जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 65/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-04/02/2011.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 07/09/2013.
श्री.राजेश बी.पाटील,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यापार,
रा.श्रेयस अडव्हरटाईझिंग,
अडव्हरटाईझिंग व प्रिंटींग,
सी-152, पहीला मजला, गोलाणी मार्केट,
जळगांव, ता.जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. व्यवस्थापक / प्रतिनिधी,
(क्रेडीट कार्ड विभाग)
एच.डी.एफ.सी.बँक, जळगांव.
2. राजलक्ष्मी,
कस्टमर सर्व्हीस ऑफीसर,
एच.डी.एफ.सी.क्रेडीट कार्ड विभाग, चेन्नई. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्रध्दा एस.काबरा (चंद्रात्रे) वकील.
विरुध्द पक्ष 1 व 2 एकतर्फा.
निकालपत्र
श्री.चंद्रकांत मो.येशीराव, सदस्यः विरुध्द पक्षाने तक्रारदारास क्रेडीट कार्ड बाबत सेवा त्रृटी प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
विरुध्द पक्ष बँकेचे अधिका-यांनी तक्रारदारास क्रेडीट कार्डचे महत्व सांगुन ते घेण्याची गळ घातल्याने तक्रारदाराने क्रेडीट कार्ड विरुध्द पक्षाकडुन घेतले. तक्रारदाराने त्यानंतर काही प्रमाणांत क्रेडीट कार्डचा वापर केला व सदर रक्कमेचा त्वरीत भरणाही करुन दिला. तक्रारदाराचे असे लक्षात आले की, संपुर्ण पैसे भरणा करुन देखील वेगळे चार्जेस भरावे लागत आहे तेव्हा तक्रारदाराने दि.1/6/2006 रोजी मॅनेजर, एच.डी.एफ.सी.बँक, क्रेडीट विभाग यांचे नावे पत्र पाठवुन क्रेडीट कार्ड क्र.5176351001731284 वर बँकेकडुन रक्कम रु.110/- आकारले जात आहेत हे सर्वस्वी चुकीचे आहे. कार्ड देतेवेळी संपुर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असल्याचे सांगुन त्यानंतर रक्कमेची आकारणी करुन तक्रारदारास आर्थिक त्रास दिला. तसेच तक्रारदाराने क्रेडीट कार्ड सुविधा बंद करण्याची विनंती केल्यावर देखील त्यास प्लॅटीनम कार्ड ची सुविधा देऊन अनेक प्रलोभने दाखवुन क्रेडीट कार्ड चालुच ठेवले. तसेच वेळोवेळी तक्रारदाराच्या खात्यातील रक्कमा वाढवल्या. तक्रारदारास अनेक वेळा नोटीसीने कळवुन त्याचे खात्यावर शिल्लक रक्कमांचा तपशिल दाखवुन सरतेशेवटी तक्रारदाराकडुन रक्कम रु.31,718/- ची नोटीसीव्दारे मागणी केली व तक्रारदारास सदोष सेवा प्रदान केली. सबब आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.32,000/- विरुध्द पक्षाकडुन 18 टक्के व्याजासह मिळावी, मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने केली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष हे नोटीस मिळुन याकामी गैरहजर राहील्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
4. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे तसेच तक्रारदाराचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
5. मुद्या क्र.1 - प्रस्तुत प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडुन क्रेडीट कार्ड क्र.5176351001731284 अन्वये सुविधा घेतली होती. विरुध्द पक्ष हे तक्रारदाराकडुन सदर कार्डाव्दारे खरेदी केलेली रक्कम वसुली करण्याचे व्यतिरिक्त अन्य स्वरुपात रु.110/- प्रमाणे रक्कम वसुल करुन तक्रारदारास आर्थिक त्रास दिला तसेच तक्रारदाराने क्रेडीट कार्ड ची सुविधा बंद करण्याचे कळविल्यानंतर तक्रारदाराकडुन रक्कम रु.31,718/- ची अवास्तव मागणी करुन मनस्ताप दिला म्हणुन सदरची तक्रार प्रामुख्याने दाखल केलेली आहे. या प्रकरणी तक्रारदाराचे वकीलांनी मंचासमोर युक्तीवादात विरुध्द पक्षाने वेळोवेळी नोटीस पाठवुन तक्रारदाराकडुन अनधिकृतपणे रक्कमांची मागणी केल्याचे प्रतिपादन या मंचासमोर केले. नि.क्र.3 लगत दाखल कागदपत्राचे अवलोकन करता तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे क्रेडीट कार्ड खात्यावरील चार्जेस कमी करण्याबाबत पत्राने कळविले असुन तक्रारदारास विरुध्द पक्षाने तक्रारदारास दि.7 जानेवारी,2011 रोजीचे पत्रान्वये रक्कम रु.31,718/- ची मागणी केल्याचे तक्रारदाराने दाखल केलेल्या नि.क्र.3 लगतच्या पत्रावरुन स्पष्ट होते. सदर तक्रारीकामी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 हे नोटीस मिळुनही गैरहजर राहीले., त्यांनी त्यांचे कोणतेही म्हणणे याकामी दाखल केले नाही यावरुन विरुध्द पक्षास तक्रारदाराची तक्रार एकप्रकारे मान्य आहे असा निष्कर्ष निघतो. तक्रारदाराने विरुध्द पक्षास क्रेडीट कार्डची सुविधा बंद करण्याचे लेखी कळवुनही त्यानंतर तक्रारदाराची सेवा तशीच पुढे सुरु ठेवुन त्यास त्याव्दारे रक्कमांची मागणी करुन सदोष व त्रृटीयुक्त सेवा दिल्याचे निष्कर्षाप्रत हा मंच आलेला आहे. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
6. मुद्या क्र.2 - तक्रारदाराने आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रु.32,000/- विरुध्द पक्षाकडुन 18 टक्के व्याजासह मिळावी, मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावा अशी विनंती केली आहे. तक्रारदाराने लेखी युक्तीवादातुन आर्थिक नुकसानीची रक्कम रु.57,000/- ची मागणी वाढवुन केली आहे. तथापी तक्रारदाराचे नेमके रक्कम रु.32,000/- तसेच 57,000/- या रुपयांचे नुकसान कसे झाले याबाबतचा कोणताही समर्पक खुलासा केला नाही तसेच सदरचे नुकसान नेमके कसे झाले हे कागदोपत्री पुराव्यानिशी शाबीत केलेले नाही. तसेच तक्रारदाराने क्रेडीट कार्ड त्वरीत बंद करण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती लेखी युक्तीवादातुन केली आहे. आमचे मते तक्रारदार हा क्रेडीट कार्ड ची सुविधा बंद करण्याची विनंती मान्य होण्यास तसेच नुकसानीपोटी रु.2,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.500/- मिळण्यास पात्र आहे या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहोत. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) विरुध्द पक्ष 1 व 2 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदाराचे क्रेडीट कार्ड क्र. 5176351001731284 या निकालाची प्रत मिळाल्यानंतर तात्काळ बंद करावे.
( क ) विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या नुकसानीपोटी रक्कम रुपये 2,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.500/- या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 07/09/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) ( श्री.चंद्रकांत मो.येशीराव) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,जळगांव.