निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 23/08/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 12/09/2011
तक्रार निकाल दिनांकः- 09/05/2012
कालावधी 07 महिने 26 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - सदस्या
श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
---------------------------------------------------------------------------------------
दत्तराव पिता बाबाराव पौळ. अर्जदार
वय 42 वर्ष.धंदा.शेती. अड.मा.तू.पारवे.
रा.माहेर ता.पूर्णा.जि.परभणी.
विरुध्द
1 व्यवस्थापक. गैरअर्जदार.
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं.लि. अड.जी.एच.दोडीया.
11 रिलायंन्स सेंटर वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड.इस्टेट,मुंबई.400038.
2 व्यवस्थापक. स्वतः
कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा.लि.
विभागीय कार्यालय,भास्करायन एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग.
प्लॉट नं.7,सेक्टर ई-1, टाऊन सेंटर.औरंगाबाद.
3 मा.तहसिलदार साहेब. स्वतः
तहसिल कार्यालय,पूर्णा.
ता.पूर्णा.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.)
शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजनेची शारीरीक कायमचे अपंगत्वाची नुकसान भरपाई लाभार्थी शेतक-यास देण्याचे विमा कंपनीने दिली नाही म्हणून प्रस्तुतची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
अर्जदार रा.माहेर ता.पूर्णा येथील रहिवाशी आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 1 यानी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता त्या पॉलीसीचा अर्जदार हा देखील लाभार्थी होता तारीख 08/07/2009 रोजी बैलाने धडक मारल्यामुळे बैलाचे शिंग अर्जदाराच्या डाव्या डोळयास लागल्यामुळे त्याचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झाला व तो काढून टाकावा लागला.व अर्जदार डाव्या डोळयाने पूर्णपणे आंधळा झाला. अर्जदारने त्यानंतर शेतकरी विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेमफॉर्मसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे तारीख 05/10/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे सादर केले. त्यानंतर त्यांनी कबाल इन्शुरन्सकडे ती कागदपत्रे दिनांक 28/10/2009 रोजी मंजुरीसाठी पाठवली, परंतु दोन महिने उलटून गेले तरी गैरअर्जदार 1 व 2 यांनी त्याबाबत काहीच कळविले नाही.म्हणून तारीख 30/06/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ला वकिला मार्फत नोटीस पाठवुन नुकसान भरपाईची मागणी केली होती.त्या नोटीसीलाही उत्तर दिले नाही अशा रितीने नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत सेवात्रुटी करुन मानसिकत्रास दिला आहे म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन नुकसान भरपाई रु.50,000/- द.सा.द.शे. 15 टक्के व्याजासह मिळावी याखेरिज मानसिकत्रासापोटी रु.10,000/- आणि अर्जाचा खर्च रु.15,000/- मिळावा अशी मागणी केलेली आहे.
तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2) व पुराव्यातील कागदपत्रात नि. 5 लगत एकूण 11 कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेली आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तारीख 08/02/2012 रोजी आपले लेखी म्हणणे (नि.17) दाखल केला.गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पोष्टा मार्फत पाठवलेला लेखी जबाब(नि.11) प्रकरणात तारीख 04/01/2012 रोजी सामिल केला.गैरअर्जदार क्रमांक 3 ने मंचाची नोटीस स्वीकारुनही नेमले तारखेस हजर होवुन प्रकरणात आपले लेखी म्हणणे सादर न केल्यामुळे त्यांचे विरुध्द तारीख 04/01/2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत केला.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांने लेखी जबाबात (नि.17) शेतकरी अपघात विम्या संबंधी तक्रार अर्जातील मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने त्यांनी साफ नाकारली आहेत.अर्जदाराने खोटा तक्रार अर्ज केलेला असल्यामुळे ते खारीज करावा कारण अर्जदाराच्या क्लेमची कसलीही कागदपत्रे कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज कडून त्यांचेकडे आलेली नाहीत.त्याबाबत कबाल इन्शुरन्सकडे चौकशी करता असे समजले की,अर्जदाराने पाठविलेल्या कागदपत्रात बरीच अपुरी कागदपत्रे होती त्या आवश्यक कागदपत्रांच्या सर्टिफाईड कॉपीज नसल्यामुळे कबाल इन्शुरन्स यांनी अर्जदारास पत्र व स्मरणपत्र पाठविले, परंतु अर्जदाराकडून पूर्तता झाली नाही शिवाय गैरअर्जदार क्रमांक 1 यांनीही स्वतः 23/06/2010 रोजी वरील कागदपत्रे पाठविण्याबाबत अर्जदारास कळवुनही त्याने आजपर्यंत पुर्तता केलेली नाही.त्यामुळे नुकसान भरपाई अर्ज मंजूर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही त्यांचेकडून याबाबतीत कोणतीही सेवात्रुटी झालेली नाही.सबब खर्चासह ती खारीज करण्यात यावी अशी शेवटी विनंती केली आहे.
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.18) दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.11) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्राची आवश्यक ती पूर्तता व छाननी करुन क्लेम प्रस्ताव विमा कंपनीकडे मंजूरीसाठी पाठविण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही.अर्जदारच्या विमाक्लेमची कागदपत्रे त्यांच्याकडे दिनांक 13/11/2009 रोजी मिळाली त्यामध्ये बॅंक पासबुक, तलाठी व कृषी अधिका-यांचे सर्टिफीकेट, स्टँप पेपरवरील शपथपत्र, फेरफार, पोलीसाकडील एफ.आय.आर.घटनास्थळ पंचनामा, अपंगत्वाचा दाखला, मेडीकल रिपोर्ट ही अपुरी कागदपत्रे होती त्याची पुर्तता करण्यासाठी कृषी अधिका-या मार्फत अर्जदारास दिनांक 03/02/2010 रोजी कळवले होते त्यानंतर दिनांक 24/02/2010 ला स्मरणपत्र पाठवुनही पुर्तता केली नाही म्हणून दिनांक 23/06/2010 रोजी तसा शेरा मारुन क्लेम फाईल गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे पाठविली.त्यांनी ही अर्जदारास कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत कळवले होते त्या तारीख 23/06/2010 च्या पत्राची छायाप्रत लेखी जबाबासोबत दाखल केलेली आहे.वरील सर्व बाबी विचारात घेवुन प्रस्तुत प्रकरणातून त्यांना वगळण्यात यावे.अशी विनंती केली आहे.
लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.12) दाखल केले आहे.
तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड.पारवे आणि गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड दोडीया यानी लेखी युक्तिवाद केला.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदार 1 ते 3 यांनी अर्जदाराच्या शारिरीक
अपंगत्वाची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई
मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी केली आहे
काय ? नाही.
2 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2 -
अर्जदार हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे पुराव्यात सादर केलेल्या नि. 5/5 वरील 7/12 उतारे, नि.5/4 वरील नमुना नं.8-अ चा उतारा, या महसुल कागदपत्रा मधील नोंदीतून शाबीत झाले आहे. दिनांक 08/07/2009 रोजी
बैलाने धडक मारल्यामुळे बैलाचे शिंग अर्जदाराच्या डाव्या डोळयास लागल्यामुळे त्याचा डावाडोळा पूर्णपणे निकामी झाला व तो काढून टाकावा लागला.व अर्जदार डाव्या डोळयाने पूर्णपणे आंधळा झाला. ही वस्तुस्थिती शाबीत करण्यासाठी अर्जदारने पोलीस पाटील यांचे प्रमाणपत्राची छायाप्रत आणि सिव्हील हॉस्पीटल परभणी कडील तारीख 30/09/2009 चे डाव्या डोळयाला 30 टक्के कायमचे अपंगत्व आल्या संबंधीचे सर्टिफीकेटची छायाप्रत दाखल केले.
घटना घडल्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 तहसिलदार कार्यालय पूर्णा यांच्याकडे योग्य मुदतीत शेतकरी विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेम दाखल केला होता तहसिलदार यांनी त्यानंतर गैंरअर्जदार क्रमांक 2 कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज यांच्याकडे तो प्रस्ताव पाठवलेला होता.ही अडमिटेड फॅक्ट आहे.गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात अर्जदाराचा विमा प्रस्ताव त्यांच्याकडे दिनांक 13/11/2009 रोजी प्राप्त झाला होता. हे मान्य केलेले आहे. पाठवलेल्या कागदपत्रात काही आवश्यक व अपुरी कागदपत्रे पाठवल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी परभणी यांना अनुक्रमे दिनांक 03/02/2010 व 24/02/2010 रोजी कळवले होते.त्या दोन्ही पत्रांच्या स्थळप्रती पुराव्यात नि.13 व 14 वर दाखल केले आहे.कृषी अधिकारी यांना पाठवलेल्या पत्राची समज त्यांनी अर्जदाराला दिली असलीच पाहिजे.कारण कागदपत्रांची पुर्तता ही अर्जदाराकडूनच होणार होती म्हंटल्यानंतर कृषी अधिकारी ते पत्र त्यांच्याकडे तसेच ठेवुन देतील असे वाटत नाही.अर्जदाराकडून बरेच दिवस कागदपत्रांची पुर्तता झाली नसल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी शेवटी नाईलाजाने तसा शेरा मारुन तो प्रस्ताव तारीख 23/06/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीकडे पाठवलेला होता.व विमा कंपनीला ही ते कागदपत्रे मिळाली होती ही अडमिटेड फॅक्ट आहे.त्यांनी देखील अपु-या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी थेट दिनांक 23/06/2010 रोजी पत्र पाठवलेले होते त्या पत्राचीही स्थळप्रत पुराव्यात गैरअर्जदाराने नि.13 वर दाखल केलेली आहे. अर्जदाराला ते पत्र मिळाल्यानंतर वास्तविक त्याने मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता करायला काहीच हरकत नव्हती आणि त्या कागदपत्रांची पुर्तता झाली नसल्यामुळेच गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीला अर्जदाराचा विमा क्लेम आजपर्यंत मंजूर करता आलेला नसावा. विमा कपंनीने मागणी केलेल्या कागदपत्रांची अर्जदाराने पुर्तता केलेली होती या संबंधीचा कसलाही ठोस पुरावा अर्जदारने प्रकरणात दाखल केलेला नसल्यामुळे कागदपत्रांची पुर्तता होणे अद्यापी बाकी आहे. असाच यातून निष्कर्ष निघतो.
मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसी जोखमीतून मिळणारी नुकसान भरपाई संबंधी अथवा अपघातामुळे लाभार्थी शेतक-यास शारीरीक अवयवास कायमचे अपंगत्व आले तर लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे.त्यासाठी शासनाने राज्यातील सर्व खातेदार शेतक-यांचा विम्याचा हप्त्याची रक्कम शासनाच्या तिजोरीतून विमा कंपनीकडे जमा करुन शेतकरी कुटूंबाला हातभार दिला आहे. शिवाय विमा प्रस्तावची कागदपत्रे दाखल करण्याच्या बाबतीत अज्ञान शेतक-यांना अडचण भासू नये म्हणून महसूल कार्यालय आणि कबाल इन्शुरन्स ब्रोकरेज सर्व्हीसेस यांनाही मध्यस्थ म्हणून मदतीसाठी नेमलेले आहे.त्यांनी सुरवातीला अर्जदाराला अपु-या कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत कळवुन देखील अर्जदाराकडून कागदपत्रांची पुर्तता झालेली नाही.विमा कंपनीकडे प्रस्ताव गेल्यानंतर त्यांनीही अर्जदाराला पत्र पाठवुन अपुरी कागदपत्रे पाठवण्या बाबत अर्जदारास कळवुन देखील त्याने आजपर्यंत पुर्तता केली नाही त्यामुळे याबाबतीत गैरअर्जदारा कडून सेवात्रुटी झाली असे म्हणता येणार नाही, तरीपरंतु अर्जदार शेतकरी विम्याचा लाभार्थी असल्याने व पॉलिसी मुदतीत त्याला त्याचा डोळा कायमचा निकामी झाल्यामुळे शासनाच्या योजने प्रमाणे व पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई रु.50,000/- मिळणेस अर्जदार पात्र असल्याने वरील सर्व बाबी विचारात घेवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदार नं 1 विमा कंपनीने अर्जदारास तारीख 23/06/2010 च्या पत्रातून मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता अर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत करावी, कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांने अर्जदाराचा विमाक्लेम पुढिल दोन महिन्याच्या आत कोणतीही मुदतीची बाधा येवु न देता सेटल करावा.
3 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा.
4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ. अनिता ओस्तवाल श्री. सी.बी. पांढरपटटे
सदस्या अध्यक्ष