निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 01/01/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 06/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 27/04/2011 कालावधी 03 महिने 21दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. उषा भ्र. प्रदीपराव खिस्ते अर्जदार वय 35 वर्षे धंदा घरकाम, अड.अरुण खापरे रा.निवळी ता.जिंतूर जि.परभणी. विरुध्द 1 मॅनेजर गैरअर्जदार नॅशनल इन्शुरन्स कंपनी अड.एस.ए.पाठक दुसरा माळा स्टर्लिंग सिनेमा बिल्डींग 65, मर्झबान स्ट्रीट फोर्ट मुंबई 400 001. 2 विभागीय व्यवस्थापक कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. गैरअर्जदार. भास्करायन एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग. प्लॉट क्रमांक 7 सेक्टर ई 1 टाऊन सेंटर सिडको.औरंगाबाद.. 3 तहसिलदार तहसिल कार्यालय जिंतूर ता.जिंतूर, जि.परभणी. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. ) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विम्याची देय नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत विमा कंपनीकडून झालेल्या सेवात्रुटीची दाद मिळणेसाठी अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे निवळी ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी शेतकरी आहे. तारीख 16/06/2007 रोजी अर्जदाराचा पती मयत प्रदीपराव गणेशराव खिस्ते याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-याचा गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता. त्या पॉलीसीचा अर्जदाराचा मयत पती प्रदीप खिस्ते लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने तहशीलदार जिंतूर यांचेकडे शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह विमा क्लेम दाखल केला. त्यानंतर तहशीलदार यानी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे क्लेम व कागदपत्रे वर्ग केली. त्यानंतर गैरअर्जदार 2 यानी विमा कंपनीकडे कागदपत्रे पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने पुन्हा अर्जदाराकडून काही कागदपत्रांची मागणी केली ती सर्व कागदपत्रे अर्जदारानी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे सादर केली होती तरीही गैरअर्जदार क्रमांक 1 यानी 18.02.2009 चे पत्र पाठवून कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे तुमची फाईल बंद करण्यात आली असल्याचे अर्जदारास कळविले अशारितीने बेकायदेशीररित्या क्लेम नामंजूर करुन सेवा त्रूटी केली आहे म्हणून ग्राहक मंचात कायदेशीर दाद मिळणेसाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. आणि गैरअर्जदाराकडून पॉलीसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 % व्याजासह मिळावेत व मानसिक त्रासापोटी रुपये 25000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावी अशी तक्रार अर्जातून मागणी केलेली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदार हिचे शपथपत्र ( नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.4 लगत एकूण 16 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार नं 1 यांनी दिनांक 22.03.2011 रोजी मंचाकडे लेखी म्हणणे सादर केले ( नि.20) . गैरअर्जदार क्रमांक 2 यानी पोष्टाव्दारे पाठवलेला लेखी जबाब प्रकरणात नि. 9 ला समाविष्ठ करुन घेतला. गैरअर्जदार नं 3 यांनी मंचाची नोटीस स्विकारुनही नेमलेल्या तारखेस मंचापुढे हजर न झाल्यामुळे त्यांचेविरुध्द तारीख 22/03/2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.. गैरअर्जदार नं 1 यांनी आपल्या लेखी जबाबात ( नि.20) अर्जदाराच्या तक्रार अर्जातील सर्व मजकूर साफ नाकारला आहे. अर्जदाराने नियमाप्रमाणे क्लेम मुदतीत दाखल केलेला नव्हता. तसेच न्यायमंचात देखील तक्रार मुदतीत दाखल नाही. अर्जदारानी आवश्यक ती कागदपत्रे सादर केलेली नव्हती. गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई क्लेम संदर्भात कोणत्याही प्रकारे सेवा त्रूटी झालेली नाही वरील सर्व बाबी विचारात घेऊन तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केलेली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.9) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्राची छाननी करुन मंजूरीसाठी क्लेम पाठविण्यासाठी त्याना सल्लागार म्हणून नेमलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्याचेकडून विमा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत प्रदीप गणेश खिस्ते रा.निवळी यांचा विमा क्लेमची कागदपत्रे दिनांक 10.09.2007 रोजी मिळाली होती परंतू पाठविलेल्या कागदपत्रात नमुना क्रमांक 8 अ चा उतारा, फेरफार उतारा, सर्टीफाईड तलाठयाचा दाखला, केमिकल अनालेसिस रिपोर्ट ही आवश्यक ती कागदपत्रे नव्हती त्याबाबत अर्जदारास दिनांक 14.07.2007 रोजी पत्र पाठवून कागदपत्रांची मागणी केली होती त्यानंतर ही पुन्हा दिनांक 22.10.2007 , 12.02.2008, व 11.06.2008 रोजी स्मरणपत्रे पाठवून देखील अर्जदाराने कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही त्यामुळे विमा कंपनीने अर्जदाराची फाईल मंजूरीविना बंद केली. सबब गैरअर्जदारास या प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबा सोबत अर्जदाराला वेळोवेळी पाठवलेल्या स्मरणपत्राच्या छायाप्रती ( नि.11 ते नि. 15 ) दाखल केल्या आहेत. तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदार तर्फे अड खापरे यानी युक्तिवाद केला आणि गैरअर्जदार नं 1 तर्फे लेखी युक्तिवाद सादर केला. निर्णयासाठी उपस्थीत होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार नं. 1 यांचेकडून अर्जदाराचा विमा क्लेम मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ? नाही. 2 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- प्रस्तुत प्रकरणातील अर्जदाराचापती मयत प्रदीप गणेश खिस्ते याचा दिनांक 16.06.2007 रोजी मृत्यू सर्पदंश झाल्याने झाला होता हे पुराव्यातून शाबीत करण्यासाठी अर्जदाराने प्रकरणात नि. 4/8 ला मयताचा पोष्टमार्टेम रिपोर्टची छायाप्रत दाखल केली आहे. रिपोर्टचे शेवटी मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे नमूद करुन व्हिसेरा राखून ठेवला आहे अशीही नोंद केली आहे. अर्जदाराने व्हिसेराचा पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. मयत प्रदीप खिस्ते शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने तहसिलदार जिंतूर याच्याकडे विम्याची नुकसान भरपाई मिळणेसाठी जी कागदपत्रे सादर केलेली होती पुराव्यात नि. 4 लगत संबधीत कागदपत्राच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत त्यामध्ये गट क्रमांक 72 चा सन 2007-08 चा 7/12 उतारा ( नि.4/4), नमुना 6 क चा उतारा (नि. 4/5 ) तसेच अर्जदारास अपूरी कागदपत्रे पाठविण्यासंबधी विमा कंपनीने पाठेविलेल्या दिनांक 10.06.2008 च्या पत्राची छायाप्रत (नि.4/3) , मृत्यू प्रमाणपत्र (नि.4/7) , बॅक पासबुक (नि.4/9) रेशन कार्ड (नि.4/10) एवढीच कागदपत्रे दाखल केलेली आहे. अर्जदाराने तहशीलदार यांच्याकडे क्लेम फॉर्म सोबत दिलेली कागदपत्रे तहशीलदार यानी गैरअर्जदार क्रमांक 2 कबाल ब्रोकरेज सर्व्हीसेस यांच्याकडे पाठविल्यानंतर क्लेम मंजूर करण्याचे कामी आणखी काही आवश्यक त्या कागदपत्रांची अपूर्णता दिसून आल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 यानी अर्जदाराला सुरुवातीला दिनांक 14.07.2007 रोजी पत्र पाठवून नमुना क्रमांक 8 अ चा उतारा , मुळ फेरफार उतारा, तलाठी प्रमाणपत्र, केमिकल अनालासिस रिपोर्ट ही कागदपत्रे पाठविण्याबाबत कळविले होते. अर्जदारानी त्याची पूर्तता केलेली नसल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 यानी पुन्हा अर्जदारास दिनांक 22.10.2007 , 12.02.2008 आणि दिनांक 10.06.2008 रोजी स्मरणपत्रे पाठविलेली होती असा लेखी जबाबात खुलासा केलेला आहे व त्याचे पुष्टयर्थ अर्जदारास पाठविलेल्या स्मरणपत्राच्या छायाप्रती देखील ( नि. 11 ते नि. 15 ) दाखल केलेल्या आहेत. अर्जदाराने वर नमूद केलेल्या कागदपत्रांची पूर्तता विमा कंपनीकडे केलेली होती असे तक्रार अर्जात म्हटलेले आहे परंतू त्या एकाही कागदपत्राची छायाप्रत पुराव्यात दाखल केलेली नसल्यामुळे विमा कंपनीकडे कागदपत्रे पाठविली होती हे विनाशाबीती ग्राहय धरणे कठीण आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने अर्जदारास दिनांक 18.02.2009 चे पत्रातून (नि.4/1) तिचेकडून कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे क्लेम फाईल बंद केली असल्याचे कळविले होते त्या पत्रात स्मरणपत्रांच्या तारखांचाही उल्लेख आहे. त्यामुळे अर्जदाराकडून कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्यामुळे विमा कंपनीला ती फाईल बंद करावी लागली याचा दोष विमा कंपनीवर टाकता येणार नाही व त्यांचेकडून सेवा त्रूटी झाली असेही म्हणता येणार नाही. तरी परंतू महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची नुकसान भरपाई रुपये 100000/- मिळणेसाठी व कुटूंबातील त्या लाभार्थी शेतक-याला त्याच्या अपघाती मृत्यू पश्चात काही प्रमाणात का होईना आर्थिक मदतीचा लाभ कुटूंबाला मिळावा या उदात्त हेतूने शासनाने सर्व शेतक-याचे विमा हप्त्याची रक्कम शासनाच्या तिजोरीतून भरुन ही कल्याणकारी शेतकरी विमा पॉलीसी घेतलेली आहे. मयत प्रदीत गणेश खिस्ते याचा अपघाती मृत्यू पॉलीसी हमी मुदतीत झालेला असल्याने व तो पॉलीसीचा लाभार्थी असल्यामुळे त्याचे पश्चात अर्जदाराला नुकसान भरपाई रुपये एक लाख मिळालीच पाहीजे व ती मिळणेस पात्र आहे. क्लेम उशीरा दाखल केला या तांत्रीक कारणास्तव विमा कंपनीने क्लेमची कागदपत्रे स्विकारण्याचे नाकारता कामा नये या संदर्भात मा. महाराष्ट्र राज्य आयोगाने रिपोर्टेड केस 2008 (2) All MR ( Journal) page 13 ( महाराष्ट्र ) मध्येही हेच मत व्यक्त केलेले आहे त्याचा आधार घेवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 अर्जदाराने तीच्या मयत पतीच्या डेथ क्लेमची नुकसान भरपाई रुपये 100000/- मिळणेसाठी दिनांक 10.06.2008 च्या स्मरणपत्रा मध्ये मागणी केल्याप्रमाणे तलाठी दाखला मुळ प्रत, मृत्यू पूर्वीचा 7/12 उतारा, फेरफार उतारा, 8 अ चा उतारा, मृत्यू दाखला व केमिकल अनालासिस रिपोर्ट या कागदपत्रांची पूर्तता आदेश तारखेपासून 30 दिवसात विमा कंपनीकडे करावी त्यानंतर पुढील एक महिन्यात गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने अर्जदाराचा नुकसान भरपाईचा क्लेम सेटल करावा. 2 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |