जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …...
ग्राहक तक्रार क्रमांक – 53/2011 तक्रार दाखल तारीख- 05/04/2011
रामधन संपतराव कांदे,
वय – 36 वर्ष, धंदा – शेती व मुकादम
रा.जागींरमोहा,ता.धारुर, जि.बीड. ....... तक्रारदार
विरुध्द
शाखा व्यवस्थापक,
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, शाखा- धारुर
हुतात्मा स्मारक समोर, वाय.आर.शेटे बिल्डिंग,
किल्लेधारुर ता. धारुर जि.बीड ........ सामनेवाले.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य
तक्रारदारातर्फे – वकील – आर.बी.धांडे,
सामनेवालेतर्फे – वकील – व्ही.व्ही.कुलकर्णी/ए.डी.काळे,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा जहागींरमोहा ता.धारुर जि.बीड येथील रहिवाशी असुन शेती व साखर कारखान्याला मजूर पुरविण्याचे मुकादमाचे काम करतो.
तक्रारदाराने सामनेवाले बँकेत सर्व कागदपत्राची पूर्तता करुन बचत खाते क्रं.30803763795 दि.25.6.2009 रोजी उघडले आहे. सदर बचत खात्यास बँकेने एटीएम कार्ड दिलेले आहे.
दि.15.10.2010 रोजी बचत खातेवर रक्कम रु.41,789/- शिल्लक होती. दि.16.10.2010 रोजी बँकेत गेलो असता दि.14.10.2010 रोजी एस.बी.एच.बँकेच्या ए.टी.एम मधुन रक्कम रु.20,000/- काढले आहेत त्याची नोंद आमच्या बँकेत आली नाही असे सांगुन खात्यावरील व्यवहार थांबवुन ठेवले आहे. असे सामनेवाला यांनी तक्रारदारास सांगितले. त्यावेळेस तक्रारदाराने दि.14.10.2010 रोजी रक्कम न काढले बाबत सांगितले. त्यानंतर तक्रारदार सामनेवाला यांचे कडे गेला असता खाते परत सुरु केल्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने दि.15.10.2010 रोजी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद यांचे एटीएम मधुन पैसे काढले आहेत. त्यानंतर तक्रारदार दि.30.10.2010 रोजी एटीएम वर पैसे काढण्यासाठी गेला असता त्यांला खात्यावर रु.534/- शिल्लक असल्याचे आढळून आले. त्यानंतर तक्रारदाराने दि.13.11.2010 रोजी स्वतःच्या खात्यावर रु.15,000/- जमा केले असे एकूण खात्यावर रु.15,534/- शिल्लक रक्कम होती.
तक्रारदाराने दि.11.02.2011 रोजीचा चेक नंबर 901857 रु.15,000/- चा श्री.जयसिंग राजपुत यांचे नांवे दिला तो पास होण्यास अडचण येऊ नये म्हणून तक्रारदाराने दि.09.02.2011 रोजी रु.800/- भरले. दि.14.2.2011 रोजी जयसिंग राजपूत यांने तक्रारदारास खात्यावरील व्यवहार बंद केल्याचे सांगितले. तक्रारदार पासबुक भरणेसाठी सामनेवालाकडे गेला असता दि.14.10.2010 रोजी आपण स्टेट बँक ऑफ हैद्राबाद एटीएम मधुन काढलेली रक्कम रु.20,000/- मुळे आपले खाते बंद ठेवले आहे. याबाबत जास्ती चौकशी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास अपमानास्पद वागणुक देऊन बँकेतून जाण्यास सांगितले.
तक्रारदाराने खाते क्र.30803763795 हे पुर्ववत चालु करुन घ्यावे. मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- तक्रारीच्या खर्चापोटी रु.3000/- व त्यांस निकाल तारखेपासुन 18 टक्के व्याज मिळावे तसेच दि.14.10.2010 रोजीच्या बॅंक रेकॉरिंगची सीडी न्यायमंचात दाखल करुन तक्रारदारानेच रक्कम रु.20,000/- काढले आहे हे सिध्द करावे अशी मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले लेखी म्हणणेच्या पुष्ठयार्थ एकुण 02 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले यांनी आपले लेखी म्हणणे दि.11.07.2011 रोजी दाखल केले असुन
तक्रारदाराने दि.14.10.2010 रोजी एटीएम मधुन काढलेले नसुन ते दि.3.10.2010 रोजी काढलेले आहेत. सदर एटीएम द्वारे काढलेली रक्कम रु.20,000/- ची नोंद तक्रारदाराचे खात्यामधून कमी झालेली नसल्यामुळे तक्रारदाराचे खाते होल्ड ठेवण्यात आले होते. दि.3.10.2010 ची ए.टी.एम सीडीची नोंद पाहिली तर एस.बी.एच.किल्लेधारुर येथे झाली असुन सदरील रेकॉडींग सिडी मिळणे शक्य नाही, असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. तसेच तक्रारदाराने रक्कम रु.20,000/- बुडवण्यासाठी व सामनेवाले यांना त्रास देण्यासाठी खोटी तक्रार केलेली आहे. तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाले यांनी आपले लेखी म्हणण्याचे पूष्ठयार्थ एकुण 03 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रारदाराची तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे सोबतची कागदपत्रे तसेच तक्रारदार व सामनेवाले यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याचे बारकाईने आवलोकन केले असता,
सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्राचे बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदाराने स्टेट बँक ऑफ हैद्राबाद एटीएम दि.3.10.2010 रोजी सकाळी 10.05 वाजता रु.20,000/- काढलेचे एटीएम च्या टीएक्स नंबर 8477 वर दिसते. येथे याबाबत तक्रारदाराने स्टेट बँक ऑफ हैद्राबाद चे एटीएम चे सीसीटीव्ही चे फुटेजची सीडी दाखल करावे असे म्हटले आहे. परंतु सामनेवाले यांनी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद च्या एटीएम मधून रक्कम काढलेले असल्यामुळे व ती 60 दिवसांचा रेकॉडींग राहते असे सांगितले. त्यामुळे ते दाखल करु शकत नाही असे म्हटले आहे.
सामनेवाला यांनी मा. राष्ट्रीय आयोग यांचे अपील नंबर 3182/2008 –सीपीआर (2) 2011 यांचा आधार घेतला आहे. In view of elaborate procedure evolved by Bank it is not possible for money to be withdrawn by an unauthorized person from ATM without ATM card and knowledges of PIN Number असे म्हटले आहे. यांचा विचार करता तक्रारदाराने दि.14.10.2010 रोजी नंतर सुध्दा एटीएम द्वारे रक्कम काढली आहे. म्हणजे एटीएम कार्ड हे तक्रारदाराच्या जवळ आहे. तसेच तक्रारदाराने केलेले मागणीच्या विनंतीचे अवलोकन केले असता दि.3.10.2010 रोजीची रक्कम रु.20,000/- परत मिळण्याची मागणी नसुन त्यांचे खाते हे पुर्ववत चालू करण्याचे आहे. तक्रादाराने दाखल केलेला खाते उता-याचे बारकाईने अवलोकन केले असता दि.14.10.2010 ते 13.11.2010 या कालावधीत कमीत कमी रु.16208/- ते जास्तीत जास्त रु.46701/- अशी रक्कम शिल्लक दिसून येते आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून रु.20,000/-दि.03.10.2010 रोजी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद च्या एटीएम मधून काढली आहे ती येणे आहे असे म्हटले आहे. त्यामुळे दि.14.10.2010 रोजी अकाऊट होल्ड वर ठेवणे योग्य होते. कारण याबाबत सामनेवाला यांनी दि.03.10.2010 रोजी स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या एटीएम मधील व्यवहाराची खातर जमा करावयाची होती. परंतु दि.14.02.2011 रोजी तक्रारदाराचे अकाऊट होल्ड वर ठेवले सामनेवाला यांनी तक्रारदारास कोणत्या कारणासाठी अकाऊट होल्डवर ठेवले आहे. यांची नोटीस देणे आवश्यक होते व पुर्वीच्याच दि.14.10.2010 रोजीच्या कारणासाठी दुस-या वेळेस तक्रारदाराचे अकाऊट बंद ठेवणे हे अयोग्य आहे. त्यामुळे तक्रारदारास घ्यावयाचे सेवेत कसूर केला आहे हे सिध्द होते.
तक्रारदारास त्याचे अकाऊट 030803763795 हे पुर्ववत चालु करुन देणे, तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1500/- मिळण्यास पात्र आहे असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, आदेश प्राप्तीपासुन 15 दिवसांत तक्रारदाराचे अकाऊट नंबर 030803763795 पुर्ववत चालू करावे.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रु.2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1500/- (अक्षरी रुपये पंधराशे फक्त) दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
( अजय भोसरेकर ) ( पी. बी. भट )
सदस्य, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि.बीड