तक्रारदारातर्फे – वकील – ए. आर. तळणीकर,
सामनेवालेतर्फे – वकिल – एस.एल.वाघमारे.
।। निकालपत्र ।।
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराने सदर तक्रार ही गॅस वितरक आणि विमा कंपनी विरुध्द दाखल केलेली आहे. तक्रारदाराच्या तक्रारीत तारीख 28/01/2010 रोजी गॅस शेगडीला लावलेले सिलेंडर संपल्यामुळे त्यांनी नवीन गॅस टाकी शेगडीला रेग्युलेटरसह लावली. शेगडी पेटवीत असतांना त्याच वेळी अचानक गॅस लिक झाल्याने सिलेंडरने पेट घेतला व घराच्या चोहोबाजूने आग लागली. सदर आगीत घरातील टी. व्ही. संच, मिक्सर, डीश, गॅस शेगडी कपडे व कपाट व घरातील नगदी रु. 13,000/- तसेच इतर घरगुती सामान, महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. तसेच घर माळवदाचे असल्याने घराचे देखील मोठयाप्रमाणावर नुकसान झाले. सर्व नुकसान अंदाजे रु.1,55,000/- चे आहे.
सदर घटनेची फिर्याद तात्काळ पोलीस स्टेशन सिरसाळा येथे दिली. त्याचा स्टेशन डायरी क्रं. 28/2010 ने घेण्यात आली व पुढील तपास करण्यात आला. झालेल्या नुकसानी बाबत सामनेवाले नं. 1 यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी नुकसान भरपाई विमा कंपनीतर्फे देण्यात येईल, असे सांगितले. परंतु नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून तक्रारदाराने तारीख 17/3/2010 रोजी सामनेवाले नं. 1 व 2 यांना वकिलामार्फत नोटीस पाठवली. नोटीस घेवूनही नुकसान भरपाई दिली नाही.
विनंती की, नुकसान भरपाईची रक्कम रु. 1,55,000/- व मानसिक त्रासाची रक्कम रु. 15,000/- सामनेवाले नं. 1 व 2 कडून तक्रारदारांना देण्यात यावी.
सामनेवाले नं. 1 हे नोटीस प्राप्त होवूनही न्याय मंचात हजर झाले नाही व त्यांनी त्यांचा खुलासा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार दाखल केलेला नाही, म्हणून त्यांच्या विरुध्द तारीख 13/08/2010 रोजी एकतर्फा तक्रार चालविण्याचा निर्णय घेतला.
सामनेवाले नं. 2 हे अँड. एस. एल. वाघमारे यांच्यामार्फत हजर झाले. त्यांचे वकिलपत्र दाखल नाही. त्यांनी खुलासा देण्यासाठी मुदतीचा अर्ज दिला, अर्ज मंजूर. त्यांनी त्यांचा खुलासा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मुदतीत दाखल न केल्याने त्यांच्या विरुध्द तारीख 07/10/2010 रोजी त्यांच्या खुलाशाशिवाय तक्रार चालविण्याचा निर्णय न्याय मंचाने घेतला.
न्याय निर्णयाचा मुद्दे उत्तरे
1. सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना
नुकसान भरपाईची रक्कम न देवून
दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब
तक्रारदाराने सिध्द केली आहे काय ? नाही.
2. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
3. अंतिम आदेश ? निकालाप्रमाणे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारी सोबतचे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराने त्यांचे पुराव्याचे शपथपत्र ब-याच संधी देवूनही दाखल केलेले नाही. तक्रारदार तक्रार दाखल केल्यापासून सतत गैरहजर आहे. तक्रारदारास सुचना नोटीस काढली असता सदर सुचना नोटीसीचे पाकीट अपूर्ण पत्ता या शे-याने परत आले, त्यामुळे न्याय मंचाने ग्राहक संरक्षण कायदयातील कलम- 13 (2)(सी) प्रमाणे तक्रार गुणवतेवर निकाली काढण्याचा निर्णय घेतला.
सामनेवाले नं. 2 च्या वकिलांनी ता. 11/11/2010 रोजी त्यांना तक्रारीच्या नोटीसीसोबत कागदपत्रे मिळाली नाहीत, त्यामुळे तक्रारदारांना संपूर्ण कागदपत्रे देण्याबाबत आदेश व्हावा अथवा तक्रारीतून सामनेवाले नं. 2 चे नांव कमी करण्यात यावे, असा अर्ज दिलेला आहे. त्यावर तक्रारदाराच्या खुलाशाबाबत आदेश झाला. तक्रारदार व त्यांचे वकील आज दि. 01/12/10 रोजीही गैरहजर. तक्रारदाराचा खुलासा नाही. तारीख 07/10/2010 रोजी सामनेवाले नं. 2 चा खुलासा दाखल नाही, म्हणून तक्रार त्यांच्या खुलाशाशिवाय चालविण्याचा निर्णय न्याय मंचाने घेतल्यानंतर सामनेवाले नं. 2 ने तारीख 13/08/2010 रोजी वरील अर्ज दिला आहे. तो त्यावरील आदेशाप्रमाणे बंद करण्यात आला.
सदरची तक्रार ही गॅस सिलेंडर मधून गॅसची गळती झाल्याने लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानी बाबतची आहे. तक्रारीसोबत तक्रारदाराने सर्व झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. तक्रारीबाबत त्यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल नाही. त्यामुळे तक्रारदारांना सामनेवाले नं. 1 व 2 यांनी नुकसान भरपाईची रक्कम न देवून दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होत नाही, असे न्याय मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारदारांना तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे कोणतीही नुकसान भरपाईची रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड