जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/107 प्रकरण दाखल तारीख - 05/05/2009 प्रकरण निकाल तारीख – 04/07/2009 समक्ष – मा.श्री.सतीश सामते - अध्यक्ष प्र. मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या 1. वसंतराव पि.राजेश्वरराव कुलकर्णी, वय वर्षे 66, व्यवसाय पेन्शनर, अर्जदार. 2. गिरीष पि.वसंतराव कुलकर्णी, वय वर्षे 32, व्यवसाय वकीली, दोघे रा.नांदेड हाऊसिंग सोसायटी, विजयनगर,नांदेड. विरुध्द. शाखाधिकारी, गैरअर्जदार. जय शिवराय नागरी सहकारी बँक लि, (मुख्य कार्यालय) विद्युतनगर,(आनंदनगर), नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.राहुल डावरे. गैरअर्जदार तर्फे - एकतर्फा निकालपञ (द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार क्र. 1 हे जेष्ठ नागरीक असुन ते सेवानिवृत्त असुन त्यांना औषधोपचारासाठी दर महा रु.8 ते 10 हजार एवढा खर्च येतो. अर्जदार क्र.2 हे अर्जदार क्र. 1 चा मुलगा आहे. अर्जदार क्र. 1 यांनी स्वतःच्या व अर्जदार क्र. 2 यांच्या नांवे गैरअर्जदार बँकेत एकत्रित मुद्यतठेव म्हणुन रु.1,00,000/- दि.21/02/2004 रोजी मुदतठेव पावती क्र.0006284 नुसार रक्कम ठेवली. गैरअर्जदार यांनी दरमहा रु.990/- व्याज देण्याचे मान्य केले व मुद्यत ठेवीची मुदत दि.21/03/2009 रोजी संपुष्टात आली. गैरअर्जदाराने अर्जदारास नियमितपणे प्रतिमहा रु.990/- व्याज दिले. सदरील व्याजाची रक्कम गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे खाते क्र.7627 मध्ये गैरअर्जदार जमा करीत होते आणि ती रक्कम अर्जदार उचलुन घेत होते. मुदत ठेवीची मुदत दि.21/03/2009 रोजी संपल्यामुळे गैरअर्जदार यांनी मुदतठेवीची रक्कम रु.1,00,000/- अर्जदार यांच्या सेव्हींग खात्यामध्ये वर्ग केली. अर्जदार क्र. 1 हे अर्धांगवायुच्या विकाराने तसेच उच्च रक्तदाबाच्या व्याधीने त्रस्त असल्यामुळे नियमित उपचारासाठी पैशाची गरज असल्यामुळे अर्जदार क्र. 1 व 2 यांनी रक्कम रु.1,00,133/- गैरअर्जदाराकडे मागली केली असता, त्यांनी विवीध कारणे दाखवून रक्कम देण्यास टाळाटाळ केली. गैरअर्जदार यांनी अर्जदार क्र. 1 व 2 यांना रक्कम न देवुन त्यांनी सेवेत त्रुटी केली म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, रु.1,00,133/- व त्यावर 18 टक्के व्याजासह आणि नुकसान भरपाई म्हणुन रु.25,000/- व दावा खर्चा पोटी रु.5,000/- मिळावेत. गैरअर्जदार यांना या मंचा तर्फे नोटीस पाठविण्यात आली, त्यांना नोटीस मिळुनही ते म्हणणे सादर न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरणांत एकतर्फा आदेश पारीत करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, अर्जदार यांनी केलेला युक्तीवाद याचा विचार होता, खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार क्र.1 व 2 हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार क्र. 1 व 2 यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली काय? होय. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 - अर्जदार क्र. 1 व 2 यांनी एकत्रितपणे गैरअर्जदार या बँकेमध्ये मुदतठेव रक्कम रु.1,00,000/- दि.21/02/2008 रोजी ठेवलेले आहे, त्याची मुदत दि.21/03/2009 रोजी संपलेली आहे. सदरची मुदतठेवीचीरक्कम गैरअर्जदार बँकेने दि.21/03/2009 रोजी अर्जदार क्र. 1 व 2 यांचे असणारे सेव्हींग खात्यामध्ये जमा केलेली आहे. अर्जदार क्र. 1 व 2 यांनी सदर अर्जासोबत त्यांची गैरअर्जदार बँकेमध्ये असणरे सेव्हींग खाते क्र.7627 या सेव्हींग पास बुकाची झेरॉक्स प्रत या अर्जासोबत या मंचामध्ये दाखल केलेले आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले सेव्हींग पासबुक याचा विचार होता, अर्जदार क्र. 1 व 2 हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र.1 – अर्जदार हे दि.02/02/2004 रोजी रक्कम रु.1,00,000/- एवढी रक्कम मुदतठेव म्हणुन गैरअर्जदार बँकेमध्ये ठेवले नंतर सदर रक्कमेबद्यल दरमहा रु.990/- एवढे व्याज उचलुन घेत असत परंतु दि.21/03/2009 रोजी सदर मुदतठेवीची मुदत संपल्यावर अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे सदर रक्कमेची मागणी केल्याचे अर्जदार यांनी त्यांच्या अर्जामध्ये नमुद केलेले आहे. गैरअर्जदार या अर्जाच्या कामी नोटीस मिळुनही या मंचामध्ये या अर्जाच्या कामी हजर राहीलेले नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्या अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले नाही अगर त्यांनी त्यांच्या लेखी म्हणणे,शपथपत्र या अर्जाच्या कामी दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी या अर्जासोबत त्यांना म्हणजेच अर्जदार क्र.1 यांचेसाठी केलेल्या औषधोपचाराबाबतचे कागदपत्र या अर्जाचे कामी या मंचामध्ये या अर्जासोबत दाखल केलेले आहे, याचा विचार होता, अर्जदार यांना सदरच्या पैशाची नितांत आवश्यकता होती, ही बाब स्पष्ट होत आहे. अर्जदार यांना त्यांच्या गरजेनुसार त्यांनी गैरअर्जदार बँकेकडे ठेवलेल्या पैशाची आवश्यकता असतांनाही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सदरची रक्कम दिलेली नाही, याचा विचार होता, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे, असे या मंचाचे मत आहे. कोणतेही योग्य व संयुक्तीक कारण नसतांन गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना रक्कम रु.1,00,000/- एवढी रक्कम आज अखेर दिलेली नाही अगर ती देण्यास गैरअर्जदार का ? तयार नाहीत. याबाबतचे कोणतेही म्हणणे गैरअर्जदार यांनी या मंचामध्ये पुराव्याच्या कामी दाखल केलेले नाही. अर्जदार यांची रक्कम रु.1,00,000/- एवढी रक्कम दि.21/03/2009 पासुन गैरअर्जदार बँकेकडे विनाकारण गुंतुन पडलेली आहे. त्यामुळे सदर रक्कमेवर व्याज मिळणेस अर्जदार हे पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे. कोणतेही योग्य संयुक्तीक कारण नसतांना गैरअर्जदार यांनी अर्जदार यांची रक्कम दिली नाही. म्हणुन अर्जदार यांना या मंचामध्ये अर्ज दाखल करावा लागला आहे व त्या अनुषंगाने खर्चही करावा लागला आहे. त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदाराकडुन मानसिक त्रासापोटी व अर्जाचा खर्चापोटी रक्कम वसुल होऊन मिळणेस पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेले कागदपत्र, अर्जदाराच्या वकीलांचा युक्तीवाद, याचा विचार होता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश अर्जदाराचाअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. आज पासुन 30 दिवसांच्या आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार क्र.1 व 2 यांना खालील प्रमाणे रक्कमा द्यावेत. 1. रक्कम रु.1,00,000/- द्यावे. सदर रक्कमेवर दि.21/03/2009 पासुन प्रत्यक्ष रक्कम पदरी पडेपर्यंत 9 टक्के दराने व्याजासहीत होणारी रक्कम द्यावी. 2. मानसिक त्रासापोटी रु.5,000/- द्यावेत. 3. अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- द्यावेत. 4. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) सदस्या अध्यक्ष प्र. गो.प.निलमवार.लघूलेखक. |