Maharashtra

Beed

CC/10/27

Shaikh Dadamiyan Chandpasha - Complainant(s)

Versus

Manager,Saideep Automobiles Pvt.Ltd. - Opp.Party(s)

S.Sajed

07 Oct 2010

ORDER

 
Complaint Case No. CC/10/27
 
1. Shaikh Dadamiyan Chandpasha
R/o Sabalkheda,Tq.Ashti,Dist.Beed
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Manager,Saideep Automobiles Pvt.Ltd.
Hero Honda Showroom,Sarjepura,Ahamadnagar.
Ahamadnagar.
Maharashtra.
2. Manager Sahebm Hero Honda Motor's Ltd.
Head Office-34,Community Centre,Basant lok, Vasant Vihar,New Delhi.
New Delhi
Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  P. B. Bhat PRESIDENT
  Sou. M. S. Vishwarupe MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

            तक्रारदारातर्फे       :- वकील- स.साजेद.    
             सामनेवाले नं. 1,2 तर्फे :- वकील- आर. बी. भंडारी.     
            
                             निकालपत्र   
           
            तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.
 
      तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात की, तक्रारदार हे मौजे साबलखेड ता. आष्‍टी येथील रहिवाशी असून आष्‍टी न्‍यायालयात वकिली व्‍यवसाय करत आहेत. सदर तक्रारदार हे साबलखेड येथील रहिवाशी असल्‍यामुळे आष्‍टी न्‍यायालय तक्रारदाराच्‍या घरापासून 15 ते 18 कि. मी. अंतर असल्‍यामुळे मोटार सायकलची आवश्‍यकता असल्‍यामुळे त्‍याने वृतपत्रामध्‍ये सामनेवाले यांची जाहीरात वाचून सामनेवाले साईदिप हिरो होंडा शोरुम यांच्‍याकडे गाडीच्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन रक्‍कम रु. 40,982/- रोख भरुन  हिरो होंडा प्‍लस सिलव्‍हर कलरची मोटार सायकल खरेदी केली व गाडी ताब्‍यात घेतली. सामनेवाले यांनी तक्रारदाराला गाडीच्‍या रक्‍कमे विषयी व गाडीच्‍या रंगाविषयी माहिती सांगितली परंतू गॅरंटी/वॉरंटी विषयी आजपर्यंत काहीही सांगितलेले नाही.
 
      तक्रारदाराने सामनेवालेकडून रोख रक्‍कम भरुन मोटार सायकल चेसीज नं. MBLHA 10EJG9HH16496 इंजीन नं.   HA10EA9HH67403 खरेदी केली. सदर वाहनाचे रजिस्‍ट्रेशन तक्रारदार याने सहाययक परिवहन अधिक्षक बीड यांचेकडे केले व सदर वाहनास एमएच-23 व्‍ही-1867 असा नंबर देण्‍यात आला आहे.
 
            त्‍यानंतर तक्रारदार सदर मोटार सायकलची पहिली सर्व्‍हीसींग करण्‍यासाठी दिनांक 10/10/2009 रोजी सामनेवालेंच्‍या शोरुमला गेला. तेव्‍हा सामनेवालेच्‍या कर्मचा-यांनी तक्रारदाराच्‍या मोटार सायकलची वरवर सर्व्‍हीसींग करुन दिली. त्‍यानंतर दि. 08/11/2009 रोजी तक्रारदार दुसरी सर्व्‍हीसींग करण्‍यासाठी गेला व सर्व्‍हीसींग करुन घेतल्‍यावर तक्रारदाराने त्‍याचे मोटार सायकलची बारकाईने पाहणी केली असता त्‍याचे असे निदर्शनास आले की, त्‍याचे सदर गाडीच्‍या मागील चाकाचे टायर रिंगच्‍या बाजूने चिरलेले दिसले. तक्रारदाराने त्‍याविषयी सामनेवाले यांचे सुपरवायजर श्री ठोकळे यांना माहिती दिली परंतू त्‍यांची तक्रारदारास सांगितले की, आमचे मालक येथे नाहीत तुम्‍ही परत या असे सांगितले.
 
      त्‍यानंतर तक्रारदार हे पुन्‍हा ता. 31/12/2009 रोजी सामनेवालेचे शोरुम मध्‍ये गेले असता तेथे तक्रारदाराला लवकर विचारले सुध्‍दा नाही. तेथे तक्रारदार जवळपास अर्धा ते एक तास सुपरवायजर यांना भेटण्‍यासाठी थांबले. शेवटी त्‍यांची भेट झाल्‍यावर त्‍यांनी तक्रारदारास सांगितले की, आजही आमचे मालक येथे नाहीत तुम्‍ही पुन्‍हा दोन ते तीन दिवसांनी चक्‍कर मारा. त्‍यानंतर तक्रारदार पुन्‍हा सामनेवालेकडे ता. 02/01/2010 रोजी सकाळी 11.00 वा. गेले असता तेथे सामनेवाले यांचे सुपरवायजर श्री ठोकळ साहेब रजेवर होते. त्‍यांच्‍या जागी गुंरेजा हे सुपरवायजरचे काम करीत होते. तक्रारदाराने त्‍यांना टायर बाबत सांगितले असता त्‍यांनीही तक्रारदाराच्‍या वाहनाकडे दुर्लक्ष केले. तक्रारदाराने टायर बदलून मागितले असता सामनेवालेने नकार दिला. सदर वाहनाच्‍या अजुन 4 सर्व्‍हीसींग बाकी आहेत.
      त्‍यानंतर तक्रारदाराने तारीख 05/01/2010 रोजी सामनेवालेंना नोटीस पाठवून टायर 15 दिवसात बदलून देण्‍याबाबत कळविले परंतू आजपर्यंत सामनेवालेने टायर बदलून दिलेले नाही.
 
      विनंती की, सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदाराच्‍या हिरो होंडा मोटार सायकलचे मागील बाजुचे टायर बदलून दयावे, असा आदेश व्‍हावा. नुकसान भरपाई म्‍हणून रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रु. 3,000/- सामनेवाले नं. 1 व 2 कडून मिळावा. 
 
      सामनेवाले नं. 1 व 2 यांनी त्‍यांचा खुलासा न्‍याय मंचात तारीख 06/07/2010 रोजी दाखल केला. त्‍यांचा खुलासा थोडक्‍यात की, तक्रारीतील कलम- 1 मोटार सायकल सामनेवाले नं. 1 कडून खरेदी केली या हद्दीपर्यंत बरोबर आहे. बाकी मजकूराबाबत वैयक्‍तीक माहिती नाही.
 
      कलम- 2 कांही अशी बरोबर काही अंशी चुक आहे. तक्रारदारास गाडी घेतेवेळी गाडीच्‍या गॅरंटी वॉरंटी बाबत पूर्ण लेखी व तोंडी कल्‍पना दिली होती.
 
      कलम- 4 चुक असून तक्रारदाराच्‍या गाडीची पहिली सर्व्‍हीसींग कंपनी नियमाप्रमाणे व्‍यवस्‍थीत करुन दिली. दुसरी सर्व्‍हीसींग व्‍यवस्‍थीत करुन दिली. तक्रारदाराने ज्‍यावेळी गाडी घेतली त्‍यावेळी ती चांगल्‍या स्थितीमध्‍ये व टायर चांगल्‍या स्थितीत असतांना घेतलेली आहे. तसेच गाडीच्‍या मागील चाकाचे टायर गाडी देतांना चिरलेले नव्‍हते. तक्रारदाराकडून वाहन चालवतांना योग्‍य ती काळजी न घेतल्‍याने टायर चिरले असल्‍यास या सामनेवालेंना माहिती नाही व तशी शक्‍यता आहे. मोटार सायकलच्‍या टायरची गॅरंटी वॉरंटी दिली जात नाही, कारण गाडीचे टायरचा समावेश रबरी पार्टमध्‍ये येतो व सदरचे टायर हे संबंधीत उत्‍पादकाकडून पुरवले जातात. टायर हे हिरो होंडा कंपनीचे उत्‍पादन नाही. त्‍यामुळे गाडी विक्री करतांना ओनर्स मॅन्‍युअल मध्‍ये वॉरंटी व गॅरंटी या सदराखाली सुचना क्रं. 4,7 मध्‍ये त्‍याप्रमाणे स्‍पष्‍ट उल्‍लेख केलेला आहे. त्‍याची झेरॉक्‍स प्रत सोबत जोडलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदाराच्‍या गाडीच्‍या टायर बाबतची जबाबदारी या सामनेवालेवर कायदयाने येत नाही. तक्रारदाराने सुचना क्रं. 2 प्रमाणे वेळेवर गाडीची सर्व्‍हीसींग करुन घेतलेली नाही, त्‍यामुळे तक्रारदाराने केलेले आरोप चुक आहेत.
 
      कलम- 5 कपोलकल्‍पीत व चुक आहे. शोरुम मध्‍ये प्रत्‍यक्ष मालकाच्‍या उपस्थितीची आवश्‍यकता नसते. त्‍याठिकाणी उपस्थित असलेला स्‍टाफ तक्रारीची दखल घेत असतो.
 
      कलम- 6 तारीख 05/01/2010 रोजी या तक्रारदारांना नोटीस पाठवली, या हद्दीपर्यंत बरोबर आहे. सदरची नोटीस मिळाल्‍यानंतर या सामनेवालेने टायरचा समावेश रबरी पार्टमध्‍ये येत असल्‍याने कंपनी टायरची गॅरंटी अथवा वॉरंटी देत नाही, अशी तोंडी कल्‍पना दिली होती. त्‍यामुळे नोटीसचे उत्‍तर दिले नाही. त्‍यामुळे तक्रारदाराच्‍या गाडीचे मागील टायर बदलून देण्‍याचा प्रश्‍नच येत नाही.
 
      तक्रारदाराने हिरो होंडा पॅशन प्‍लस ही मोटार सायकल सामनेवाले नं. 1 कडून दिनांक 27/09/2009 रोजी विकत घेतली आहे. सामनेवाले नं. 2 हे गाडीचे उत्‍पादक असून सामनेवाले नं. 1 हा त्‍यांचा नगर शहरासाठी विक्री प्रतिनिधी आहे.
 
      हिरो होंडा मोटार सायकलला लागणारे रबरी पार्ट, टायर, टयुब इ. चे उत्‍पादन कंपनी करीत नाही. सदरचे पार्टचा पुरवठा इतर उत्‍पादक कंपन्‍याकडून केला जातो. त्‍यामुळे या पार्टची कोणत्‍याही प्रकारे वॉरंटी वा गॅरंटी दिली जात नाही. तशाप्रकारची सुचना ओनर्स मॅन्‍युअलमध्‍ये दिलेली आहे. त्‍यामुळे या सामनेवालेने सेवेमध्‍ये कोणत्‍याही प्रकारचा कसूर केलेला नाही. त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द केलेली सदरची तक्रार फेटाळण्‍यात यावी.
 
      विनंती की, तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी.
 
      सामनेवाले नं. 2 यांना न्‍याय मंचाची नोटीस तामील होवूनही त्‍यांनी ग्राहक संरक्षण कायदा- 1986 मधील तरतुदीनुसार मुदतीत खुलासा दाखल केला नाही, किंवा ते हजरही नाही, म्‍हणून न्‍याय मंचाने त्‍यांच्‍या विरुध्‍द तारीख 04/05/10 रोजी तक्रार एकतर्फा चालविण्‍याचा निर्णय घेतला. 
     
      न्‍याय निर्णयासाठी मुददे                        उत्‍तरे
 
1.     तक्रारदाराच्‍या मोटार सायकलचे टायर
      बदलून न देवून सामनेवालेंनी तक्रारदारांना
      दयावयाच्‍या सेवेत कसूर केल्‍याची बाब
      तक्रारदाराने सिध्‍द केली आहे काय ?              होय.
 
2.    तक्रारदार दाद मिळण्‍यास पात्र आहे काय ?         होय.
 
3.    अंतिम आदेश ?                            निकालाप्रमाणे.
 
      तक्रारदाराची तक्रार दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद, सामनेवाले नं. 1 चा खुलासा, शपथपत्र, दाखल कागदपत्रे, सामनेवालेचा लेखी युक्तिवाद यांचे सखोल वाचन केले.
 
      तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराने सामनेवाले नं. 2 यांच्‍याकडून तक्रारीत नमूद केलेली हिरो होंडा पॅशन प्‍लस ही मोटारसायकल सामनेवाले नं. 1 कडून रक्‍कम रु. 40,982/- ला विकत घेतलेली आहे. ही बाब सामनेवाले यांना मान्‍य आहे. सामनेवाले नं. 2 न्‍याय मंचात हजर नाहीत व त्‍यांची त्‍यांचा खुलासाही दाखल नाही.
 
      सदर मोटार सायकलचे मागील चाकाचे टायर रिंगच्‍या बाजुने चिरलेले तक्रारदारांना दिसून आले, त्‍यामुळे त्‍यांनी सामनेवाले नं. 1 कडे चौकशी केली असता सामनेवाले नं. 1 चे सुपरवायझर यांनी मालक येथे नाहीत म्‍हणून परत येण्‍यास सांगितले. ता. 31/12/09 रोजी देखील वरील प्रमाणे तक्रारदारांना उत्‍तर देण्‍यात आले, असे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे. यासंदर्भात तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 व 2 यांना नोटीसही दिलेली आहे, परंतू सामनेवाले नं. 2 यांनी सदर नोटीसची दखल घेतलेली नाही. सामनेवाले नं. 1 यांनी मंचात खुलाशात नोटीस मिळाल्‍याचे मान्‍य केलेले आहे, परंतू सामनेवालेने टायरचा समावेश रबरी पार्टमध्‍ये येत असल्‍याने कंपनी टायरची गॅरंटी/वॉरंटी देत नाही, अशी तोंडी कल्‍पना दिल्‍याने नोटीसीचे उत्‍तर दिलेले नाही.
 
      यासंदर्भात सामनेवाले नं. 1 यांनी ‘लिमिटेशन ऑफ वॉरंटी शाल नॉट अप्‍लाय’ मधील अनुक्रमांक नं. 7 नुसार सदरचे टायरचे उत्‍पादन हे त्‍यांचे उत्‍पादन नसल्‍याने त्‍याची वॉरंटी नाही, म्‍हणून सदरच्‍या वॉरंटीच्‍या कलमाचा आधार घेतलेला आहे.
 
      वरील सामनेवाले नं. 1 च्‍या म्‍हणण्‍याच्‍या संदर्भात गांभीर्यपूर्वक विचार केला असता सामनेवाले नं. 2 यांनी हिरो होंडा या कंपनीने मशिन व सांगाडा तयार केलेला आहे. मोटार सायकलचे टायर व टयुब हे गाडीसाठी अत्‍यावश्‍यक घटक आहे. उत्‍पादक कंपनीने विक्रेत्‍यासाठी मोटारसायकल टायर, टयुबसह व त्‍यांच्‍या किंमतीसह विक्री केलेले आहे. अशा परिस्थितीत केवळ त्‍यांचे उत्‍पादन नाही आणि रबरी पार्ट असल्‍यामुळे त्‍यांची वॉरंटी नाही, असे म्‍हणता येणार नाही. सामनेवाले नं. 2 यांनी सदरचे टायर, टयुब ज्‍या उत्‍पादीत कंपनीकडून विकत घेतलेले असतील त्‍या कंपनीने निश्चितच त्‍या टायर व टयुबच्‍या संदर्भात गॅरंटी/वॉरंटी सामनेवाले नं. 2 यांना दिलेली असते. परंतू प्रस्‍तुत प्रकरणात उत्‍पादित कंपनी हजर नसल्‍याने त्‍याबाबतचा कोणताही खुलासा होवू शकला नाही. तसेच सामनेवाले नं. 1 हे सामनेवाले नं. 2 कंपनीचे अधिकृत विक्रेते आहेत. त्‍यांची देखील यासंदर्भात जबाबदारी उत्‍पादित कंपनी एवढीच आहे. त्‍यांनी सदरचे टायर हे उत्‍पादित कंपनीकडे पाठवून उत्‍पादित कंपनीकडून सदरचे टायर बदलून मिळण्‍यासाठी कार्यवाही करण्‍याची जबाबदारी त्‍यांची आहे. अशा परिस्थितीत केवळ रबरी पार्टची वॉरंटी नाही व ते टायरचे उत्‍पादक नाहीत एवढाच सामनेवाले नं. 1 चा बचाव पुरेसा नाही, असे न्‍याय मंचाचे मत आहे. सामनेवाले नं. 1 विक्रेता यांनी टायरची किंमत तक्रारदाराकडून गाडीच्‍या किंमतीत घेतलेली आहे. प्रत्‍येक उत्‍पादित वस्‍तुला त्‍या त्‍या वस्‍तुच्‍या उत्‍पादनानुसार वॉरंटी/गॅरंटी ही प्रमाणित करण्‍यात आलेली असते. अशा परिस्थितीत केवळ स्‍वत:ची जबाबदारी झटकण्‍यासाठी सामनेवाले नं. 1 यांनी सदरचा बचाव घेतलेला आहे, तो या ठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही, असे न्‍याय मंचाचे मत आहे. त्‍यामुळे सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना टायर बदलून न देवून दयावयाच्‍या सेवेत कसूर केल्‍याची बाब स्‍पष्‍ट होते, असे न्‍याय मंचाचे मत आहे. त्‍यामुळे सामनेवाले नं. 1 यांनी तक्रारदाराच्‍या मोटार सायकलचे टायर बदलून देण्‍यासाठी सामनेवाले नं. 2 यांच्‍याकडे योग्‍य ती कार्यवाही करणे व सदरचे टायर बदलून देणे उचित होईल, असे न्‍याय मंचाचे मत आहे.
 
      सेवेत कसूरीची बाब स्‍पष्‍ट झाल्‍याने सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना प्रत्‍येकी रक्‍कम रु. 2,000/- व तक्रारीच्‍या खर्चाची प्रत्‍येकी रक्‍कम रु. 1,000/- देणे उचित होईल, असे न्‍याय मंचाचे मत आहे.
 
      सबब, न्‍याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
 
                  आ दे श
1.     तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येत आहे.
2.    तक्रारदारांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी सदर मोटार सायकलचे चिरलेले टायर सामनेवाले नं. 1 कडे आदेश मिळाल्‍यापासून 15 दिवसाच्‍या आत जमा करावे.
3.    सामनेवाले नं. 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदाराने जमा केलेला टायर बदलून मिळण्‍यासाठी सामनेवाले नं. 2 कडे 30 दिवसांच्‍या आत योग्‍य ती कार्यवाही करावी.
4.    सामनेवाले नं. 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्‍कम रु. 2,000/- ( अक्षरी रुपये दोन हजर) व तक्रारीच्‍या खर्चाची रक्‍कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार) आदेश मिळाल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत अदा करावी.
5.    सामनेवाले नं. 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्‍कम रु. 2,000/- ( अक्षरी रुपये दोन हजर) व तक्रारीच्‍या खर्चाची रक्‍कम रु. 1,000/- (अक्षरी रुपये एक हजार) आदेश मिळाल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत अदा करावी.
6.    वरील रक्‍कमा विहीत मुदतीत तक्रारदारास अदा न केल्‍यास त्‍यावर सामनेवाले नं. 1 व 2 हे तक्रार दाखल तारखेपासून म्‍हणजेच तारीख 03/02/2010 पासून द.सा.द.शे. 8 टक्‍के प्रमाणे व्‍याज देण्‍यास जबाबदार राहतील.
7.    ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
                        (सौ. एम. एस. विश्‍वरुपे )       ( पी. बी. भट )
                       सदस्‍या,                अध्‍यक्ष,
                   जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच, बीड.
 
चुनडे एम.एस. /-
 
 
[ P. B. Bhat]
PRESIDENT
 
[ Sou. M. S. Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.