जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 462/2010. तक्रार दाखल दिनांक : 02/08/2010. तक्रार आदेश दिनांक : 05/07/2011. श्री. प्रसाद शशिकांत भोसले, वय 27 वर्षे, रा. भोसले चौक, पंढरपूर, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. मॅनेजर, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कं., अडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफीस, 101, 105, शिव चेबर्स, पहिला मजला, सेक्टर 11, सी.बी.डी., बेलापूर, नवी मुंबई – 400 614. 2. ब्रँच मॅनेजर, श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी, शाखा सोलापूर, 19, गोल्डफिंच पेठ, दुसरा मजला, रुक्मिणी कॉम्प्लेक्स, सावरकर मैदानासमारे, सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : पी.पी. मोहिते विरुध्द पक्ष यांचेतर्फे विधिज्ञ : एस.आर. गडदे आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांच्या ट्रक क्र.एम.एच.16/बी.3261 करिता विरुध्द पक्ष यांच्याकडून दि.31/3/2008 रोजी रु.2,50,000/- कर्ज घेतले असून तीन वर्षामध्ये प्रतिमहा रु.10,074/- प्रमाणे 36 समान हप्त्यामध्ये त्याची परतफेड करावयाची आहे. त्यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे 24 हप्त्यापोटी रु.2,38,000/- भरणा केले असून उर्वरीत 12 हप्ते भरण्यास तयार होते आणि तशी तयारी दर्शविली असता विरुध्द पक्ष यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.3/3/2010 रोजी नोटीस पाठवून दखल न घेतल्यामुळे रु.1,08,310/- च्या डी.डी.सह दि.9/4/2010 रोजी नोटीस पाठविली असता, विरुध्द पक्ष यांनी डी.डी. वटवून रक्कम स्वीकारली, परंतु वाहनाचे नाहरकत प्रमाणपत्र व इतर महत्वाची कागदपत्रे अद्याप दिलेली नाहीत. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांच्याकडून कर्ज थकीत नसल्याचा दाखला देण्यासह वाहनाची महत्वाची कागदपत्रे मिळावेत आणि मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार व त्यांच्यामध्ये लोन-कम-हायपोथिकेशन अग्रीमेंट झालेले असून तक्रारदार यांनी त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यामध्ये सातत्याने कसूर केला आहे. अग्रीमेंटनुसार रु.3,62,650/- ची परतफेड 36 हप्त्यामध्ये करावयाची आहे. तक्रारदार यांनी अग्रीमेंटप्रमाणे रक्कम भरणा केली नाही आणि खाते पूर्णत: बंद करण्याबाबत कळविलेले नाही. तक्रारदार यांनी रु.1,08,309.82 पैसे डी.डी. द्वारे भरणा केले असून अद्यापि रु.94,000/- त्यांच्याकडे बाकी आहेत. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याशी लोन-कम-हायपोथिकेशन अग्रीमेंटद्वारे कर्ज घेतल्याविषयी विवाद नाही. प्रामुख्याने, तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 24 हप्त्यापोटी रु.2,38,000/- भरणा केले असून उर्वरीत रु.1,08,310/- च्या डी.डी.सह दि.9/4/2010 जमा केलेले असतानाही विरुध्द पक्ष यांनी त्यांना नाहरकत प्रमाणपत्र व वाहनाची कागदपत्रे दिली नसल्याविषयी तक्रार केलेली आहे. उलटपक्षी, तक्रारदार हे थकबाकीदार असल्यामुळे तक्रारदार यांची तक्रार त्यांनी अमान्य केली आहे. 5. रेकॉर्डवर दाखल फायनल डाटाशीटचे अवलोकन करता, तक्रारदार यांना फायनान्स चार्जेससह एकूण रु.3,62,650/- चे कर्ज वितरण केल्याचे निदर्शनास येते. प्रतिमहा रु.10,074/- प्रमाणे 35 हप्ते व रु.10,060/- चा 1 हप्ता याप्रमाणे कर्जाची परतफेड करावयाची आहे. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर लोन-कम-हायपोथिकेशन अग्रीमेंटची प्रत दाखल केलेली नाही. त्यामुळे अग्रीमेंटमधील तरतुदी काय आहेत ? हे स्पष्ट होत नाही. आमच्या मते, विरुध्द पक्ष हे वित्तीय संस्था असल्यामुळे निश्चितच त्यांच्याकडे अग्रीमेंट असावयास पाहिजे आणि ते दाखल न करण्याची कारणे त्यांनी स्पष्ट केलेली नाहीत. 6. तक्रारदार यांनी दि.9/4/2010 रोजी विरुध्द पक्ष यांना पाठविलेल्या नोटीसमध्ये तक्रारदार यांनी रु.2,38,000/- भरणा केल्याचे नमूद करुन उर्वरीत रक्कम एकरकमी भरण्यास तयार असल्यामुळे 3 टक्के व्याजासह रु.1,08,309.82 चा डिमांड ड्राफ्ट पाठविल्याचे निदर्शनास येते. विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी त्यांना कर्ज खाते पूर्णत: बंद करण्याबाबत कळविलेले नाही. निर्विवादपणे, विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्याकडून प्राप्त झालेला डिमांड ड्राफ्ट वटवून एकरकमी रक्कम स्वीकारलेली आहे. त्यामुळे निश्चितच कर्ज खात्यामध्ये कर्जदार/तक्रारदार यांच्याकडून कर्जाच्या हप्त्याची रक्कम मुदतपूर्व जमा करण्यात येत असल्याची जाणीव त्यांना आहे. तक्रारदार हे कर्जाची रक्कम भरणा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. असे असताना, मुदतपूर्व कर्ज खात्यामध्ये रक्कम भरणा करुन खाते बंद करण्याविषयी असलेली तरतूद मंचासमोर सादर न करता तक्रारदार यांच्याकडे थकीत बाकी असल्याविषयी विरुध्द पक्ष समर्थन करीत आहेत. 7. विरुध्द पक्ष यांनी रु.2,50,000/- मुद्दल गृहीत धरुन त्यावर रु.1,12,650/- फायनान्स चार्जेस आकारणी केले आहेत. कर्जाचा शेवटचा हप्ता दि.1/4/2011 रोजी देय आहे. तक्रारदार यांनी तो कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच हप्त्याद्वारे रु.2,38,000/- व डिमांड ड्राफ्टद्वारे रु.1,08,309.82 असे एकूण रु.3,46,309/- चा भरणा दि.9/4/2010 पर्यंत केलेला आहे. सदर रक्कम भरताना एक वर्षाचा कर्ज कालावधी बाकी आहे. विरुध्द पक्ष यांनी मुदतपूर्व कर्ज खात्यामध्ये रक्कम भरणा करुन खाते बंद करण्याविषयी असलेली तरतूद मंचासमोर सादर केलेली नाही आणि तसेच तक्रारदार यांच्याकडे थकबाकी कशी राहते ? हे सिध्द केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी मुदतपूर्व कर्ज रकमेची परतफेड केलेली असताना विरुध्द पक्ष यांनी त्यांना वाहनाची कागदपत्रे व नाहरकत प्रमाणपत्र न देऊन सेवेत त्रुटी केल्याचे सिध्द होते. तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांच्याकडून नाहरकत प्रमाणपत्र व वाहनाची आवश्यक कागदपत्रे मिळविण्यास पात्र ठरतात, या अंतीम निर्णयाप्रत आम्ही आलो आहेत. 8. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी कर्ज बाकी नसल्याबाबत नाहरकत प्रमाणपत्र व वाहनाची त्यांच्या ताब्यात असलेली मूळ कागदपत्रे या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत तक्रारदार यांना द्यावीत. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/30611)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |