जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 127/2011 तक्रार दाखल तारीख –11/08/2011
पांडुरंग पि.रामभाऊ गायकवाड
वय 30 वर्षे धंदा मजुरी .तक्रारदार
रा.शिरापुर (धुमाळ) ता.शिरुर (का.) जि.बीड
विरुध्द
शाखा व्यवस्थापक,
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि.
डि.सी.लोढा संकुल, जालना रोड,बीड सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.ए.एस.बडे
सामनेवाला तर्फे ः- अँड.एस.ए.चव्हाण
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार यांनी श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनी यांचेकडून अँटोरिक्षा नंबर एम.एच.-23-सी-8205 रक्कम रु.55,000/- डाऊन पेमेट भरुन दि.22.11.2007 रोजी कर्जाऊ खरेदी केली. त्यावेळी श्री.वैद्यनाथ अँटो एजन्सी परळी वैजनाथ यांनी तक्रारदार यांस रु.,1,24,500/- चे बिल दिले होते. संबंधीत बिलावर एचपी विथ श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि. असा उल्लेख आहे. बिलाचे तपशीलामध्ये अँटोरिक्षाचा कलर काळा व चेसीज नंबर एफजेके 599199 असा असून, इंजिन नंबर आरजेके 0455114 असा आहे.
सामनेवाला यांनी तक्रारदारांना गाडी ताब्यात घेतेवेळी डाऊन पेमेंटची पावती दिली नाही. तसेच आगाऊ रक्कमेचा एक हप्ता भरुन घेतला. तसेच काही को-या कागदावर सहया घेतल्या.
तक्रारदार सामनेवाला यांचे कर्जाचे हप्ते नियमित भरणा करीत होते. आर्थिक अडचणीमुळे काही हप्त्याची रक्कम भरणा झाली नाही. त्या बाबत तक्रारदारांनी सामनेवाला यांचे कार्यालयात संबंधीत प्रतिनिधीस प्रत्यक्ष भेटून तो संपूर्ण कर्जाची परतफेड करण्यास तयार असल्या बाबतची कल्पना दिली. तरी देखील संबंधीत सामनेवाला यांचे प्रतिनिधीने काही व्यक्तींना हाताशी धरुन तक्रारदाराचा रिक्षा ओढून नेला.
तक्रारदारांनी सामनेवाला यांचे कार्यालयात जाऊन हप्त्याची रक्कम भरणा करुन घेणे बाबत व वाहन परत देणे बाबत अनेक वेळा विनंती केली परंतु उपयोग झाला नाही. तक्रारदार सही पुरता साक्षर असल्याने त्यांस वाचता लिहीता येत नसल्याने संबंधीताने तक्रारदाराच्या असाक्षरतेचा फायदा घेऊन त्यांचे वाहन परस्पर विक्री केले हे तक्रारदारास समजताच तक्रारदारांनी वकिलामार्फत वाहन परत करण्यासंबंधी व वाहन घेतल्यापासून भरणा केलेली कर्ज रक्कमेचे विवरण, डाऊन पेंमेटची पावती, कराराची सत्यप्रत, कर्ज घेतल्यासंबंधी सर्व कागदपत्राची मागणी नोटीसद्वारे दि.1.7.2010 रोजी केली. सदरची नोटीस सामनेवाला क्र.2 यांना दि.2.6.2010 रोजी मिळाली. त्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून दि.13.7.2010 रोजी कार्यालयात येऊन रु,6,000/- भरणा करा व गाडी घेऊन जा असे सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार कार्यालयात गेले असता रक्कम रु.6,000/- सामनेवाला यांनी भरुन घेताना तक्रारदाराच्या काही कागदपत्रावर सहया घेतल्या व त्यांस वाहन विकले आहे, काय करायचे ते करा असे सांगितले.
तक्रारदार हा सामनेवाला कडून खालील प्रमाणे नूकसान भरपाई मिळण्यास हक्कदार आहे.
अ. अँपे रिक्षा क्र.एम.एच.23-सी-8205 ची एकूण रक्कम रु.1,24,500/-
ब. शारीरिक व मानसिक त्रासाबददल रु.50,000/-
क. नोटीसचा खर्च रु.1,000/-
ड. प्रस्तुत तक्रार अर्जाचा खर्च रु.7,000/-
-----------------------
एकूण रु.2,32,500/- ----------------------
विनंती की, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे रु.,2,32,500/- सामनेवाला यांनी तक्रारदारास देण्याचे आदेश व्हावेत, सदर रक्कमेवर तक्रार दाखल दिनांकापासून द.सा.द.शे.12 टक्के व्याज देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.9.1.2012 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीत सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदारांनी दि..13.7.2010 रोजी त्यांचे कर्ज खाते संदर्भात तडजोड केली व त्या बाबत सामनेवाला यांचे लाभात शपथपत्र लिहून दिले आणि त्यांनी दिलेल्या हमीनुसार कर्ज खाते बंद करण्यात आले. तक्रारदारांना कर्ज खात्याचे व्यवहार बाबत कोणतीही तक्रार नाही व तक्रारदार त्या संदर्भात कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाही असे नमूद केलेले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला नाही. त्यामुळे तक्रार खोटी असल्याने रदद करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.बडे व सामनेवाले यांचे विद्वान वकील
श्री. एस.ए.चव्हाण यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी सन 2007 मध्ये सामनेवालाकडून रिक्षासाठी कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज हप्ते तक्रारदार नियमितपणे भरु शकले नाही त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराची रिक्षा ताब्यात घेतली होती व ती कधी ताब्यात घेतली व तक्रारदाराचे किती हप्ते राहीले होते या बाबत तक्रार अत्यंत मोघम आहे. किती हप्ते कर्ज परतफेड करावयाचे होते यांचाही तक्रारीत कूठेही उल्लेख नाही. सामनेवाला यांनी वाहन ताब्यात घेतल्याहनंतर तक्रारदार कधी त्याचे कार्यालयात रक्कम भरण्यासाठी गेले यांचाही उल्लेख तक्रारीत नाही. सामनेवाला यांनी रिक्षा ताब्यात घेतल्यानंतर विक्री केल्याचे तक्रारदारांना कळाले होते. त्यानंतर तक्रारदारानी सामनेवाला यांना नोटीस दिली व नोटीस मिळाल्यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांचे कार्यालयात बोलावले व रिक्षा विकून त्यांचे आलेली किंमत तक्रारदाराचे खात्यात जमा करुन शिल्लक राहीलेली रक्कम रु.12,000/- भरावयाचे होते पैकी सामनेवाला यांनी त्यात तडजोड करुन तक्रारदारांना रु.6,000/- भरुन रक्कम रु.6,000/- ची सुट सामनेवाला यांनी तक्रारदारांना दिली होती. या संदर्भात सामनेवाला यांचे शपथपत्र स्वयंस्पष्ट होते. सदरचे शपथपत्र तक्रारदारांनी शपथपत्राद्वारे नाकारलेले आहे. परंतु तक्रारदाराच्या तक्रारीत वरील तक्रारीवरुन तक्रारदारानी जे काही तक्रारीत मागणी केलेली आहे, ते पाहता रिक्षाचे कर्जापोटी भरलेले पैसे व मानसिक त्रास, तक्रारीचा खर्च यांची मागणी केलेली आहे. यावरुन सामनेवाला यांनी दिलेली रक्कम रु.6,000/- कर्जाची सूट घेऊन देखील कर्जाची भरलेली रक्कम तक्रारदारांना परत पाहिजे आहे. तथापि तक्रारदारानीच तक्रारीत नमूद केले आहे की, सामनेवाला यांचे निरोपाप्रमाणे तक्रार सामनेवालाकडे गेले व तेथे त्यांनी रक्कम रु.6,000/- भरलेले आहेत. त्यावेळी सामनेवाला यांनी त्यांचे को-या कागदपत्रावर सहया घेतल्या. हा मजकूर पाहता तक्रारदार सामनेवाला यांचे कार्यालयात जाऊन रु.6,000/- भरल्याची बाब स्पष्ट होते व को-या कागदपत्राचे संदर्भात तक्रारदाराचे शपथपत्र व सदरचे विधान याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड