांनी दाखल केलेला पुरावा व यूक्तीवाद लक्षात घेतला. तक्रारदार यांनी सदरील वाहन टूरिस्ट टॅक्सी म्हणून वापरण्यासाठी घेतलेले आहे. सदरील वाहन तक्रारदार हे व्यवसाय करण्यासाठी वापरत होते. तक्रारदार यांचे तक्रारीत दिलेला दिनांक व सामनेवाले यांनी दाख केलेला दस्ताऐवज यांचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी प्रथम वाहनाची सर्व्हीसिंग केली त्यावेळी ब्रेक बाबत कोणतीही तक्रार केलेली नाही असे निदर्शनास येते. तक्रारदार यांनी प्रथम दि.21.10.2009 रोजी यु.ए.भंडारी पुणे यांचे वर्कशॉपमध्ये वाहनाचे ब्रेकस बाबत तक्रार दाखल केली. त्यावेळेस पुणे येथे ब्रेक दूरुस्त करुन देण्यात आला. त्या बाब दि.21.10.2010 रोजीचे जॉब कार्ड हजर केलेले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे वाहनाचे सव्हीसिंगचे जॉब कार्ड हजर केले आहे त्यांचे काळजीपुवर्क पाहणी केली असता तक्रारदार याचे वाहन वेळोवेळी सर्व्हीसिंग करुन देण्यात आलेले आहे व आवश्यक त्या दुरुस्त्या करुन देण्यात आलेल्या आहेत. तक्रारदार हे सदरील वाहन प्रवासी वाहतूक करण्याकरिता वापरत आहेत. त्यामुळे सदरील वाहनाचा वापर व्यवस्थित झालेला नाही असे दिसते.साहजिकच सदरील वाहनाचे रिपेरिंग वेळोवेळी करण्याची आवश्यक भासते. तक्रारदार यांचे तक्रारीत नमूद केलेल्या बाबीचा सखोल विचार केला असता तक्रारदार यांनी ब्रेकमध्ये नेमका कोणता दोष आहे, तो दोष उत्पादक कंपनीचा आहे या बाबत सबळ पुरावा दिलेला नाही. बरेच वेळा वाहनाचा योग्य प्रकारे, ब्रेकचा योग्य प्रकारे वापर न केल्यामुळे अगर ड्रायव्हरचे चूकीमूळे अशा प्रकारचे दोष निर्माण होऊ शकतात. सदरील ब्रेक बाबत उत्पादीत दोष आहे हे सिध्द करण्यासाठी सदरील वाहन योग्य त्या सक्षम व्यक्तीकडून अगर कार्यशाळेकडून तपासून त्यांचा अहवाल मंचासमोर येणे गरजेचे होते. तो अहवाल सादर केलेला नाही अगर वाहन तपासणी बाबत मंचाकडे अर्ज दिलेला नाही. तक्रारदार सदरील वाहन व्यावसायीक कारणासाठी व नफा मिळविण्यासाठी वापरत आहे.त्या कारणास्तव सुध्दा तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत. तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेल्या बाबी पुरावा देऊन शाबीत केलेल्या नाहीत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी ठेवली आहे व त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले आहे ही बाब तक्रारदार हे शाबीत करु शकलेले नाहीत. ज्या ज्या वेळी वाहन सर्व्हीसिंगसाठी कार्यशाळेमध्ये न्यावे लागते त्या त्या वेळी दूरुस्ती कामी ते वाहन ठेवावे लागते. तक्रारदार यांनी हे शाबीत केलेले नाही की, सामनेवाले यांनी दुरुस्तीकामी जास्त दिवस वाहन वर्कशॉपमध्ये ठेवले व वाहन देण्यास विलंब केला. सबब, या मंचाचे मत की, तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत.
मुददा क्र.1 ते 3 चे उत्तर नकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.