ग्राहक तक्रार क्र. 155/2013
अर्ज दाखल तारीख : 11/11/2013
अर्ज निकाल तारीख: 22/12/2014
कालावधी: 01 वर्षे 01 महिना 12 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्रीमती मंगल छगन शेळके,
वय-54 वर्षे, धंदा – घरकाम व शेती,
रा.बोर्डा, ता.कळंब, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. व्यवस्थापक श्री. प्रेम शिवदास,
फयूचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
डी.जी.पी. हाऊस पहिला मजला, 88 सी,
जुना प्रभादेवी रोड, बेंगल केमीकल जवळ,
प्रभादेवी, मुंबई400025
2. विभागीय प्रमुख श्री.नंदकुमार प्रभाकर देशपांडे,
डेक्कन इन्शुरन्स अॅन्ड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.,
औरंगाबाद 6 – परखडे निवास, भानुदास नगर,
बिग बझार मागे, आकाशवाणी चौक,
औरंगाबाद-431001
2. मे. तालूका कृषी अधिकारी,
श्री. शिवराम श्रीहरी नाईकनवरे,
तालूका कृषी अधिकारी कार्यालय,
कळंब ता. कळंब जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2)मा.श्रीमती विदयुलता जे. दलभंजन सदस्या.
3) मा.श्री.एम.बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.एस.एन.बाराते.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.पी.दानवे.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
विरुध्द पक्षकार क्र.3 तर्फे विधीज्ञ : स्वत:.
निकालपत्र
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
1) आपल्या शेतकरी नव-याच्या अपघाती मृत्यूमुळे देय विमा रक्कम न देवून विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केल्यामुळे विमा रक्कम मिळावी म्हणून तक्रारकर्ती हिने ही तक्रार दिलेली आहे.तक्रारदारकर्तीच्या तक्रारीमधील थोडक्यात कथन असे की तिचा पती छगन हा शेतकरी होता व बोर्डा शिवारात गट क्र.11 मध्ये 73 आर. जमीन त्याच्या नावे आहे. ता.30/08/2012 रोजी छगन हा त्याजमीनीतील स्वत:च्या घरामध्ये झोपला होता सकाळी तो त्या ठिकाणी न दिसता पंधरा फुट अंतरावर डोक्यावर पडलेल्या व मयत अवस्थेत दिसला. त्याचा पंचनामा केला तेव्हा उजव्या कानाखाली एक्सआकाराचा व्रण दिसून आला व कानामधून द्रव पदार्थ बाहेर येत होता. सदरहू व्रण कोणत्या तरी प्राण्याच्या दंशामुळे झाला होता. शवचिकीत्सेमध्ये मृत्यूचे कारण कळू शकले नाही व मयताचा व्हिसेरा वरक्त केमीकल अनॅलिसेससाठी पाठविण्यात आले होते. मयताचा मृत्यू मेंदूत रक्तस्त्राव होऊन झाला.
तक्रारकर्तीने शेतकरी जनता विमा अपघात योजने अंतर्गत मिळणा-या नुकसान भरपाईसाठी सर्व कागदपत्रांसह विरुध्द पक्षकार क्र.3 यांच्याकडे अर्ज दाखल केला. विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारकर्तीहिला नुकसान भरपाई दिली नाही अगर प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याबददल कळविले नाही. ता.12/11/2012 रोजी तक्रारदारकर्ती हिने विरुध्द पक्षकार क्र.1 चे कार्यालयात जावून विमा रकमेची मागणी केलीविरुध्द पक्षकार क्र.1 यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे विरुध्द पक्षकार यांच्याकडून विम्याची रक्कम रु.1,00,000/- बँक दराने व्याजसह तसेच मानसिक त्रासासाठी रु.10,000/- व खर्चापोटीरु.10,000/- मिळावे म्हणून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीसोबत तक्रारकर्तीने मृत्यूचा दाखला, आकस्मिक मृत्यूची खबर, गट क्र.18 चा सातबारा, गाव नमूना नं.8 अ चा उतारा, विमा क्लेमफॉर्म विरुध्द पक्षकार क्र.3 चे दि.12/11/12 रोजीचे सही शिक्यासह, वारसाचे प्रमाणपत्र, पंचनाम्याची प्रत, मरणोत्तर पंचनाम्याची प्रत, शवचिकित्सा अहवाल, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
2) विरुध्द पक्षकार क्र.1 यांनी आपले लेखी म्हणणे ता.10/12/2014 रोजी दाखल केले आहे. त्याप्रमाणे मयताच्या कानाखाली व्रण होता व त्यातून रक्त येत होते हे अमान्य केले आहे. मेंदूतरक्तस्त्राव हा ब्रेन थ्रॉम्बोसीसमुळे होतो. मेंदूतील रक्तस्त्रावामुळे ह्रदयक्रिया बंद पडून मयताचा मृत्यू झाला म्हणजेच तो नैसर्गीक मृत्यू होता. व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा लाभ त्यामुळे कराराच्याअटी शर्तीनुसार मिळू शकत नाही. तक्रारदारकर्ती ही विरुध्द पक्षकार क्र.1 यांचेकडे ता.12/11/2012 रोजी आली व विरुध्द पक्षकार क्र.1 यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली हे कथन खोटे आहे. तक्रारीस कारणघडले नाही. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्टपणे Cardio Respiratory arrest due to unknown cause असे लिहीलेले आहे. त्यामूळे तक्रार रदद होण्यास पात्र आहे.
3) विरुध्द पक्षकार क्र.2 यांनी दि.06/03/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केले आहे. त्याप्रमाणे संस्था त्रिपक्षीय कराराप्रमाणे कृषी कार्यालयातून प्राप्त दाव्यांची कागदपत्रे विमा कंपनीस पाठविते वकंपनीकडे पाठपुरावा करते. कागदपत्रे अपूर्ण असल्यास कृषी कार्यालयास कळविते. मिळणा-या लाभासाठी विरुध्द पक्षकार क्र.2 जबाबदार नाही. त्यामुळे विरुध्द पक्षकार क्र.2 यांना दाव्यातून मुक्त करण्यातयावे.
4) विरुध्द पक्षकार क्र.3 यांनी ता.02/12/2013 रोजी लेखी जबाब दाखल केला आहे. त्याप्रमाणे तक्रारदारकर्ती हिने ता.12/11/2012 रोजी प्रस्ताव विरुध्द पक्षकार क्र.3 कडे सादर केला. विरुध्द पक्षकारक्र.3 ने ता.27/11/2012 रोजी पत्रासोबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.
5) तक्रारदाराची तक्रार तिने दाखल केलेली कागदपत्रे, विरुध्द पक्षकार यांचे म्हणणे यांचा विचार करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात त्यांची उत्तरे आम्ही त्यांच्यासमोर खाली दिलेल्याकारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1) विरुध्द पक्षकाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे का ? होय.
2) अर्जदार अनुतोषास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
कारणमिमांसा :
मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचन:
6) विरुध्द पक्षकार क्र.1 चे बचावाचा विचार करता हे स्पष्ट होते की विरुध्द पक्षकार क्र.1 चे म्हणण्याप्रमाणे छगन याला नैसर्गीक मृत्यू आल्यामुळे अपघात विमा मिळणेस तक्रारकर्ती पात्र नाही विरुध्द पक्षकार क्र.1 ने ट्रायपार्टाईट अॅग्रीमेंट हजर केलेले आहे त्यात अॅक्सीडेंटची व्याख्या wholly unexpected not intended or designed event अशी दिलेली आहे. मयत छगन शेतकरी होता व त्याचा शेतकरी जनता अपघात विमा विरुध्द पक्षकार क्र.1 कडे उतरवला होता या बददल फारसा वाद नाही.
7) हे खरे आहे की शवचिकित्सा अहवाल पॅरा क्र.17 मध्ये शरीरावर जखम दिसून आली नाही असे नमूद केलले आहे मात्र मरणोत्तर पंचनाम्यात ते स्पष्टपणे नमूद आहे की मयताचे उजव्या कानाच्या खालच्या बाजूस अंधूक X असा व्रण दिसत असून कानातून पाणी येत आहे. मयताला मृत अवस्थेत दवाखान्यात आणले असे शवचिकित्सा अहवालात नमूद आहे. कान नाक अगर तोंडातून फेस येत नसल्याचे नमूद आहे. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे नमूद आहे. मृत्यूचे कारण Cardio Respiratory arrest due to unknown cause असे दिलेले आहे. व्हिसेरा सी.ए. कडे पाठवणेत आला होता. सी.ए. रिपोर्ट प्रमाणे रक्तात सर्प विष आढळून आले नाही. त्याचप्रमाणे stomach small intestine large intestine तसेच brain, liver, spleen, kidney, heart, lungs तुकडयात chemical poison आढळून आले नाही.
8) मयत हा 60 वर्षे वयाचा शेतकरी होता त्यामुळे तो धडधाकट तसेच मजबूत बांध्याचा असण्याची शक्यता जास्त आहे. त्याला पुर्वी काही आजार असल्याबददल कोणतेही रेकॉर्ड नाही. त्याला विषबाधेने मृत्यू झाला नाही असे दिसते मात्र post mortem रिपोर्टप्रमाणे मृत्यूचे कारण cardio respiratory arrest due to unknown cause असे आहे. मेंदूत रक्तस्त्राव असे कारण दिलेले नाही तसेच मेंदूत रक्तस्त्रावाने अचानक मृत्यू सहसा होत नाही. कुठल्यातरी कारणाने रकतदाब वाढला तरच रक्तस्त्राव होतो अशाप्रकारे मृत्यू हा आमच्या मते अपघाती मृत्यूच आहे. त्यामुळे तक्रारदारकर्ती विमा रक्कम मिळणेस पात्र होती ती रक्कम नाकारुन विरुध्द पक्षकार क्र.1 ने सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालीलप्रमाणे हुकूम करतो.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार क्र.1 ने तक्रारकर्ती हिला विम्याची रक्कम रु.1,00,000/-(रुपये एक लाख फक्त) दयावी.
3) विरुध्द पक्षकार क्र.1 ने वरील रक्कमेवर तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे 9 दराने व्याज दयावे.
4) विरुध्द पक्षकार क्र.1 ने तक्रारकर्ती हिला तक्रारीचा खर्च म्हणून रु.3,000/- (रुपये तीन हजार फक्त) दयावे.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष क्र.1 यांनी आदेश दिल्या तारखेपासुन
तीस दिवसात करुन विरुध्द पक्षकार क्र.1 यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर
सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता
विरुध्द पक्षकार यांनी न केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
6) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री.एम.व्ही.कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (मा.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.