जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 365/2008. प्रकरण दाखल तारीख - 18/11/2008 प्रकरण निकाल तारीख –05/02/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य रामचंद्र दुर्गाजी मानेकर वय, 64 वर्षे, धंदा सेवानिवृत्त रा.रवि नगर, ता.जि. नांदेड. अर्जदार विरुध्द. मा. व्यवस्थापक, दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. स्टेशन रोड, नांदेड. गैरअर्जदार अर्जदारा तर्फे वकील - अड.किशन सूरेश कूलकर्णी. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.एस.डी.भोसले. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, अध्यक्ष ) गैरअर्जदार नांदेड जिल्हा सहकारी बँक यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे दि.19.08.1998 रोजी रिइन्व्हेस्टमेंट डिपाझिट स्कीमध्ये रु.24,000/- जमा केले होते व ज्यांची अंतिम मूदत ही दि.19.08.2006 रोजीला रु.76,000/- मिळणार होते. पण गैरअर्जदाराने जानेवारी,2008 ला रु.73,500/- पैकी रु.30,000/- अर्जदाराला परत दिले व उर्वरित रक्कम रु.49,992/- अर्जदाराचे बचत खाते क्र.498 मध्ये जमा केली. सदर रक्कमेची गैरअर्जदार यांचेकडे मागणी केली असता ती रक्कम ते देत नाहीत. त्यामूळे अर्जदारास खूप मानसिक व शारीरिक ञास झाला. सदर रक्कम न देऊन गैरअर्जदाराने सेवेत ञूटी केली म्हणून सदरची तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांचे गैरअर्जदार यांचे श्रीनगर शाखा नांदेड येथे ब-याच वर्षापासून बचत खाते आहे. त्या स्कीम वरील बोनस रक्कम रु.6125/- ची मागणी केली असता त्यांनी ती रक्कम आपल्या उर्वरित रक्कमेसोबत मिळेल असे सांगितले. बचत खात्यात जमा असलेली रक्कम रु.49,992/- व बोनसची रक्कम मिळण्यासाठी अनेक चकरा मारल्या असता त्यांनी बँकेचे देवाण घेवाणीचे व्यवहार बंद आहेत व चालू झाल्यानंतर तूमची रक्कम मिळेल असे सांगितले. अर्जदार व त्यांची पत्नी उतारवयामूळे सतत आजारी असतात. त्यांना उपचारासाठी रक्कमेची आवश्यकता आहे. त्यामूळे त्यांची विनंती आहे की, बचत खात्यामधील रक्कम रु.49,992/- व बोनसची रक्कम रु.6125/- व्याजासह मिळावेत. मानसिक व शारीरिक ञासाबददल रु.10,000/- गैरअर्जदाराकडून मिळावेत. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले आहे. त्यांना हे मान्य केले आहे की, अर्जदाराचे बचत खाते क्र.498 मध्ये रु.49,992/- जमा आहे. गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने दि.20.10.2005 रोजी 35 अ कलम लाऊन आर्थिक निर्बध घातले आहेत. अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यातील अर्ज व त्यांसोबत डॉक्टराचे प्रमाणपञ व उपचारासाठीची सर्व कागदपञे दाखल करुन प्रस्ताव दिल्यास तो प्रस्ताव मंजूरीसाठी आर.बी.आय. कडे पाठविण्यास बँक तयार आहे. मंजूर होऊन आलेली रक्कम बँक अर्जदारास देण्यास तयार आहे. रक्कम न देऊन बँकेने कोणतीही ञूटी केलेली नाही. म्हणून सदरची तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदाराचे खाते क्र.498 मध्ये रु.49,992/- जमा आहेत ही बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. पण अर्जदार व त्यांची पत्नी ही वयोवृध्द असल्यामूळे त्यांना रक्कमेची आवश्यकता पडली असेल ही बाब सूध्दा नाकारता येणार नाही. परंतु गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने कलम 35 ए हे कलम लावून बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बध लादले असल्यामूळे गैरअर्जदार आर.बी.आय. च्या परवानगीशिवाय रक्कम देऊ शकत नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी सूध्दा सिध्द होत नाही. गैरअर्जदार बँकेने म्हटल्याप्रमाणे अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यातील अर्ज, उपचाराचे कागदपञ व इतर कागदपञ दाखल करुन रक्कमे बाबतचा प्रस्ताव त्यांचेकडे सादर केल्यास तो प्रस्ताव बँक ताबडतोब आर.बी.आय.कडे पाठविण्यास तयार आहे व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम अर्जदार यांना देण्यास तयार आहे. आर.बी.आय. यांचे मंजुरी नुसार एकदा रक्कम दिली आहे, पुन्हा एकदा दूसरा प्रस्ताव गरजेमूळे पाठविता येईल. अशा प्रकारे रक्कम न देऊन बॅकेने कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी योग्य कागदपञासह रक्कमेबाबतचा दुसरा प्रस्ताव आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यात गैरअर्जदार बँकेकडे सादर करावा व बँकेने तो प्रस्ताव त्यांचे मार्फत आर.बी.आय. कडे सादर करावा व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम ताबडतोब अर्जदार यांना दयावी. 3. मानसिक ञासाबददल आदेश नाही. 4. दावा खर्च पक्षकारांनी आपआपला सोसावा. 5. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यु.पारवेकर लघूलेखक. |