( पारीत दिनांक : 26/06/2014)
( मा. प्रभारी अध्यक्ष, श्री मिलींद आर.केदार यांच्या आदेशान्वये).)
तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये गैरअर्जदार यांच्या विरुध्द दाखल केली असून, तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे आहे.
01. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून घर बांधण्याकरिता रु.1,80,000/- कर्ज घेतले होते. सदर कर्जाचा खाते क्रं. 1593029875 हा होता. तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष यांनी दिनांक 22.01.2002 रोजी रु. 60,000/-
दिनांक 05.03.2002 रोजी रु. 60,000/-
दिनांक 03.04.2002 रोजी रु. 40,000/-
दिनांक 22.04.2002 रोजी रु. 15,000/-
दिनांक 23.05.2002 रोजी रु. 05,000/-
असे एकूण रुपये 1,80,000/- दिल्याचे तक्रारकर्त्याने नमूद केले आहे. त.क. यांनी पुढे असे नमूद केले की, तो वि.प. यांच्याकडे रु.2400/- एवढा मासिक हप्ता कर्ज खाते क्रं. 1593029875 मध्ये जमा करीत होते. तक्रारकर्त्याने पुढे असे नमूद केले की, दि. 01.12.2006 नंतर त्याचा कर्ज खाते क्रं. बदलून 11037118680 हा करण्यात आला. त.क. यांना विरुध्द पक्षाने हप्त्याची रक्कम खाते क्रं. 11037010878 मध्ये जमा करण्यास सांगितले होते असे त.क. ने नमूद केले आहे. तक्रारकर्त्यानुसार सदर खाते क्रमांक हा बचत खाते क्रमांक आहे. त.क. ने पुढे नमूद केले की, तो बदललेल्या कर्ज खाते क्रं. 11037118680 वर आपले हप्ते भरीत होता. त.क. ने पुढे नमूद केले की, त्याला विरुध्द पक्ष यांनी सांगितल्यानुसार त्यांनी जी रक्कम खाते क्रं. 11037010878 हया बचत खात्यात जमा केली ती एकूण रु.21,700/- होती. परंतु वि.प. यांनी सदर रक्कम कर्ज खात्यामध्ये वळती न केल्यामुळे तक्रारकर्त्याचे कर्ज खाते एन.पी.ए. झाले व त्यावर 13 महिन्याचे व्याज आकारण्यात आले, ही विरुध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रृटी असल्याचे त.क. यांनी नमूद केले. वि.प. यांनी कर्ज खात्यामध्ये दि. 30.04.2007 रोजी रु.979/- व्याजाचे दर्शविले. त.क. यांनी त्यांच्या खात्यात रु.2,400/- भरले होते. दि. 05.04.2007 ते 30.04.2007 पर्यंत व्याजाच्या दरात बदल झाला असून सुध्दा वरील हप्त्यावर दि. 06.12.2008 व्याज दरात व कर्ज खात्यात रक्कम दर्शविली नाही. ही वि.प. यांच्या सेवेतील त्रृटी असल्याचे त.क. चे म्हणणे आहे. वि.प. यांना सदरची बाब माहिती झाल्याने त्यांनी बचत खात्यातून रुपये 21,700/-, एवढी रक्कम कर्ज खाते क्रं. 11037118680 दि. 06.02.2008 ला वळती करुन दर्शविली. वि.प. यांच्या सदर चुकीमुळे त.क. चे कर्ज खाते घेणे बाकी रु.1,13,438.28/- एवढी दर्शविली होती.
02 त.क. ने पुढे असे नमूद केले की, वि.प. यांच्याकडे त.क. ने हप्त्याचे रुपये 2400/- भरले होते ही रक्कम वि.प. यांनी बचत खात्यात दर्शविली व त्यामुळे व्याज दरात फरक पडला. सदर नोंदीची माहिती झाल्यावर रु.3000/- वि.प. यांनी त.क. यांच्या कर्ज खात्यात दि.25.06.2008 रोजी दाखविले. त.क.ने पुढे नमूद केले की, तो सेवानिवृत्त झाल्यानंतर दि. 04.09.2010 रोजी रुपये 50,000/-कर्ज खात्यात भरले. त्यावेळी त.क. यांच्या कर्ज बाकी खात्यात रक्कम रु.24,785.28/-एवढी दर्शविली होती. त्यानंतर त.क. यांनी कर्ज खात्यात रुपये 20,000/- दि. 12.10.2010 रोजी भरले. त्यावेळी त्याच्या कर्ज खाती बाकी रु.24,785.28 पैसे दाखविण्यात आले. रक्कम भरुन सुध्दा एवढी रक्कम बाकी दाखविल्यामुळे त.क. यांना संशय आला. त्यामुळे त.क. यांनी चौकशी केली असता वि.प. यांनी चुकीने त.क. यांनी भरलेली रक्कम बचत खात्यात जमा केल्याचे लक्षात आले, ही वि.प. यांची चूक असल्याचे त.क. चे म्हणणे आहे.
03 त.क. ने पुढे नमूद केले की, त्यांनी कर्ज खात्याचे स्टेटमेंट (हिशोबाचे कागदपत्र) वि.प. यांच्याकडून घेतल्यानंतर त्यामध्ये फार त्रृटी दिसल्या त्यामध्ये दुरुस्ती करुन देण्याकरिता विनंती केली होती परंतु त्यांनी दुरुस्ती केली नाही. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास झाला. त्याकरिता त्यांनी रुपये 25000/-ची मागणी केली. तसेच विरुध्द पक्ष यांच्याकडून रुपये 27,859.72 एवढी रक्कम व्याजासह परत मिळण्याची मागणी केली आहे.
04 सदरच्या तक्रारीची नोटीस विरुध्द पक्ष यांना मंचा मार्फत बजाविण्यात आली. विरुध्द पक्ष यांनी सदर तक्रारीला खालीलप्रमाणे उत्तर दाखल केले.
05 वि.प. यांनी आपले लेखी उत्तरात त.क. यांनी रु.1,80,000/- कर्ज मंजूर केले होते, ही बाब मान्य केली. त.क.चा कर्ज खाते क्रं. 1593029875 हा होता हे देखील मान्य केले. तसेच तक्रारकर्त्याचा सदर कर्ज खाते क्रं. बदलून 11037118680 झाल्याची माहिती तक्रारकर्त्याला फोनद्वारे कळविली होती हे नमूद केले आहे. वि.प. यांनी पुढे असे नमूद केले की, त्यांनी त.क. यांनी कधीही बचत खाते क्रं. 11037010808 मध्ये रक्कम भरण्याबाबत सांगितले नव्हेत. त.क. यांनी खाते क्रं. 11037118680 मध्ये हप्ता भरणा सुरु केले होते. त्यांनी आपल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे की, त.क. यांनी कर्ज खाते पावत्या विद्यमान मंचासमक्ष उपस्थित कराव्या याबाबत नोटीस टू प्रोडुयस तक्रारकर्त्याला दिले होते. त्यांनी पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्याने कर्ज खात्यात रक्कम न जमा केल्यामुळे त्याचे खाते एन.पी.ए. झाले होते. त्यांनी तक्रारकर्त्याच्या उत्तरातील सर्व म्हणणे, तक्रारीतील कथन अमान्य केले असून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
06 सदर तक्रार मंचासमक्ष दि. 23.06.2014 रोजी युक्तिवादाकरिता आली असता मंचासमक्ष उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. तसेच त्यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, प्रतिज्ञालेख यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षा प्रत पोहचले.
-: कारणे व निष्कर्ष :-
07 तक्रारकर्ता यांनी वि.प. यांच्याकडून घर बांधण्याकरिता रु.1,80,000/- एवढे कर्ज घेतले होते ही बाब उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते.
08 तक्रारकर्ता यांचा कर्ज खाते क्रं. 1593029875 हा होता ही बाब सुध्दा उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते. तसेच त.क. चे कर्ज खाते क्रं. बदलून 11037118680 झाला होता ही बाब सुध्दा उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते व त्याबाबत दोन्ही पक्षामध्ये कोणताही वाद नाही.
09 तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील मुख्य वाद आहे की, त.क. च्या कर्ज खाते क्रं. मध्ये बदल झाला असता वि.प. यांनी त.क. यांना कर्जाच्या हप्त्याची रक्कम खाते क्रं. 11037010878 या खात्यावर जमा करण्यास सांगितले असे तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमूद केले व प्रतिज्ञालेखावर सुध्दा ही बाब नमूद केली आहे. परंतु सदर बाब सिध्द करण्याकरिता कोणताही दस्ताऐवज किंवा पुरावा त.क. यांनी मंचासमक्ष दाखल केलेला नाही. या उलट वि.प. यांनी त.क. यांना बचत खाते क्रं. 11037010878 या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सांगितले नव्हते असे स्पष्ट म्हटलेले आहे अशा परिस्थितीत वि.प. यांनी सदर खात्यामध्ये रक्कम जमा करावयास सांगितले होते ही बाब त.क. यांनी पुराव्यानिशी सिध्द करावयास पाहिजे होती, ती तक्रारकर्त्याने केलेली नाही.
तक्रारकर्त्यानुसार त्यांनी ......................................... दिनांक 05.04.2007 ला रुपये 2,400/-
दिनांक 03.05.2007 ला रुपये 2,500/-
दिनांक 07.07.2007 ला रुपये 5,000/-
दिनांक 28.07.2007 ला रुपये 5,000/-
दिनांक 11.09.2007 ला रुपये 2,000/-
दिनांक 07.12.2007 ला रुपये 2,400/-
दिनांक 06.12.2008 ला रुपये 2,400/-
असे एकूण रक्कम रुपये 21,700/- बचत खाते क्रं. 11037010878 मध्ये जमा केल्याचे आपल्या तक्रारीत नमूद केले व त्या पृष्ठयर्थ बँकेच्या पास-बुकाची झेरॉक्स प्रत लावली आहे. परंतु सदर रक्कम कुणाच्या म्हणण्यावरुन बचत खात्यात जमा केली हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील कथन की, सदर रक्कम ही विरुध्द पक्षाच्या म्हणण्यावरुन बचत खात्यात जमा केली ही बाब मान्य करता येत नाही. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्त्याचा कर्ज खाते क्रं. 1593029875 हा बदलून 11037118680 हा दिनांक 01.12.2006 पासून देण्यात आला असे तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे व त्यानुसार त.क. हा सदर कर्ज खात्यात रक्कम भरीत होता ही बाब त.क.च्या म्हणण्यानुसार व दाखल केलेल्या कर्ज खाते क्रं. 11037118680 च्या स्टेटमेंटवरुन स्पष्ट होते.
10 तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीमध्ये कर्ज खाते क्रं. 11037118680 मध्ये रुपये 5,000/- जमा केले व दि. 18.02.2007 ला रुपये 2,500/- जमा केले होते. परंतु सदर रक्कम वि.प. यांनी बचत खात्यात दाखविली असे त.क.ने आपल्या तक्रारीत नमूद केले. परंतु त.क. यांनी दाखल केलेल्या कर्ज खाते क्रं. 11037118680 चे निरीक्षण केले असता, सदर रक्कम त्याच कर्ज खात्यात दर्शविली असून बचत खात्यात दर्शविलेली नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारकर्त्याचे स्वतःचे कथन सिध्द होत नाही.
वि.प. यांनी त.क. यांना कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा केलेल्या पावत्या दाखल करण्याबाबत ‘नोटीस टू प्रोडुयस’ केले होते. परंतु त.क. यांनी सदर पावत्या दाखल केल्या नाही. तसेच पावत्या कां ? दाखल केल्या नाहीत याबाबत काहीही कथन केले नाही. त्यामुळे त.क. याचे कथन सिध्द होत नाही व कर्ज खात्यातील रक्कम जमा करण्याबाबत कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. तसेच रक्कम कधी कोणत्या खात्यात कशाकरिता भरली याबद्दल निष्कर्ष काढता येते नाही.
तक्रारकर्त्याने सदर तक्रारीत नमूद केलेले कथन, दाखल केलेले दस्ताऐवज , पुराव्या अभावीसिध्द होत नसल्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेली मागणी मान्य करता येत नाही. त्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात येते.
उपरोक्त सर्व विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) उभय पक्षाने खर्चाचे वहन स्वतः करावे.
3) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधीतांनी परत घेवुन
जाव्यात.
निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधीत पक्षांना माहितीस्तव व उचित
कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.