जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –16/2011 तक्रार दाखल तारीख –03/01/2011
भारत पि. चंदरराव दातार
वय 38 वर्षे धंदा एल.आय.सी.एजंन्ट .तक्रारदार
रा.तिरुपती नगर,बार्शी रोड,बीड ता. जि.बीड
विरुध्द
व्यवस्थापक, .
रिलायन्स् जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
सी-9/10, दुसरा मजला, औरंगाबाद बिझीनेस सेंटर
अदालत रोड,औरंगाबाद-431001 .सामनेवाला
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.अरविंद काळे
सामनेवाले तर्फे :- अँड.ए.पी.कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हे एलआयसी एजन्ट म्हणून काम करतात.कामासाठी त्यांना बाहेरगांवी व इतरत्र जावे लागते. म्हणून तक्रारदारांनी स्वतःकरिता टवेरा कार सोहम मोटार्स औरंगाबाद येथून खरेदी केली. त्यासाठी तक्रारदारांनी आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेतले.
दि.7.8.2010 रोजी तक्रारदारांनी सदर वाहनाचा विमा घेतला आहे.सदर वाहनाचा नोंदणी क्रमांक एम.एच.-23-ई-6307.
दि.05.08.2010 रोजी तक्रारदार हा पाटोदा येथे एलआयसी च्या कामाकरिता ड्रायव्हर पांडूरंग आत्माराम सुरवसे याला घेऊन जात असताना संध्याकाळी अंदाजे 5.35 वाजता बीड पासून सहा किलोमिटर नगर रोडवर म्हसोबा फाटयाजवळ एक गाय अचानकपणे तक्रारदाराच्या गाडीसमोर आली.तिला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने गाडी बाजूला घेत असताना गाडी स्लीप झाली व रोडच्या बाजूच्या दगडाच्या कठडयावर एका साईडने आदळल्यामुळे तक्रारदाराच्या गाडीचा समोरचा भाग चक्काचूर झाला. त्यामुळे तक्रारदाराच्या गाडीचे रु.1,50,000/- चे नूकसान झाले. अपघातानंतर तक्रारदारांनी तात्काळ यासंदर्भातील सामनेवाला यांना कळविले. त्याचप्रमाणे बीड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची माहीती दिली. सामनेवाला यांचे सर्व्हेअर यांनी गाडीचा अपघाता झाला त्याठिकाणी जाऊन गाडीची पाहणी केली.गाडीचे किती रुपयांचे नूकसान झाले यांचे अंदाजपत्रक तयार केले. तक्रारदारांनी सामनेवालाकडे नूकसान भरपाईची मागणी केली. त्यावेळी सामनेवाला यांनी तक्रारदारांना सांगितले की, गाडी दूरूस्त करुन घ्या व खर्चाच्या पावत्या आमचे कार्यालयामध्ये जमा करा. त्याप्रमाणे गाडीचे खर्चाचे पैसे मिळतील.
सामनेवाला यांचे सांगणेप्रमाणे व त्यांचे संमतीने तक्रारदाराने अपघातग्रस्त गाडी दूरुस्तीकरिता औरंगाबाद येथे सोहम मोटार्स यांचेकडे दि.16.08.2010 रोजी टाकली.त्यावेळी सोहम मोटार्स यांनी तक्रारदाराकडून अनामत रक्कम रु.15,000/- घेतले.गाडी दूरुस्तीसाठी तक्रारदाराजवळ पैसे नसल्यामुळे व सदरील पैसे जमवाजमव करण्यासाठी तक्रारदारास वेळ लागला.गाडी दूरुस्ती टाकल्याची माहीती सामनेवाला यांना दिली होती. दि.30.11.2010 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना पत्र पाठवून कळविले की, तक्रारदाराचा विमा दावा विमा कंपनीच्या अटीचा भंग झाल्याने फेटाळण्यात आला. अपघातचे वेळी गाडी व्यापारी हेतूने वापरण्यात आली होती. तक्रारदारांना सदरची कारणे मान्य नाहीत. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा नाकारुन तक्रारदाराना दयावयाचे सेवेमध्ये कसूर केलेला आहे. सामेनवाला तक्रारदारांना खालील प्रमाणे नूकसान भरपाई देण्यास बंधनकारक आहेत. अपघातग्रस्त वाहनाचा दूरस्तीसाठी लागलेला खर्च रु.1,50,000/-, मानसिक आर्थिक त्रासाबददल रु.50,000/- गाडी दूरस्तीच्या काळामधील पाकीगचा खर्च रु.100/- प्रतिमहीना दि.16.08.2010 पासून दि.23.12.2010पर्यत 120 दिवसाचे रु.13,000/- तक्रारीचा खर्च रु.10,000/-असे एकूण रक्कम रु.2,25,000/-.
विनंती की, तक्रारदारांना सामनेवाला यांनी रक्कम रु.2,25,000/- 12 टक्के व्याजासह देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा दि.27.06.2011 रोजी दाखल केला आहे. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. तक्रारदारांनी वाहनाची नोंद आणि विमा हा खाजगी वापरासाठी घेतलेला आहे. तो व्यापारी वापरासाठी नाही. चौकशी आणि कागदपत्रावरुन सामनेवाला यांनी असे आढळून आले की, सदरचे ववाहन अपघाताचे वेळी व्यापारी हेतूने दिलेले होते. त्यामुळे सामनेवाला यांनी योग्य रितीने दावा नाकारला आहे. त्या बाबत दि.30.11.2010 रोजी तक्रारदारांना पत्राने कळविले आहे. या संदर्भात सामनेवाला यांची कोणतीही जबाबदारीयेत नाही. विमा पत्रातील अटी व शतीनुसार खाजगी वाहनाचा विमा असताना सदरचे वाहन भाडे तत्वावरती वापरासाठी देता येत नाही. दिल्यास पॉलिसीतील शर्तीचा भंग होतो. तसेच वाहन चालकाजवळ अपघाताचे वेळी अंमलातील वैध परवाना नव्हता. सदरचे वाहन हे एलएमव्ही (एनटी) या प्रकारातील वाहन चालक परवाना वाहन चालकाजवळ नसल्याने विमा पत्रातील अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. त्यामुळे नूकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार नाहीत. तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला यांचा खुलासा, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.काळे आणि सामनेवाला यांचे विद्वान वकील श्री.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी त्यांचे तवेरा वाहनासाठी सामनेवाला कडून दि.6.5.2010 रोजी विमा घेतला आहे. ही बाब सामनेवाला यांना मान्य आहे.
दि.8.8.2010 रोजी तक्रारदाराच्या वाहनाला अपघात झालेला आहे. त्या बाबतची सूचना तक्रारदारांनी सामनेवालाकडे दिल्यावर सामनेवाला यांचे सर्व्हेअरने घटनास्थळी वाहनाची पाहणी केली आहे. सामनेवाला यांचे सूचनेप्रमाणे वाहन दूरुस्तीसाठी टाकलेले आहे.
तक्रारदारांनी नूकसान भरपाईचा दावा सामनेवाला यांचेकडे गेला असताना दरम्यानचे काळात दि.1.11.2010 रोजी सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांचा दावा विमा पत्रातील अटी व शर्तीचा भंग झाल्यामुळे नाकारल्याचे पत्र दिलेले आहे.
वरील पत्रात सामनेवाला यांनी जी कारणे नमूद केली आहे त्या कारणाचा विचार करता सामनेवाला यांनी सदर पत्रात अपघाताचे वेळी सदरचे वाहन भाडे तत्वावर दिले असल्याने विमा पत्राच्या अटीचा भंग झालेला असल्याने दावा नाकारला आहे. या संदर्भात सामनेवाला यांनी सदर खुलाशासोबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.खुलाशात नमूद केल्याप्रमाणे एक कागदपत्रे व चौकशी वरुन वाहन हे व्यापारी हेतूने चालविण्यासाठी दिल्याचे आढळून आल्या बाबतचे विधान सामनेवाला यांनी केलेले आहे. सदरचे विधान शाबीत करण्याची पूर्ण जबाबदारी सामनेवाला यांची आहे. तक्रारदारांनी तक्रारीत या संदर्भात ते स्वतः अपघाताचे वेळी त्यांचे कामासाठी जात असल्याची विधाने केलेली आहेत. सदरच्या विधान खोडून काढण्यासाठी सामनेवाला यांचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा विमा पत्रातील अटीचा भंग झाल्याने योग्य रितीने नाकारला असे म्हणता येणार नाही. खुलाशात सामनेवाला यांनी वाहन चालकाच्या परवान्या बाबत हरकत घेतली आहे. परंतु सदरचे कारण हे त्यांचे दावा नाकारल्याचे पत्रात नमूद नाही त्यामुळे यांचा याठिकाणी विचार करणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी वाहन दूरुस्तीसाठी टाकले त्यावेळी रक्कम रु.15,000/- दिलेले आहे व त्यानंतर आजपर्यत तक्रारदाराचे वाहन दूरुस्त झाले किंवा नाही यांचा तक्रारीवरुन कोणताही बोध होत नाही. या संदर्भात तक्रारदाराची तक्रारीतील नूकसान भरपाईची मागणी दि.16.08.2010 रोजी ते दि.23.12.2010पर्यत गाडी पार्कीगचे 130 दिवसाची रक्कम तक्रारदारांनी मागितली आहे परंतु वाहन दूरुस्तीचे संदर्भातील रक्कम अदा केली त्या बाबतची कोणतीही पावती दाखल नाही. अंदाजित खर्च रु.1,52,000/- म्हटले आहे. रक्कम रु.1,23,600/- सोहम मोटार्स यांचे नांवाचा दि.23.1.2.2010 रोजीचा चेक दाखल केलेला आहे. यावरुन तक्रारदारांना वाहन दूरुस्तीसाठी रु.1,23,600/- रु.15,000/- असे एकूण रु.1,38,600/- एवढा खर्च आल्याचे दिसते. गाडी पार्कीगचे संदर्भातील रक्कमेची पावती तक्रारीत दाखल नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांना रक्कम रु.1,38,600/- वाहन नूकसानीची रक्कम देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सदर प्रकरणात सर्व्हे अहवाल दाखल नाही. सेवेत कसूरीची बाब स्पष्ट झाल्याने तक्रारदारांना निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे.त्यामुळे मानसिक त्रासाची रक्कम रक्कम रु.5,000/- व खर्चाची रक्कम रु.2000/- सामनेवाला यांनी तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना वाहनाच्या दूरुस्तीचा खर्च रु.1,38,600/-(अक्षरी रु.एक लाख अडोतिस हजार सहाशे फक्त) आदेश प्राप्ती पासून 30 दिवसाचे आंत दयावा.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, वरील रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास दि.30.11.2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज देण्यास सामनेवाला हे जबाबदार राहतील.
4. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्त) व खर्चाची रक्कम रु.2,000/-(अक्षरी रु.दोन हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावी.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड