निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्र तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- सामनेवाला ही बँक असून ग्राहकांना कर्जपुरवठा करतात. 2 तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून वैयक्तिक कर्ज रु.1,20,000/- दि.20.12.2007 रोजी घेतले, त्याचा कर्ज खाते क्र.45679312 असा होता. तक्रारदारांचे देय रक्कम रु.99,824.75पैसे इतकी होती. त्यावेळेस सामनेवाला व तक्रारदार यांच्यात तडजोडीची बोलणी होऊन तक्रारदारांनी सामनेवाला यांना रक्कम रु.75,000/- इतकी दयावयाची ठरली. 3 तक्रारदारांची अशी तक्रार आहे कि, तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.05.09.2008 रोजी झालेल्या तडजोडीनुसार तक्रारदारांनी सामनेवाला यांना अंतिम देय रक्कम रु.75,000/- चा 05.09.2008 या तारखेचा धनादेश दिला व त्यांचे कर्ज खाते बंद केले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांची अंतिम देय रक्कम दिल्यानंतर व त्यांचे कर्ज खाते बंद केल्यानंतरही तक्रारदारांना सामनेवाला यांच्या दिल्ली येथील वसुली कार्यालयाकडून वसुलीच्या संदर्भात सारखे फोन येत होते. त्यानंतर, तक्रारदारांनी सामनेवाला यांना कर्ज खाते बंद केल्याचे कळविल्यानंतरही त्यांचे कोणत्याही वेळेस फोन येणे बंद झाले नाही. 4 तक्रारदारांना सामनेवाला यांचे कलकत्ता कार्यालयाकडून दि.06.04.2009 रोजी खाते क्र.45679312 या खात्यामध्ये कर्जाची येणे रक्कम रु.25,712/- येणे बाकी असल्याचे नमूद केले व त्या संदर्भात दावा क्र.12732/2009 हा दावा दाखल केल्याचे व तो दावा दि.19.04.2009 रोजी लोक अदालत पुढे ठेवल्याचे कळविले व पैसे भरणार असल्यास लोक अदालत पुढे असलेल्या तारखेच्या आधी पैसे भरावे असे सांगितले. 5 ही बाब तक्रारदारांना मान्य नसल्यामुळे तक्रारदारांनी या मंचापुढे तक्रार दाखल करुन खालीलप्रमाणे मागण्या केल्या. अ तक्रारदारांनी तडजोडीनंतर अंतीम देय रक्कम भरल्यानंतर सामनेवाला यांनी रक्कम रु.25,712/- ची चुकीने केलेली मागणी रद्द करावी ब तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु.2,00,000/- ची नुकसान भरपाई दयावी. क तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.2,000/- दयावेत. 6 तक्रार अर्ज, शपथपत्र व पुरक कागदपत्रांसह दाखल केली आहे. 7 सामनेवाला यांना हजर राहून तक्रार अर्जास उत्तर दाखल करावे अशी मंचाकडून नोटीस पाठविण्यात आली, ती नोटीस सामनेवाला यांना मिळाल्याची पोचपावती तक्रारदारांने अभिलेखात दाखल आहे. तक्रार अर्जाची नोटीस मिळूनही सामनेवाला गैरहजर राहिले व तक्रार अर्जास उत्तर दाखल केले नाही म्हणून तक्रार अर्ज एकतर्फा निकाली काढण्यात यावा असा मंचाने आदेश केला. 8 तक्रार अर्ज, शपथपत्र व कागदपत्रे यांचे पडताळणी करुन पाहिले असता निकालीसाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. क्र. | मुद्दे | उत्तरे | 1 | तक्रारदार सामनेवाला यांचे सेवेतील कमतरता सिध्द करतात काय ? | होय | 2 | तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.25,712/- ची मागणी रद्द करावी अशी मागणी करु शकतात काय ? | होय | 3 | तक्रारदार सामनेवाला यांचेकडून झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रक्कम रु.2,00,000/- इतकी रक्कम मागू शकतात काय ? | होय, रक्कम रु.5,000/- फक्त | 4 | तक्रारदार सामनेवाला यांचेकडून या तक्रार अर्जाचा खर्च मागू शकतात काय ? | होय, रक्कम रु.1,000/- | 4 | आदेश ? | तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येते. |
कारणमिमांसाः- 9 तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.1,20,000/-, दि.20.12.2006 रोजी कर्ज घेतले होते, त्याची देय रक्कम रु.99,824.75पैसे इतकी बाकी असताना सामनेवाला व तक्रारदार यांच्यात तडजोडीची बोलणी होऊन तक्रारदारांनी सामनेवाला यांना रक्कम रु.75,000/- इतकी रक्कम देण्याचे ठरले, हे पृष्ठ क्र.5 वर दाखल केलेले दि.05.09.2008 च्या पत्रांवरुन निष्पन्न होते. 10 तडजोडीत ठरल्याप्रमाणे, तक्रारदारांनी अंतीम देय रक्कम रु.75,000/- चा धनादेश दि.05.09.2008 रोजी सामनेवाला यांना दिला, त्याची प्रत तक्रार अर्जासोबत तक्रारदारांनी पृष्ठ क्र.6 वर दाखल केली आहे तसेच दि.05.09.2008 रोजी दिलेला रक्कम रु.75,000/- चा धनादेशाचे रोखीकरण दि.09.09.2008 रोजी झाल्याचे त्यांनी दाखल केलेल्या बँक स्टेटमेंटवरुन व पासबुकामधील नोंदीवरुन स्पष्ट होते. अंतीम देय रक्कम देऊनही सामनेवाला यांनी तक्रारदारांना वारंवार उर्वरित रक्कम भरण्यासाठी फोन करीत राहिले, ही गोष्ट सामनेवाला यांना संधी देऊनही ते मंचासमक्ष हजर राहून व तक्रार अर्जास उत्तर देऊन खोडले नाही, म्हणून तक्रारदारांचे म्हणणे ग्राहय धरले जाते. 11 तक्रारदारांनी युक्तीवादाच्या वेळी असे नमूद केले कि, दि.06.04.2009 च्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे सामनेवाला यांनी दाखल केलेला दावा क्र.12732/2009 मध्ये तक्रारदारांना कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही किंवा आदेश मिळालेले नाहीत. 12 सामनेवाला यांनी तडजोडीच्या बोलणी नंतर अंतीम देय रक्कम देऊनही पुन्हा बाकी रक्कमेची मागणी केली, यात सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता दिसून येते म्हणून सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून रक्कम रु.25,712/- ची मागणी करु नये. 13 तक्रारदारांनी झालेल्या मनस्तापासाठी नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु.2,00,000/- ची मागणी केली आहे. – तडजोडीनंतर संपूर्ण पैसे भरुनही पुन्हा पुन्हा सामनेवाला यांचेकडून पैशाची मागणी केल्यामुळे तक्रारदारांना मनस्ताप झाला ही गोष्ट नाकारता येणार नाही परंतु झालेला मनस्ताप हे पैशात मोजता येत नाही. तक्रारदारांनी मनस्तापासाठी झालेली नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.2,00,000/- ची मागणी अवास्तव वाटते. सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.5,000/- मनस्तापासाठी नुकसान भरपाई म्हणून देणे योग्य राहील. 14 तसेच सामनेवाला यांनी तक्रादारांना रक्कम रू.1,000/- तक्रार अर्जाचा खर्च देण्यास जबाबदार राहतील. उक्त विवेचनावरुन, या प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश (1) तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. (2) सामनेवाला यांनी तक्रारदारांकडून रक्कम रु.25,712/- ची मागणी करु नये. (3) सामनेवाला यांनी तक्रारदारारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- नुकसानभरपाई म्हणून दयावेत. (4) सामनेवाला यांनी तक्रारदारांनी रक्कम रु.1,000/- तक्रार अर्जाचा खर्च दयावा. (5) सामनेवाला यांनी आदेशाची पुर्तता आदेश मिळाल्यापासून सहा आठवडयाच्या आत करावी अन्यथा विलंबापोटी दरमहा रु.500/- दंडात्मक रक्कम सामनेवाला यांनी तक्रारदारांना द्यावी. (6) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य देण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |