जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 325/2008 प्रकरण दाखल तारीख - 30/09/2008 प्रकरण निकाल तारीख – 20/07/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य 1. सुनिता उर्फ प्रणिता भ्र.प्रमोद बडेराव, वय वर्षे 26, व्यवसाय घरकाम, अर्जदार. रा.पालीनगर,तरोडा (बु) नांदेड. 2. कु.श्रध्दा पि.प्रमोद बडेराव, वय वर्षे 04, व्यवसाय काही नाही, अ.पा.क. आई अर्जदार नं.1 3. कु.दिलीका उर्फ स्वीटी पि.प्रमोद बडेराव, वय वर्षे 06, व्यवसाय शिक्षण, अ.पा.क.आई अर्जदार नं.1 विरुध्द. 1. शाखाधिकारी, गैरअर्जदार. भारतीय जिवन बिमा निगम, विभागीय कार्यालय, जिवन प्रकाश, गांधीनगर, हिंगोली रोड,नांदेड. 2. विभागीय शाखाधिकारी, युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि, गुरु कॉम्प्लेक्स, जी.जी.मार्ग,नांदेड. 3. क्षेत्रीय शाखाधिकारी, भारतीय जिवन विमा निगम, योगक्षमा, पुर्व शाखा- जिवन विमा मार्ग, मुंबई -400021. 4. भिमराव पि.गुणाजी बडेराव, वय वर्षे 68, व्यवसाय सेवानिवृत्त, रा.पालीनगर, तरोडा (बु) ता.जि.नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.जे.एस.गुहीलोत. गैरअर्जदार क्र. 1 व 3 तर्फे - अड.शेख इकबाल अहमद. गैरअर्जदार क्र 2 तर्फे - अड. जी.एस.औंढेकर. गैरअर्जदार क्र. 4 तर्फे - अड. आर.एन.औठे. निकालपञ (द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार यांची थोडक्यात तक्रार अशी की, मयत प्रमोद पि.भिमराव बडेराव हे गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांच्या कार्यालयात लघुलेखक म्हणुन मागील वर्षी 1999 पासुन कार्यरत होते आणि गैरअर्जदार क्र. 4 हे त्यांचे वडील आहेत. नौकरीवरच असतांना मयत प्रमोद बडेराव यांचे निधन दि.27/10/2007 रोजी रहात्या घरी रात्री लघविला जात असतांना फरशीवरुन पाय घसरुन पडुन डोक्यास मार लागुन मृत्यु झाला. अर्जदार क्र. मयताची पत्नी असुन, अर्जदार क्र. 2 व 3 या मुली आहेत. मयत प्रमोद यांची आई त्यांच्या मरणाच्या अगोदरच वारली आहे. म्हणुन अर्जदार क्र. 1 ते 3 मयत प्रमोद बडेराव यांचे वारसदार आहेत. मयत प्रमोद यांनी त्यांच्या हयातीमध्ये भारतीय जिवन विमा निगम कार्यालय,नांदेड मार्फत पॉलिसी क्र.983602535 रक्कम रु.1,00,000/- ची काढली होती. सदर विम्याचा हप्ता प्रतिवादी नं. 1 यांनी त्यांच्या पगारातुन कपात करुन प्रतिवादी नं. 2 कडे वर्ग करत होते म्हणुन सदरचे संबंध कलम 12 ग्राहक संरक्षण कायदयानुसार मयत हा ग्राहक होतो. मयत प्रमोद यांनी त्यांच्या हयातीमध्ये गैरअर्जदार क्र. 1 यांचेकड खालील पॉलिसी काढल्या होत्या, 1) पॉलिसी क्र.983598107, रु.1,00,000/-, 2) पॉलिसी क्र.983053646 रु.1,00,000/-, 3) पॉलिसी क्र.980391692, रु.50,000/-, 4) पॉलिसी क्र.983592767, रु.50,000/-, 5) पॉलिसी क्र.983602535, रु.1,00,000/- वरील नमुद पॉलिसी पैकी अनु.1 ते 4 या पॉलिसीची अनामत रक्कम कार्यालयाने मंजुर केली असुन, त्या रक्कमेचे धनादेश परस्पर गृहकर्ज खातेमध्ये जमा करण्यात आले. परंतु शेवटचे म्हणजे अनु.क्र.5 मधील पॉलिसी रु.1,00,000/- ही नामंजुर करण्यात आली आहे. वास्तविक पहाता वरील सर्व पॉलिसी मंजुर करण्या योग्य आहेत. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 1 यांनी सुचविल्या प्रमाणे क्लेम फॉर्म पॉलिसी क्र.983602535 साठी सादर केले असता, गैरअर्जदार क्र. 1 च्या कार्यालयाने सदरचा क्लेम फॉर्म ज्याचा नं.902/क्लेम हा रद्य केल्याबद्यल दि.31/03/2008 रोजीच्या पत्रान्वये सुचविले होते. त्यांनी परत झोनल मॅनेजर एल.आय.सी. ऑफ इंडिया, मुंबई यांचेकडे अपील करण्यासाठी निर्देश दिले होते. त्याप्रमाणे मुदतीत अपील केले असत, सदर कार्यालयाने सुध्दा सदरचा दावा मंजुर केला नाही. वास्तविक पहाता मयत प्रमोदकुमारला गैरअर्जदार क्र. 2 चा कार्यालयामध्ये कार्यरत असतांनाच वरील नमुद पॉलिसीची रक्कम नियमा प्रमाणे कपात करुन पगार देण्यात येत होता. म्हणुन मयताने कोणतीही माहीती लपविलेली नव्हती, ही बाब ईतर पॉलिसी मंजुर केल्यावरुन स्पष्ट होते. मयत प्रमोद यांच्या मृत्यु बाबत त्यांच्या वडीलांनी पोलिस स्टेशन भाग्यनगर येथे बयान दिले, त्या अर्जावरुन संबंधीत पोलिसांनी साक्षीदाराच्या जबाणी घेतल्या, घटना स्थळाचा पंचनामा, प्रेताचा पंचनामा करण्यात आला, डॉक्टरांनी शव विच्छेदन केल्यानंतर त्यांच्यामध्ये प्रमोदकुमार हा डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे मृत्यु झाल्याबद्यलचे मत व्यक्त करुन तसे प्रमाणपत्र दि.28/10/2007 रोजी संबंधीतांस दिले, शिवाय शव विच्छेदन फॉर्मच्या परिच्छेद क्र. 19 मध्ये ऑक्सेपिटल बीन ही उजव्या बाजुकडुन मोडल्याचे व तसेच हेमाटोमाऑक्सीपिटल मीनची जखम 2 x 2 से.मी. ची जखम होवुन त्या ठिकाणी रक्तस्त्राव झाल्याचे नमुद केले व शेवटी डोक्यास गंभीर मार लागल्यामुळे प्रमोदकुमारचा मृत्यु झाला हे मत व्यक्त केले. त्या अहवालामध्ये डॉक्टरांनी सदरची जखम दि.2710/2007 ला झाल्याबद्यलचे मत व्यक्त केले आहे. हया वरुन असे स्पष्ट होते की, मयतास कोणताही आजार नव्हता. मयताने कोणताही आजार लपविला नाही व त्याचा मृत्यु डोक्याच्या दुखापतीमुळे झाला हे स्पष्ट कागदोपत्री पुराव्यावरुन दिसुन येते. म्हणुन अर्जदाराचा अर्ज मान्य करुन पॉलिसीचे रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.27/10/2007 पासुन 12 टक्के व्याज देण्यात यावे तसचे मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दाव्याचा खर्च रु.2,000/- देण्यात यावे अशी मागणी केली आहे. सदर प्रकरणांत गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांना नोटीस तामील झाली ते हजर होऊन आपले म्हणणे एकत्रित सादर केले. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार यांनी दाखल केलेली तक्रार असल्यामुळे ती फेटाळण्यात यावी. सदर प्रकरण हाताळण्याचे या मंचास कार्यक्षेत्र नाही. मयत विमा धारकाने संबंधीत विमा प्रस्तावात महत्वाचे प्रश्नांची खोटी उत्तरे दिली. अर्जदारास सदर प्रकरण दाखल करण्यास लोकस स्टँडी नाही. क्लेम फॉर्म गैरअर्जदार क्र. 2 ने दाखल केला होता व रिपोडीएशन पत्र गैरअर्जदार क्र. 2 लाच पाठविण्यात आले होते. अर्जदाराने कधीही सदरील गैरअर्जदाराकडे विमा दाखल केला नसल्यामुळे व सदरील पॉलिसीचे लाभ गैरअर्जदार क्र. 2 च्या हक्कात मयत विमाधारकाने असाईन केल्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 मयताचे कायदेशिर वारस असुन, अर्जदार सदरील तक्रारअर्ज दाखल करु शकत नाही. मयत प्रमोद हा गैरअर्जदार क्र. 2 चा कर्मचारी होता, तसेच अर्जदाराचे म्हणणे की, मयत प्रमोद हा लघवीला जात असतांना फरशीवरुन पाय घसरुन पडुन डोक्यास मार लागुन त्यांचा मृत्यु झाला हे निव्वळ खोटे आहे. अर्जदार मयत प्रमोदची मुलगी, विधवा व आईबद्यल माहीती दिली आहे. परंतु त्यांचे वडिलाबद्यल माहिती लपविण्यात आली आहे. म्हणुन अर्जदाराचा तक्रारअर्ज फेटाळण्यात यावा. मयत प्रमोदने आपल्या हयातीत पाच पॉलिस्या घेतल्या होत्या हे सत्य आहे. सुरुवातीचे चार पॉलिसीचे लाभ गैरअर्जदार क्र. 2 असाईनी असल्यामुळे त्यास देण्यात आले होते. उर्वरित पाचवी पॉलिसी फेटाळण्यात आली असुन, क्लेम दाखल करणारे गैरअर्जदार क्र. 2 यांना असाईनी या नात्याने रिपुडीएशन लेटर पाठविण्यात आले आहे, ही बाब अर्जदाराने अस्पष्टपणे परस्पर ग्रहकर्ज खाते मध्ये जमा करण्यात आले आले, असे मंचाचे दिशाभुल करणारे विधाने केले आहे. अ.क्र.5 वरील पॉलिसीचे लाभ नामंजुर करण्यात आले हे बरोबर असुन, मयत प्रमोदने 5 क्रमांक वरची पॉलीसी घेतेवेळेस दिलेल्या प्रस्तावात प्रकृतीबद्यल प्रश्नांची जाणीवपुर्वक व हेतुपुरस्सर खोटे उत्तर दिले आहे. विमा पॉलिसीचा करार उबेरिम्माफाईडस म्हणजेच गुडफेथ वर अधारीत आहे. परंतु मयताने आपल्यास असलेले जीव घेणारे विकार अक्युट ब्रॉंचिटीस लपविले असल्याचे कारणांने योग्यरित्या बुध्दीचा वापर करुनच विमा दावा फेटाळण्यात आला आहे. मयतास आणखी दुसरे जीव घेणारे विकार हदयाबद्यलचे होते व गैरअर्जदार क्र. 2 ने कळविल्याप्रमाणे त्याचे डेनिन टयुमर ऑफ इंटर व्हेंट्रीक्युलर सेप्टल मायोकार्डीयम हे विकार होते व सदरील बाब मयताने प्रस्ताव फॉर्म मध्ये जाणीवपुर्वक लपविलेली आहे. गैरअर्जदार क्र. 2 ने असाईनी नात्याने क्लेम दाखल केला होता व त्यास दि.31/03/2008 रोजीच्या पत्रान्वये योग्यरित्या क्लेम नाकारल्याचे कळविण्यात आले आहे. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, मयतास कोणताही आजार नव्हता व त्यांनी कोणताही आजार लपविलेला नाही. गैरअर्जदार क्र. 2 सर्व पाच पॉलिसी मध्ये असाईनी असल्याची मान्य स्थिती स्पष्ट करणार आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराने केलेली इतर सर्व विपरीत विधाने केली आणि असा उजर घेतला की, गैरअर्जदाराच्या हक्कात कंपेनसेटरी कास्ट म्हणुन रु.5,000 व खर्च रु.2,000/- सहीत तक्रार खारीज करण्यात यावी. गैरअर्जदार क्र. 2 हे वकील मार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी निवेदन दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदार यांनी केलेली तक्रार त्यांना मान्य नाही. त्यांना या तक्रारीमध्ये शेरीक केलेले आहे. पण त्यांचा या प्रकरणांशी काहीही संबंध नाही व त्यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. गैरअर्जदार हे मान्य करतात की, अर्जदार हे त्यांचे कार्यालयाचे कर्मचारी आहेत. त्यांनी सांगितलेला अपघात त्यांना मान्य नाही. हा व्यवहार हा गैरअर्जदार क्र.1 व अर्जदार यांचे मध्ये झालेला आहे त्यांना या बाबत काहीही माहीती नाही. त्यामूळे त्यांना पॉलिसी बददल काहीही माहीती नाही.हे त्यांना मान्य नाही की, अर्जदाराचा मृत्यू हा ब्रेन हॅम्ब्रीजने झाला होता. हे त्यांना मान्य नाही की, अर्जदारयांना दूखापत झाली व त्यांत त्यांचा मृत्यू झाला. त्यामूळे गैरअर्जदारांचे सेवेत कोणतीही ञूटी नाही म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 4 हे वकीला मार्फत हजर झाल्या व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणणे असे की, तक्रार अर्जातील परिच्छेद क्र. 1 ते 10 चा मजकुर सत्य व बरोबर आहे व गैरअर्जदारास मान्य आहे. गैरअर्जदाराचा मयत मुलगा प्रमोद भिमराव बडेराव यांच्या अकाली मृत्युमुळे तसेच गैरअर्जदाराच्या पत्नीच्या मृत्युमुळे गैरअर्जदारास सेवा श्रुषशा करण्यास कुणीही नाही. गैरअर्जदार सध्या हालाकीचे जीवन जगत आहे. गैरअर्जदारास कुणाचाही आधार नाही. गैरअर्जदार हा मयताचे वडील व कायदेशिर वारस असल्यामुळे कायद्याप्रमाणे व नियमाप्रमाणे गैरअर्जदारास विमा पॉलिसीद्वारे मिळणारी रक्कम रु.1,00,000/- मध्ये जो काही हिस्सा असेल तो द्यावा. तसेच वरील रक्कमे पैकी अर्जदाराची रक्कम अर्जदार क्र. 1 हीला न देता सदर रक्कम अर्जदार क्र.2 व 3 यांचे नांवे राष्ट्रीय बँकेत त्या सुज्ञ होईपर्यंत ठेवावी म्हणजे सदर रक्कमेचा मुलींना त्यांच्या भविष्य काळ योग्य तो उपयोग करता येईल. गैरअर्जदाराची अशी विनंती आहे की, अर्ज मंजुर करावा व त्याचा हिस्सा त्यांना देण्यात यावा. अर्जदार यांचा अर्जदार, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र व अर्जदार व गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांच्या वकीलांचा युक्तीवाद याचा विचार होता, खालील प्रमाणे मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय? होय. अर्जदारहे गैरअर्जदार क्र.1 व 3 चे ग्राहक आहेत. 2. अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 2 व 4 चे ग्राहक आहेत काय? नाही. 3. गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? होय. 4. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 व 3 यांचेकड विमा पॉलिसी घेतलेली होती, ही बाब गैरअर्जदा क्र. 1 व 3 यांनी त्यांच्या लेखी म्हणणे व शपथपत्रामध्ये नाकारलेले नाही. अर्जदाराचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 अर्जदार हीचे पती श्री.प्रमोद पि. भिमराव बडेराव हे गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे नौकरीस म्हणजेच अर्जदार हीचे पती गैरअर्जदार क्र. 2 यांचे कर्मचारी होते, त्यामुळे अर्जदार हीचे पती यांना गैरअर्जदार क्र. 2 चे ग्राहक म्हणता येणार नाही. प्रस्तुत प्रकरणांत गैरअर्जदार क्र. 4 यांनी तिराईत इसम म्हणुन अर्ज दिलेला आहे. सदर अर्ज मंजुर झाल्यानंतर सदर अर्जाचे कामी आवश्यक पक्षकार म्हणुन गैरअर्जदार क्र. 4 यांना या अर्जाचे कामी आवश्यक पक्षकार म्हणुन सामील केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 4 हे अर्जदार यांचे मयत पती श्री.प्रमादे भिमराव बडेराव यांचे वडील श्री.भिमराव गुणाजी बडेराव आहेत. त्यामुळे अर्जदार यांना गैरअर्जदार क्र.2 व 4 चे ग्राहक म्हणता येणार नाही, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र.3 अर्जदार यांच्या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे एकुण पाच विमा पॉलिसी घेतल्या होत्या, त्यापैकी चार पॉलिसीचे पैसे अर्जदार यांना देण्यात आलेले आहेत, पाचव्या पॉलिसीचे पैसे अर्जदार यांना देण्यात आलेले नाही. अर्जदार यांच्या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांचे पती श्री.प्रमोद भिमराव बडेराव यांचा मृत्यु दि.27/10/2007 रोजी घरातच पाय घसरुन पडल्याने डोक्याला झालेल्या दुखःपतीमुळे त्यांचा मृत्यु झालेले आहे. अर्जदार यांनी मयत श्री.प्रमादे भिमराव बडेराव यांचे वडीलचा पोलिसांना दिलेला जबाब, घटनास्थळ पंचनामा,मरणोत्तर पंचनामा इ. कागदपत्र दाखल केलेले आहेत. अर्जदार यांनी दाखल केलेल्या पोस्ट मॉर्टेम रिपोर्टचे अवलोकन केले असता, Cause of death] death due to head injury असे नोंद केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांना अर्जदार यांनी विमा पॉलिसी उतरविताना त्यांना असणा-या आजारा बाबतची माहीती लपवुन ठेवली आहे, असे म्हणण्यास कोणताही अर्थ उरत नाही. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र यांचा विचार होता, कोणतेही योग्य व संयुक्तीक कारण नसतांना गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्या विमा पॉलिसीची रक्कम देण्याचे नाकारुन सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे, असे या मंचाचे मत आहे. कोणते योग्य व संयुक्तीक कारण नसतांना गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा विमा क्लेम नाकारलेला आहे, त्यामुळे अर्जदार यांना या मंचामध्ये सदरची क्लेमची रक्कम मिळण्यासाठी अर्ज करावा लागला आहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागाला आहे, याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडुन मानसिक त्रासापोटी व अर्जाच्या खर्चा पोटी रक्कम मिळण्यास पात्र आहे, असे या मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्र. 1 व यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांना अर्जदार यांचा क्लेम योग्य व संयुक्तीक कारण नसतांना क्लेम नाकारल्या बाबत दि.31/03/22008 रोजी कळविलेले आहे. त्यामुळे अर्जदार हे विमा क्लेमच्या रक्कमेवर दि.31/03/2008 पासुन 9 टक्के व्याजासह गैरअर्जदाराकडुन रक्कम वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत. गैरअर्जदार क्र. 4 हे सदर अर्जदाराचे कामी तिराईत इसम म्हणुन हजर राहीलेले आहेत. गैरअर्जदार क्र. 4 हे अर्जदार यांचे मयत पती श्री.प्रमोद भिमराव बडेराव यांचे वडील आहेत तसेच ते सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहेत, त्यांना दरमहा सेवानिवृतीची रक्कमही मिळते. त्यामुळे सदर विमा पॉलिसीची रक्कम गैरअर्जदार क्र.4 यांना देण्या ऐवजी अर्जदार क्र. 2 व 3 यांचे नांवे फिक्स डिपॉझिट करणे योग्य व न्याय असे ठरणार आहे, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज,शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, त्यांचा वकीलांनी केलेला युक्तीवाद तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र त्यांच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद याचा विचार होता, खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदाराचा अर्ज अंशतः मंजुर करण्यात येते. गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांनी अर्जदार यांना खालील प्रमाणे रक्कमा द्यावेत. 1. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/ सदर रक्कमेवर दि.31/03/2008 पासुन प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत रक्कम रु.1,00,000/- वर व्याजासह होणारी एकुण रक्कम द्यावी. 2. गैरअर्जदार यांचेकडुन सदरची रक्कम मिळालेनंतर अर्जदार यांनी रक्कम रु.25,000/- प्रत्येकी अर्जदार क्र. 2 व 3 यांचे नांवे राष्ट्रीयकृत बँके फिक्स डिपॉझिट ठेवावे. उर्वरीत रक्कम व सदर रक्कमेवर मिळणा-या व्याजाचा उपयोग अर्जदार यांनी अर्जदार क्र. 2 व 3 यांच्या पालनपोषन व शिक्षणासाठी करावा. 3. मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/- द्यावे. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |