(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून स्कोडा लॉरा ही गाडी खरेदी केली होती. दिनांक 7/2/2008 रोजी रु 1 लाखाचा चेक डाऊन पेमेंट गैरअर्जदार क्रमांक 2 यांना दिला. त्यानंतर गाडीच्या इन्शुरन्ससाठी म्हणून दिनांक 5/2/2008 रोजी रु 50,000/- दिले. तसेच गाडीच्या टायर आणि टॅप्लॉन कोटींगसाठी रक्कम रु 27,000/- गैरअर्जदार क्रमांक 2 यांना असे एकूण रु 1,77,000/- दिले. त्यानंतर तक्रारदारानी काही वैयक्तिक अडचणीमुळे गाडी आरटीओ रजिष्टर होण्या आधीच गैरअर्जदार क्रमांक 2 यांना परत केली. गैरअर्जदाराच्या पॉलिसीनुसार फक्त रु 15,000/- वजा जाऊन उर्वरीत रक्कम तक्रारदारास देणे अपेक्षित होते. परंतु गैरअर्जदारानी फक्त रु 85,000/- ही रक्कम तक्रारदारास परत केली. तक्रारदारानी त्या गाडीचा वापरच केला नाही. अनेकवेळा विनंती केली, ई मेल केला तरीही गैरअर्जदारानी रक्कम परत केली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून रु 77,000/- 10 टक्के व्याजदाराने परत मागतात, तसेच नुकसान भरपाईपोटी रु 15,000/- व मानसिक त्रासापोटी रु 5,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदाराने शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदारानी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अग्रीमेंट टू सेलच्या अटी व शर्ती नुसार, तक्रारदारानी, 1 लाख भरलेले होते. त्यातील रु 15,000/- वजा करुन रु 85,000/- दिले. इन्शुरन्स ची रक्कम तक्रारदारानीच भरलेली असल्यामुळे व ही पॉलिसी या गैरअर्जदाराच्या नावावर ट्रान्सफर झालेली नसल्यामुळे ही रक्कम ते देऊ शकत नाहीत. तक्रारदारानी म्हटल्याप्रमाणे टायर आणि टॅफलॉन कोटींग ची रक्कम त्यांच्यापर्यंत पोचली नाही. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारानी इन्शुरन्स रक्कम त्यांना मागितली त्यावेळेस प्रिमीयमची रक्कम भरुन 10 महिने झालेले होते. त्यामुळे पूर्ण रक्कम देता येत नाही. कांही रक्कम वजा करुनच देता येईल हेच त्यांना सांगितले होते परंतू त्यानी यास नकार दिला. तक्रारदारानी त्याना याबाबतीत ई मेल केले हे त्यांना मान्य नाही. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे व शपथपत्राची पाहणी मंचाने केली. तक्रारदारानी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून स्कोडा लॉरा ही गाडी खरेदी केलेली होती. त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे त्यानी गाडी परत केली. तक्रारदारानी दिनांक 7/2/2008 रोजी डाऊन पेमेंट म्हणून 1 लाख रुपये भरले होते. गैरअर्जदाराने पॉलीसीनुसार रु 15,000/- वजा करुन 85,000/- रुपये तक्रारदारास परत केले. तक्रारदारास हे मान्य नाही. इन्शुरन्स रक्कम तक्रारदारानीच भरलेली असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ते देऊ शकत नाहीत. तसेच टायर व टॅफ्लॉन कोटींगसाठी रक्कम भरल्याचा पुरावा तक्रारदारानी दाखल केला नाही. त्यामुळे ही मागणी मान्य करता येत नाही. परंतु गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 च्या म्हणण्यानुसार त्यांनी असे कळविले होते की, इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यापासून दहा महिने झाल्यानंतर तक्रारदारानी, पॉलीसीची रक्कम त्यांच्याकडे मागितली. त्या गाडीस इन्शुरन्स चे जवळपास पूर्ण संरक्षण लाभले होते. त्यामुळे संपूर्ण प्रिमीयमची रक्कम देता येणार नाही , कांही रक्कम वजा करुन मिळेल हे मंचास पटते. पॉलीसीचा कालावधी दिनांक 2/2/2008 ते 1/1/2009 पर्यंत होता. तक्रारदारानी दिनांक 30/8/2008 रोजी प्रिमिअमची रक्कम परत मागितली. वरील तारखानुसार, गैरअर्जदार म्हणतात त्याप्रमाणे पॉलीसीच्या नियमानुसार (जीआर-12) रक्कम वजा करुन, उर्वरित प्रिमिअमची रक्कम तक्रारदारास द्यावी. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारदारास रक्कम दिलेलीच आहे त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार रक्कम वजा करुन या आदेशाच्या प्राप्तीपासून 6 आठवडयाच्या आत रक्कम तक्रारदारास द्यावी. 2. खर्चाबद्दल आदेश नाही. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |