::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या.)
(पारीत दिनांक–22 मार्च, 2018)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्ष पतसंस्थे विरुध्द कर्ज खात्याचा उतारा मिळण्यासाठी तसेच कर्ज देताना कपात केलेली शेअर्सची रक्कम व्याजासह मिळण्यासाठी दाखल केली आहे.
02. तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याची शेती मौजा भागेमहारी येथे एकूण-1.19 हेक्टर आर एवढी आहे, त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थे कडून दिनांक-06/05/2008 रोजी रुपये-50,000/- एवढे कर्ज घेतले, त्यावेळी शेअर्सची रक्कम रुपये-8000/- कपात करण्यात आली. तक्रारकर्त्याने दोन वर्षा पूर्वी संपूर्ण कर्जाची रक्कम परतफेड करुन पुन्हा विरुध्दपक्ष पतसंस्थे मधून रुपये-20,000/- कर्ज घेतले, यावेळी सुध्दा शेअर्सची रक्कम रुपये-4000/- कपात करण्यात आली. अशाप्रकारे एकूण रुपये-12,000/- शेअर्सची रक्कम कपात केली. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याला विरुध्दपक्ष पतसंस्थे कडून कर्ज खात्याचा उतारा तसेच शेअर्सचे रकमेचा हिशेब आज पर्यंत मिळाला नाही. तो विरुध्दपक्ष पतसंस्थेचा ग्राहक असून विरुध्दपक्षाने त्यास दोषपूर्ण सेवा दिलेली आहे.
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे त्याने विरुध्दपक्ष पतसंस्थे मध्ये वेळोवेळी कर्ज परतफेडीपोटी रकमा जमा केलेल्या आहेत, त्याचे विवरण पुढील प्रमाणे-
अक्रं | दिनांक | कर्ज परतफेडी पोटी जमा केलेली रक्कम |
01 | 11/06/2011 | 20,000/- |
02 | 30/03/2011 | 24,000/- |
03 | 09/03/2013 | 10,000/- |
04 | 24/03/2015 | 10,000/- |
05 | 05/07/2016 | 10,560/- |
06 | 08/07/2016 | 9440/- |
तक्रारकर्त्याचे असेही म्हणणे आहे की, त्याला रिझर्व्ह बँकेच्या धोरणां बद्दल विरुध्दपक्षा तर्फे कोणतीही माहिती देण्यात आली नाही. म्हणून त्याने प्रस्तुत तक्रार विरुध्दपक्ष पतसंस्थे विरुध्द दाखल करुन पुढील मागण्या केल्यात-
(1) दिनांक-11/06/2011 रोजीची पावती क्रं-8653 अनुसार तक्रारकर्त्याची विरुध्दपक्ष पतसंस्थेत जमा रक्कम रुपये-20,000/- व शेअर्सची कपात केलेली रक्कम रुपये-12,000/- असे मिळून एकूण रुपये-32,000/- रक्कम द.सा.द.शे.-18% दराने व्याजासह विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे.
(2) दिनांक-06/05/2008 पासून कर्ज खात्याचा उतारा तसेच कपात केलेल्या शेअर्सचे रकमेचा हिशोब विरुध्दपक्षाने देण्याचे आदेशित व्हावे.
(3) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारखर्च विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे.
03. विरुघ्दपक्ष पतसंस्थे तर्फे व्यवस्थापक श्री क्रिष्णा वासुदेवराव काळे यांनी लेखी उत्तर दाखल केले. विरुध्दपक्षाचे उत्तरा नुसार तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक नसून हा वाद सहकारी संस्थे अंतर्गत असल्याने तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र ग्राहक मंचास येत नाही. तक्रारकर्त्याने दिनांक-06/05/2008 रोजी रुपये-50,000/- कर्ज घेतल्याची बाब मान्य केली. परंतु तक्रारकर्त्याने जवळपास 02 वर्षा पूर्वी संपूर्ण कर्जाची परतफेड केल्याची बाब अमान्य केली. तक्रारकर्त्याने दिनांक-11/06/2011 रोजी विरुध्दपक्ष पतसंस्थे कडून रुपये-20,000/- रकमेचे तत्कालीन कर्ज घेतले होते परंतु तत्कालीन कर्ज रकमेची परतफेड केली नाही. विरुध्दपक्षाने रुपये-4000/- शेअर्सची रक्कम कपात केल्याची बाब अमान्य केली. तक्रारकर्त्याने कर्ज खात्याची किंवा शेअर्सचे रकमेच्या हिशोबाची मागणी त्यांचेकडे कधीही केली नाही. विशेष कथना मध्ये पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने दिनांक-06/05/2008 रोजी रुपये-50,000/- कर्ज घेतले आणि दिनांक-11/06/2011 रोजी रुपये-20,000/- तात्कालीक कर्ज विरुध्दपक्ष संस्थे कडून घेतले, ते कर्ज वार्षिक-18% व्याज दराने तक्रारकर्त्याला मासिक हप्त्याने परतफेड करावयाचे होते आणि कर्जाची रक्कम भरण्यास विलंब झाल्यास 3% प्रमाणे दंड व्याज भरण्यास तो जबाबदार राहिल असे करारनाम्याचे अटी व शर्ती नुसार ठरले होते. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने एकूण रुपये-70,000/- कर्ज घेतले होते, परंतु तक्रारकर्त्याने ठरलेल्या मासिक हप्त्यामध्ये कर्ज परतफेडीची रक्कम न भरल्याने विरुध्दपक्ष पतसंस्थेनी सहकार न्यायालय, नागपूर येथे कलम-91 अंतर्गत दिनांक-18/0722016 रोजी दावा क्रं-484/2016 अन्वये रक्कम रुपये-33,414/- कर्ज वसुली करीता दावा दाखल केलेला असून तो न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामध्ये तक्रारकर्त्याने आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारकत्र्याने कर्ज घेतल्या पासून रक्कम रुपये-74,300/- व तात्कालीक कर्जा पोटी रक्कम रुपये-9960/- असे मिळून एकूण रुपये-84,260/- रकमेचा भरणा केला परंतु अजून सुध्दा तक्रारकर्त्या कडून अनुक्रमे रुपये-21,286/- अधिक रुपये-20,000/- असे मिळून एकूण रुपये-41,286/- प्रलंबित घेणे बाकी आहे. तक्रारकर्त्याने सहकार न्यायालयातील कर्ज वसुलीची कार्यवाही टाळण्याचे उद्देश्याने ही खोटी तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे, सबब विरुध्दपक्ष संस्थे विरुध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
04. तक्रारकर्त्याने निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार शेती संबधीचे दस्तऐवज 7/12 उतारा प्रत, गाव नमुना-8-अ प्रत, पैसे भरल्याच्या पावत्या, कायदेशीर नोटीस, पोस्टाची पावती, पोच अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
05. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याने कर्ज मिळण्यासाठी केलेले अर्ज, तक्रारकर्त्याच्या कर्जाचे खाते उतारे, सहकार न्यायालय, नागपूर येथे विरुध्दपक्षाने कर्ज वसुलीसाठी केलेल्या दाव्याची प्रत, सदर दाव्या मध्ये तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या उत्तराची प्रत, तक्रारकर्त्याचे शेअर्सचे उता-याची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात.
06. प्रस्तुत तक्रारी मध्ये तक्रारकर्त्या तर्फे वकील श्री भेदरे तर विरुध्दपक्षा तर्फे वकील श्री अभय फाले यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला.
07. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर तसेच प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रती इत्यादींचे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले तसेच उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
::निष्कर्ष::
08. विरुध्दपक्षाने आपल्या लेखी उत्तरात तक्रारकर्ता हा त्यांचा ग्राहक होत नाही आणि सदर तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र ग्राहक मंचास नसून ते फक्त सहकारी न्यायालयास आहेत असा प्राथमिक आक्षेप घेतला. विरुध्दपक्ष पतसंस्थेनी आपल्या लेखी उत्तरामध्ये असे नमुद केले आहे की, पतसंस्थेनी सहकार न्यायालय, नागपूर येथे कलम-91 अंतर्गत दिनांक-18/07/2016 रोजी दावा क्रं-484/2016 अन्वये रक्कम रुपये-33,414/- कर्ज वसुली करीता दावा दाखल केलेला असून तो न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामध्ये तक्रारकर्त्याने आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रारकर्त्याने कर्ज घेतल्या पासून रक्कम रुपये-74,300/- व तात्कालीक कर्जा पोटी रक्कम रुपये-9960/- असे मिळून एकूण रुपये-84,260/- रकमेचा भरणा केला परंतु अजून सुध्दा तक्रारकर्त्या कडून अनुक्रमे रुपये-21,286/- अधिक रुपये-20,000/- असे मिळून एकूण रुपये-41,286/- प्रलंबित घेणे बाकी आहे. तक्रारकर्त्याने सहकार न्यायालयातील कर्ज वसुलीची कार्यवाही टाळण्याचे उद्देश्याने ही खोटी तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे. आपल्या या म्हणण्याच्या पुराव्यार्थ विरुध्दपक्ष पतसंस्थेनी सहकार न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याची प्रत, त्या दाव्यामध्ये तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या उत्तराची प्रत सुध्दा दाखल केली आहे.
09. विरुध्दपक्षाचे उत्तरावर तक्रारकर्त्याने आपले प्रतीउत्तर दाखल केले नाही किंवा विरुध्दपक्षाचे म्हणणे सुध्दा खोडून काढलेले नाही. तक्रारकर्त्याच्या विरुध्द सहकार कायद्दा-1960 चे कलम-91 खाली कर्जाचे रकमे संबधी वसुलीचा दावा सहकार न्यायालय, नागपूर येथे चालू असल्याने व तो प्रलंबित असल्याने पुन्हा त्याच कारणासाठी अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष तक्रारकर्त्याची तक्रार चालविण्या योग्य नाही. सबब तक्रारीतील अन्य कोणत्याही मुद्दांना स्पर्श न करता, आम्ही ही तक्रार अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष चालविण्या योग्य नसल्याचे कारणा वरुन खारीज करीत आहोत. तक्रारकर्ता सहकार न्यायालयात जाऊन तेथे आपली बाजू मांडू शकतो.
10. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंच प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री उध्दवराव हनुमंतराव गोमकाले यांची, विरुध्दपक्ष श्री मंगलवार ग्रामीण सहकारी पतसंस्था लि. चनकापूर, चनकापूर मेन रोड, खापरखेडा, तालुका सावनेर जिल्हा नागपूर तर्फे व्यवस्थापक यांचे विरुध्दची तक्रार, अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष चालविण्या योग्य नसल्याचे कारणा वरुन खारीज करण्यात येते. तक्रारकर्ता त्याचे विरुध्द चालू असलेल्या सहकार न्यायालयात जाऊन तेथे आपली बाजू मांडू शकतो.
2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.