::निकालपत्र ::
(पारित व्दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्यक्ष.)
(पारित दिनांक-20 जानेवारी, 2017)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली त्याच्या वाहनाची दुरुस्त करुन न दिल्याने सेवेत कमतरता ठेवली या आरोपा वरुन विरुध्दपक्षां विरुध्द मंचासमक्ष दाखल केली.
02. तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे-
विरुध्दपक्ष क्रं-2) ही महिन्द्रा कंपनी असून चार चाकी वाहनाची निर्माता आहे आणि विरुध्दपक्ष क्रं-1) हे त्या कंपनीचे नागपूर येथील अधिकृत विक्री केंद्र आहे. तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्रं-2) महिन्द्रा कंपनी निर्मित स्कॉर्पीओ EX-M2 DICR या वाहनाचा मालक असून वाहनाचा नोंदणी क्रं-MH-31/D.V.-7671 असा आहे. ते वाहन त्याने विरुध्दपक्ष क्रं-1) कडून विकत घेतले होते. वाहनाचा ताबा देते वेळी मीटर रिडींग 15 किलोमीटर होते तसेच वाहनाचे सर्व्हीस बुक देताना पहिले मोफत सर्व्हीस कुपन माडी वापरण्यापूर्वीच फाडून दिले होते. सदर वाहनातून 08 ते 10 दिवसा नंतर पांढरा धुर निघू लागला आणि इंजीन लवकरच गरम होऊन पिक-अप बरोबर नव्हते. विरुध्दपक्ष क्रं-1) ने त्यावेळी वाहनाची दुरुस्ती कुठलेही शुल्क न आकारता करुन दिली होती परंतु जॉब कॉर्ड बनविले नव्हते. तक्रारकर्त्याने वाहनाची पहिली मोफत सर्व्हीस 4821 किलोमीटर असताना विरुध्दपक्ष क्रं-1) कडून करवून घेतली, त्यावेळी त्याचे कडून विनाकारण इंटेरियर लॅम्प पोटी रुपये-319/- घेतले तसेच 04 प्रकारचे ऑईल बदलविण्यात आले परंतु डिफ्रेन्शीयल ऑईल बदलविणे आवश्यक असताना ते बदलविले नाही.
तक्रारकर्त्याची पुढील तक्रार अशी आहे की, वाहना सोबत त्याला वॉरन्टी प्रमाणपत्र, बॅटरीचे प्रमाणपत्र इत्यादी भरुन दिले नाही. तसेच शेडयुल ऑफ चॉर्जेस शिट सुध्दा भरुन दिली नाही, अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं-1) ने अकार्यक्षम सेवा त्याला दिली. त्यानंतर दिनांक-15/05/2012 ला जेंव्हा मीटर वाचन 15490 किलोमीटर होते त्याने निराशेने वैतागून वाहन इंजीन कामा करीता विरुध्दपक्ष क्रं-1) कडे सोडून दिले. तक्रारकर्त्याला आपल्या कुटूंबियां सोबत गाडीने सर्व देवस्थानांना जायचे होते परंतु त्याचे वाहन प्रवासासाठी योग्य नसल्याने व ते दुरुस्ती करीता विरुध्दपक्ष क्रं-1) कडे जमा असल्याने दुरुस्तीसाठी काही अवधी लागणार होता म्हणून त्याने दुसरी एक गाडी भाडयाने घेऊन तिर्थक्षेत्रास भेटी दिल्यात, त्यावर विरुध्दपक्ष क्रं-1) ने नुकसान भरपाई म्हणून तक्रारकर्त्यास रुपये-12,000/- चा धनादेश दिला व आपली चुक कबुल केली. परंतु तक्रारकर्त्यास प्रत्यक्षात रुपये-19,266/- एवढा खर्च आला होता. तक्रारकर्त्याला विरुध्दपक्ष क्रं-2) च्या कुठल्याही अधिका-याशी संपर्क साधता आला नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) ने त्याचे वाहन आज पर्यंत दुरुस्त करुन दिले नाही, त्यामुळे या तक्रारीव्दारे त्याने त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- नुकसान भरपाई मागितली असून खर्चापोटी रुपये-20,000/- मागितले आहेत. तसेच पुढील 05 वर्षात त्याचे वाहनात दोष निर्माण झाल्यास ते मोफत दुरुस्त करुन देण्याची हमी विरुध्दपक्षा कडून मागितली आहे किंवा 06 महिन्याची वाहनाची 5% झीज पकडून दिलेली संपूर्ण रक्कम व्याजासह विरुध्दपक्षाने परत करावी किंवा त्या वाहना ऐवजी नविन वाहन वॉरन्टीसह द्दावे अशी मागणी सुध्दा केली आहे.
03. विरुध्दपक्ष क्रं-1) ने आपला लेखी जबाब सादर करुन सदर वाहन त्याचे कडून तक्रारकर्त्याने विकत घेतल्याचे मान्य केले. परंतु वाहन देते वेळी मोफत सर्व्हीस बुक मधील पहिल्या मोफत सर्व्हीसचे पान फाडल्या बद्दल नाकबुल केले. तक्रारकर्त्याने त्याच्या गाडीतून पांढरा धुर निघत असल्याची तक्रार केली आणि त्या दोषाचे निराकरण सुध्दा करण्यात आले होते परंतु त्यावेळी जॉब कॉर्ड बनविण्यात आले नाही हे नाकबुल केले. पहिल्या मोफत सर्व्हीसिंगचे वेळी दुरुस्ती शेडयुल प्रमणे फक्त कंझुमेबल वस्तुवर रक्कम आकारण्यात आली होती आणि सर्व्हीस मॅन्युअल प्रमाणे वाहनाची सर्व्हीसिंग करण्यात आली होती, त्यावेळी डिफ्रेन्शीयल ऑईल बदलविण्यात आले नव्हते. वाहना सोबत वॉरन्टी कॉर्ड, बॅटरी सर्टिफीकेट इत्यादी दिले नसल्याची तक्रार नाकबुल करण्यात आली. वाहन ज्यावेळी 15490 किलोमीटर चालले होते तेंव्हा ते दुस-या मोफत सर्व्हीसिंगसाठी आणले होते आणि त्यावेळी सुध्दा तक्रारकर्त्याने सांगितल्या प्रमाणे वाहनातील दोषांचे निराकरण करण्यात आले होते, त्यावेळी तक्रारकर्त्याने गाडीची दुरुस्ती बरोबर झाल्याचे समाधान झाल्या बद्दल लिहून दिले होते. तक्रारकर्त्याला त्या नंतर गाडीचे दुरुस्तीस वेळ लागणार असल्याने त्याला त्रास होऊ नये या दृष्टीने रुपये-12,000/- प्रवास खर्च दिला होता परंतु त्याचे कडून काही चुक झाली असे कबुल केले होते ही बाब अमान्य केली. सदर वाहन तक्रारकर्त्या कडे दिनांक-26/05/2012 पासून आहे.
विरुध्दपक्ष क्रं-1) ने पुढे असे नमुद केले की, ज्यावेळी वाहनातून पांढरा धुर निघत असल्याची तक्रार करण्यात आली होती त्यावेळी ते वाहन 6082 किलोमीटर चालले होते, तपासणी केल्यावर असे निष्पन्न झाले होते की, तो दोष भेसळयुक्त डिझेल वापरामुळे झाला होता, त्या वाहना मध्ये कुठलाही उत्पादकीय दोष नव्हता. सबब तक्रार खोटी असून ती खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) तर्फे करण्यात आली.
04. विरुध्दपक्ष क्रं-2) ने आपल्या लेखी उत्तरात तक्रारीतील सर्व मुद्दे नाकबुल केलेत व असे नमुद केले की, तक्रारकर्ता म्हणतो त्या प्रमाणे गाडीतील दोषा संबधी त्याने सर्व्हीस मॅनेजरकडे कधीच तक्रार केली नव्हती. तसेच त्या वाहनाची तपासणी तज्ञा मार्फत करुन घेण्या बद्दलच्या सुचना पण विरुध्दपक्ष क्रं-2) ला कधी देण्यात आलेल्या नाहीत. तक्रारकर्त्याने त्या वाहना बद्दल त्याचे संपूर्ण समाधान झाल्या नंतर ते विकत घेतले होते, त्या वाहना मध्ये कुठलाही उत्पादकीय दोष नव्हता, सबब तक्रार खारीज करण्याची विनंती करण्यात आली.
05. तक्रारकर्त्याची तक्रार तसेच विरुध्दपक्षांचे लेखी उत्तर आणि उपलब्ध दस्तऐवजांच्या प्रतीं तसेच उभय पक्षकारांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
06. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीचे समर्थनार्थ केवळ गाडी विकत घेतल्या संबधीच्या पावत्या, टॅक्स इन्व्हाईस, अंदाजपत्रक, धनादेश व नोटीसच्या प्रती दाखल केल्या आहेत, त्याने कुठल्याही सर्व्हीसिंगचे जॉब कॉर्ड किंवा असा कुठलाही दस्तऐवज दाखल केला नाही, ज्यावरुन हे सांगता येईल की, त्या वाहना मध्ये तक्रारकर्ता म्हणतो त्या प्रमाणे काही दोष होते. तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज वास्तविकपणे ही तक्रार निकाली काढण्यास कुठल्याही प्रकारे उपयोगाचे नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या तक्रारीचा एक-एक विचार केला तर त्याची पहिली तक्रार अशी आहे की, वाहनाचा ताबा देते वेळी वाहनाच्या मोफत सर्व्हीसिंग पुस्तीके मधील पहिले मोफत सर्व्हीसचे पान गाडीचा उपयोग घेण्या अगोदरच फाडून टाकलेले होते परंतु त्याची ही तक्रार त्याने केलेल्या पुढील विधानामुळे विसंगत आहे, त्याने असे म्हटले आहे की, ज्यावेळी ते वाहन 4821 किलोमीटर चालले होते, त्यावेळी वाहनाची पहिली मोफत सर्व्हीसिंग झाली होती, जेंव्हा की त्याचा असा आरोप आहे की, पहिल्या मोफत सर्व्हीसचे पान त्याला दिले नव्हते, तर वाहनाची पहिली मोफत सर्व्हीस कशी झाली, त्या बद्दल त्याने काहीच खुलासा केलेला नाही. तसेच त्यावेळी विरुध्दपक्ष क्रं-1) ने डिफ्रन्शीयल ऑईल बदललेले नव्हते आणि इंटेरिअर लॅम्पसाठी तक्रारकर्त्या कडून विनाकारण रुपये-319/- घेतले होते. विरुध्दपक्ष क्रं-1) ने टॅक्स इन्व्हाईसची प्रत दाखल केली आहे, जे हे दर्शविते की, रुपये-319/- इंटेरियर लॅम्पसाठी आकारण्यात आले होते परंतु तक्रारकर्ता हे सिध्द करु शकला नाही की, ती आकारणी विनाकारण करण्यात आली, जेंव्हा की त्याला त्या खर्चाचे बिल देण्यात आले, त्याअर्थी त्याने तो लॅम्प बदलविण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं-1) ला नक्कीच सांगितले असावे. डिफ्रन्शीयल ऑईल बदललेले नाही या बद्दल वाद नाही परंतु सर्व्हीस शेडयुल प्रमाणे वाहनातील ऑईल बदलविण्यात येत असते त्यामुळे केवळ ते ऑईल बदलविले नाही म्हणून त्यात विरुध्दपक्ष क्रं-1) ने सेवेत त्रृटी ठेवली असे गृहीत धरता येणार नाही. या बद्दल वाद नाही की, त्या वाहनातून पांढरा धुर निघत असल्याची तक्रार होती परंतु त्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले होते आणि ही बाब विरुध्दपक्ष क्रं-1) ने दाखल केलेल्या जॉब कॉर्डचे प्रतीवरुन सिध्द होते. जर तक्रारकर्ता सर्व्हीसिंगव्दारे केलेल्या दोषाचे निवारण्या संबधी समाधानी नव्हता तर त्याने तसे जॉब कॉर्डवर लिहून द्दावयास पाहिजे होते किंवा त्यावर स्वाक्षरी करावयास नको होती.
07. विरुध्दपक्ष क्रं-1) ने तक्रारकर्त्याचे दिनांक-03/03/2012 रोजीचे गाडीच्या दुरुस्ती बद्दल तो समाधानी असल्या बद्दलचे पत्र दाखल केले आहे, त्यापत्रा व्दारे तक्रारकर्त्यने असे नमुद केले की, त्याला त्याचे वाहन चांगल्या स्थितीत परत मिळाले असून विरुध्दपक्ष क्रं-1) ने केलेल्या दुरुस्ती संबधी तो पूर्णपणे समाधानी आहे. याचाच अर्थ मार्च-2012 मध्ये त्या वाहनात जे काही दोष असतील त्या दोषांचे निवारण तक्रारकर्त्याचे समाधाना प्रमाणे करण्यात आले होते.
08. तक्रारकर्त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, दिनांक-15/05/2012 ला त्याने ते वाहन इंजीनच्या कामासाठी शेवटी वैतागून विरुध्दपक्ष क्रं-1) कडे सोडून दिले, त्यावेळी ते वाहन 15490 किलोमीटर चालले होते. विरुध्दपक्ष क्रं-1) ने जॉब कॉर्डची प्रत दाखल केली आहे, ज्यावरुन हे दिसून येते की, त्यावेळी ते वाहन तिस-या मोफत सर्व्हीसिंगसाठी आणण्यात आले होते म्हणजेच ते वाहन वैतागून तक्रारकर्त्याने आणलेले नव्हते तर त्या वाहनाची तिसरी मोफत सर्व्हीस करुन घेण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं-1) कडे सोडण्यात आले होते, त्यावेळी तयार केलेल्या जॉब कॉर्ड मध्ये वाहनातून पांढरा धुर निघत असल्याची तक्रार तक्रारकर्त्याने केली होती या संबधी काहीही दिसून येत नाही. विरुध्दपक्ष क्रं-1) ने जे काही दस्तऐवज दाखल केलेले आहेत, त्यावरुन असे म्हणता येईल की, तक्रारकर्त्याने वाहना संबधी जी काही तक्रार केली होती, त्यावर विरुध्दपक्ष क्रं-1) कडून योग्य ती तपासणी होऊन त्याचे निराकरण करण्यात आले होते, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या या म्हणण्याला काही अर्थ उरत नाही की, आज पर्यंत त्याचे वाहनाची दुरुस्ती विरुध्दपक्ष क्रं-1) ने केलेली नाही.
09. तक्रारकर्त्या पुढे असा युक्तीवाद करण्यात आला आहे की, विरुध्दपक्ष क्रं-1) ने तक्रारकर्त्याला प्रवासखर्चापोटी रुपये-12,000/- देऊन एकप्रकारे आपली चुक कबुल केलेली आहे परंतु तक्रारकर्त्याचे हे केवळ तोंडी विधान आहे कारण विरुध्दपक्ष क्रं-1) चे म्हणण्या नुसार त्या वाहनाच्या दुरुस्तीला काही सुटे भाग उपलब्ध नसल्याने वेळ लागणार होता आणि तक्रारकर्त्याला बाहेरगावी जावयाचे असल्याने केवळ सहानुभूतीपूर्वक त्याला प्रवासाचा खर्च म्हणून रुपये-12,000/- देण्यात आले होते, केवळ पैसे दिल्याने विरुध्दपक्ष क्रं-1) ची काही चुक होती, असा निष्कर्ष काढता येत नाही.
10. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले आहे की, त्याला विरुध्दपक्ष क्रं-1) कडून वाहन दुरुस्तीसाठी योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी त्याने आपले वाहन उन्नती मोटर्स कडून दिनांक-17/07/2012 ला दुरुस्त करुन घेण्याचे ठरविले परंतु त्याने ते वाहन खरोखरच उन्नती मोटर्स कडून दुरुस्त करुन घेतले किंवा नाही, या संबधी कुठलाही दस्तऐवज दाखल केलेला नाही. जर त्याने वाहन दुरस्त केले असेल तर त्याने त्या संबधीचे दस्तऐवज दाखल
करावयास हवे होते, ज्यामुळे त्याचा तक्रारीला थोडाफार आधार मिळाला असता. ज्याअर्थी त्याने तसा पुरावा दिलेला नाही, त्याअर्थी असा निष्कर्ष काढता येतो की, त्याचे वाहनात नंतर कुठलाही दोष उत्पन्न झाला नव्हता.
11. वरील सर्व कारणास्तव आम्हाला या तक्रारीत फारसे तथ्य दिसून येत नाही, त्या वाहनात निर्मिती दोष (Manufacturing defect) होता किंवा नाही या बद्दल तज्ञांचा अहवाल (Expert opinion) मंचा समोर आलेला नाही. उलट पक्षी विरुध्दपक्ष क्रं-1) ने दाखल केलेल्या दस्तऐवजाच्या प्रती वरुन वेळोवेळी वाहनाची दुरुस्ती व सर्व्हीसिंग करण्यात आली होती, असे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्त्या कडून घेण्यात आलेल्या पुढील एका निवाडयाचा आधार या प्रकरणाला लागू होत नाही- “M/s. Hyundai Motors India Ltd.-Versus-M/s. Affiliated East West Press (P) Ltd”-2008 (1) CPR 318 (NC) या प्रकरणात असे म्हटले आहे की, जेंव्हा उत्पादीत वाहनातील दोषाचे निराकरण अनेकदा दुरुस्ती करुनही होऊ शकत नसेल अशावेळी वाहन निर्मात्याला वाहनाची रक्कम परत करण्याचा आदेश अयोग्य ठरविता येत नाही. हातातील प्रकरणातील वस्तुस्थिती वरुन हे स्पष्ट आहे की, तक्रारकर्त्याचे वाहना मध्ये असलेल्या दोषाचे निराकरण करण्यात आले होते व तशी पावती तक्रारकर्त्याने दिली पण होती.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करता ही तक्रार खारीज होण्यास पात्र आहे, त्यावरुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
::आदेश::
(1) तक्रारकर्ता श्री छत्रपती व्ही.गेडाम यांची विरुध्दपक्ष क्रं-1) मॅनेजर, प्रोव्हिन्शिएल ऑटोमोबाईल कंपनी लिमिटेड , नागपूर अधिक-एक यांचे विरुध्दची खारीज करण्यात येते.
(02) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.
(03) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.