(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 31.10.2011) 1. अर्जदाराने सदर तक्रार, गै.अ.चे विरुध्द ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. अर्जदाराने मॅक्स कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट अधिकृत विक्रेता गै.अ.क्र.2 यांचेकडून दि.1.5.2010 रोजी दोन सीम कार्ड असलेला मॉडेल क्र.488 M-IMEI No.359722030501627, S-IMEI 359722031501626 गै.अ.क्र.2 कडून रुपये 3350/- मध्ये विकत घेतला. गै.अ.क्र.2 ने अर्जदाराला रुपये 3350/- चे बिल दिले. सदर बिलात मॉडेल नंबर MAXX. mx480 असा चुकून नंबर नमूद केला. अर्जदाराने, गै.अ.क्र.2 कडे बिलात दुरुस्तीकरण्याकरीता गेला असता, ‘‘कुछ नही होता साहब, मै तो चंद्रपुर में हू, आपको जब भी प्रॉब्लेम जायेगा तब मै करेक्शन करके दूंगा, यह हिसाब बील के साथ कंपनी को देना होता है. और वह बिल कंपनी को मैने भेज दिया है.’’ अर्जदाराचा सदर मोबाईल 20-30 दिवसांनी बिघडल्याने गै.अ.क्र.2 कडे घेवून गेला. तेंव्हा, त्यांनी हम खाली मोबाईल बेचते है, दुरुस्त कराने का सेंटर रेणुका कॉम्प्युटर्स में है, असे म्हणून गै.अ.क्र.3 कडे पाठविले. 2. अर्जदार सदर बिघडलेला मोबाईल हॅन्डसेट गै.अ.क्र.3 कडे घेवून गेला, त्यांनी 15-20 दिवस मोबाईल हॅन्डसेट ठेवावे लागेल असे सांगून मोबाईल हॅन्डसेट ठेवून घेतला. त्यानंतर, गै.अ.क्र.3 ने अर्जदारास दिलेल्या तारखांना 3-4 वेळा गेल्यानंतर कसाबसा दुरुस्त करुन दिला. अर्जदाराने दि.9.4.2011 च्या नंतर मोबाईल हॅन्डसेट आणखी बिघाड आल्यामुळे दुरुस्तीसाठी टाकला, त्यांनी 15-20 दिवस लागेल असे सांगितले. अर्जदार मोबाईल घेण्यास गेला असता, इसका की पॅड खराब हो गया है, या मदर बोर्ड में प्राम्ब्लेम हो सकता है. इसे कंपनी के तरफ भेजना पडेगा, असे म्हणून 20-25 दिवसांनी येण्यास सांगितले. अर्जदार, त्यानंतर मोबाईल हॅन्डसेट घेण्याकरीता गेला असता, कंपनी का आदमी आया नही असे सांगून तारखा देत गेले. 5-6 वेळा काही ना काही बाहाना करुन, अर्जदारास परत पाठविले आणि शेवटी गै.अ.क्र.3 ने सांगीतले की, यह मोबाईल मेरेसे दुरुस्त नही होगा वापस ले जाओ, तुम्हे जो करना है ओ करो. अर्जदाराने ही बाब गै.अ.क्र.2 ला जावून कथन केली. गै.अ.क्र.2 ने ही मॉडेल क्रमांक बदलवून देण्यास नकार दिला. गैरअर्जदार यांनी हॅन्डसेट दुरुस्त करुन दिला नाही म्हणून दि.23.5.2011 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविला. गै.अ.क्र.1 ला नोटीस प्राप्त झाल्यावर अर्जदाराचे वकील राजेश्वर ढोक, चंद्रपूर यांना फोन करुन IMEI No. मागीतला, तेंव्हा त्यांनी मोबाईल आपको दुरुस्त करके मिलेगा असे सांगितले. परंतु, आजतागायत, मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करुन मिळाला नाही. पुन्हा गै.अ.क्र.1 तर्फे अनिता मॅडमचा फोन आला नाही, म्हणून सदर तक्रार न्यायमंचात दाखल करावी लागली.
3. अर्जदाराने, तक्रारीत मागणी केली की, गैरअर्जदारानी अवलंबलेली व्यापार पध्दती अनुचीत व्यापार पध्दती ठरविण्यात यावी व दिलेली सेवा ही न्युनतापूर्ण सेवा ठरविण्यात यावी. गै.अ.क्र.2 कडून, गै.अ.क्र.1 च्या कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट त्वरीत दुरुस्त करुन देण्याचे आदेश गैरअर्जदाराविरुध्द पारीत व्हावा आणि मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त होऊ शकत नसल्यास दुसरा नवीन त्याच किंमतीचा हॅन्डसेट गॅरंटी/वॉरंटीसह देण्याचा आदेश व्हावा. अर्जदार आयकर विक्रीकर सल्लागार असल्याने, नादुरुस्त मोबाईल हॅन्डसेटमुळे आर्थिक, सामाजीक, भावनिक, मानसिक नुकसान झाले, त्याची नुकसान भरपाई रुपये 25,000/- गै.अ.कडून अर्जदारास मिळण्याचा आदेश व्हावा. अर्जदाराची शारीरीक, मानसिक, सामाजीक पिळवणूक झाली, या ञासापोटी गैरअर्जदारांवर रुपये 25,000/- दंड आकारावा व दंडीत रक्कम अर्जदाराला देण्यात यावी. नोटीस खर्च प्रत्येकी रुपये 1000/-, आणि तक्रार खर्च प्रत्येकी रुपये 6000/- प्रमाणे वसूल करुन अर्जदारास देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. 4. अर्जदाराने तक्रारीसोबत नि.4 नुसार एकूण 8 अस्सल व झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. तक्रार नोंदणी करुन, गै.अ.यांना नोटीस काढण्यात आले. गै.अ.क्र.2 व 3 यांना नोटीस तामील झालाच्या अहवाल नि.5 नुसार प्राप्त झाला आणि गै.अ.क्र.1 ला मंचामार्फत पाठविलेला नोटीस अनक्लेम म्हणून परत आला, तो नि.6 वर दाखल आहे. गै.अ.यांना नोटीस तामील होऊनही, हजर होऊन आपले म्हणणे सादर केले नाही, त्यामुळे त्याचे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यात यावे, असा आदेश नि.1 वर पारीत करण्यांत आला. 5. अर्जदाराने, तक्रारीतील कथना पृष्ठयर्थ तक्रारीतील मजकूर पुरावा शपथपञ समजण्यात यावा, अशी पुरसीस नि.7 नुसार दाखल केली. अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज आणि अर्जदार तर्फे वकीलाचा युक्तीवाद ऐकूण घेण्यात आला. गै.अ.चे विरुध्द प्रकरण एकतर्फा असल्यामुळे व सतत पुकारा करुन कोणीही हजर झाले नसल्यामुळे, उपलब्ध रेकॉर्डवरुन तक्रार गुणदोषावर (Merits) निकाली काढण्याकरीता ठेवण्यात यावे, असा आदेश नि.1 वर दि.4.10.2011 ला पारीत करुन, प्रकरण आदेशाकरीता ठेवण्यात आले. अर्जदाराने, दाखल केलेले दस्ताऐवज आणि केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. // कारणे व निष्कर्ष // 6. अर्जदाराने, गै.अ.क्र.1 च्या कंपनीचा डबल सीम हॅन्डसेट मॉडेल क्र.488 दि.1.5.2010 ला विकत घेतला. सदर मोबाईल मध्ये 20 ते 30 दिवसात बिघाड आल्यामुळे गै.अ.क्र.2 कडे घेवून गेला असता, त्यांनी गै.अ.क्र.3 कडे पाठविला. गै.अ.क्र.3 हे गै.अ.क्र.1 चे सर्व्हीस सेंटर असून, सेवा पुरविण्याचे काम करतात. अर्जदाराने तक्रारीत गै.अ.क्र.2 यांनी चुकीने मॉडेल क्रमांक Mx 480 असा नमूद केला व नंतर दुरुस्त करुन देण्यात येईल असे सांगितले. अर्जदाराने, गै.अ.क्र.2 चे विरुध्द जे कथन केले ते विना आव्हान असल्यामुळे स्विकारण्यास पाञ आहे. गै.अ.क्र.2 व 3 हे स्थानिक असून, त्यांना मंचातर्फे नोटीस तामील होऊनही आपले म्हणणे सादर केले नाही. यावरुन, अर्जदाराच्या म्हणणे त्यांना मान्य आहे, असाच निष्कर्ष निघतो. वास्तविक, गै.अ.क्र.2 व 3 यांनी हजर होऊन सत्य बाब पुढे आणण्याची जबाबदारी त्यांची होती. अर्जदाराच्या वकीलांनी युक्तीवादात असे सांगितले की, मोबाईल हॅन्डसेट आजही गै.अ.क्र.3 कडे आहे आणि अजूनपर्यंत दुरुस्त करुन दिलेला नाही. ही गै.अ.च्या सेवेतील न्युनता आहे, असाच निष्कर्ष निघतो. 7. अर्जदाराने, गै.अ.क्र.2 कडून, गै.अ.क्र.1 च्या कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट विकत घेतला आणि गै.अ.क्र.1 चे सर्व्हीस सेंटर म्हणून गै.अ.क्र.3 काम करीत असल्यामुळे, अर्जदाराने दि.1.5.2010 रोजी घेतलेला मॅक्स कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट मॉडेल क्र. MAXX 488 किंमत रुपये 3350/- दुरुस्त करुन देण्यास जबाबदार आहे आणि मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करुन देणे शक्य नसल्यास, त्याच किंमतीचा दुसरा मोबाईल हॅन्डसेट गै.अ.क्र.1 ते 3, अर्जदारास देण्यास पाञ आहेत, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 8. अर्जदाराने, तक्रारीत मानसीक, शारीरीक ञासापोटी व भावनिक, तसेच झालेल्या गैरसोयी पोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 25,000/- मागितलेले आहे. गै.अ.क्र.2 यांचेकडून मोबाईल हॅन्डसेट घेतल्यानंतर योग्य सेवा पुरविली नाही. वास्तविक, अर्जदार हा मॅक्स कंपनीकडे मोबाईल हॅन्डसेट घेण्याकरीता गेलेला नाही, तर कंपनी सोबत गै.अ.क्र.2 मार्फत संबंध आलेले आहे. त्यामुळे, कंपनीसोबत अर्जदाराचा करारात्मक संबंध (Privities of Contract) गै.अ.क्र.2 मार्फत घडून आलेले आहे, आणि गै.अ.क्र.3 हे सर्व्हीस सेंटर असल्यामुळे तिन्ही गै.अ. वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या मोबाईल हॅन्डसेट दुरुस्त करुन देण्यास, किंवा दुरुस्त होणे शक्य नसल्यास नवीन हॅन्डसेट देण्यास जबाबदार आहे. तसेच, गैरअर्जदाराच्या न्युनतापूर्ण सेवेमुळे झालेल्या मानसीक, शारीरीक ञासापोटी आणि मोबाईल हॅन्डसेट घेवूनही त्याचे उपभोगापासून वंचीत राहावे लागले असल्याने, नुकसान भरपाई म्हणून देण्यास पाञ आहेत, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. Defect—Mobile – Consumer Protection Act, 1986 – Section 2(1)(r) – Mobile became defective within a very short period of its purchase—Appellant arranged to get it repaired – Defect reappeared – Complaint allowed by the District Forum – Appellant directed to replace the defective set with a new set failing which to refund the price of Rs. 1,300/- with Rs.400/- as compensation and Rs. 200/- cost – Appeal – Contention raised that the appellant being only a retailer, the responsibility for repair cast on the manufacturer—Contention rejected – Appellant whom it was to be regarded as an agent – Impugned order modified – Appellant only to pay the cost of mobile i.e. Rs.1,300/- alongwith compensation and cost – Appeal dismissed. Plaza Mobiles –Vs.- Bhupati Roy Basunia 2010 CTJ 88 (CP)(SCDRC) 9. एकंदरीत, वरील कारणे व निष्कर्षावरुन गै.अ.क्र.1 ते 3 यांनी सेवा देण्यात न्युनता केली असल्याचे निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे. // अंतिम आदेश //
(1) गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी, वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या MAX कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट मॉडेल क्र.MX 488 गैरअर्जदार क्र.3 कडे असलेला दुरुस्त करुन, आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. किंवा दुरुस्त करुन देणे शक्य नसल्यास, नवीन मोबाईल हॅन्डसेट त्याच किंमतीचा तोच मॉडेल अर्जदारास आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत नवीन वॉरंटी/गॅरंटीसह द्यावे. (2) गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तीकरित्या, अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी व झालेल्या गैरसोयीपोटी रुपये 500/- व तक्रार खर्चापोटी रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत द्यावे. (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी. |