जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे. मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी --------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – २१८/२०१० तक्रार दाखल दिनांक – २२/०७/२०१० तक्रार निकाली दिनांक – २३/१२/२०१३ श्री.पिराजी तोताराम पाटील ----- तक्रारदार. उ.व.५२, धंदा- नोकरी रा.प्लॉट नं.५-ब,साईदर्शन कॉलनी, नवजीवन इंग्लीश शाळे जवळ, साक्रीरोड,धुळे.ता.जि.धुळे विरुध्द व्यवस्थापक,मे महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ----- सामनेवाले. फायनाशिअल सर्व्हीसेस लि.पांडव प्लाझा बिल्डींग,८० फुटी रोड,धुळे.ता.जि.धुळे. न्यायासन (मा.अध्यक्षा - सौ.व्ही.व्ही.दाणी) (मा.सदस्या - सौ.एस.एस.जैन) (मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी) उपस्थिती (तक्रारदारा तर्फे – वकील श्री.सी.व्ही.जावळे) (सामनेवाले तर्फे – वकील श्री.आर.एफ.पाटील) ---------------------------------------------- निकालपत्र (द्वारा- मा.अध्यक्षा - सौ.व्ही.व्ही.दाणी) (१) सामनेवाले यांनी तक्रारदाराचे ओढून नेलेले वाहन परत मिळावे या मागणीसाठी तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. (२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदार यांनी दि.१६-१०-२००८ रोजी ऑटोमोटीव्ह प्रायव्हेट लि.धुळे येथून ओमनी ई-३, चेसी नंबर १०५०७४५ इंजिन नंबर ४००६३२९ हे वाहन रक्कम रु.२,२६,५८७/- इतक्या किमतीस विकत घेतले. या कामी सामनेवाले यांच्याकडून रक्कम रु.२,००,०००/- चे कर्ज घेतले आहे. सदर वाहन घेतांना डाऊन पेमेंट रक्कम रु.४५,३००/- जमा केले आहेत. त्यानंतर सदर वाहन पासींग करुन रजिष्ट्रेशन हे सामनेवाले करणार होते. अशा परिस्थितीत दि.२६-१०-२००८ रोजी सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या घरी येवून त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पत्नीकडून गोड बोलून वाहनाची चावी घेतली व सदर वाहन घेऊन गेले. त्यानंतर त्या वाहनाची सामनेवालेंनी विक्री केली आहे. अशा त-हेने सामनेवाले यांनी फसवणूक केली आहे. तक्रारदारांनी वेळोवेळी सदर वाहनाचा ताबा मागून देखील सामनेवाले यांनी वाहन दिलेले नाही. अशा प्रकारे सामनेवाले यांनी सदोष सेवा दिली आहे. त्यामुळे सदरची तक्रार या मंचात दाखल करावी लागली आहे. सबब नुकसान भरपाईपोटी सामनेवाले हे रक्कम रु.१,००,०००/- देण्यास जबाबदार आहेत. सबब तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांनी सदर वाहन हे ताब्यात द्यावे. विकल्पे करुन ते देणे शक्य नसल्यास, वाहनापोटी भरलेली डाऊन पेमेंटची रक्कम रु.४५,३००/- व विम्याची रक्कम, अॅसेसरीजचा खर्च असे एकूण रु.६०,३००/- व्याजासह द्यावेत, मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रु.१,००,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च ५,०००/- द्यावा अशी विनंती केली आहे. (३) तक्रारदार यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.नं.३ वर शपथपत्र, नि.न.४ वर एकूण ६ कागदपत्र छायांकीत स्वरुपात दाखल केली आहेत. त्यात टॅक्स इनव्हाईस, डिलेव्हरी मेमो, खरेदीची पावती, विमा पॉलिसी इ. कागदपत्रांचा समावेश आहे. (४) सामनेवाले यांनी त्यांचा खुलासा नि.नं.१२ वर दाखल केला असून, त्यात त्यांनी तक्रार अर्ज नाकारला आहे. त्यांनी सत्य परिस्थितीमध्ये असे नमूद केले आहे की, तक्रारदार यांनी सदर वाहन खरेदी करणे कामी रु.२,००,००/- चे कर्ज घेतले आहे. सदर कर्जाची परतफेड दि.१०-१०-२०१२ पर्यंत एकूण ४८ हप्त्यांमध्ये करावयाची होती. परंतु प्रत्यक्षात तक्रारदाराने कोणतीही रक्कम वाहनाचे हप्त्यापोटी भरलेली नाही. तक्रारदाराने कर्ज करारनाम्याचे पालन केलेले नाही. तक्रारदाराने कर्जापोटी हप्ते भरण्यास टाळाटाळ केल्याने ते डिफॉल्टर झाले आहेत, म्हणून सामनेवाले यांना वाहनाचा ताबा घेण्याचा व ते विकण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सामनेवालेंनी योग्य ती कार्यवाही केलेली आहे. तक्रारदार यांची आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून त्यांनी सदर वाहन स्वत: सामनेवाले यांना सरेंडर केले आहे. त्यानंतरही तक्रारदार यांच्याकडे कर्जापोटी राहिलेली रक्कम रु.४२,०५२/- घेणे बाकी आहे. त्याकामी डिमांड नोटिस तक्रारदारास पाठविली आहे व त्याच्या वसुलीकामी लवादाकडे दावा दाखल केलेला आहे व त्यामध्ये तक्रारदार हे गैरहजर आहेत. सदर रक्कम भरण्याचे टाळण्यासाठी व लवाद अर्जाला शह देण्यासाठी सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी दाखल केलेला आहे. सामनेवालेंनी सदोष सेवा दिलेली नाही. सबब सदरचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. (५) सामनेवाले यांनी त्यांच्या खुलाशाचे पुष्टयर्थ नि.नं.१३ वर तक्रारदार यांचा तक्रार नसल्याबाबतचा अर्ज छायांकीत स्वरुपात दाखल केला आहे. (६) तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र, आणि सामनेवाले यांचा खुलासा व दाखल कागदपत्रे पाहता आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत. मुद्देः | निष्कर्षः | (अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय | (ब)सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | : नाही | (क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन (७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी दि.१६-१०-२००८ रोजी मारुती व्हॅन हे वाहन खरेदी केलेले आहे व त्याकामी सामनेवाले महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फायनान्स सर्व्हिस यांचेकडून रक्कम रु.२,००,०००/- चे कर्ज घेतले आहे हे उभयपक्षास मान्य आहे. याचा विचार होता तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. (८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांचे असे म्हणणे आहे की, सामनेवाले यांनी सदर वाहन हे तक्रारदार यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता व त्यांची संमती न घेता त्यांचे ताब्यातून घेवून त्याची विक्री केली आहे. तथापि तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडून कर्ज घेतल्याचे मान्य केले आहे, परंतु त्या कर्जाची परतफेड कशी व किती रकमेच्या हप्त्यांमध्ये करावयाची तसेच आजपावेतो किती कर्जाची रक्कम परतफेड केली आहे व किती कर्ज रक्कम अद्याप शिल्लक आहे या बाबत काहीही खुलासा तक्रार अर्जात नमूद केलेला नाही व त्या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे कर्ज घेतांना कर्ज करारनामा केलेला आहे. त्याप्रमाणे तक्रारदार हे जर थकबाकीदार झाले असतील तर सामनेवाले यांना सदर वाहन ताब्यात घेण्याबाबत व त्याकामी पुढील कार्यवाही करण्याचा अधिकार आहे. परंतु तक्रारदार व सामनेवाले यांनी त्यांचेत सदर वाहनाबाबत झालेला करारनामा किंवा त्याच्या अर्टी व शर्ती यांचा तपशील प्रकरणात दाखल केलेला नाही. याबाबत सामनेवालेंनी असा बचाव घेतला आहे की, तक्रारदार हे कर्ज थकबाकीदार झालेले आहेत. तसेच तक्रारदार यांनी स्वत: त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे नमूद करुन, हप्ते न भरता गाडी सामनेवाले यांना स्वत: सरेंडर केलेली आहे. या पुष्टयर्थ सामनेवाले यांनी दि.१४-०३-२००९ रोजीचा तक्रारदार यांनी दिलेला अर्ज नि.नं.१३/१ वर दाखल केला आहे. या कागदपत्राचा विचार करता सदर पत्र हे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दिलेले दिसून येते. त्या पत्रामध्ये “मी आपल्या फायनान्सकडून मारुती ओमनी गाडी घेतली, त्या गाडीला मी गॅसकीट बसविले होते ते मला परत मिळाले. तरी गॅसकिट बद्दल माझी काही एक तक्रार नाही. सदरहू माझी आर्थिक स्थिती नसल्याने गाडी विकण्यास माझी तक्रार नाही” असे नमूद केले असून, त्यावर तक्रारदारांची स्वाक्षरी आहे. या पत्राप्रमाणे असे दिसत की. दि.१४-०३-२००९ रोजी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना गाडी विकण्यास संमती दिलेली आहे व या संमतीअन्वये सामनेवाले यांनी दि.२२-०३-२००९ रोजी सदरचे वाहन हे विकलेले आहे. यावरुन असे लक्षात येते की, सदर वाहन विकण्यास तक्रारदारांची समंती आहे व त्या संमतीनेच गाडी विकलेली आहे. परंतु ही बाब तक्रारदार यांनी त्यांच्या तक्रार अर्जामध्ये नमूद केलेली नाही. सामनेवालेंनी गाडी ताब्यात घेतली व विक्री केली एवढेच केवळ तक्रार अर्जात नमूद केलेले आहे. यावरुन सदर वाहन विक्रीचे ज्ञान तक्रारदारास आहे व त्यास तक्रारदाराने संमती दिली आहे हे स्पष्ट होत आहे. सबब तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य नाही आणि सामनेवालेंच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होत नाही, असे आमचे मत आहे. उपरोक्त बाबीचा विचार करता, तक्रारदार हे स्वच्छ हाताने या मंचात आलेले नाहीत. त्यामुळे सामनेवालेंच्या म्हणण्याप्रमाणे, तक्रारदार यांना कर्जाची उर्वरीत राहिलेली रक्कम भरावी लागू नये तसेच सामनेवाले यांनी लवादाकडे जो दावा दाखल केला आहे त्याकामी शह देण्यासाठी सदरचा अर्ज तक्रारदाराने दाखल केल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत. (९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – उपरोक्त सर्व विवेचनावरुन हे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे. आदेश (अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येत आहे. (ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. धुळे. दिनांक : २३-१२-२०१३ (श्री.एस.एस.जोशी) (सौ.एस.एस.जैन) (सौ.व्ही.व्ही.दाणी) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे. |