जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 04/2011 तक्रार दाखल तारीख –06/01/2011
शहादेव पि.भानुदास थापडे
वय 40 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.ढेकणमोहा ता.जि.बीड
विरुध्द
1. व्यवस्थापक,
महाराष्ट्रा हायब्रीड सिडस
रेशम भवन,78,वीर नरिमन रोड,
मुंबई 400 020 सामनेवाला
2. व्यवस्थापक,
विक्रम सिंडस प्रा.लि.
209, अश्वमेध,अव्हेन्यु, मयुर कॉलनी,
नवरंगपुरा, अहमदाबाद 380 009
3. व्यवस्थापक,
नवीजिडू सिडस प्रा.लि. 905, कंचनजुंगा बिल्डींग,
बरखांबा रोड, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली- 110 001
4. गोविंद कृषी सेवा केंद्र, प्रो.प्रा.बाजीराव रामराव घोडके
रा.घोडकाराजुरी ता.जि.बीड
5. गणेश कृषी सेवा केंद्र, प्रो.प्रा.महारुद्र नारायण मुळे
रा.म्हाळसजवळा ता.जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.आर.बी.धांडे
सामनेवाला क्र.1 तर्फे ः- अँड.व्ही.एम.कासट सामनेवाला क्र.2 तर्फे ः- अँड.आर.बी.नवले
सामनेवाला क्र.3 तर्फे ः- अँड.नरेंद्र धुत
सामनेवाला क्र.4 व 5 तर्फे ः- अँड.ए.डी.काळे
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार ढेकणमोह ता.जि.बीड येथील रहीवासी असून त्यांची जुजगव्हाण येथे वडिलोपार्जीत शेती आहे. शेतीवर त्यांची उपजिवीका आहे.
तक्रारदाराचे नांवे गट नंबर 79 मध्ये 82 आर जमिन आहे. कूटूंबाची व्यवस्था म्हणून 7/12 उता-यावर गट नंबर 79 मध्ये जमिन आपसात सहा भावांच्या नांवे लावलेल्या होत्या. त्यातील अनुरथ भानुदास थापाडे हे त्यांचे अगदी लहान वयातच आजाराने मयत झाले. त्यांचे नावांवरील 1 हेक्टर 22 आर जमिन तक्रारदाराच्या भांवाचे म्हणण्यानुसार व तोंडी वाटणीनुसार मयत भावाचे नांवावरील जमिन ही तक्रारदारास सहा वर्षापुर्वी वहितीस व उत्पन्न घेण्यास सर्व भांवाचे संमतीने दिलेली आहे. त्यानुसार तक्रारदार वहितीदार म्हणून मालक व ताबेदार आहे.
गट नंबर 79 मध्ये क्षेत्र 2 हेक्टर 4 आर उत्तम प्रतिची बागायती शेत जमिन असल्याने तक्रारदारास सर्व खर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न रक्कम रु.4,00,000/- मिळते.
तक्रारदारांना चालू हंगामामध्ये गट नं.79 मधील 2 हेक्टर 4 आर जमिनीमध्ये तो वहिती करत असलेल्या भावाचे जमिनीत कापसाचे पिक घेण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तक्रारदाराने गोविंद कृषी सेवा केंद्र प्रो.प्रा.बाजीराव रामराव घोडके सामनेवाला क्र.4 यांचेकडून खालीलप्रमाणे कापसाचे बियाणे खरेदी केले.
1. एम.आर.सी.7351 बी.जी.-2 कॉटन हायब्रेड सिडस ज्यांचा लॉट नं.एक्स के.बी.10698 ज्याची किंमत रक्कम रु.750/- प्रत्येकी एक नग प्रमाणे दोन नग एकूण रु.1500/- किंमतीचे.
2. विक्रम 5 बी.टी.(बी.जी.-2) कॉटन सिडस ज्याचा लॉट नं.0310635 ज्याची किंमत रक्कम रु.750/- एक नग प्रमाणे प्रत्येकी तिन नग एकूण रु.2250/- किंमतीचे.
3. मल्लीका बी.टी. एन.सी.एस-207 बी.टी. कॉटन हायब्रेड सिडस ज्यांचा लॉट नं.4888111 ज्याची किंमत रक्कम रु.650/- एक नग प्रमाणे प्रत्येकी दोन नग एकूण रु.1300/- किंमतीचे.
वरील प्रमाणे कपाशी बियाणे दि.17.6.2010 रोजी खरेदी केल्यानंतर खरेदीच्या वेळी सामनेवाला क्र.4 कडे बिलाची मागणी केली असता रितसर पावती उपलब्ध नाही तुम्हाला 2-4 दिवसांत पावती उपलब्ध करुन देतो असे सांगून पावती देण्यास टाळाटाळ केली.
तक्रारदाराने वरील खरेदी केलेल्या बियाणे गट नंबर 79 मध्ये 5 एकर 4 आर जमिनीमध्ये 3 x 3 फुटच्या अंतराने त्यांची वेगवेगळया क्षेत्रामध्ये लागवड केली. लागवड करतेवेळी तक्रारदाराने 15-15-15 हे सुफला कंपनीचे खत आठ पोते किंमत रक्कम रु.3500/- चे पेरणी करुन . (08 जुन 2010 रोजी)
दि.3.5.2011 रोजी सदरील बियाण्यांची वेगवेगळया क्षेत्रावर लावणी केली. सदरचे बियाणे
निशाणी 18 वरील उगवुन आल्यानंतर लागवडीनंतर दिड महिन्याने तक्रारदाराने त्यांस
आदेशाप्रमाणे 8 जुन तनाचा नाश होण्याकरिता पाळी घालून खुरपणी करुन तनाचा
2010 रोजी ऐवजी बंदोबस्त केला. तसेच सदरच्या पाळीच्या वेळी तक्रारदाराने वरील
18 जुन 2010 अशी कापसाच्या झाडांना 20-20-13 सरदार कंपनीचे खत 16 पोते किंमत
दुरुस्ती करण्यात आली. रक्कम रु.7750/- पेरणी केले.
सही/- पिकाची वाढ समाधानकारक झाल्याचे दिसल्यानंतर पिकावर पहिली तक्रारदाराचे वकील फवारणी समिडा-1 नग रु.500/- व अँमीनॉल -1 नग रु.400/- औषध वापरुन दि.3.5.2011 दि.15.7.2010 रोजी पिक 40-50 दिवसांचे असतांना फवारणी केली. त्यानंतर
15-20 दिवसांच्या फरकाने दि.25.8.2010 रोजी दुसरी फवारणी विद्राव्य खत
औषध महाधन 19-19-19 एक पुडा रु.220/- व विक्टर एक बाटली रु.350/-
वापरुन दुसरी फवारणी केली.
त्यानंतर 15-20 दिवसांचे अंतराने दि.21.9.2010 रोजी शार्क कंपनीचे औषध 1 नग रु.450/- व अँमीनोगोल्ड कंपनीचे औषध दोन नग रु.800/- वापरुन तिसरी फवारणी केली. यासर्व फवारण्या किड व रोग नियंत्रणासाठी केल्या होत्या. त्यानंतर कापसाची वाढ चांगल्या प्रकारची दिसून आल्यानंतर दि.3.9.2010 रोजी चौथी फवारणी लान्सर गोल्ड कंपनीचे औषध दोन पुडे रु.1000/-, आर्कस्टीक एक बाटली रु.200/- ची फवारणी केली. त्यानंतर लगेचच दि.15.9.2010 रोजी पिकाचे मागणी प्रमाणे पाचवी फवारणी मॅक्झीमा कंपनीचे औषध रु.1000/- व अँलविन टॉप कंपनीचे औषध सहा नग रु.1800/- प्रमाणे वापरुन फवारण्या केल्या. वरील सर्व औषधे हे तक्रारदाराने सामनेवाला क्र.4 कडून खरेदी केलेले आहेत.सामनेवाला क्र.4 यांनी वरील बि-बियाणाचे खरेदी केलेले औषधाच्या पावत्या वारंवार मागितल्या असता सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारास वरील बी-बियाण्यांच्या व औषधाच्या पावत्या देण्यास वारंवार टाळाटाळ करुन श्री. गणेश कृषी सेवा केंद्र प्रो.प्रा.महारुद्र नारायण मुळे रा. म्हाळस जवळा या दुकानाच्या पावत्या दिल्या आहेत.
कापसाचे पिकास चांगला फुलोरा लागलेला दिसला. परंतु फुलोरा लागल्यानंतर झाडाची पाते न टिकता गळून जाऊ लागली. पातेगळ मोठयाप्रमाणावर होत असलेली दिसून येऊ लागले, एका झाडाला सर्व साधारणपणे वरील सर्व मशागत झाल्यानंतर 120 ते 130 परिपक्व बोंडे येणे आवश्यक असतात. परंतु केवळ एका झाडाला 2-4 बोंडे तयार होऊ लागली व त्यांचा आकार ही सुपारी एवढाच राहू लागला. तसेच ते बोंडही 2-3 दिवसामध्येच गळून पडू लागले. एम.आर.सी.7351 बी.जी.-2 कॉटन हायब्रेड सिडस, विक्रम 5 बी.टी. (बी.जी.-2) कॉटन सिडस मल्लीका बी.टी. एन.सी.एस-207 बी.टी. कॉटन हायब्रेड सिडस या कापसाच्या झाडांना केवळ 4-5 सुपारीच आकाराची बोंडे येऊ लागली. केवळ कापसांच्या झाडांची वाढ जोमाने होऊ लागली. प्रत्येक झाडाची 5-6 फुटापर्यत वाढ झाली. परंतु प्रत्येक झाडास फळ (बोंडे)न आल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न तक्रारदारास मिळालेले नाही. त्यामुळे तक्रारदाराचे पूर्ण शेतीचे उत्पन्न हे 90 टक्के निष्फळ गेले. योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाखाली कापसाच्या झाडांची योग्य प्रकारे निगा राखून खत, पाणी व औषधे वेळोवेळी दिलेली आहेत, पिकास आवश्यक असणारा पूर्ण आहार तक्रारदाराने दिलेला आहे. तक्रारदाराचे पिकावर कुठलीही नैसर्गिक आपत्ती आलेली नसतांना झाडाची फुलगळ व पातेगळ झाल्यामुळे बोंडे येऊ शकली नाहीत व झाडाला जी बोंडे आली ती 2-3 दिवसांत गळू लागली. तक्रारदाराच्या शेतातील कापसाच्या पिकाला कसल्याही प्रकारची परिपक्व बोंडे न लागल्याने पूर्ण शेतीचे उत्पन्न हे 90 टक्के निष्फळ झालेले आहे.
तक्रारदाराची शेती बागायती, उच्च दर्जाची असल्याने तक्रारदारास प्रति एकर कापसाचे उत्पन्न 14-15 क्विंटल मिळत असते, परंतु तक्रारदारास मिळालेले कापसाचे बियाणे हे भेसळयूक्त व निकृष्ट दर्जाचख्े असल्याने सदरील बियाणापासून तक्रारदारास कसलेही उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे तक्रारदाराचे प्रति एकर 14-15 प्रमाणे एकूण पाच एकर जमिनीमधील कापसाचे 75 क्विंटल 60 किलो ते 81 क्विंटल कापसाचे उत्पन्न मिळाले असते ज्याची एकूण किंमत रु.3,17,520/- ते रु.3,40,200/- उत्पन्न मिळाले असते. परंतु तक्रारदारांना उत्पन्न मिळाले नाही. तक्रारदारानी चालू हंगामाकरिता कापसाचे लागवडी करिता बी-बियाणे, खते व औषधे खरेदी करण्यासाठी दि. बीउ जिल्हा मध्यवती बँक शाखा बीडचे रक्कम रु.65,000/- कर्ज घेतलेले होते तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शाखा बीड चे रक्कम रु.,22,000/- कर्ज घेतलेले होते. त्यांची परतफेड वरील कापसाचे उत्पन्नातून तक्रारदारांनी करणे आवश्यक होते. तक्रारदार सध्या कर्जबाजारी झालेले आहेत.
दि.7.12.2010 रोजी सामनेवाला क्र.1 ते 3 यांचे कंपनीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे व भेसळयूक्त असल्याचे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना तसेच कृषी अधिकारी पंचायत समिती बीड, जिल्हाधिकारी बीड, यांना कळविले. शेतातील पिकाची पाहणी करुन नूकसान भरपाई मिळावी म्हणून रितसर अर्ज दिला. त्यानुसार दि.21.12.2010 रोजी जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद बीड तसेच प्रतिनिधी महाबीज, बीड कृषी विकास अधिकारी बीड, तालुका कृषी अधिकारी बीड व जिल्हा बीज प्रमाणीकरण यंत्रणा बीड वरील समिती तक्रारदाराच्या मौजे जुजगव्हाण येथील गट नं.79 मधील पाच एकर 4 आर मिळकतीमध्ये येऊन रितसर जवाब घेतला. तसेच जायमोक्याचा पंचनामा केला. पंचनाम्याचा निष्कर्ष तक्रारदाराच्या तक्रारी प्रमाणे तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे आढळून आल्याने त्याप्रमाणे पंचनामा करुन त्यांची एक प्रत तक्रारदारास दिली.निकृष्ट व भेसळयूक्त बियाणे देऊन सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदाराचे जे नूकसान झाले त्याची मागणी तक्रारदार खालीलप्रमाणे करीत आहेत.
1. बियाणे खरेदी खर्च रु.5900/-
2. लागवडीचा खर्च रु.5000/-
3. खत खर्च रु.14250/-
4. मजुरीचा खर्च रु.15000/-
5. रासायनिक किटकनाशक फवारणीचा खर्च रु.6270/-
6. औषध फवारणीचा खर्च रु.5000/-
7. दोन खुरपणीचा खर्च रु.10000/-
8. मानसिक व आर्थिक त्रासाबाबत रु.50,000/-
9. तक्रारीचा खर्च रु.5000/-
10. तक्रारदाराचे कापूस विक्रीतून मिळणारे उत्पन्न रु.3,20,000/-
एकूण रु.4,36,420/-
मिळण्यास पात्र आहेत.
विनंती की, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 ते 5 यांनी तक्रारदारांना नूकसान भरपाई रु.4,36,420/-, सदर रक्कमेवर बियाणे खरेदी केलेल्या दिनांकापासून रक्कम मिळेपर्यत नूकसान भरपाई देण्याचे आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा नि.20 दि.11.3.2011 रोजी दाखल केला. तक्रारदार ग्राहक नाहीत. तक्रारदाराची तक्रार ही सेवा या संज्ञेत येत नाही. तसेच ग्राहक संरक्षण कायदा प्रस्तूत तक्रारदाराला लागू नाही कारण सदरच्या तक्रारीस बियाणे कायदा 1966 लागू आहे. प्रस्तूत तक्रारीत तक्रारदारांनी या बियाणे कयंपनी विरुध्द आणि दोन दूस-या बियाणे कंपनी विरुध्द तक्रार दाखल केली आहे. तसेच दि.17.6.2010 रोजीचे बिलाची फोटो प्रत पाहता त्यावर बियाणे विक्रेत्यांचे नांव व पत्ता नाही. त्यांला पुरावा कायदयानुसार कूठलेही महत्व नाही. तसेच सदर बिलावर कूठल्याही विक्रेत्याची सही नाही. दि.21.12.2010 रोजीच्या क्षेत्र पाहणीच्या बियाणे समितीला तक्रारदारानी दोन बॅग महिको 7351 लॉट नंबर वायकेजी 100255एक्स तिन बॅग विक्रम-5, लॉट नंबर 0310635, दोन बॅग मल्लीका बॅच नंबर 2 लॉट नंबर 19466251, 4888111 आणि एक बॅग मागो -1 गोविंद कृषी सेवा केंद्र घोडका राजूरी कडून घेतल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांनी तक्रारदारांना कच्ची पावती दिली आणि नंतर वारंवार विनंतीवरुन मूळ बिल मे. गणेश कृषी सेवा केंद्र म्हाळस जवळा ता.जि.बीड चे दिले परंतु लॉट नंबर सदर पावतीमध्ये वेगळा आहे. त्यामुळे तक्रारदाराचे विधान मे. गोविंद कृषी सेवा केंद्र घोडका राजूरी यांचेकडून कापसाचे बियाणे विकत घेतल्याची बाब स्पष्ट होत नाही. बिल नंबर 932 दि.17.6.2010 रोजी मे. गणेश कृषी सेवा केंद्र म्हाळसा जवळा चे तक्रारदाराने बिल दाखल केले. ते खरे बिल नाही. तक्रारदारांनी बियाणे सदर दूकानातून खरेदी केलेले नाही. या संदर्भात तक्रारदाराचे खोटे बिल दाखल केले आहे. तक्रारदारास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदार कायदयाने चालू शकत नाही. तक्रारदारास स्वतःचे मालकीचे 82 आर (दोन एकर) शेत जमिन आहे. तक्रारदारांनी कापसाचे बियाणे तिन वेगवेगळे कंपनीचे पाच एकर 4 आर क्षेत्रात लागवउ केली आहे.तक्रार खोटी असून ती रदद होण्यास पात्र आहे. तक्रारीत दि.8.6.2010 रोजी वरील क्षेत्रात कापसाची लागवड केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तसेच दि.21.12.2010 रोजी तक्रारदारानी बियाणे समिती समोर जवाब दिलेला आहे. तसेच सदर अहवाल बियाणे मे. गोविंद कृषी सेवा केंद्राकडून दि.17.6.2010 रोजी विकत घेतले आणि लगेचच त्यांची पेरणी केली म्हणून नमूद करण्यात येते की, तक्रारदारानी दिलेले पत्र दि.7.12.2010 रोजीचे कृषी विकास अधिका-याच्या नांवाचे बाबत तक्रारदारानी मल्लीका बी.टी.2 बॅग, कनक (73 x 51) दोन बँग, मार्गो एक बॅग, विक्रम तिन बॅग एकूण आठ बँग खरेदी केलेल्या आहेत. त्यांची लागवड दि.8.6.2010 रोजी केलेली आहे. समिती समोरची दिलेले स्टेटमेंट व तक्रारीमध्ये मध्ये दिलेली तक्रार यामध्ये तफावत आहे व सदरचे विधाने ही एकमेकाशी पुरक नाही. त्यामुळे तक्रार खोटी आहे. बिनबूडाची आहे. दि.17.6.2010 रोजीचे बिल नंबर 932 ची पावती सामनेवाला नाकारीत आहेत. तक्रारदारांनी बियाणे खरेदी केल्याची बाब सिध्द केलेली नाही.
मे. गोविंद कृषी सेवा केंद्र घोडका राजूरी हे सामनेवाला यांचे अधिकृत विक्रेते नाहीत. सामनेवाला यांनी त्यांना एमआरसी-7351 बीजी 2 च्या बिलाचा पुरवठा केलेला नाही. त्यामुळे हे सामनेवाला सदर बियाण्यास जबाबदार नाहीत. तसेच तक्रारदारांना कोणतीही नूकसान भरपाई देण्यास सामनेवाला जबाबदार नाहीत.
तक्रारदारांनी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचेकडे दि.07.12.2010 रोजी तक्रार दिली आणि समितीने दि.21.12.2010 रोजी क्षेत्राची पाहणी केली म्हणजेच हंगामानंतर पिकाच्या वाढीचा पूर्ण कालावधी झाल्यानंतर पाहणी केल्यानंतर सदरचा पंचनामा दि.21.12.2010 रोजी हा परिपत्रक दि.27.3.1992 नुसार नाही. कमिटीने बियाण्याचे गुणवत्ते बाबत कोणताही निष्कर्ष दिलेला नाही. पंचनामा अत्यंत मोघम आहे तो परिपत्रकानुसार नाही. क्षेत्र पाहणी अहवाल हा समितीने फुल आणि पाते येण्याचे काळात तयार करावयाचा होता. परंतु समितीने भेट हंगामानंतर दिलेली आहे. पिकाच्या वाढीचा पूर्ण कालावधी झालेला आहे त्यामुळे सदरचा पंचनामा योग्य नाही.
समितीने सदरचे बियाणे तपासणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले नाही. बियाणे समितीचा रिपोर्ट सामनेवाला यांना मान्य नाही. ग्राहक संरक्षण कायदयातील कलत 13 (1)(सी) नुसार तक्रारदारांनी सदरच्या बियाण्याचा नमूना प्रयोगशाळेकडे पाठविला नाही. तक्रारीतील सर्व आक्षेप सामनेवाला यांनी नाकारले आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदारांना कोणतेही निकृष्ट भेसळयूक्त बियाणे देऊन सेवेत कसूर केलेला नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचा खुलासा दि.1.4.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तसेच तक्रारदार ग्राहक नाही कारण कापसाचे पिक हे व्यापारी हेतूने तक्रारदाराने घेतले आहे. तक्रारीत तक्रारदाराने सदरचे कापसाचे उत्पन्न हे स्वतःसाठी घेत असल्याचे कूठेही म्हटलेले नाही. सामनेवाला क्र.1 च्या कायदेशीर बाबी तक्रारीत सामनेवाला यांनी त्यांचे खुलाशात घेतलेल्या आहेत. तक्रारदारांनी बियाण्याचे पाकीटावरील सुचनाचे पालन केलेले नाही. सामनेवाला यांचे बियाणे हे निकृष्ट आणि भेसळयूक्त नाही. त्यामुळे तक्रारदारानां दयावयाचे सेवेत कूठेही कसूर केलेला नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.3 यांनी त्यांचा खुलासा नि.23 दि.07.3.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. सदरचे बियाणे कंपनी ही मागील 30 वर्षापासून सदरचे बियाणे उत्पादक करणारी कंपनी आहे. कंपनीने तयार केलेल्या बियाण्याचा उत्कृष्ट दर्जा असतो हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे नेहमी चांगली मागणी असते. कंपनी उच्च गुणवत्ता व परिपूर्ण तंत्रज्ञान यांचा योग्य वापर करीत असल्याने भारत सरकारने उच्च गुणवत्तेचे डि.आय.ए.आर. अवार्डने कंपनीला गौरवांकित केलेले आहे.बियाणे उगवण्याकरिता बरेच घटक जबाबदार असतात. जसे वातावरण, मातीचा दर्जा, वापरलेले खते, वापरलेली किटकनाशके, मुबलक प्रमाणात पाऊस व इतर घटक उत्पादनात तसेच उगवण शक्तीवर परिणाम करतात.त्यामुळे बियाणे हा घटक हा तक्रारदाराच्या तक्रारीस जबाबदार नाही. तक्रारदाराने ब-याच कंपनीचे बियाणे विकत घेऊन त्यांची लागवड केली. कृषी शास्त्राप्रमाणे वेगवेगळे गुणधर्माचे बियाणे एकाच परिक्षेत्रात लागवड करु नये त्यामुळे पिकाचे उत्पन्नावर परिणाम होतो. सर्व प्रतिच्या बियाण्यामध्ये नूकसानीची शक्यता वाएते. दाखल असलेल्या पंचनाम्यावरुन स्पष्ट होते की, पिकामध्ये ब-याच प्रमाणात पाने गळ, फूल गळ, आढळून आलेली आहे. ही सर्व परिस्थिती सर्व वाणामध्ये आहे. तक्रारदाराने कृषी शास्त्रातील नियमाचे पालन न केल्याने हा दोष उत्पन्न झाला आहे. त्याकरिता बियाणे हा घटक मुळीच जबाबदार नाही.
तक्रारदारा जवळ त्यांची मालकीची फक्त 82 आर शेत जमिन गट नंबर 79 मध्ये आहे. यांच गटातील 1 हेक्टर 22 आर शेत जमिन ही तक्रारदाराचा भाऊ अनुरथ यांच्या नांवे आहे व तो लहान वयातच मयत झालेला आहे. त्यामुळे शेत जमिन ही तोंडी वाटणीनुसार फक्त तक्रारदारांना कशी मिळाली या बाबत तक्रारीत कूठेही नमूद नाही. सहा भांवाचे नांवे असलेला 7/12 त्यामध्ये प्रत्येकाचे हिस्सावर आलेली जमिन नमूद आहे. अनुरथ थापडेची शेत जमिन तक्रारदार वहिती करतो याबददलचा कोणताही कागदोपत्री पुरावा किंवा इतर भांवाची ना हरकत प्रमाणपत्र तक्रारीसोबत दाखल नाही.82 आर शेत जमिनीत इतर क्षेत्रात लागवड केलेल्या बियाण्याशी तक्रारदाराचा काहीही संबंध नाही.
तक्रारदारांनी वेगवेगळया तिन कंपनीच्या कापूस जातीच्या बियाण्याची सात बँग बियाण्याची लागवड केली. तसे तक्रारीत नमूद आहे. बियाण्याची खरेदी पावती तक्रारीत दाखल नाही. दि.17.6.2010 रोजीच्या कच्चा पावतीचे अवलोकन केले असता त्यावर दूकानाचे किंवा सामनेवाला क्र.4 चे नांव नाही. ती पावती कोणाची, कोणी व कूणास दिली हे समजू शकत नाही. त्यामध्ये एकूण सहा कंपनीचे 10 बँग कापूस बियाणे नमूद आहे. गणेश कृषी सेवा केंद्र बिल नंबर 932 ही बियाण्याची पावती दाखल केली असून त्यामध्ये चार वेगवेगळे कंपनीचे आठ बॅग बियाणे खरेदी केल्याचे दिसून येते. सदरचे बियाणे तक्रारदारांनी गणेश कृषी सेवा केंद्र येथून विकत घेतलेलेच नाही, हे तक्रारदाराचे म्हणणे आहे. यांचा अर्थ असा की, ज्यादिवशी तक्रारदाराने सामनेवाला क्र.4 कडून बियाणे विकत घेतले त्या बददलची रितसर पावती दिलेली नाही व वांरवार मागणी करुनही त्यानंतर सामनेवाला क्र.5 ची रितसर पावती देण्यात आली. त्यामुळे तक्रारदार व सामनेवाला यांचेत विक्रेता व ग्राहक संबंध नाही. तक्रारदार सामनेवाला क्र.3 नूजिवूड सिडस प्रा.लि. कंपनीचा ग्राहक होत नाही.महत्वाची बाब म्हणजे दाखल केलेल्या बियाण्याचे कच्चा पावत्यामध्ये मार्गो, व सिग्मा या दोन कंपनीच्या बियाण्यांचा उल्लेख आहे. परंतु त्यांना पार्टी केलेले नाही. तक्रारदार शुध्द हेतूने जिल्हा मंचा समोर आलेला नाही. सत्य बाबी लपवित आहे हे स्पष्ट होते. आजच्या आधूनिक काळात प्रत्येक ग्राहक जागृत असून बिगर पावती माल खरेदी करणे शक्य नाही. खरेदी केलेल्या दूकानाची रितसर पावती न घेता त्या दूकानदाराकडून दूस-या दूकानाची पावती कशी घेईल हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. महत्वाची बाब म्हणजे तक्रारदाराने दि.2.1.2.2010 रोजी कृषी विकास अधिकारी यांना दिलेल्या अर्जात आठ बॅगाची लागवड दि.8.6.2010 रोजी केलेली आहे. बियाणे दि.17.6.2010 रोजी विकत घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. बियाणे गोविंद कृषी सेवा केंद्र सामनेवाला क्र.4 कडून खरेदी केल्याचे म्हणतात. दूकानदाराने रितसर पावती दिली नाही ही बाब नमूद नाही. यावरुन स्पष्ट होते की, बियाणे खरेदी करण्यापूर्वीच दि.8.6.2010 रोजी लागवड कशी झाली.
शेत मशागतीसाठी, औषध, फवारणीसाठी, औषध खत याबददलची रितसर पावती विकत घेतल्याबददल तक्रारीत दाखल नाही. सदर बाबी करिता बँकेकडून कर्ज घेतल्याचे, याबददल शेत दस्ताऐवज नाही.
तक्रारदाराचे कथनानुसार तक्रारदारांनी दि.8.6.2010 रोजी बियाण्याची लागवड केल्यानंतर तब्बल पाच महिन्यानी म्हणजे लागवडीपासून 150 दिवसांनी कृषी विकास अधिकारी यांचेकडे दि.7.1.2.2010 रोजी तक्रार दाखल केली. कृषी शास्त्रानुसार कापूस या पिकाचा कालावधी हा 90 ते 120 दिवसांचाच असतो व त्यानंतर फरदळ वेचणीचा कालावधी असतो. सर्व कालावधी संपून गेल्यानंतर तक्रार केल्याचे स्पष्ट होते.
बियाणे तक्रार निवारण समितीचा दि.21.12.2010 रोजीचा क्षेत्र भेट अहवाल पंचनामा शासन परिपत्रकानुसार नाही. सदर अहवाल लागवडीनंतर तब्बल सहा महिन्यानंतर तयार करण्यात आलेला आहे. त्यात मार्गो कंपनीच्या बियाण्याचा उल्लेख असून तक्रारदारांनी दाखल केलेल्या बियाणे पावतीवर सुध्दा सदर कंपनीच्या बियाण्याचा उल्लेख असून तक्रारीमध्ये सदर बियाण्याबाबत उल्लेख नसून मागणीसुध्दा नाही. बियाण्याचे सदोषा बाबत पंचनामा स्तब्ध असून दोषा बाबत काही नमूद केलेल नाही. यावरुन स्पष्ट होते की, बियाणे हा घटक तक्रारीस जबाबदार नाही. तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
सामनेवाला क्र.4 व 5 यांचे वतीने एकत्रित खुलासा नि.22 दि.1.4.2011 रोजी दाखल करण्यात आला. खुलाशात तक्रारीत सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदारांनी दि.17.6.2010 रोजी सामनेवाला क्र. 5 चे दूकानातून कापसाचे महिको, मार्गो विक्रम, मल्लीका जातीचे कापासाचे बियाणे खरेदी केले. त्यानंतर जिल्हा मंचात तक्रार दाखल करेपर्यत त्या मधल्या कालावधीत कधीही तक्रारदाराने सामनेवाला क्र.5 कडे बियाणे सदोष असल्याबाबत तक्रार केली नाही. सामनेवाला क्र.4 चे दूकानावर तक्रारदार बियाणे खरेदीसाठी आलेला नाही. सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारास बियाण्याची खरेदी पावती दिलेल्या नाही. सामनेवाला क्र.4 व 5 बियाणे विक्रीचा व्यवसाय करीत असून बियाण्यामध्ये दोष असल्यास त्यांस उत्पादक कंपनी जबाबदार असू शकते. त्यामुळे सामनेवाला क्र.4 व 5 यांनी कोणतेही कारण नसताना पार्टी करण्यात आलेल आहे. तक्रारीतील कपाशीचे लागवड क्षेत्र मान्य नाही. कापूस पेरणी दि.8.6.2010 रोजी केल्याचे तक्रारीत नमूद केले असून बियाणे सदोष असल्याबददल तक्रार कृषी विकास अधिकारी यांचेकडे केल्याचे नमूद केले आहे. परंतु सामनेवाला क्र.5 कडून बियाणे दि.17.6.2010 रोजी खरेदी केले ते कोणत्या शेतात पेरले अथवा पेरलेच नाही यांचा खुलासा तक्रारीत नाही. पंचनामा व अहवाल परिपत्रकाप्रमाणे नाही.
सामनेवाला क्र.4 व 5 यांनी जून 2010 मध्ये अनेक शेतक-यांना कपाशीचे बियाणे विक्री केले असून एकही शेतक-याची बियाणे सदोष असल्याबददलची तक्रार नाही.फक्त तक्रारदाराने शेतात एकाच वेळी महिको, विक्रम, मल्लीका बी.टी. या सर्व कंपनीच्या कापसाचे वाण भेसळ असल्याची तक्रार केली. यावर विश्वास ठेवता येत नाही. सामनेवाला क्र.4 व 5 यांचे गांवामध्ये नावाजलेले दूकान असून 20 वर्षापासून ते दूकान चालवतात. तक्रारदाराने सामनेवाला क्र.4 कडून कोणत्याही प्रकारचे कपाशीचे बियाणे खरेदी केलेले नाही. त्यांचेकडे सामनेवाला क्र.4 चे सांगणेवरुन सामनेवाला क्र.5 पावती देऊ शकत नाही. त्यामुळे तक्रारदार सामनेवाला क्र.5 चा ग्राहक नाही. तक्रार चालविण्याचा अधिकार मा. मंचास नाही. सामनेवाला क्र.5 विरुध्द कोणासही तक्रार नाही. तक्रारदाराच्या कपाशीचे बियाण्यामध्ये भेसळ असल्यास त्यांस फक्त उत्पादक कंपनी जबाबदार असते. सामनेवाला क्र.4 व 5 विरुध्द खोटी तक्रार दाखल करुन गांवात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे तक्रारदार आर्थिक नूकसान जबाबदार आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र.4 व 5 यांना प्रत्येकी रु.5,000/- नूकसान भरपाई देण्या बाबतचे आदेश व्हावेत.
विनंती की, तक्रार खर्चासह रदद करण्यात यावी.
तक्रारदाराचे शपथपत्र, दाखल कागदपत्र, सामनेवाला क्र. 1 चा खुलासा, दाखल कागदपत्र, सामनेवाला क्र..2 चा खुलासा, शपथपत्र, सामनेवाला क्र.3 चा खुलासा, शपथपत्र, सामनेवाला क्र.4 व 5 चा खुलासा, सामनेवाला क्र.4 व 5 यांचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 चे साक्षीदार डॉ. आरती जोशी श्री पूरन चंद्रा जोशी, मॅनेजर, क्वॉलिटी अश्युरन्स महाराष्ट्र हायब्रीड सिडस कंपनी लि. औरंगाबाद याचे शपथपत्र, तक्रारदाराचे साक्षीदार रत्नकुमार माधवराव यंबल यांचे शपथपत्र, सामनेवाला क्र.3 चा लेखी यूक्तीवाद, तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.धांडे, सामनेवाला क्र.1 चे विद्वान वकील श्री.कासट, सामनेवाला क्र.2 चे विद्वान वकील श्री.अनिक सूराती व सामनेवाला क्र.4 व 5 चे विद्वान वकील श्री.ए.डी.काळे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्र पाहता तक्रारदारांनी कपाशी लागवडीसाठी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे एमआरसी-7351 बी.-2 कॉटन हायब्रीड लॉट नंबर एक्स.के.बी 10698 दोन बँग, विक्रम 5 बी.टी. कॉटन सिडस ज्याचा लॉट नंबर 0310635 च्या दोन बॅग, मल्लीका बी.टी. एनसीएस 207 बी.टी. कॉटन हायब्रेड सिडस ज्यांचा लॉट नंबर 4888111 च्या दोन बँग बियाणे सामनेवाला क्र.4 कडून विकत घेतल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. परंतु त्यांनी तक्रारदारास पावती दिली नाही. तक्रारदारांना सामनेवाला क्र.5 कडून पावती मिळाली. त्यात उल्लेख केलेल्या बियाण्या व्यतिरिक्त मार्गो आणि सिग्मा कंपनीच्या 1-1 बॅग त्यात नमूद आहेत. सदरचे बिल दि.17.6.2010 रोजीचे आहे. तक्रारदारांनी सुरुवातीला तक्रारीत बियाण्याची लागवड दि.8.6.2010 रोजी केल्याचे म्हटले होते व सामनेवाला यांचा खुलासा आल्यानंतर तक्रारदाराने सदरची दिनांक दूरुस्त करुन ती दि.18.6.2010 रोजी अशी केली आहे. तसेच सदरचे सर्व कपाशीचे बियाणे हे शेतात लागवड केल्यानंतर उगवण चांगली झाली आहे. पिकाची वाढ चांगली झालेली आहे. तथापि फळ धारणेच्या वेळी पाने गळ, व फुलगळ झाल्याने तक्रारदारांना अपेक्षीत उत्पन्न आलेले नाही अशी तक्रारदाराची प्रामुख्याने तक्रार आहे. या संदर्भात तक्रारदारांनी सामनेवाला क्र.4 कडून बियाणे विकत घेतल्याचे म्हटले आहे व सामनेवाला क्र.5 यांनी तक्रारदारांना बियाणे खरेदीची पावती दिलेली आहे. या संदर्भात सामनेवाला क्र.4व 5 यांनी तक्रारदाराची सदरची विधाने नाकारलेली आहेत. त्यामळे बियाणे खरेदीची बाब स्पष्ट होत नाही.
तक्रारदारांनी पाने व फुलगळ बाबतची तक्रार जिल्हा बियाणे समिती कडे केलेली आहे व त्यांनी तक्रारदाराच्या शेतातील पिक क्षेत्राची पाहणी दि.31.12.2010 रोजी केलेली आहे. याठिकाणी सर्वात महत्वाची बाब म्हणजे तक्रारदार प्रथम दि.8.6.2010 रोजी लागवड केल्याचे म्हणतात नंतर दूरुस्त दि.18.6.2010 रोजी लागवड केल्याचे म्हणतात. दि.18.6.2010 रोजी ही जरी लागवडीची दिनांक गृहीत धरली तरी तक्रारदारांनी जिल्हा बिज समितीकडे तक्रार ही डिसेंबर महिन्यात दिलेली आहे एकूण सहा महिन्याचे कालावधीनंतर दिलेली आहे. तसेच कपाशी पिकाचा कालावधी हा 90 ते 120 दिवसांचा असताना एकूण 180 दिवसानंतर म्हणजे विलंबाने तक्रारदाराने तक्रार दिलेली आहे. सदर कालावधीमध्ये समितीने पिकाची पाहणी केलेली आहे.
सदर पिक पाहणी पंचनामा, शेतक-याचा जवाब व निष्कर्ष अहवालात बियाणे दोषयुक्त असल्यामुळे पाने व फुले गळती झाल्याची कोणताही स्पष्ट निष्कर्ष अहवालात नाही. फक्त तक्रारदाराच्या तक्रारीत तथ्य आढळून आले एवढाच शेवटचा निष्कर्ष समितीने दिलेला आहे. या संदर्भात मोहीम अधिकारी यांचे शपथपत्र सदर अहवालाचे पूष्टयर्थ दाखल केलेले आहे. परंतु त्यातही बियाणे सदोश असल्या बाबतचे कूठेही विधान नाही. मूळात वर नमूद केलेल्या कालावधीनंतरचा पिक क्षेत्र पाहणी असल्याने त्यात त्या बाबतची कूठेही स्पष्ट विधाने नाही. त्यामुळे सदरचा अहवाल तक्रारदारांना पोषक ठरु शकत नाही.
तक्रारदारांनी एकूण क्षेत्र 1 हेक्टर 22 आर क्षेत्रात वरील तिन्ही तक्रारीत नमूद केलेल्या बियाण्याची लागवड केल्याची नमूद केले आहे. परंतु लागवडीचे संदर्भात शेतात कोणत्या भागात कोणत्या बियाण्याची लागवड केली. हे नमूद नाही, तसेच प्रत्येक कंपनीच्या बॅगातील बियाण्याचे क्षेत्र, किती क्षेत्रात लागवड केली यांचाही उल्लेख नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार त्या संदर्भात अत्यंत मोघम आहे. तसेच कृषी शास्त्राप्रमाणे अनेक कंपनीची बियाणे एकाच क्षेत्रात लागवड केली त्यांचा परिणाम पाने व फुले गळनेवर होऊन निश्चितच अपेखीत उत्पन्न मिळत नाही.त्यामुळे तक्रारदारांनी एकूण पाच कंपनीचे वाण 1 हेक्टर 22 आर क्षेत्रात लावलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांना अपेखीत उत्पन्न मिळाले नाही. तक्रारदाराची तक्रार पाहता पिकाची चांगली वाढ झालेली होती, परंतु बोंडे लागण्याचे वेळी त्यांस अपेक्षीत बोंडे लागली नाहीत. परंतु तक्रारदारांनी सदर कपाशीचे किती उत्पन्न घेतले व कितीचे नूकसान झाले यांचा मोघम तक्रारीवरुन अंदाज बांधता येत नाही. तक्रारदारांनी तक्रारीत फक्त 10 टक्के बोंडे आले आहे. 90 टक्के नूकसान झाल्याचे म्हटले आहे परंतु त्या बाबत कोणताही सक्षम पुरावा नाही. वर नमूद केल्यानुसार पिक पाहणी देखील कृषी नियमाप्रमाणे पिकाचा कालावधी संपल्यानंतर झालेला असल्याने तो देखील याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
बियाणे विकत घेतल्याची बाब स्पष्ट नाही, प्रत्येक कंपनीच्या बियाणे लागवडीचे क्षेत्र नमूद नाही. तसेच फुलोरा व पानगळ झाल्यानंतर लगेचच तक्रार नाही. त्यामुळे तक्रारदारांना सामनेवाला यांनी निकृष्ट व भेसळयुक्त बियाणे दिल्याची बाब स्पष्ट होत नाही असे न्यायमंचाचे मत आहे. मार्गो व सिग्मा कंपनीला पार्टी केलेले नाही. त्यांचे उत्पना बाबत तक्रारीत उल्लेख नाही. त्यामुळे तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे कोणतीही नूकसान भरपाई तक्रारदारांना देणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड