(द्वारा- श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराचे म्हणणे असे आहे की, तिचे पती दादा भवर यांचे दि.10.01.2009 रोजी विहिरीत पडून निधन झाले. तिचे पती व्यवसायाने शेतकरी होते त्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाने गैरअर्जदार क्र.1 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेनुसार विम्याचे संरक्षण होते. त्यांचे विमा कालावधीमधेच निधन झालेले असल्यामुळे तिने गैरअर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रासह मुदतीमधे विमा दावा सादर केला. विमा दावा सादर केल्यानंतर विमा रक्कम अदा करणे विमा कंपनीवर बंधनकारक असतानाही गैरअर्जदार विमा कंपनीने अद्याप विम्याची रक्कम दिलेली नाही. अशा प्रकारे गैरअर्जदारांनी त्रुटीची सेवा दिली, म्हणून तक्रारदाराने गैरअर्जदारांकडून रु.1,00,000/- व्याज व नुकसान भरपाईसह मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराची तक्रार अमान्य केली आहे. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचा कोणताही विमा प्रस्ताव त्यांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे तक्रारदाराला नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तक्रारदाराने गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे विमा दाव्यासोबत आवश्यक कागदपत्रे दाखल केलेली नसल्यामुळे गैरअर्जदार क्र.2 यांनी तिचा विमा दावा त्यांच्याकडे सादर केला नाही. म्हणून तक्रारदाराची तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांना नोटीस प्राप्त होऊनही ते मंचात हजर राहिले नाहीत, म्हणून त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आला. गैरअर्जदार क्र.3 कृषी अधिकारी यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, दि.12.08.2009 रोजी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवला. तक्रारदारास दि.25.08.2009 व दि.03.11.2009 रोजी कागदपत्रांची पूर्तता (3) त.क्र.595/09 करणेबाबत पत्र दिले होते. तक्रारदाराने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर दि.01.12.2009 रोजी सर्व कागदपत्रे जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी औरंगाबाद व विमा कंपनी यांचेकडे पाठविली. तक्रारदारास विमा दाव्याची रक्कम देण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे, म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी. गैरअर्जदार क्र.4 तहसिलदार कन्नड यांनी लेखी निवेदन दाखल करुन तक्रारदाराने त्यांचे कार्यालयामार्फत सदर प्रकरण दाखल केले नाही असे म्हटले आहे. तक्रारदाराने त्यांना अनावश्यक प्रतिवादी केले आहे. म्हणून त्यांचे विरुध्द दाखल केलेला तक्रार अर्ज नामंजूर करण्यात यावा. दोन्ही पक्षाने दाखल केलेल्या शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदार आणि गैरअर्जदार क्र.1 यांचा युक्तिवाद ऐकण्यात आला. गैरअर्जदार क्र.2, 3, 4, गैरहजर. तक्रारदाराने तिच्या पतीचे अपघाती मृत्यूनंतर तालुका कृषी अधिकारी कन्नड यांच्यामार्फत गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांच्याकडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्हणून विमा दावा सादर केला होता. त्यानंतर कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांनी विमा दाव्यासोबत काही कागदपत्र नसल्यामुळे त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात जिल्हा कृषी अधिकारी यांना पत्र दिल्याचे दिसून येते. त्यानंतर कृषी अधिका-यांनी तक्रारदारास कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात पत्र दिल्याचे दिसून येते. त्यानुसार तक्रारदाराने कागदपत्रांची पूर्तता केली. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तालुका कृषी अधिका-यांनी, तक्रारदाराने सादर केलेली कागदपत्र दि.01.12.2009 रोजी जिल्हा कृषी अधिकारी आणि कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांच्याकडे पाठवल्याचे दि.01.12.2009 रोजीचे पत्रावरुन स्पष्ट दिसून येते. तक्रारदाराने कागदपत्रांची पूर्तता करुनही गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेसने तक्रारदाराचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्र.1 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पाठविला नाही. गैरअर्जदार विमा कंपनीस तक्रारदाराचा विमा दावा अद्याप प्राप्त झालेला नसल्यामुळे त्यांना तक्रारदाराच्या विमा दाव्याबाबत निर्णय घेण्याची संधी देणे योग्य राहील. अशा परिस्थितीत विमा कंपनीला तक्रारदारास विमा दाव्याबाबत नुकसान भरपाई देण्याचा आदेश देणे उचित ठरणार नाही. परंतू तक्रारदाराने काही कागदपत्रांची पूर्तता केली नाही, या तांत्रिक कारणावरुन तक्रारदाराचा विमा रक्कम मिळण्याचा हक्क पूर्णतः नाकारणे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने योग्य नाही. या आधी स्पष्ट केल्याप्रमाणे (4) त.क्र.595/09 तक्रारदाराने कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेसकडे कागदपत्रे दाखल करुन त्रुटींची पूर्तता केली आहे. त्यामुळे कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांनी तक्रारदाराचा विमा दावा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविणे उचित ठरते. आदेश 1) गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेसने तक्रारदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्र.1 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे निकाल कळाल्यापासून 30 दिवसाचे आत पाठवावा. 2) गैरअर्जदार क्र.1 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस यांच्याकडून प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत विमा दाव्याबाबत निर्णय घ्यावा. 3) दोन्ही पक्षांना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |