तक्रारकर्तीतर्फे वकील :- ॲड. एस.एन. ढोले
विरुध्दपक्षातर्फे वकील :- ॲड. पी.आर. धर्माधिकारी
::: आ दे श प त्र :::
मा. सदस्य, श्री कैलास वानखडे यांनी निकाल कथन केला :-
ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये तक्रारकर्तीने दाखल केलेल्या तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे :-
तक्रारकर्ती ही तक्रारीमध्ये नमूद केलेल्या पत्यावर गुरुकृपा इन्डस्ट्रीज हया नावाने व्यवसाय करते. विरुध्दपक्ष मशिनरी पुरवठा करण्याचा व्यवसाय करतात. तक्रारकर्तीला विरुध्दपक्षाकडून त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने मशिनरी घ्यावयाची असल्याने विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला मशिनीसंदर्भात कोटेशन सुध्दा दिले व त्या कोटेशनमध्ये मशिनरीचे दर सुध्दा नमूद करुन दिले. त्यानंतर तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्षास रक्कम ₹ 11,33,000/- चा अग्रीम भरणा केला व विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला थोडयाच दिवसात सदरहू मशिनरीचा पुरवठा करण्याचे कबूल केले. त्यानंतर तक्रारकर्तीने वारंवार विरुध्दपक्षाला मशिनरीची मागणी केली असता विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला टाळाटाळ केली व ठरल्याप्रमाणे वेळेवर मशिनरी सुध्दा दिली नाही व दिलेल्या यादीनुसार सुध्दा तक्रारकर्तीस ऑईल एक्सप्लर 24 X 4, बेबी बॉयलर, फिडर प्रेस हया मशिनरीचा पुरवठा केला नाही व त्यांची अनुक्रमे रक्कम ₹ 1,65,000/-, 95,000/- 1,55,000/- असे एकूण ₹ 3,25,000/- तक्रारकर्तीकडून वसूल केले. वास्तविक पाहता विरुध्दपक्षाने दिलेल्या यादीनुसार मशिनरीचे संपूर्ण पैसे अग्रीम घेतले होते. विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला दिलेल्या कोटेशननुसार मशिनरीचा पुरवठा केला नाही. तसेच दिलेल्या कोटेशननुसार दर सुध्दा तक्रारकर्तीला लावलेले नाही व कोटेशनमध्ये नमूद दरापेक्षा अधिकची रक्कम तक्रारकर्तीकडून वसूल केली. त्यात फिडींग एलिवेटर ज्याची किंमत ₹ 95,000/- होती त्याचे 1,95,000/- घेतले. वाटर स्पायलर किंमत ₹ 15,000/- त्याचे ₹ 75,000/- घेतले. ग्राऊंडनट डिस्टोनर ₹ 48,000/-, त्याचे ₹ 95,000/-, घेतले. स्टोअरेज प्लेटफॉर्म फॉर ग्राऊंडनट ₹ 75,000/- त्याचे ₹ 1,75,000/-, मोटर स्टार्टर ₹ 68,000/-, त्याचे ₹ 1,25,000/- घेतले. फाऊंडेशन बोल्ट चे ही जास्त पैसे घेतले आणि सुपरव्हिजन चार्जेस ₹ 25,000/- जास्तीचे पैसे घेतले. अशाप्रकारे अनुक्रमे ₹ 95,000/-, ₹ 60,000/-, ₹ 47,000/-, ₹ 1,00,000/-, ₹ 45,000/-, आणि सुपरव्हिजन चार्जेस ₹ 25,000/- जास्तीचे पैसे घेतले. सदरहू रक्कम तक्रारकर्तीस परत करण्यास विरुध्दपक्ष जबाबदार आहेत. ज्या मशिनरी दिल्या त्या सुध्दा योग्य नाहीत व त्यामध्ये दोष आहे व सदरहू दोषांचे सुध्दा विरुध्दपक्षाने अदयापपर्यंत कोणतेही निराकरण केलेले नाही.
विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला अतिशय उत्कृष्ट सेवा देण्याची हमी व आश्वासन देवून मशिनरी विकत घेण्यास प्रवृत्त केले होते. परंतु, मशिनरीचा पुरवठा न करता तसेच कोटेशनपेक्षा जास्त रक्कम वसूल करुन सेवा देण्यामध्ये कमतरता व न्युनता दर्शविली असून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. सबब, तक्रारकर्तीची प्रार्थना की, 1) तक्रारकर्तीची तक्रार पूर्णपणे मंजूर होवून विरुध्दपक्षाने कोटेशनमध्ये नमूद केलेल्या दराप्रमाणे तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाला ज्या मशिनरी पुरविण्याचे निर्देश दिले ते ठरलेल्या दरानेच पुरविण्याचा आदेश देण्यात यावा व तक्रारकर्तीकडून घेतलेली जास्तीची रक्कम ₹ 3,72,000/- तक्रारकर्तीस परत करण्याचा आदेश व्हावा. 2) ऑईल एक्सप्लर 24 x 4, बेबी बॉयलर, फिडर प्रेस हया मशिनरीचा पुरवठा केला नाही व त्याची अनुक्रमे रक्कम ₹ 1,65,000/-, ₹ 95,000/-, ₹ 1,55,000/- असे एकूण ₹ 3,25,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला परत करण्याचा किंवा सदरहू मशिनरी पुरविण्याचा आदेश देण्यात यावा. 3) शारिरीक, मानसिक त्रास, आर्थिक नुकसानीपोटी रक्कम ₹ 2,00,000/- देण्याचा विरुध्दपक्षाला आदेश देण्यात यावा. 4) तक्रारीचा खर्च ₹ 5,000/- तक्रारकर्तीला विरुध्दपक्षाने देण्याचा आदेश व्हावा. 5) आदेशित रकमेवर विरुध्दपक्षांनी तक्रारकर्तीस तक्रार दाखल केल्या तारखेपासून रक्कम मिळेपर्यंत 18 टक्के दर साल दर शेकडा प्रमाणे व्याज देण्याचा आदेश दयावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्यासोबत एकंदर 08 दस्तऐवज पुरावा म्हणून दाखल केलेले आहेत.
विरुध्दपक्षाचा लेखी जवाब :-
सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्यानंतर विरुध्दपक्ष यांनी लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील सर्व म्हणणे फेटाळले व जवाबात असे नमूद केले आहे की, तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार ही बेकायदेशीर असून तक्रारकर्ती ही ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (डी) नुसार ग्राहक या संज्ञेमध्ये मोडत नाही. तक्रारकर्तीने उल्लेख केल्यानुसार सदर मशिनरीज हया तिने स्वत:च्या व्यवसायाच्या दृष्टीने घेतलेल्या आहेत, त्यामुळे “ व्यावसायिक उद्देशाकरिता ” घेण्यात आलेल्या वस्तुमध्ये ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (डी) नुसार ग्राहक या संज्ञेमध्ये मोडत नाही. त्यामुळे तक्रारकर्ती ही ग्राहक नाही या कारणास्तव तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार खारीज करावी.
विरुध्दपक्ष हा अमरावती येथे त्यांचा व्यवसाय करतो. तक्रारकर्तीला कोटेशन हे अमरावती येथे दिलेले आहे व अमरावती येथूनच तक्रारकर्तीने ते स्विकारलेले आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 11 नुसार सदर तक्रार ही ग्राहक मंच, अकोला यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही. सदर तक्रारीतील घटना ही अमरावती येथे घडली असल्यामुळे अमरावती ग्राहक मंचाच्या कार्यक्षेत्रामध्ये येते. त्यामुळे सुध्दा तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारकर्तीने दाखल केलेले दस्त क्रमांक अ-1 ज्यावर कोटेशन असे लिहिलेले आहे हा कागद बनावट असून तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाच्या मुळ कोटेशनवरुन तिच्या सोयीप्रमाणे तयार करुन घेतला आहे. तसेच दस्त क्रमांक अ-2 जो प्रकरणात तक्रारकर्तीने जोडला आहे व ज्यावर कोटेशन असे लिहिले आहे ते दस्त सुध्दा तक्रारकर्तीने तिच्या सोयीप्रमाणे विरुध्दपक्षाच्या कोटेशन व Acceptance Order या कागदपत्रांचा अर्ध्या अर्ध्या भागांचा वापर करुन तयार केलेला आहे. त्यामुळे सदर दस्त सुध्दा बनावट आहे.
तक्रारकर्तीस पूर्ण मशीनरीजचा पुरवठा Acceptance Order मध्ये उल्लेखित दरानुसार केलेला आहे. त्यामुळे कोटेशननुसार मशिनरीजचा पुरवठा विरुध्दपक्षाने केला नाही हे तक्रारकर्तीचे म्हणणे खोटे आहे. सदर कोटेशनची मुदत ही फक्त 15 दिवसांकरिता आहे व तक्रारकर्तीने सदर तक्रार सदर अटींचा भंग करुन 15 दिवसापेक्षा जास्त दिवस झाल्यानंतर दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने दिनांक 01-04-2014 रोजी विरुध्दपक्षाला Acceptance Order दिली सदर ऑर्डरवर तक्रारकर्ती व विरुध्दपक्ष या दोघांच्याही सहया आहेत व हया ऑर्डर नुसारच मशीनरीजचा पुरवठा करण्यात आला आहे.
तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाला करुन दिलेली Acceptance Order व विरुध्दपक्षाने दिलेले बिल यांची रक्कम एकसारखी आहे. सदर रकमेमध्ये फक्त लोडिंग चार्जेस व सुपरव्हिजनचा फरक काळानुरुप पडलेला आहे.
तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाला खोडसाळपणे मशीनरीजची जास्त रक्कम लावली म्हणून कोटेशननुसार मशीनरी पुरविल्या नाही म्हणून खोटी नोटीस पाठविली होती. सदर नोटीसला दिनांक 01-12-2014 रोजी उत्तर दिलेले आहे. तसेच बँकेने सुध्दा विरुध्दपक्षाला कोटेशन नुसार मशीनरीजचा पुरवठा करावा म्हणून दिनांक 12-09-2014 रोजी पत्र पाठविले होते. परंतु, सदर पत्रावरुन व तक्रारकर्तीने पाठविलेल्या नोटीसनुसार असे लक्षात येते की, तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडून घेतलेला कोटेशनचा गैरवापर सदर बॅकेकडून अधिकचे कर्ज मिळविण्याकरिता केलेला आहे व त्याचा विरुध्दपक्षाशी कोणताही संबंध नाही. Acceptance Order नुसार मशीनरीजच्या बिलाची रक्कम ₹ 9,89,125/- इतकी झाली होती. त्यानुसार तक्रारकर्तीने दिलेल्या ₹ 11,33,000/- इतक्या रकमेपैकी ₹ 9,89,125/- वजा करुन विरुध्दपक्षाला तक्रारकर्तीस ₹ 1,43,875/- देणे होते. त्यानुसार विरुध्दपक्षाने त्यामध्ये तक्रारकर्तीस काही सवलत एकूण ₹ 2,00,000/- तक्रारकर्तीच्या पतीला चेकद्वारे दिले. तसेच तक्रारकर्तीने दिलेली Acceptance Order ही दिनांक 01-04-2014 ची असून बँकेने विरुध्दपक्षाला दिनांक 19-04-2014 रोजी 11,33,000/- दिलेले आढळतात. त्यामुळे हे स्पष्ट होते की, Acceptance Order ही कमी रकमेची असून सुध्दा तक्रारकर्तीने जाणुनबुजून जास्तीच्या रकमेची उचल केली आहे व त्यास विरुध्दपक्ष जबाबदार नाही. तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार ही विदयमान न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रात नाही. तक्रारकर्ती ग्राहक नाही, सबब, तक्रारकर्तीची तक्रार दंड लावून खारीज करण्यात यावी.
का र णे व नि ष्क र्ष
सदर प्रकरणातील तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्षाचा लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्तीचे प्रतिउत्तर, विरुध्दपक्षाचा पुरावा, उभयपक्षाचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपूर्वक अवलोकन केल्यास असे दिसते की, तक्रारकर्तीने सदर तक्रारीमध्ये अशी विनंती केली की,
विरुध्दपक्षाने कोटेशनमध्ये नमूद केलेल्या दराप्रमाणे तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाला ज्या मशीनरी पुरवण्याचे निर्देश दिले ते ठरलेल्या दरानेच पुरवण्याचा आदेश देण्यात यावा व तक्रारकर्तीकडून घेतलेली जास्तीची रक्कम ₹ 3,72,000/- तक्रारकर्तीस परत करण्याचा आदेश व्हावा.
ऑईल एक्सप्लर, बेबी बॉयलर, व फिडर प्रेस या मशीनरीचा पुरवठा केला नाही त्यांची रक्कम विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला परत करावी किंवा सदरहू मशिनरी पुरवण्याचा आदेश देण्यात यावा. विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई ₹ 2,00,000/- व तक्रारीचा खर्च ₹ 5,000/- व्याजासह दयावा.
तक्रारकर्तीच्या वरील विनंतीनुसार उभयपक्षाने दाखल केलेले दस्तऐवज तपासले असता असे स्पष्ट निदर्शनास येते की, तक्रारकर्तीची प्रार्थना ही पूर्णपणे विरुध्दपक्षाने दिलेले दिनांक 23-11-2013 च्या कोटेशन वर आधारित आहे. सदर कोटेशन हे विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला अकोला येथे दिले होते, हे तक्रारकर्तीने सिध्द् केलेले नाही. शिवाय सदर कोटेशनची वैधता ही पंधरा दिवसच आहे असेही त्यावर नमूद केलेले आढळते.
त्यामुळे उभयपक्षातील कोटेशनबाबतचा व्यवहार हा अमरावती येथे झाल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार हे प्रकरण चालवण्याचे कार्यक्षेत्र अकोला मंचाला येत नाही. शिवाय प्रार्थनेत नमूद केलेल्या मशिनरी हया कोटेशनमध्ये असल्या तरी विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या व तक्रारकर्तीने स्विकारलेल्या Acceptance Order मध्ये त्या खरेदी केल्याचे नमूद नाही. त्यामुळे जरी तक्रारकर्तीने सदर मशिनरीबद्दल विरुध्दपक्षाकडून कोटेशन मागवलेले असले तरी स्विकारतांना मात्र त्या मशीन खरेदी केलेल्या नाहीत, असे विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या सर्व दस्तऐवजांवरुन कळते. शिवाय कोटेशन दस्तातील दर व प्रत्यक्ष खरेदी दर हे भिन्न असू शकतात असे मंचाचे मत आहे. सबब तक्रारकर्तीच्या तक्रारीमधील प्रार्थना या मंजूर करता येण्यासारख्या नाहीत. सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.
अं ति म आ दे श
1) तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात येते.
2) न्यायीक खर्चाबाबत कोणते आदेश नाही.
3) उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्य देण्यात यावी.