जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/207. प्रकरण दाखल तारीख - 23/09/2009 प्रकरण निकाल तारीख – 28/12/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य विठठल पि. शंकरराव खाडे वय, 53 वर्षे, धंदा शेती, रा. भवानी नगर, कंधार ता.कंधार जि. नांदेड अर्जदार विरुध्द. 1. एल.आय.सी. ऑफ इंडिया आदिलाबाद जीवन ज्योती, कलेक्टर रोड, आदिलाबाद (आंध्रप्रदेश) 2. आंध्रा बँक, आदिलाबाद नेताजी चौक, आदिलाबाद (आंध्रप्रदेश) गैरअर्जदार 3. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, शाखा कंधार ता. कंधार जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - अड.आर.एच. कूलकर्णी. गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील - एकतर्फा. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) मूख्यतः गैरअर्जदार क्र.1 यांचे स्वतःच्या ञूटी बददल अर्जदार यांनी तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणाची हकीकत खालील प्रमाणे, अर्जदार हे एल.आय.सी. चे 1993 पासून पॉलिसीधारक आहेत. या पॉलिसीचा नंबर 680987481 असा असून वार्षिक हप्ता रु.3335/- आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 एल.आय. सी. च्या नांवे रु.3335/- चा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा कंधार चा चेक नंबर 769771 दि.14.3.2007 रोजी प्रीमियमपोटी गैरअर्जदार क्र.1 यांना दिला होता. गैरअर्जदार क्र.1 ने हा चेक त्यांचे खाते असलेली आंध्रा बँक शाखा आदिलाबाद येथे क्लीअरिंगसाठी दिला. हा चेक आंध्रा बँकेने एस.बी.एच. शाखा कंधार यांचेकडे क्लिरन्स साठी पाठविला. तो चेक एस.बी.एच. शाखा कंधार शाखेने दि.10.04.2007 रोजी क्लिंरन्स करुन डि.डि. नंबर 619121 द्वारे गैरअर्जदार यांचे बँकेत आदिलाबाद येथे पाठविला आहे. असे असताना एल.आय. सी.चे म्हणणे त्यांना डि.डि. मिळाला नाही असे आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदारास दि.24.5.2008 रोजी, दि.31.5.2008, 19.7.2008, व 22.01.2009 रोजी चेक जमा झाला नाही म्हणून कळविलेले आहे. अर्जदाराच्या खात्यातून रक्कम गेली असताना गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराची काही चूक नसताना रक्कम मिळाली नाही असे म्हणून दि.10.09.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पॉलिसीचा हप्ता भरण्यास गेला असता त्यांनी रु.7573/- बाकी काढले. म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, त्यांचे चेकची रक्कम जमा करुन देण्याचे आदेश करण्यात यावेत तसेच झालेल्या मानसिक ञासाबददल नूकसान भरपाई म्हणून रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- दयावेत. गैरअर्जदार क्र. 1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांनी कायदेशीर आधार न घेता तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी वादातीत चेक नंबर 769771 दि.14.3.2007 रोजी मिळाला होता व तो वटविण्यासाठी गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 आंध्रा बँक शाखा आदिलाबाद यांचेकडे दिला लगेच गैरअर्जदार क्र.3 यांनी दि.10.04.2007 रोजी डि.डि. नंबर619121 द्वारे क्लिंअरन्स करुन आंध्रा बॅंक शाखा आदिलाबाद कडे पाठविला होता ही बाब त्यांना मान्य नाही, हे अर्जदाराने सिध्द करावे. गैरअर्जदार क्र.1 यांनी यासाठीची सूचना गैरअर्जदार क्र.1 यांना दि.24.5.2008, 31.05.2008, 19.07.2008, 22.01.2009 रोजीच्या पञाद्वारे वेळोवेळी कळवलेली होती. गैरअर्जदार यांना अर्जदाराबददल सहानूभूती आहे. गैरअर्जदारांना हा चेक मिळाला परंतु तो क्लीअर होऊन आला नाही असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी चांगल्या भावनेने अर्जदार यांची पॉलिसी नंबर 680987481 चा 2007 चा वार्षीक हप्ता प्राप्त न झालेला असताना सूध्दा सर्व्हायव्हल बेनिफीटचे रु.10,000/- दि.28.3.2009 रोजी दिलेले आहेत. यावरुन त्यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही. गैरअर्जदार यांनी दि.10.09.2009 रोजी रु.7573/- भरण्यास सांगितले. कारण अर्जदाराने पॉलिसीचे हप्ते भरले नाहीत. म्हणून गैरअर्जदार यांची मागणी आहे की, अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावी. अर्जदार यांना दिलेले सर्व्हायव्हल बेनिफीटचे रु.10,000/- व्याजासह त्यांना वापस मिळावेत तसेच नूकसान भरपाई बददल रु.10,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना नोटीस तामील होऊन ते हजर झाले नाहीत व आपले म्हणणे देण्यांची संधी असताना आपले म्हणणे दिले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी पॉलिसी नबर 680987481 साठीचा हप्ता म्हणून रु.3335/- चा स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा कंधार यांचा चेक नंबर 769771 दि.14.03.2007 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांना दिला ही बाब गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले लेखी म्हणण्यामध्ये मान्य केलेली आहे. सोबत हे ही म्हटले आहे की, त्यांनी त्यांचे खाते असलेले आंध्रा बँक शाखा आदिलाबाद यांचेकडे क्लिंअरन्ससाठी पाठविले. प्रकरणाकडे पाहिले असता ही बाब अतीशय स्पष्ट आहे की, अर्जदाराने विम्याच्या हप्त्याची रक्क्म चेकद्वारे गैरअर्जदार क्र.1 यांना दिली असताना व अर्जदाराने त्यांचे खाते असलेले एस.बी.एच. शाखा कंधार यांचे अकाऊंटस स्टेटमेंट प्रकरणात दाखल केलेले आहे. याप्रमाणे तो चेक दि.10.04.2007 रोजी त्यांचे नांवे पडला आहे म्हणजे ही रक्कम अर्जदार म्हणतात त्याप्रमाणे डि.डि. नंबर 619121 द्वारे आंध्रा बँक शाखा आदिलाबाद कडे पाठविला. एवढी बाब गैरअर्जदार क्र.1 यांना मान्य नाही. खरे तर हा वाद गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द आहे. गैरअर्जदार क्र.1 हे गैरअर्जदार क्र.2 यांचेवर कोणतीही कारवाई न करता त्यांनी सरळसरळ अर्जदार यांना वेठीस धरलेले आहे ही बाब अतिशय चूक आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या नांवाने जो पञव्यवहार केलेला आहे तो पञव्यवहार पाहीला असता दि.24.05.2008च्या त्यांचे पञात त्यांनी अतिशय स्पष्टपणे अर्जदाराकडून मिळालेला चेक आंध्रा बँकेकडून गहाळ झालेला आहे. म्हणून त्यासाठी त्यांनी दूसरा चेक किंवा डि.डि. दयावा असे म्हटले आहे. दि.31.5.2008 रोजीच्या पञात देखील त्यांनी अर्जदार यांना व्याजासहीत रु.3945/- देण्यात यावेत व वादग्रस्त चेक ची रक्कम मिळाली नाही असे म्हटले आहे. तसेच दि.31.5.2008 रोजीच्या पञात देखील गैरअर्जदार हे असा उल्लेख करतात की, अर्जदाराचा चेक क्लिंअरिगही झाला नाही व मिसप्लेस ही झाला अशा दोन्ही बाबी एकदाच सांगतात. दि.20.06.2008 रोजीच्या पञात देखील अर्जदाराचा चेक क्लिंअरिग झाला नाही. ही रक्कम गैरअर्जदार क्र.1 यांचे खात्यात जमा झाली नाही व हा चेक अर्जदाराच्या नांवे न पडता चेक डिसऑनर झाला अशी अक्शन आम्ही घेत आहोत, त्यामूळे झालेले ट्रॅजेक्शन हे रदद करण्यात येते असे म्हटले आहे. ही गैरअर्जदाराची कृती अतीशय बेकायदेशीर आहे. शेवटचे एक पञ जे दि.19.07.2008 रोजी दिलेले आहे. त्यात तर त्यांनी अर्जदाराचा चेक डिसऑनर झालेला आहे असा उल्लेख केलेला आहे व त्या सोबत गैरअर्जदार क्र.1 यांयच्या सेल्स डिपार्टमेंटचा मेमो जोडून चेक नंबर 769771 डिसऑर्नर झाल्या बददल म्हटले आहे. ही कृती बेकायदेशीर असून गैरअर्जदार क्र.1 यांनी चेक डिसऑर्नर झाला असे म्हणावयाचे असेल तर आंध्रा बँकेचा मेमो त्यात चेक डिसऑर्नर होण्याची कारणे व सोबत अर्जदाराचा चेक हा अर्जदारांना वापस दिला पाहिजे. गैरअर्जदार क्र.1 यांचे मेमो हा बँकेचा मेमो होऊ शकत नाही. त्यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांनी केलेली कारवाई ही बेकायदेशीर ठरते. गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे चेक क्लिंअरीग दिला असताना रक्कम प्राप्त झाली नसेल तर त्यांनी आंध्रा बँकेशी त्या बाबत विचारणा करणारे पञ त्यांना दयावयास हवे होते तसा पञव्यवहार त्यांनी समोर आणलेला नाही किंवा गैरअर्जदार क्र.2 यांना त्यांनी जर डि.डि. ची रक्कम मिळाली नसेल तर गैरअर्जदार क्र.3 शी पञव्यवहार करणे उचित होते. त्या बददल गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी असे न करता विनाकारण अर्जदारावर कारवाई करुन व त्यांची पॉलिसी रदद करुन अर्जदाराचा मानसिक छळ केलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी आताही गैरअर्जदार क्र.2 यांचेवर कायदेशीर कारवाई करुन वादग्रस्त चेकची रक्कम ही कायदेशीरपणे त्यांचेकडून वसूल करावी. कारण गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून अर्जदार यांचे नांवावर ती रक्कम पाठविली आहे. गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून जर डि. डि. मिळाला नसेल तर गैरअर्जदार क्र.2 यांना गैरअर्जदार क्र.3 यांचेवर कायदेशीर कारवाई करता येईल. परंतु प्रकरणातील सर्व कागदपञावर नजर टाकली असता हे अतीशय स्पष्ट होते की, 2007 चा वार्षिक हप्ता अर्जदाराकडून गैरअर्जदार क्र.1 यांना मिळाला आहे. आता त्यांना तो हप्ता परत मागता येणार नाही. चालू वर्ष,2008 त्यानंतरचे थकीत हप्ते गैरअर्जदार क्र.1 यांना अर्जदारास मागता येतील व ते अर्जदार यांना भरावे लागतील. गैरअर्जदार क्र.1 यांनी कारवाई करुन ज्या अनुषंगाने अर्जदाराची पॉलिसी नंबर 680987481 बंद करुन दिलेली रक्कम वापस मागितली आहे ती त्यांची कृती बेकायदेशीर ठरवून त्यांचे मागणी अमान्य करण्यात येते. वर्ष 2007 पासून अर्जदार यांना या पॉलिसी बाबत त्यांचे हक्कात जे काही लाभ असतील ते देणे गैरअर्जदार क्र.1 यांचेवर बंधनकारक राहतील. वरील सर्व बाबीवरुन गैरअर्जदार क्र.1 यांनी सेवेत ञूटी केलेली आहे परंतु अनूचित प्रथेचा अवलंब केलेला आहे या बददल अर्जदार यांना मानसिक ञास झालेला आहे त्याबददल रक्कम देणे योग्य राहील. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 यांनी पॉलिसी नंबर 680987481 या बाबतचा 2007 चा वार्षिक हप्ता रु.3335/- अर्जदारास न मागता त्यांना त्या पॉलिसीचे सर्व लाभ देण्यात यावेत. 3. या पॉलिसी बददल पूढील थकीत हप्ते वर्ष 2008,2009 अर्जदाराकडून स्विकारावेत व त्यासाठी त्यांना 30 दिवसांचा वेळ देण्यात यावा. 4. अर्जदारास मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 5. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर, लघूलेखक |