निकालपत्र :- (दि.24/02/2012) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या)
(1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदार व त्यांचे वकील गैरहजर सामनेवालांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला.
सदरची तक्रार तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्या मुळे दाखल करणेत आला आहे.
(2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- यातील तक्रारदार यांचा मुख्य व्यवसाय घरकाम व शेती असून शेतीबरोबर दुभती जनावरे पाळून त्यातून येणारे उत्पन्नावरच उपजिवीका चालवितात. तक्रारदार यांची देशी म्हैस मागे वर बाहेर वळलेली शिंगे, काळया रंगाची, कपाळावर पांढरा ठिपका,वय 7वर्षे असलेल्या म्हैशीचा सामनेवाला विमा कंपनीकडे दि.31/03/2007 रोजी विमा उतरविलेला होता. त्याचा पॉलीसी नं.(कॅटल इन्शुरन्स नं.)1706-06-3012-000001 असून सर्टीफिकेट नं.1706-06-3012-000001/7090 असा असून कालावधी दि.27/03/2007 ते 26/03/2010 असा आहे. टॅग नं.आर.जे.आय. सी. एल.06082एम.एल.डी.बी. असा आहे. दि.20/01/2009 रोजी ‘अंग बाहेर येऊन’ अचानक मरण पावली. त्याप्रमाणे अधिकृत डॉक्टर प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष पाहणीनंतर अहवालात नमुद केलेले आहे. यावरुन तक्रारदार यांची म्हैस नैसर्गिकपणे मयत झालेचे स्पष्ट होते. सदर अधिकृत डॉक्टर प्रतिनिधी यांनी शवविच्छेदन अहवालामध्ये सदरची म्हैस ही अंग बाहेर येऊन अचानक मयत झालेचे स्पष्टपणे नमुद केले आहे. तक्रारदार यांनी म्हैस मयत झालेची घटना त्याच दिवशी सामनेवाला यांना फोनव्दारे कळविले. त्यानंतर दि.25/01/2009 रोजी तक्रारदार हे सामनेवालांचे कोल्हापूर येथील शाखेत जाऊन म्हैस मयत झालेचे कळविले. त्यावेळी सामनेवाला यांनी तक्रारदारास त्याचदिवशी क्लेम फॉर्म दिला व क्लेम फॉर्मव्दारे विमा रक्कमेची रितसर मागणी करणेस सांगितले. तक्रारदार यांनी सामनेवालांकडे योग्य ती कागदपत्रे जोडून क्लेम फॉर्मव्दारे विमा रक्कमेची मागणी केलेली होती व आहे. परंतु तक्रारदार यांनी सामनेवाला कंपनीशी वारंवार प्रत्यक्ष भेटून व फोन करुन क्लेमबाबत चौकशी केली. परंतु विमा कंपनीने आजतागायत तक्रारदार यांना विम्याची रक्कम अदा केलेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव तक्रारदार यांनी त्यांचे वकील सचिन देसाई यांचेमार्फत दि.04/02/2011 रोजी कायदेशीर नोटीस पाठवली. सदर नोटीस विमा कंपनीला दि.05/02/2011 रोजी मिळाली. परंतु सामनेवाला यांनी सदर नोटीसला उत्तर दिले नाही तसेच विमा रक्कमही दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झाले. त्यामुळे तक्रारदारास सदरची तक्रार मे. मंचात दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन क्लेमची रक्कम रु.12,000/- दि.25/01/09 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.
(3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदार यांनी भरुन दिलेला कॅटल इन्शुरन्स क्लेम फॉर्म, तक्रारदाराचे म्हैशीचे वहॅटर्निटी सर्टीफिकेट, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, पंचनामा, दुध संस्थेचा दाखला, इन्शुरन्स सर्टीफिकेट, सामनेवाला यांना म्हैस मयत झालेचा फोन केलेचे बील, जिल्हा पशुसंवर्धन यांना दिलेला रिटॅगींग पत्र व यादी, सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, पोच पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
(4) सामनेवालाने दाखल केलेल्या म्हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार मान्य केले कथनाखेरीज परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. तसेच सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराची तक्रार खोटी, लबाडीची व चुकीची असून ती कायदेशिररित्या चालणेस पात्र नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी. सामनेवाला त्यांचे लेखी म्हणणेत पुढे असे सांगतात की, तक्रारदारचे तक्रार अर्ज कलम 1 ते 6 मधील मजकूर तक्रारदाराने शाबीत करावा. तसेच तक्रार अर्ज कलम 7 ते 10 मधील सर्व मजकूर सामनेवाला यांना मान्य व कबूल नाही.तसेच कलम 11 व 12, 14 ते 17 मधील सर्व मजकूर वस्तुस्थितीस सोडून आहे. तक्रारदाराचे तक्रार अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. दाखविलेले कारण चुकीचे आहे. यातील तक्रारदार यांनी आपला क्लेम शाबीत केलेस व सामनेवाला कंपनीकडे सदर म्हैस विमा उतरविलेली होती व विमा काळात सदर म्हैस मयत झाली व सामनेवाला कंपनीची काही जबाबदारी येते असे शाबीत झालेस ती सामनेवाला कंपनीचे पॉलीसी व त्यातील अटीस बांधील राहूनच येते. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
(5) सामनेवालांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत.
(6) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे व सामनेवालांचे वकीलांनी केलेला युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात.
1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे का? --- होय.
2, काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.1 व 2 :- तक्रारदाराने त्याचे म्हैशीचा विमा सामनेवाला कंपनीकडे उतरविलेला होता. त्याचा पॉलीसी क्र.1706-06-3012-000001 असून सर्टीफिकेट नं.1706-06-3012-000001/7090 असा आहे व बिल्ल्याचा क्रमांक RGICL06082MKDB असा आहे. सदर विमाधारक म्हैशीचे वय 7 वर्षे आहे. सदर म्हैस दि.20/01/2009 रोजी अंग बाहेर येऊन मुळे अचानक मयत झाली. सदर म्हैस मयत झालेनंतर डॉ.एस.ए.जाधव यांचेमार्फत म्हैशीचे शवविच्छेदन केलेले दाखल शवविच्छेदन अहवाल, विल्हेवाट दाखला इत्यादीवरुन निदर्शनास येतो. तसेच नमुद म्हैशीचे रिटॅगींग करणेबाबत दि.06/08/2008 रोजी पशुधन विकास अधिकारी(विस्तार) पंचायत समिती आजरा यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा कोल्हापूर यांना पत्राव्दारे कळवलेचे दिसून येते. तसेच पशुवैद्य डॉ.एस.ए.जाधव यांनी दिलेले व्हेटर्नरी सर्टीफिकेट, शवविच्छेदन अहवाल, सरपंच ग्रामपंचायत पोळगांव यांचा दाखला, यावरुन विमा उतरविलेलीच म्हैस मयत झालेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे.
दाखल कागदपत्रे व विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे मालकीची विमा उतरविलेलीच म्हैस मयत झालेची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराने सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन सामनेवाला यांचेकडे क्लेमची मागणी केलेली आहे. परंतु पॉलीसीचा मूळ हेतू विचारात घेता तसेच वस्तुस्थितीजन्य पुराव्याचा विचार करता तक्रारदाराच्या क्लेमबाबत कोणताही निर्णय अथवा क्लेम नाकारलेचे पत्र तक्रारदारास दिलेले नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. वस्तुत: क्लेम दाखल झालेपासून तीन महिनेचे आत प्रस्तुत क्लेमबाबत निर्णय देणे सामनेवाला यांना बंधनकारक आहे. सामनेवाला यांनी सदर निर्णय तक्रारदारास कळवलेचे दिसून येत नाही ही सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे. तक्रारदाराने दि.04/02/2011 रोजी त्यांचे वकीलांमार्फत सामनेवाला यांना कायदेशीर नोटीस पाठवली. सदर नोटीस सामनेवाला यांना मिळूनही सामनेवाला यांनी तक्रारदारास क्लेमबाबत काही कळवलेले नाही तसेच नोटीसला उत्तरही दिलेले नाही हीसुध्दा सामनेवालांचे सेवेतील गंभीर त्रुटी आहे.
तक्रारदार नमुद पॉलीसीप्रमाणे रक्कम रु.12,000/- दि.25/03/2009 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहे. तसेच सामनेवाला यांनी सेवेत ठेवलेल्या त्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली रक्कम रु.12,000/- (रु.बारा हजार फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.25/03/2009 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे.
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.