(आदेश पारीत व्दारा-श्री.महेश एन.ढाके -मा.सदस्य )
1. तक्रारदाराने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणे ः-
तक्रारदार हे वरील पत्त्यावरील कायमचे रहिवाशी असून तक्रारदार हे नुकतेच बी ई कॉम्प्युटर विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्यामुळे तक्रारदार यांचे वडील नामे निर्मलकुमार जैन यांनी तक्रारदारास तक्रारदार यांच्या मन पसंतीची मोटारसायकल घेऊन देण्याची तक्रारदार यांच्याकडे इच्छा व्यक्त केली. तक्रारदार यांनी आदरपुर्वक वडीलांची इच्छा स्विकारुन तक्रारदार यांनी वडीलांसह सामनेवाले नं.1 यांच्या अधिकृत शोरुममध्ये म्हणजे सामनेवाले नंबर 2 यांच्याकडे दिनांक 21.03.2015 रोजी भेट दिली व त्या ठिकाणी तक्रारदार यांनी वडीलांसह वेगवेगळया मोटार सायकल पाहून सामनेवाले यांच्याकडून मोटार सायकलीची माहिती घेतली. त्या प्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या कंपनीची ड्रीम युगा एस डी आर ए ही मोटारसायकल पसंत केली. त्या प्रमाणे सदरील मोटार सायकल घेण्याबाबत तक्रारदार यांनी सामनेवाले नंबर 2 यांच्याकडे इच्छा व्यक्त केली. त्यावेळी सामनेवाले नंबर 2 यांनी तक्रारदार यांना तुम्हाला सदरची मोटार सायकल हवी असेल तर तुम्हाला आज रोजी गाडीचे बुकींग करावे लागेल. त्यामुळे तक्रारदार यांनी सदरील गाडीची किंमत विचारली असता सामनेवाले नंबर 2 यांनी सदरील गाडीची किंमत रुपये 61,440/- एवढी तक्रारदार यांना सांगितली. सदरील सामनेवाले नंबर 2 यांनी सागितलेल्या किंमतीवर सामनेवाले नंबर 1 यांचे देशभरात असलेले नांव विचारात घेऊन तक्रारदार यांनी तात्काळ कोणतीही किंमतीची खातरजमा न करता सामनेवाले नंबर 2 यांच्याकडे सदरील गाडीचे बुकींग पोटी रक्कम रुपये 1,329/- एवढी रक्कम भरुन सदरील गाडी बुक केली. त्यानंतर तक्रारदार यांनी दिनांक 06.04.2015 रोजी सामनेवाले नंबर 2 यांच्याकडे गाडी घेण्यासाठी गेले असता सामनेवाले नंबर 2 यांनी तक्रारदार याच्याकडून उर्वरीत रक्कम रुपये 60,111/- एवढी स्विकारुन तक्रारदारास सदरील रक्कम व बुकींगची रक्कम स्विकारल्याबाबत पावत्या देवून तक्रारदार यांना त्यांच्या पसंतीची मोटारसायकल तक्रारदार यांच्या ताब्यात दिली. त्यानंतर तक्रारदार यांनी सदरील गाडी ताब्यात घेतल्यानंतर तात्काळ सामनेवाले नंबर 2 यांचे शोरुमला उपलब्ध असणारे आय सी आय सी आय लोम्बार्ड कंपनीच्या संबंधीताकडे संपर्क साधुन सदरील नविन घेतलेल्या गाडीचा इन्शुरन्स पोटगी रक्कम रुपये 1,548/- चा त्याच दिवशी भरणा करुन सदरील गाडीची विमा पॉलीसी घेतली. त्यानंतर तारीख 02.05.2015 रोजी तक्रारदार यांनी सदर मोटार सायकलचे पासिंगसाठी रक्कम रुपये 110/- भरले. त्याच बरोबर टॅक्स पोटी देखील तक्रारदार यांनी आर टी ओ कार्यालयाकडे रक्कम रुपये 3,839/- भरले व सदरील गाडीचे संपुर्ण पुर्तता करुन गाडी ताब्यात घेतली होती व आहे. त्यानंतर तक्रारदार यांना मुळ गाडीचे बिल न मिळाल्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले नंबर 2 यांचेकडे संपर्क केला असता सामनेवाले नंबर 2 यांनी तक्रारदार यांना सदरील गाडीचा टॅक्स इन्व्हाईस असे नमुद केलेले बिल दिले व सदरील बिल रक्कम रु.51,840/- चे दिले. त्यावेळी तक्रारदार यांनी सामनेवाले यांना रक्कम रुपये 61,440/- मी तुम्हास दिलेले असतांना तुम्ही मला रक्कम रुपये 51,840/- चे बिल दिले आहे व माझ्याकडून उर्वरीत रक्कम रुपये 9,600/- ही कशापोटी घेतली त्याचे मला बिल द्या अशी विनंती केली असता सामनेवाले नंबर 2 यांनी तक्रारदार यांना उडवा उडवीची उत्तरे दिली व तक्रारदाराची बोळवण केली. त्यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी सामनेवाले यांच्याकडे संपर्क केला असता सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही बिले न देता उडवा उडवीची उत्तरे देवून अपमानास्पद वागणुक देवून तक्रारदारास तुला कोणतेही बिल मिळणार नाही, तुला काय करावयाचे ते कर अशी अर्वाच्य भाषा वापरुन तक्रारदार यांना त्यांचे शोरुम मधुन हाकलून दिले. वास्तविक पहाता तक्रारदार व सामनेवाले यांचे दरम्यान ग्राहक व विक्रेता असा नातेसंबंध निर्माण झालेला असून तक्रारदार यांना सामनेवाले यांनी चांगली सेवा देण्याची कायदेशिर व नैतिक जबाबदारी असतांना सामनेवाले नंबर 2 यांनी तक्रारदार यांना दुषीत सेवा देवून ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींचा भंग केलेला आहे. तसेच अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब करुन वास्तविक किंमती पेक्षा अवास्तव किंमत तक्रारदाराकडून स्विकारुन तक्रारदाराची फसवणुक केली आहे. तसेच सदरील सामनेवाले नंबर 1 हे मुख्य कार्यालय असून सामनेवाले नंबर 2 हे सामनेवाले नंबर 1 यांचे अख्त्यारीत शाखा कार्यालय म्हणुन कार्यरत आहे, सामनेवाले नंबर 1 यांचे जाहीरातीवर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी सामनेवाले नंबर 2 कडून सदर वाहन खरेदी केलेले आहे. त्याच बरोबर सदरील वाहनाची निर्मीती देखील सामनेवाले नंबर 1 यांनी केलेली असून सामनेवाले नंबर 1 हेच वाहनाच्या किंमती निश्चीत करतात, त्यामुळे तक्रारदार यांच्या केलेल्या फसवणुकीस व तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासास सामनेवाले नंबर 1 व 2 हे वैयक्तीक व संयुक्तीक रित्या जबाबदार आहेत. म्हणुन तक्रारदार यांच्याकडून सामनेवाले नंबर 2 यांनी स्विकारलेली अतिरिक्त रक्कम रुपये 9,600/- व त्यावर नुकसानी दाखल व्याजासह रक्कम परत मिळणेसाठी तसेच तक्रारदारास सामनेवाले यांचे बेकायदेशीर कृत्यामुळे झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- मिळणेसाठी व तक्रार खर्चापोटी रुपये 20,000/- मिळणेसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केलेली आहे.
3. तक्रादार यानी तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदार यांचेकडून सामेनवाले नंबर 2 यांनी अतिरिक्त घेतलेली रक्कम रुपये 9,600/- त्यावरील रक्कम स्विकारलेपासून द.सा.द.शे 18 टक्के दराने रक्कम प्रत्यक्ष परत मिळेपावेतो होणारे व्याजासह तक्रारदारास सामनेवाले यांच्याकडून परत देण्याबाबतचा आदेश व्हावा. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दुषीत सेवा दिल्याने तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- अशी रक्कम तक्रारदार यांना सामनेवाले यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तीकरित्या देण्याबाबत आदेश व्हावा.
4. तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.6 सोबत शोरुम पावत्या, टॅक्स इनव्हाईस, विमा पॉलीसी, रजिस्ट्रेशन पावती व टॅक्स पावतीच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत.
5. सदर तक्रारीकामी सामनेवाला नं.1 व 2 यांना मंचातर्फे नोटीसा काढण्यात आल्या. त्यानुसार सामनेवाला हे मंचात हजर झाले. सामनेवाला यांनी निशाणी 16 वर लेखी कैफियत दाखल केली. सदर कैफियतीमध्ये ड्रीम युगा मोटारसायकलची किंमत 61,440/- एवढी आहे. त्यामध्ये इन्शुरन्स प्रिमीयम, रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन फीज, सीआरटीएम इत्यादी मिळून रु.61,440/- अशी किंमत आहे. सामनेवाला यांचे कैफियतीमधील परीच्छेद क्र.9 मध्ये दर्शविल्याप्रमाणे तक्रारदार यांना ड्रीम युगा मोटार सायकल ज्याचा इंजीन नं. JC58ET3623033 ही मोटार सायकल तक्रारदाराने सामनेवाला नं.2 कडून खरेदी केली आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे असा आहे.
Rs.51,840/- Invoice Price(Price of Naked Vehicle)
Rs.1,548/- Insurance Premium
Rs.110/- Registration Fees
Rs.3,629/- Road Tax
Rs.100/- CRTM(Temporary Registration Charges)
Rs.2,300/- Accessories Fitted to Complainant’s Motorcycle
Rs. 525/- Extended Warranty
Rs.699/- Annual Maintenance Charges
Rs.689/- RTO Agent Charges.
Rs.61,440/- Total
त्यामुळे तक्रारदाराने सामनेवाला यांचेवर 9,600/- ज्यादा घेतल्याचे आक्षेप खोटे असल्याने सदरची तक्रार खारीज करण्यात यावी असे म्हटंले आहे. सामनेवाला यांनी कैफियतीसोबत नि.18 ला त्या संदर्भात दस्तावेज यादी अनु.क्र.1 ते 5 दाखल केली आहे. त्यात सामनेवाला यांनी रक्कम रु.61,440/- रुपयाचा तपशिल दिलेला आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे याचा बारकाईने अवलोकन केले. तक्रारदाराचे वकील श्री.पालवे यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवालाची कैफियत, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे याचा बारकाईने अवलोकन केले. सामनेवाला यांचे वकील श्री.फिरोदिया यांचा युक्तीवाद ऐकला. त्यावरुन मंचासमोर न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थितीत होतात.
| मुद्दे | उत्तर |
-
| सामनेवालाने तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे काय.? | ...नाही. |
2. | तक्रारदार हा सामनेवालाकडून नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहे काय.? | ...नाही. |
3. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
7. मुद्दा क्र.1 व 2 ः– सामनेवाला यांचे वकील श्री.फिरोदिया यांनी युक्तीवादात असे कथन केले आहे की, तक्रारदारास दिलेली ड्रीम युगा मोटार सायकलची किंमत रक्कम रु.61,440/- आहे. तक्रारदाराने 9,600/- एवढी रक्कम ज्यादा घेतली असल्याचा आरोप केलेला आहे हे आरोप खोडून काढून सामनेवालाने सदर तक्रारीतील नमुद वाहन खरेदी करतांना सामनेवालास दिलेल्या रकमेचा तपशिल दिलेला आहे व त्यासोबत इनव्हाईस मध्ये नमुद केल्याप्रामणे इन्शुरन्स प्रिमीयम, रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन फीज, सीआरटीएम, मोटार सायकल वाहनाचे सुटे स्पेअरपार्ट अॅक्सेसरीज, वार्षिक चार्जेस इत्यादीचा संपुर्ण तपशिल कागदपत्रासह दाखल केलेले आहे. त्यावर सामनेवालाचे वकीलांनी वादातील 9,600/- रक्कम सामनेवालाकडे घेणे निघत नाही. त्यांनी सेवा देण्यात कोणतीही कमतरता केलेली नाही. कोणतीही रक्कम सामनेवालाकडे घेणे निघत नाही. मात्र याबाबत तक्रारदार यांचे वकील श्री.पालवे यांनी असा युक्तीवाद केला आहे की, मोटार सायकल वाहन ड्रीम युगा तक्रारदारास विकलेली ज्याचा इंजीन नं. JC58ET3623033 याची रक्कम रु.61,440/- रुपये किंमत एवढी आहे. परंतू सामनेवाला क्र.2 यांनी 51,840/- रुपयाचे बिले दिलेले आहे. तक्रारदाराकडून उर्वरीत रक्कम रु.9,600/- कशापोटी घेतलेली आहे याचा तपशिल मागणी केली असता त्याबाबत सामनेवाला यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन कोणतेही बिल मिळणार नाही असे कथन केले. सामनेवाला यांनी 9,600/- रुपये रक्कम न देऊन सेवेत कमतरता ठेवली आहे.
8. सामनेवाला यांचे कैफियतीमधील परीच्छेद क्र.9 मध्ये दर्शविल्याप्रमाणे तक्रारदार यांना ड्रीम युगा मोटार सायकल ज्याचा इंजीन नं. JC58ET3623033 ही मोटार सायकल तक्रारदाराने सामनेवाला नं.2 कडून खरेदी केली आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे असा आहे.
Rs.51,840/- Invoice Price(Price of Naked Vehicle)
Rs.1,548/- Insurance Premium
Rs.110/- Registration Fees
Rs.3,629/- Road Tax
Rs.100/- CRTM(Temporary Registration Charges)
Rs.2,300/- Accessories Fitted to Complainant’s Motorcycle
Rs. 525/- Extended Warranty
Rs.699/- Annual Maintenance Charges
Rs.689/- RTO Agent Charges.
Rs.61,440/- Total
वरील उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद लक्षात घेतला. पुराव्याचे अवलोकन केले. तसेच वरील नमुद तपशिल अहवाल घेतांना मंचाचे असे निदर्शनास आले की, सामनेवाला यांनी घेतलेली रक्कम बरोबर असून सामनेवाला यांनी तक्रारदारासप्रति सेवेत कोणतीही त्रुटी दिलेली नाही असे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
9. मुद्दा क्र.2 – मुद्दा क्र.1 चे उत्तर नाकारले असल्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र नाहीत असे मंचाचे मत झाले आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
10. मुद्दा क्र.3 – मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अंतिम आदेश -
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
3. या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क देण्यात यावी.
4. या प्रकरणाची “ब” व “क” फाईल अर्जदार यांना परत द्यावी.