निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 19/09/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 23/09/2011
तक्रार निकाल दिनांकः- 12/07/2013
कालावधी 01 वर्ष. 09 महिने. 19 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
भिमराव पिता अप्पासाहेब गायकवाड. अर्जदार
वय 33 वर्षे. धंदा.व्यापार. अड.जे.बी.गिरी.
रा.व्दाराः युवराज गौतम,मु.पो.झरी ता.जि.परभणी.
विरुध्द
व्यवस्थापक. गैरअर्जदार.
न्यु इंडिया अशुरन्स कं.लि. अड.जी.एच.दोडीया.
शाखा यशोदिप बिल्डींग,शिवाजी रोड.ता.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
अर्जदाराची तक्रार जिप क्रमांक MH 09 AQ – 4168 च्या अपघाताची नुकसान भरपाई मिळावी याबद्दलची आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे की, अर्जदार हा जिप क्रमांक MH 09 AQ – 4168 चा मालक व ताबेदार आहे. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे आपली जिप क्रमांक MH 09 AQ – 4168 साठी 10,448/- रुपयांचा हप्ता भरुन दिनांक 18/08/2009 रोजी पॉलिसी काढली. ज्याचा पॉलिसी क्रमांक 160902/31/09/01/00000967 असा आहे. सदरची पॉलिसी ही 18/08/2009 पासून 17/08/2010 पर्यंत वैध आहे.अर्जदाराचे पुढे असे म्हणणे आहे की, दिनांक 24/03/2010 रोजी परभणी जिंतूर रोडवर टाकळी (कु) येथे बाळू कदम यांच्या शेता जवळ पोलिस स्टेशन ग्रामीण परभणीच्या हद्दीत सदरील जिपचा अपघात होवुन जिपचे रु.2,00,000/- चे नुकसान झाले. अपघाता नंतर लगेच अर्जदाराने गैरअर्जदारास माहिती दिली, त्यानंतर गैरअर्जदाराने पाठविलेल्या सर्व्हेअरने घटनास्थळ सर्व्हे केला, तसेच गॅरेज सर्व्हे व संपूर्ण जिप दुरुस्त झाल्यानंतर अंतिम सर्व्हे पुर्ण केला. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे त्याचा क्लेमफॉर्म व स्टेटमेंट व पोलिस पेपर, एफ.आय.आर., घटनास्थळ पंचनामा व संपूर्ण बिले इत्यादी कागदपत्रे गैरअर्जदाराच्या मागणी नुसार पुर्तता केली, संपूर्ण कायदेशिर बाबींची व कागदपत्रांची पुर्तता करुनही अर्जदाराचा क्लेम मंजूर करण्यात आला नाही. अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदाराकडे क्लेम बद्दल चौकशी केली असता, कोणते न कोणते कारण सांगुन गैरअर्जदाराने क्लेम देण्यास टाळाटाळ केली, शेवटी गैरअर्जदाराने दिनांक 11/03/2011 रोजी एक पत्र पाठवुन अर्जदाराचा क्लेम नामंजूर केल्याचे सुचविले व सदरील पत्रात क्लेम नामंजूर करण्याचे कारण देण्यात आले की, अर्जदार हा सदरील जिप भाडे तत्वावर चालवित होता, व घटनेच्या वेळी सदरील जिपमध्ये जास्तीचे प्रवासी बसले होते, व सदरील कारण देवुन अर्जदाराची फाईल नो क्लेम म्हणून बंद करण्यात आली. अर्जदाराने दिनांक 12/05/2011 रोजी गैरर्जदारास कायदेशिर नोटीस देवुन 15 दिवसांच्या आत अर्जदाराचा क्लेम मंजूर करुन 18 टक्के व्याजासह रु. 2,00,000/- अथवा सर्व्हेअरच्या रिपोर्ट नुसार नुकसान भरपाई द्यावी, व तसेच मानसिक व शारिरीकत्रासापोटी रु.5,000/- देण्याची विनंती केली.पण गैरअर्जदाराने नोटीस मिळून देखील अर्जदारास नुकसान भरपाई आज पर्यंत दिली नाही. म्हणून अर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, जिप क्रमांक MH 09 AQ – 4168 च्या अपघाताच्या नुकसानी पोटी अर्जदारास रु.2,00,000/- अथवा सर्व्हेअर रिपोर्ट नुसार द.सा.द.शे. 18 टक्के दराने गैरअर्जदाराकडून देण्याचा आदेश व्हावा. तसेच शारिरीक व मानसिकत्रासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्च रु.,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्यासंबंधी आदेश व्हावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र नि.क्रमांक 2 वर दाखल केलेले आहे. तसेच नि.क्रमांक 5 वर 9 कागदपत्रांच्या यादीसह 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत ज्यात अर्जदाराने दिलेली फिर्याद, घटनास्थळ पंचनामा, आर.सी.बुक, इंन्शुरंस पॉलिसी कव्हरनोट, ड्रायव्हिंग लायसेंस, गैरअर्जदारास अर्जदाराने दिलेली कायदेशिर नोटीस, गैरअर्जदाराने सदर नोटीसीला दिलेले उत्तर, साई मोटर्सचे इस्टीमेंटस् , बालाजी मेकॅनिकल बॉडी वर्क्स यांचे कॅश मेमोज, गैरअर्जदाराचे रेप्युडेशन लेटर, इत्यादीचा सामावेश आहे.
गैरअर्जदाराना मंचातर्फे त्याचे लेखी जबाब दाखल करण्याकरीता नोटीसा पाठविण्यात आल्यावर गैरअर्जदार वकिला मार्फत हजर, व नि.क्रमांक 12 वर आपले लेखी जबाब दाखल केलेले आहे. तसेच नि.क्रमांक 13 वर त्यांनी आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
गैरअर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे की, अर्जदाराची तक्रार खोटी व बनावटी आहे आणि ग्राहक संरक्षण कायद्याच्या विरोधात आहे,म्हणून ती खारीज करणे योग्य आहे. गैरअर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम नाकारला ते योग्यच केलेले आहे, कारण अर्जदाराने पॉलिसीच्या टर्म्स अँड कंडीशनचा ब्रिच केलेला आहे.गैरअर्जदाराने सदरच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी सर्व्हेअर कम इनव्हेस्टीगेटर नेमला होता व त्याच्या रिपोर्ट नुसार अर्जदाराने पॉलिसीच्या टर्म्स अँड कंडीशनचे ब्रिच केलेले आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास त्याचा क्लेम नाकारल्याचे दिनांक 11/03/2011 रोजी पत्र पाठविले जे अर्जदारास 17/03/2011 रोजी मिळाले, त्या पत्रामध्ये गैरअर्जदाराने अर्जदारास कळविलेले आहे की, अर्जदाराने त्याच्या जिपचा विमा प्रायव्हेट कार पॅकेज असा उतरविलेला होता जो की, फक्त प्रायव्हेट युज साठीच आहे आणि सदरच्या पॉलिसी मध्ये काही टर्म्स अँड कंनडीशन आहेत. ज्याचे पालन करणे आवश्यक असते, सदरच्या टर्म्स अँड कंडीशनमध्ये लिमिटेशन अज टू युज क्लॉज मध्ये सदरची गाडी हायर अँड रिवॉर्डसाठी वापरु नये असे लिहिलेले आहे. तसे असतांना सुध्दा अर्जदाराने सदरची जिप अपघाताच्या वेळी हायर अँड रिवॉर्डसाठी वापरुन सदर टर्म्स अँड कंडीशनचा उल्लंघन केलेला आहे. म्हणून त्याचा क्लेम नाकारण्यात आलेला आहे व ते योग्यच आहे.गैरअर्जदाराचे असे ही म्हणणे आहे की, सदरच्या अपघाताच्या वेळेस जिपमध्ये 17 ते 18 प्रवासी प्रवास करीत होते म्हणजेच क्षमते पेक्षा जास्त प्रवासी घेवुन जात होते,व म्हणून पॉलिसीचे टर्म्स अँड कंडीशनचा ब्रिच झालेला आहे.गैरअर्जदाराने मंचास अशी विनंती केली आहे की, अर्जदाराचा विमा दावा नाकारुन गैरअर्जदाराने कोठल्याही सेवेत त्रुटी दिली नाही व कोठलेही मानसिकत्राव व शारिरीकत्रास दिलेले नाही, व ते योग्यच केलेले आहे म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदाराने आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 15 वर 18 कागदपत्रांच्या यादीसह 18 कागदपत्रे जोडली आहेत.ज्यात इनव्हेस्टीगेशन रिपोर्ट, कॉपी ऑफ चार्जशिट, कंम्प्लेंट, एफ.आय.आर., स्पॉट पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, स्टेटमेंट ऑफ अड समीर मो.इकबाल, स्टेटमेंट ऑफ गजानन साहेबराव वाघमारे, स्टेटमेंट ऑफ परमेश्वर मधुकरराव देशमुख, स्टेटमेंट ऑफ स.साजीद अली स. लियाकत अली, स्टेटमेंट ऑफ इंदिराबाई गो.जुमळे, स्टेटमेंट ऑफ अरुण मंचक भालेराव, स्टेटमेंट ऑफ सवीता दत्ता बारहाते, ड्रायव्हींग लायसेंस, इन्शुरंस पॉलिसी, संजय बी.यादवडकर यांचा बिल चेक रिपोर्ट, रेप्युडेशन लेटर, तसेच इन्व्हेस्टीगेटर अड.अ.माजीद अ. हबीब यांचे शपथपत्र नि.क्रमांक 17/1 वर दाखल केलेले आहे.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा MH 09 AQ – 4168 चा मालक होता ही बाब अर्जदाराने नि.क्रमांक 5/3 वरील कागदपत्रावरुन सिध्द केली आहे,तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदरच्या जिपचा विमा उतरविला होता व तो 18/08/2009 ते 17/08/2010 पर्यंत वैध होता ही बाब नि.क्रमांक 5/4 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते,सदरची पॉलिसी ही प्रायव्हेट कार पॉलिसी होती व सदर जिपचा अपघात दिनांक 24/03/2010 रोजी परभणी जिंतूर रोडवर टाकळी (कु) येथे झाला ही बाब नि.क्रमांक 5/5 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते, व सदरच्या अपघातात अर्जदाराचे नुकसान झाल्याबद्दल गैरअर्जदाराकडे अर्जदाराने विमादावा दाखल केला होता व तो विमादावा गैरअर्जदाराने नाकारला हे नि.क्रमांक 15/19 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते, त्यामध्ये गैरअर्जाराने असे नमुद केले आहे की, सदरच्या अपघाताच्या वेळी सदर वाहन हे भाडे मिळवण्यासाठी वापरले जात होते,व सदरच्या जिपमध्ये अपघाताच्या वेळी 17 ते 18 प्रवासी प्रवास करीत होते, ही बाब नि.क्रमांक 15/14 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते तसेच नि.क्रमांक 17/1 वर दाखल केलेल्या अड.अ.मजीद अ.हबीब यांने दाखल केलेल्या शपथपत्रावरुन देखील हे सिध्द होते की, सदरची जिप ही अवैधरित्या मर्यादे पेक्षा जास्त प्रवासी घेवुन प्रवास करीत होती हे सिध्द होते, यावरुन अर्जदाराने पॉलिसीच्या टर्म्स अँड कंडीशन मधील लिमिटेशन अज टू युज क्लॉज मधील हायर अँड रिवॉर्ड या अटीचे उल्लंघन केलेले दिसते जे की, Flagrant breach of policy या सदरात येते.म्हणून विमा पॉलिसीचा दावा नॉन स्टँडर्डवर देणे देखील मंचास योग्य वाटत नाही. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा देण्याचे नाकारुन कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली आहे, असे मंचास वाटत नाही. अर्जदार आपली तक्रार सिध्द करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरला आहे.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री.पी.पी.निटूरकर. मा.सदस्य मा.अध्यक्ष