निकाल
दिनांक- 23.07.2013
(द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदार हा मौजे बेलगाव ता.आष्टी जि.बीड येथील रहिवाशी आहे. तक्रारदार हा शेतकरी असून त्यांचे शेतामध्ये सन 2011 मध्ये ऊसाचे पिक घेतले होते. सदर ऊस हा त्यांने साईकृपा साखर कारखाना लि.हिरडगांव या साखर कारखान्यावर घातला होता. ऊसाचे बिल रक्कम रु.79,505/- चा चेक क्र.00486 असा आहे. तक्रारदाराने सदर चेक सामनेवाले बँकेच्या आष्टी शाखेत तक्रारदाराचे खाते क्र.52172431387 मध्ये दि.7.9.2011 रोजी वटवण्यासाठी जमा केला. परत तक्रारदाराने दि.18.05.2011 रोजी दुसरा ऊसाच्या हप्त्याचा रक्कम रु.43,212/- सामनेवाला बँकेत जमा केला. सदर चेक जमा होऊन आठ दिवसांत रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल असे सामनेवाला यांनी सांगितले.
चेक वटवण्यासाठी सामनेवाले हे कमिशन घेतात. सामनेवाले ही राष्ट्रीयकृत बँक आहे. तक्रारदार व सामनेवाले यांच्यात ग्राहक व मालक असा नातेसंबंध आहे त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. वरील दोन्ही चेक वटवण्यासाठी सामनेवाला यांनी आठ दिवसांत देणे आवश्यक होते. परंतु अनेक वेळा चकरा मारुन देखील चेकची रककम जमा झाली विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होते. तक्रारदाराने दि.26.12.2011 रोजी सामनेवाला यांना कायदेशीर नोटीस दिली. सदर नोटीसला सामनेवाला यांनी दि.9..1.2012 रोजी अतिशय बेजबाबदारीने उतत्र दिले. सामनेवाले यांनी आजपर्यत तक्रारदारांना चेकची रककम दिली नाही.
तक्रारदार हा शेतकरी आहे. शेतीच्या उत्पन्नावरच त्यांची उपजीवीका चालते. मुलीच्या लग्नासाठी त्यांना पोकळे संरपंचाकडून रु.1,00,000/- कर्जाऊ घ्यावे लागले त्यामुळे त्यांना खुप मानसिक त्रास झाला. तक्रारदारांनी सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, दोन्ही चेकची रक्कम व त्यावरील व्याज जमा तारखेपासून 18 टक्के व्याजासह देण्याचा आदेश व्हावा, तसेच मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व खर्चापोटी रक्कम रु.10,000/- मिळावेत.
सामनेवाला हे हजर होऊन त्यांनी त्यांचा लेखी जवाब दि.2.4.2013 रोजी दाखल केला आहे. हे त्यांना मान्य आहे की, तक्रारदाराने ऊसाचे रक्कमेचे बिल रु.79,505/- चा धनादेश कारखान्याने दिला होता. तो चेक त्यांनी त्यांचे आष्टी येथील शाखेत खाते क्र. 52172431387 मध्ये वटविण्यासाठी दि.7.9.2011 रोजी जमा केला होता. दुसरा चेक दि.18.05.2011 रोजी रककम रु.43,212/- हा चेक सुध्दा जमा केला होता हे मान्य आहे.सदर धनादेश वटविणे कामी साकेत कुरिअर तालुका आष्टी मार्फत मुंबई येथील एस.बी.एच. शाखेला पाठविण्यात आला. जो तेथे मिळाला त्यांची पावती सामनेवाला यांनी दाखल केली आहे. परंतु सदर मुंबई एस.बी.एच. शाखेत सदरचा धनादेश गहाळ झाला. त्यामुळे सामनेवाला यांनी दुसरा धनादेश श्रीगोंदा बँक कडून घेऊन मुंबई कडे पाठविण्यात आला व तो धनादेश बँकेत जमा झाला. तक्रारदारास त्यांनी दि.26.03.2012 रोजी कळविले व तक्रारदार यांच्या खात्यात रक्कम दि.24.3.2012 रोजी जमा झाली. तक्रारदाराच्या खात्यात रककम जमा झाली त्यामुळे सामनेवाला यांनी सेवेत कसूर केलेला नाही. सदरची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी अशी माण्गाी सामनेवाला यांनी केली आहे.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्यांचे शपथपत्र, चेक जमा केलेल्या दोन पावत्या, शाखाधिकारी यांना पाठविलेले पत्र, ऊस खरेदी दोन बिल रक्कम रु.43,212/- व रु.79,505/-, बँकेचे नोटीसीचे उत्तर इत्यादी कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. सामनेवाला यांनी लेखी म्हणण्याच्या पृष्टयर्थ सयद पाशा फरीदसाब यांचे शपथपत्र, बँकेचे स्टेटमेंट, साकेत कुरिअर सर्व्हीस यांची पावती,श्री बालाजी कुरिअर सर्व्हीस यांची पावती, बँकेनी तक्रारदार यांना दिलेले पत्राची छायाप्रत इत्यादी कागदपत्र दाखल केले आहे
तक्रारदार यांची तक्रार व दाखल कागदपत्र, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे यांचे बारकाईने अवलोकन केले असता खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार हे सिध्द करु शकतात का की, सामनेवाला यांनी
त्यांना सेवा देण्या मध्ये त्रूटी केली आहे ? होय.
2. तक्रारदार हा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
2. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार यांनी आपले शपथपत्र व कागदपत्रामध्ये चेक जमा केलेल्या दोन पावत्या, शाखाधिकारी यांना पाठविलेले पत्र, ऊस खरेदी दोन बिल रक्कम रु.43,212/- व रु.79,505/-, बँकेचे नोटीसीचे उत्तर दाखल केले आहे. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे शपथपत्र व कागदपत्र , बँकेचे स्टेटमेंट, साकेत कुरिअर सर्व्हीस यांची पावती,श्री बालाजी कुरिअर सर्व्हीस यांची पावती, बँकेनी तक्रारदार यांना दिलेले पत्राची छायाप्रत इत्यादी कागदपत्र दाखल केले यांचे बारकाईने अवलोकन केले. सदर तक्रारदार हा शेतकरी आहे. त्यांने त्यांचे शेतात ऊस पिक घेतले. सदर ऊस हा साईकृपा साखर कारखाना लि.हिरडगांव येथे घातला. सदर ऊसाचे बिल म्हणून तक्रारदाराला रक्कम रु.79,505/- चा धनादेश क्र.00486 मिळाला. तसेच तक्रारदाराला ऊसाच्या बिलाच्या रक्कमेपोटी दूसरा धनादेश रकक्म रु.43,212/- दि.18.5.2011 रोजी दिला. सदरची दोन्ही धनादेश तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे वटवण्यासाठी दि.7.9.2011 व दि.18.5.2011 रोजी दिले. सदरचे धनादेश आठ दिवसांत वटवून येणे आवश्यक होते परंतु दिलेल्या मुदतीत सदरचे चेक वटवून आले नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. शेवटी तक्रारदाराने दि.26..12.2011 रोजी सामनेवाला यांना कायदेशीर नोटीस पाठविली. चेक न वटल्यामुळे त्यांनी नुकसान भरपाई मिळावी व त्यांचे सेवेत कसूर झाल्याबददल नूकसान भरपाईची मागणी केली आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे शाखा व्यवस्थापक सयद पाशा फरीदसाब यांचे शपथपत्र पुरावा म्हणून दाखल केले आहे. शपथपत्रासोबत कागदपत्र नाना पोकळे यांचे बचत खात्यांचा उतारा दाखल केला आहे. साकेत कुरिअरची पावती दि.19.09.2011 ची दाखल केली आहे. तसेच बालाजी कुरिअर सर्व्हीस मुंबई यांची पावती मुंबई एस.बी.एच. शाखेला धनादेश मिळाल्याची प्रत दाखल केली आहे. दि.26.3.2012 रोजीचे एस.बी.एच. शाखा आष्टी यांनी तक्रारदार यांना पाठविलेले पऋ यांची छायाकिंत प्रत दाखल केली आहे.
सामनेवाला यांचे पुराव्याचे कागदपत्राचे अवलोकन केले असता सामनेवाला यांचे कथन असे आहे की, सामनेवाला यांनी धनादेश रककम रु.79,505/- चा तसेच धनादेश रक्कम रु.43,212/- वटवण्यासाठी सामनेवाला यांचेकडे जमा केला होता ही बाब मान्य केली आहे. तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे हे ही मान्य केले आहे. तसेच तक्रारदारास धनादेशाची पुर्ण रककम मिळाली नाही ही बाब मान्य केली नाही. तसेच सामनेवाला यांनी आपल्या शपथपत्रात एक धनादेश रक्कम रु.79,505/- हा साकेत कूरिअर आष्टी तर्फे मुंबई एस.बी.एच. शाखेला पाठविण्यात आला आहे. परंतु सदर धनादेश मुंबई एस.बी.एच. शाखा यांचेकडून गहाळ झाला आहे हे मान्य केले आहे. म्हणून सदर धनादेशाची दूसरी प्रत श्रीगोंदा बँकेकडून घेऊन मुंबई एस.बी.एच. कडे पाठविण्यात आला आहे व रक्कम जमा करण्यात आली असे कथन केले आहे.
सामनेवाला व तक्रारदार यांचे शपथपत्र व पुराव्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सामनेवाला यांनी धनादेश वटवण्यासाठी सेवेत त्रूटी केली आहे हे ठरवण्सो महत्वाचे आहे.
तक्रारदाराचे वकील श्री.बी.एस.बोडखे यांचा यूक्तीवाद ऐकला तसेच सामनेवाला यांनी आपला लेखी यूक्तीवाद दाखल केला आहे. तक्रारदारांनी दाखल केलेलया बँकेच्या स्लीपची पावती आणि सामनेवाला यांचेकडून जमा झालेला धनादेशाची रक्कम यामध्ये चेक जमा करण्यासाठी सहा महिन्याचा विलंब झालेला आहे हे दिसून येते. सदरचा धनादेश सहा महिने उशिराने वटला आहे असे निदर्शनास आले आहे. धनादेश वेळेवर जमा न झाल्यामुळे तक्रारदारांच्या मुलीच्या लग्नकार्यासाठी त्यांना बन्सी भाऊराव पोकळे, संरपंच यांचेकडून रु.1,00,000/- मदत घ्यावी लागली. त्याबाबत तक्रारदार यांनी बन्सी पोकळे यांचे शपथपत्र पुरावा म्हणून दाखल केलेले आहे. तक्रारदारांना स्वतःचे हक्काचे पैसे असताना सुध्दा सामनेवाला यांच्या निष्काळजीपणामुळे विनाकारण त्रास होऊन दुसरी कडून रककम उसनवारी घ्यावी लागली. यावरुन हे सिध्द होते की, तक्रारदारांना निश्तितच मानसिक व शारीरिक व आर्थिक त्रास झालेला आहे.
तक्रारदाराचा युक्तीवाद वाचला असता सामनेवाला यांचेकडून तक्रारदाराला त्यांचा धनादेश जमा करण्यास विलंब झालेला आहे त्यामुळे सामनेवाला यांनी सेवेत कसूर केलेला आहे हे सिध्द होते. सामनेवाला यांनी त्यांचे दाखल केलेल्या विवेचनावरुन त्यांनी धनादेश जमा करण्यास विलंब झाला हे त्यांनी मान्य केले आहे.
वरील सर्व विवेचनावरुन हे सिध्द होते की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे धनादेश जमा करण्यास विलंब करुन सेवेत कसूर केला आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, धनादेश क्र. 00486 रक्कम रु.79,505/- वर धनादेश जमा केल्याचा दि.07.09.2011 पासून ते रककम जमा झाल्याचा दि.24.03.2012 पर्यत द.सा.द.शे.9 टक्के फक्त व्याज दयावे तसेच दुसरा धनादेश रककम रु.43,212/- वर धनादेश जमा केल्याचा दि.18.05.2011 पासून ते रक्कम जमा झाल्याचा दि.09.11.2011 पर्यत द.सा.द.शे.9 टक्के फक्त व्याज दराने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत व्याज दयावेत.
3. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व दाव्याचा खर्च रु.2500/- निकाल कळाल्यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती मंजुषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.