जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 111/2012 तक्रार दाखल तारीख – 14/05/2012
तक्रार निकाल तारीख– 18/04/2013
छबूबाई उत्तम फड
वय 40 वर्षे, धंदा शेती व घरकाम,
रा. धसवाडी ता.अंबाजोगाई जि.बीड. ..अर्जदार
विरुध्द
1) व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी
19,रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलर्ड इस्टेट, मुंबई 400 038
2) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि.
राज अपार्टमेंट प्लॉट नं.29,जी सेंटर,
रिलायन्स पंपाच्या पाठीमागे,
चिस्तीया पोलिस चौकीजवळ, एम.जी. रोड,
सिडको टाऊन सेंटर, औरंगाबाद ...गैरअर्जदार
3) तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी कार्यालय, केज
ता.केज जि.बीड.
-----------------------------------------------------------------------------------
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
-----------------------------------------------------------------------------------
तक्रारदारातर्फे - अँड.आर.आर.जाधव
गैरअर्जदार क्र.1 तर्फे – अँड.ए.पी.कुलकर्णी
गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे - स्वतः
------------------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार ही धसवाडी ता.अंबाजोगाई जि.बीड येथील रहीवाशी आहे. अर्जदार ही मयताची कायदेशीर पत्नी आहे. अर्जदाराचा पती शेती व्यवसाय करुन उपजिवीका करत असे. अर्जदाराचे म्हणणे असे की, दि.26.05.2009 रोजी मयताचे पोट दुखायला लागल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे पोटदुखीचे औषध घेण्यासाठी गेले व सोयाबीनवर फवारणीचे औषध पोटदुखीचे औषध म्हणून प्यायले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अर्जदाराने 7/12 चा उतारा, 8-अ उतारा व एफ.आय.आर. घटनास्थळ पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत आणि विमा रक्कमेची मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्र.1 रिलायन्स इंडिया इन्शुरन्स कंपनी, गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस व गैरअर्जदार क्र.3 तालुका कृषी अधिकारी हजर झाले आणि त्यांनी आपापले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार क्र.3 यांनी आपल्या जवाबात म्हटले आहे की, सदरचा प्रस्ताव त्यांनी योग्य मुदतीत पुढील कार्यवाहीसाठी पाठवला होता. सबब, तक्रार त्यांच्या विरुध्द खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स कंपनी यांनी जवाबात म्हटले आहे की, त्यांना दि.26.08.2009 रोजी प्रस्ताव प्राप्त झाला आणि त्यांनी तो दि.25.03.2010 रोजी गैरअर्जदार क्र.1 रिलायन्स इन्शुरन्स यांना पाठवला.
गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले जवाबात म्हटले आहे की, तक्रारदाराने तो शेतकरी आहे व त्या घटनेत तो मृत झाला हे सिध्द केले पाहिजे. पोलिसांच्या रिपोर्टवरुन असे दिसते की, ही घटना ही आत्महत्या आहे. तो अपघात असेल तर तसे फिर्यादीने सिध्द करावे. याशिवाय अर्जदाराने दावा मुदतीत दाखल केलेला नाही. सबब, तक्रार खारीज करण्यात यावी.
मंचाने त्यांच्या समोर दाखल केलेली कागदपत्रे तपासली. त्यात साक्षीदारांचे जवाब, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टम रिपोर्ट, मरणोत्तर पंचनामा इत्यादी कागदपत्रे आहेत.
तक्रारदाराच्या विद्वान वकील श्रीमती जाधव व गैरअर्जदार क्र.1 चे वकील श्री.ए.पी.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराच्या वकिलांनी सांगितले की, मयताला पोटदुखीचा त्रास होता. घटनेच्या रात्री विज गेलेली होती. त्यामुळे अंधारात तो चुकीने औषध म्हणून सोयाबिन फवारणीचे औषध प्यायला. त्याबाबत परशुराम फड यांचा जवाब दाखल आहे, घटनास्थळ पंचनामा आहे. श्रीमती जाधव यांनी परशुराम फड यांचे शपथपत्रही दाखल केले. ज्यामध्ये “ त्यांनी मयताला पोटदुखीचा त्रास होता व घटनेच्या रात्री मयताची पत्नी माझेकडे आली व पतीने सोयाबिन फवारणीचे औषध पोटदुखीचे औषध म्हणून प्यायले असे सांगितले” असे म्हटले आहे. म्हणून मयताचा मृत्यू अपघाती झाला आहे व तक्रारदाराला शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रु.1,00,000/- मिळावे अशी त्यांनी विनंती केली आहे.
गैरअर्जदाराच्या वकिलांनी प्रथम सांगितले की, घटना दि.26.05.2009 ची आहे व तक्रार मे 2012 मध्ये दाखल झाली. सबब, तक्रार मुदतीच्या बाहेर आहे. त्याचप्रमाणे शवविच्छेदन अहवालात विषबाधेचा संशय रासायनिक प्रयोगशाळेच्या अहवालासाठी अंतिम मत राखीव असा शेरा आहे. व्हीसेराचा अहवाल मिळालेला नाही अशा परिस्थितीत मयताचा मृत्यू आत्महत्या आहे असाच निष्कर्ष काढावा लागेल. सदरचा विमा दावा शासन निर्णयाच्या प्रपत्र क (2) प्रमाणे या योजनेत बसत नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
वरील विवेचनावरुन मंचाने खालील मुददे विचारात घेतले.
मूददे उत्तरे
1. तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे का ? होय.
2. मयताचा मृत्यू हा अपघाती विषप्रयोगाने झाला आहे
हे तक्रारदाराने सिध्द केले आहे का ? नाही.
3. तक्रारदाराने ती विमा रक्कमेस पात्र आहे हे सिध्द केले
आहे का ? नाही.
4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुददा क्र.1 ः-
सदरची विमा पॉलिसी दि.15.08.2008 ते 14.08.2009 या कालावधी साठी होती. घटना दि.20.05.2009 रोजीला घडली. गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्शुरन्स यांच्या जवाबाप्रमाणे त्यांना दि.26.08.2009 रोजीला कागदपत्रे मिळाली. काही कागदपत्रांची पुर्तता अर्जदाराकडून झात्यानंतर त्यांनी दि.25.03.2010 ला गैरअर्जदार क्र.1 यांचे कडे विमा दावा पाठवला. त्यांचेकडून काहीही उत्तर आले नाही. म्हणून दि.19.01.2012 रोजी गैरअर्जदारांना नोटीस पाठवली पण त्यांचेकडून उत्तर आले नाही यावरुन तक्रारदाराने विहीत मुदतीतच विमा प्रस्ताव दाखल केलेला आहे. या विवेचनावरुन मंच सदरची तक्रार मुदतबाहय नाही असा निष्कर्ष काढत आहे.
मूददा क्र.2 व 3 ः-
तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र बघीतले, घटनास्थळ पंचनाम्यात कोठेही किटकनाशके अथवा पोटदुखीचे औषध सापडल्याचा उल्लेख नाही. शवविच्छेदन अहवालात मयताचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्यांचा संशय आहे असे म्हटले आहे. पण रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल मंचासमोर नाही. पुरुषोत्तम फड यांच्या शपथपत्राचे वाचन केले. त्यात त्यांनी मयताला पोटदुखीचा त्रास होता. एवढेच म्हटले आहे आणि मयताच्या पत्नीने येऊन सांगितले की, मयताने नजर चुकीने औषध प्यायले. अशा परिस्थितीत मयताचा मृत्यू हा अपघाती आहे, ती आत्महत्या नाही. ही गोष्ट तक्रारदाराने सिध्द केलेली नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे व खालील आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. खर्चाबददल काहीही हुकूम नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड