::: विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला अर्ज / निशाणी-15 Preliminary objection as to Jurisdiction and Tenability of complaint and to dismiss the complaint यावरील आदेश :::
( पारित दिनांक : 26/09/2017 )
मा. सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1. तक्रारकर्त्याने सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, विरुध्द पक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
2. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी प्रकरणात हजर झाल्यावर त्यांचा लेखी जबाब दाखल केला तसेच दिनांक 30/03/2017 रोजी सदर आक्षेप दाखल केला.
विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारकर्ते व त्यांच्यामध्ये कर्ज रक्कमेबद्दल Arbitration करार झालेला आहे. त्यामुळे कलम 8 (1) of Arbitration and Conciliation Act 1996 नुसार करारातील अटी व शर्तीचा वाद मा. ग्राहक मंचासमोर चालू शकणार नाही, तसेच तक्रारकर्त्याने त्याचे वाहन व्यवसायाकरिता म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडून कर्ज रक्कम प्राप्त करुन विकत घेतले आहे, त्यामुळे तक्रारकर्ता ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत ग्राहक या संज्ञेत मोडत नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी कर्ज करार अटीनुसार तक्रारकर्ता कर्ज हप्ते थकितदार असल्यामुळे वसुली करिता तक्रारकर्त्या विरुध्द मा. सोल आरबीट्रेटर यांच्याकडे Arbitration Procedding दाखल केली होती. सदर लवाद प्रकरणाची नोटीस तक्रारकर्त्याला प्राप्त होवूनही तक्रारकर्ते गैरहजर राहिले, त्यामुळे मा. आरबीट्रेटर यांनी दिनांक 22/03/2016 रोजी लवाद निर्णय पारित केला. तक्रारकर्ते यांनी त्यानंतर सदर तक्रार मंचासमोर दाखल केली आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा आक्षेप अर्ज मंजूर करुन तक्रार खारिज करावी.
यावर तक्रारकर्ते यांचे असे म्हणणे आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला कोणतीही पुर्वसुचना न देता त्यांचे कर्जावू वाहन जप्त केले आहे, ही सेवा न्युनता आहे. त्यामुळे प्रकरण लवादासमोर न चालता मा. मंचासमोर चालू शकते, म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा अर्ज फेटाळण्यात यावा.
3. यावर मंचाचे असे मत आहे की, उभय पक्षातील वादातील वाहनाबद्दलचे प्रकरण हे सदर तक्रार दाखल करण्यापूर्वी लवादाकडे सुरु झाले होते. दाखल लवाद निर्णयावरुन असे दिसते की, लवादा समोरील कार्यवाहीची सुचना / नोटीस तक्रारकर्त्याला प्राप्त होवूनही तक्रारकर्ते लवादासमोर हजर झाले नाही. लवाद निर्णय हा दिनांक 22/03/2016 रोजीचा आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेल्या दस्तावरुन असा बोध होतो की, सदर लवाद निर्णय तक्रारकर्त्यास माहिती होता परंतु तरीही त्यानंतर दिनांक 30/05/2016 रोजी तक्रारकर्त्याने त्याच वादासाठी मंचासमोर ही ग्राहक तक्रार दाखल केली. त्यामुळे निर्णयात भिन्नता टाळण्यासाठी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला आक्षेप अर्ज मंजूर करणे न्यायोचित ठरेल असे मंचाचे मत आहे. म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचा आक्षेप अर्ज मंजूर करण्यात येवून, सदर तक्रार खारिज करण्यात येते.
सबब अंतिम आदेश पुढीलप्रमाणे पारित केला.
1. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेला आक्षेप अर्ज मंजूर केल्यामुळे सदर तक्रार खारिज करण्यात येते.
2. न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही.
3. उभय पक्षकारांना या आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri