(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा. सदस्या)
(पारीत दिनांक – 16 सप्टेंबर, 2019)
01. तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्षां विरुध्द दोषपूर्ण बियाण्यांमुळे झालेल्या नुकसान भरपाई संबधात ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारी नुसार, तक्रारकर्ता क्रं-1) श्री रामभाऊ बुधा गभणे,आणि तक्रारकर्ता क्रं-2 श्री दिपक रामभाऊ गभणे यांची संयुक्त कुटूंबाचे मालकीची मौजा अडयाळ, तहसिल पवनी, जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रं 1156, एकूणक्षेत्रफळ-1.21 हेकटर आर या वर्णनाची शेत जमीन असून त्यापैकी उभय तक्रारदारांनी 0.60 हेक्टर आर एवढया क्षेत्रफळा मध्ये धानपिकाची पेरणी केली.
यातील विरुध्दपक्ष क्रं-1) सिजेंटा हि धान बियाण्याची निर्माता कंपनी असून विरुध्दपक्ष क्रं-2) मे.वृंदावन कृषी केंद्र तर्फे प्रोप्रायटर/मालक श्री महेश भास्कर वैद्य हे बियाणे विक्रेता आहेत. उभय तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं-1) निर्मित धानाचे बियाणे हे विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता यांचे कडून रब्बी हंगामा करीता सिजेंटा हायब्रिड, एन.के.-5251, प्रतीबॅग वजन 3 किलो, प्रतीबॅग किम्मत रुपये-300/- प्रमाणे एकूण 09 बॅग्स बियाणे एकूण रुपये-2700/- मध्ये विकत घेतले. बियाणे विकत घेतल्याची पावती क्रं 253, पावती दिनांक-25.11.2016 तक्रारकर्ता श्री दिपक गभणे यांचे नावाने असून ती अभिलेखावर दाखल केलेली असून सदर धान बियाण्याचा लॉट क्रं-12623968 तसेच बॅच क्रमांक-713929 असा आहे.
तक्रारदार यांनी पुढे असे नमुद केले की, बियाणे विक्रीचे वेळी विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेता यांनी पूर्ण पिकाची हमी देऊन धानाचे पिक हे 120 ते 125 दिवसात कापणीसाठी तयार होईल असे सांगितले होते.त्याप्रमाणे शेतीची योग्य ती मशागत व नांगरणी करुन सदर बियाणे दिनांक-25.11.2016 व 26.11.2016 रोजी शेतात पेरले. पिक पेरल्या नंतर रोपांची योग्य ती जोपासना प्लॉस्टीक कागदाचा वापर, किटकनाशकाची फवारणी,खताची मात्रा आणि पाणी देऊन करण्यात आली. शेतात निंदण करण्यात आले. शेतातील बोअरवेलने वेळोवेळी पाणी दिले. परंतु काही कालावधी नंतर पिकांना लोंबीच व गर्भधारणा झाली नाही ही बाब तक्रारदारांच्या लक्षात आली, मुदती नंतरही धान गर्भात परिपूर्ण दिसून आले नाही, याबाबत वेळोवेळी विरुध्दपक्षांना विचारपूस केली असता त्यांनी टाळाटाळीची उत्तरे दिलीत. सदर धान पिकाची रोवणी दिनांक-11 जानेवारी, 2017 रोजी करण्यात आली होती तर धानाचे उत्पादनाची कापणी दिनांक- मे, 2017 महिन्यात करण्यात आली होती परंतु तक्रारदारांना फक्त 08 क्विंटल एवढेच निकृष्ट दर्जाचे उत्पादन झाले. विरुध्दपक्षांचे म्हणण्या प्रमाणे प्रती एकरी 40 क्विंटल अपेक्षीत उत्पादन देणारे धान बियाणे होते त्यामुळे दिड एकरात 60 क्विंटल अपेक्षीत उत्पादन येणे आवश्यक होते. धानाचा हमीभाव प्रती क्विंटल रुपये-1600/-प्रमाणे हिशोबात घेतल्यास अपेक्षीत उत्पादन 60 क्विंटलपोटी रुपये-96,000/- एवढे उत्पन्न मिळावयास हवे होते परंतु उत्पादीत धानास बाजारात प्रतीक्विंटल रुपये-1400/- प्रमाणे भाव आला.
सदर निकृष्ट धानाचे बियाण्या बाबत तक्रारदार श्री दिपक गभणे यांनी कृषी अधिकारी, पवनी, तालुका पवनी, जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-25 एप्रिल, 2017 रोजी लेखी तक्रार केली होती. त्यानुसार अध्यक्ष, तालुका तक्रार निवारण समिती तथा उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा आणि विद्यापीट व महाबीज अकोला यांचे प्रतिनिधी यांनी उभय पक्षांचे
उपस्थितीत तसेच उपस्थित पंचा समक्ष दिनांक-05 मे, 2017 रोजी प्रत्यक्ष मोक्यावर अर्जदारांचे शेताची पाहणी केली आणि त्याच दिवशी अहवाल तयार केला. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने आपल्या अहवालात असे नमुद केले की, वि.प.क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीने माहिती पत्रकात सदर पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवस नमुद केला आहे परंतु सिंचनाची सुविधा, नैसर्गिकपाणी, बोअरवेल असूनही तसेच सदर धान पिकास 159 दिवस उलटूनही धान पिक पूर्णपणे परिपक्व झालेले नाही व परिपक्व होण्यास अजूनही 15 ते 20 दिवस लागणार आहेत त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिलेली तक्रार योग्य आहे व त्यामुळे तक्रारकर्ता यांचे आर्थिक नुकसान संभवते असा शेरा नमुद केलेला आहे. तालुका तक्रार निवारण समितीचे अहवालावर संबधित अधिकारी व पंचाच्या सहया आहेत.
तक्रारदार यांनी पुढे असे नमुद केले की, दोषपूर्ण बियाण्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांनी वकीलांचे मार्फतीने विरुध्दपक्षांना दिनांक-19 मे, 2017 रोजीची रजिस्टर पोस्टाने कायदेशीर नोटीस पाठविली असता विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीने चुकीचे लेखी उत्तर दिले. अशाप्रकारे विरुध्दपक्षांनी दोषपूर्ण बियाण्याची विक्री करुन तक्रारदारांची फसवणूक केलेली आहे. तक्रारदारांना दिड एकर शेतीसाठी नांगरणी, रोवणी, खते इत्यादीसाठी रुपये-37,600/- विज देयकासाठी रुपये-9420/- प्रती दिवस मजूरी रुपये-175/- प्रमाणे एकूण 170 दिवसां करीतारुपये-29,750/- मजूरीचा खर्च असे मिळून रुपये-76,770/- एवढा खर्च आला. वर नमुद केल्या प्रमाणे त्यांना धानाचे अपेक्षीत उत्पन्नापोटी रुपये-96,000/- उत्पन्ना पैकी लागलेला खर्च रुपये-76,770/- वजा जाता त्यांना नफा म्हणून रुपये-20,930/- मिळावयास हवे होते. परंतु तक्रारदारांना केवळ 08 क्विंटल उत्पादन झाले असून त्याची विक्री रुपये-1400/-प्रतीक्विंटल प्रमाणे करुन केवळ रुपये-11,200/- मिळालेले आहेत. अपेक्षीत उत्पन्न रुपये-96,000/- (वजा) दोषपूर्ण बियाण्याचे विक्री मधून मिळालेली रक्कम रुपये-11,200/- वजा जाता रुपये-84,800/- एवढया रकमेचा तोटा तक्रारदारांचा झालेला आहे.
म्हणून उभय तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेता तसेच विरुध्दपक्ष क्रं 3 कृषी अधिकारी यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे खालील प्रमाणे मागणी केली-
(01) विरुध्दपक्षांनी तक्रारदारांना निकृष्ट धानाचे बियाण्याचे नुकसान भरपाईपोटी रुपये-84,800/- आणि सदर रकमेवर वार्षिक-18 टक्के दराने व्याजाची रक्कम रुपये-15,120/- अशा रकमा देण्याचे आदेशित व्हावे.
(02) तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-, शारिरीक त्रासा बद्यल रुपये-15,000/- तसेच तक्रार व नोटीस खर्च म्हणून रुपये-6000/- अशा रकमा तक्रारदारांना विरुध्दपक्षांनी देण्याचे आदेशित व्हावे.
(03) दोषपूर्ण निकृष्ट धानाचे बियाण्यामुळे तक्रारदारांचे कुटूंबाची आर्थिक विवंचना, मुलांच्या शिक्षणात अडथळे इत्यादीसाठी विरुध्दपक्षांवर रुपये-1,00,000/- दंड बसवून सदर रक्कम तक्रारदारांना देण्याचे आदेशित व्हावे.
(04) तक्रारदारांनी दुसरी कडून कर्ज घेतल्याने झालेल्या आर्थिकहानी बाबत रुपये-30,000/- विरुध्दपक्षां कडून मिळावेत.
(05) शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास आणि दंडाच्या रकमेवर विलंबाचे कालावधीकरीता वार्षिक 18 टक्के दराने व्याज आकारुन सदर रकमा विरुध्दपक्षां कडून तक्रारदारांना देण्याचे आदेशित व्हावे. या शिवाय योग्य ती दाद तक्रारदारांचे वतीने देण्यात यावी.
03. विरुध्दपक्ष क्रं 1 सिजेंटा इंडीया लिमिटेड या धान निर्माता कंपनीने आपले लेखी उत्तर ग्राहकमंचा समक्ष पान क्रं-45 ते 55 वर दाखल केले. वि.प.कं 1 बियाणे निर्माता कंपनीने आपले लेखी उत्तरात त्यांचे विरुध्द दाखल केलेली तक्रार चुकीची असल्याने ती खारीज करण्यात यावी असे नमुद केले. तसेच ग्राहक मंचाला प्रस्तुत तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नसून दिवाणी न्यायालयालाच येत असल्याचे नमुद केले. तक्रारदारांनी विरुध्दपक्षां विरुध्द तक्रारीतून केलेली संपूर्ण विपरीत विधाने तसेच तक्रारीतून केलेल्या मागण्या या नाकबुल केल्यात. अधिकचे उत्तरा मध्ये असे नमुद केले की, बियाणे बाजारात विक्रीस आणण्यापूर्वी शासनाचे मार्फतीने ते प्रमाणित केलेले आहे. सदर बियाण्याची पेरणी व लागवडी बाबत त्यांनी सुचनावजा माहितीपत्रक प्रकाशित केलेले आहे. तक्रारदारांनी दाखल केलेल्या दस्तऐवजा वरुन विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित धानाचे बियाणे दोषपूर्ण होते असे दिसून येत नाही व त्या संबधी योग्य तो पुरावा दाखल केलेला नाही. अपेक्षीत उत्पादनासाठी शेतीचे सुयोग्य व्यवस्थापन, योग्य प्रमाणात बियाण्याचा वापर, पुर्नलागवडीचे वेळी घ्यावयाची योग्य ती काळजी, योग्य तो पाणी पुरवठा, रासायनिक खते, किटकनाशकाचा वापर, योग्य जमीन, योग्य हवामान तसेच तापमान नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना इत्यादी घटकांचा प्रभाव पडतो आणि या बाबी विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीचे नियंत्रणा बाहेरील आहेत.
विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीने पुढे असे नमुद केले की, त्यांचे माहितीपत्रका प्रमाणे त्यांचे निर्मित धान बियाण्याची पेरणी ही खरीप म्हणजे माहे जून मध्ये करणे आवश्यक आहे परंतु तक्रारदारांनी दिनांक-25 नोव्हेंबर, 2016 रोजी बियाणे विकत घेऊन रब्बी कालावधीत पेरणी केली, त्यामुळे त्यांची जबाबदारी येत नाही. तक्रारदारांनी 09 किलो बियाणे विकत घेतले असून पेरणी केलेले क्षेत्र पाहता जास्त बियाण्याची पेरणी केल्याचे दिसून येते. माहितीपत्रका प्रमाणे दोन रोपांच्या ओळीत योग्य ते अंतर ठेवल्याचे दिसून येत नाही. तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीने दिलेल्या माहिती प्रमाणे तक्रारदारांनी पेरणी व लागवड केल्या बाबत योग्य तो पुरावा दाखल केलेला नाही. दोन रोपां मध्ये योग्य अंतर नसल्यामुळे पिक वाढीचा कालावधी वाढलेला आहे. तापमान नियंत्रणासाठी योग्य पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे परंतु तक्रारदारांनी अयोग्य कालावधी आणि वातावरणात धानाची पेरणी केली आणि तापमान नियंत्रणात ठेवलेले नाही या सर्व बाबी कडे कृषी तज्ञांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते त्यामुळे तज्ञांचे ज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तसेच किती क्षेत्रफळा मध्ये बियाणे पेरले तसेच योग्य तो रासायनिक खताचा वापर केला किंवा काय या बाबत पुरावा दाखल केलेला नाही. बियाणे रोपामध्ये परावर्तीत झाल्या नंतर 25 ते 30 दिवसामध्ये पुर्नलागवड करणे अपेक्षीत असून जवळपास 88 दिवसा नंतर पिक कापणीस तयार होते. अधिकचे बियाण्याचा कमी क्षेत्रात वापर केल्याचे दिसून येते तसेच पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्याचे दिसून येत नाही वा तसा पुरावा सुध्दा दिलेला नाही. बियाणे तक्रार निवारण समितीने बियाण्याची फील्ड चाचणी घेतलेली नाही जी घेणे कायदेशीर आहे. विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित बियाणे गुणवत्ता पूर्ण असून ते बियाणे कायदा-1966 मधील तरतुदी प्रमाणे योग्य ती चाचणी परिक्षण करुन बाजारात विक्रीस आणले जाते. बियाणे दोषपूर्ण असल्या बाबत सक्षम प्रयोग शाळेचा अहवाल दाखल केलेला नाही. बियाणे दोषपूर्ण असल्याचा आरोप तक्रारदारांनी केलेला असल्यामुळे ते सिध्द करण्याची संपूर्ण जबाबदारी ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी पमाणे तक्रारदारांवर येते. ग्राहक मंचाचे मर्यादित अधिकारक्षेत्रात ही तक्रार चालू शकत नाही त्यामुळे ती दिवाणी न्यायालयातच चालविणे आवश्यक आहे. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीचे बियाणे हे दोषपूर्ण होते असे दर्शविणारा कोणताही पुरावा जसे प्रयोगशाळेचा अहवाल इत्यादी दाखल केलेला नसल्याने तसेच खोटी तक्रार दाखल केलेली असल्याने ती खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीतर्फे करण्यात आली.
04. ग्राहक मंचाचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 2 मे.वृंदावन कृषी केंद्र अडयाळ तहसिल पवनी जिल्हा भंडारा बियाणे विक्रेता व विरुध्दपक्षक्रं-3 कृषी अधिकारी, पवनी, जिल्हा भंडारा यांना अनुक्रमे पान क्रं 41 व 43 वर रजिस्टर पोस्टाने नोटीस तामील झाल्या बाबत रजिस्टर पोस्टाच्या पोच अभिलेखावर दाखल आहेत. परंतु विरुध्दपक्ष क्रं 2 व क्रं 3 हे ग्राहक मंचाची रजि.नोटीस मिळूनही ग्राहक मंचा समक्ष हजर न झाल्याने वि.प.क्रं 2 व 3 विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश प्रकरणात मंचाव्दारे दिनांक-29 ऑगस्ट, 2018 रोजी पारीत करण्यात आला.
05. उभय तक्रारदारांनी तक्रारीचे पृष्टयर्थ पान क्रं 14 वरील दस्तऐवज यादी नुसार एकूण-11 दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात ज्यामध्ये तक्रारदार यांनी कृषी अधिकारी, पवनी यांचेकडे केलेली तक्रार, तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीचा मोका पाहणी अहवाल, तक्रारदारांनी विरुध्दपक्षांना पाठविलेली कायदेशीर नोटीस प्रत, रजि.पोस्टाच्या पोच, विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीने नोटीसला दिलेले उत्तर, विरुध्दपक्ष क्रं 2 कडून बियाणे विकत घेतल्याचे बिल, दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्रातील प्रकाशित मजकूर, ग्राहक पंचायतीचे विरुध्दपक्ष यांना दिलेले पत्र, विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीचे पिका बद्यलचे माहितीपत्रक अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्ता श्री दिपक गभणे याने आपले पुराव्याचे शपथपत्र पान क्रं 68 ते 72 वर दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
06. विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी तर्फे पुराव्याचे शपथपत्र पान क्रं 59 ते 67 वर दाखल केले. पान क्रं 73 ते 82 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच पान क्रं 98 वरील पुरसिस प्रमाणे मा.वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिवाडयांच्या प्रती दाखल केल्यात. तसेच पान क्रं 142 ते 146 वर कृषी संचलनालय, पुणे यांनी बियाण्याचे तक्रारी संबधात अमलात आणावयाचे कार्यवाही बाबत दिलेल्या मार्गदर्शनपर सुचना देणारी परिपत्रकाची प्रत दाखल केली.
07. उभय तक्रारदारां तर्फे वकील श्री वाडीभस्मे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष 3 तर्फे श्री ए.एम.कोटांगले, तालुका कृषी अधिकारी हे मौखीक युक्तीवादाचे वेळी हजर होते.
08. तक्रारदाराची तक्रार, शपथेवरील पुरावा, लेखी युक्तीवाद तसेच तक्रारदारांनी दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीने तक्रारीला दिलेले उत्तर, शपथेवरील पुरावा, लेखी युक्तीवाद इत्यादीचे अवलोकन ग्राहक मंचाव्दारे करण्यात आले. तसेच उपस्थित पक्षांचा मौखीक युक्तीवाद यावरुन ग्राहक मंचाचा निषकर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
09. तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने तक्रारदारांचे शेताची दिनांक-05 मे, 2017 रोजी मोका पाहणी करुन दिलेला अहवाल पान क्रं 17 ते 21 वर दाखल आहे, त्यामध्ये 0.60 हेक्टर आर एवढया क्षेत्रात विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित बियाणे, जे विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता यांचे कडून विकत घेतल्याचे नमुद आहे. तसेच रोवणी पध्दतीने दिनांक-26.11.2017 रोजी पेरणी केल्याचे तसेच पुर्नलागवड दिनांक-11.01.2017 रोजी केल्याचे त्याच बरोबर शेतामध्ये बोअरवेल व्दारे सिंचनाची व्यवस्था असल्याचे नमुद केल्याने या बाबी सिध्द होतात.
10. उभय तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं-1) निर्मित धानाचे बियाणे हे विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता यांचे कडून रब्बी हंगामा करीता सिजेंटा हायब्रिड, एन.के.-5251, प्रतीबॅग वजन 3 किलो, प्रतीबॅग किम्मत रुपये-300/- प्रमाणे एकूण 09 बॅग्स बियाणे एकूण रुपये-2700/- मध्ये विकत घेतले. बियाणे विकत घेतल्याची पावती क्रं 253, पावती दिनांक-25.11.2016 तक्रारकर्ता श्री दिपक गभणे या नावाने पान क्रं 29 प्रमाणे अभिलेखावर दाखल असून सदर धान बियाण्याचा लॉट क्रं-12623968 तसेच बॅच क्रमांक-713929 असा आहे, त्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित धानाचे बियाणे हे विरुध्दपक्ष क्रं 2 विक्रेता यांचे कडून विकत घेतल्याची बाब सिध्द होते.
11. विरुध्दपक्ष क्रं 1) बियाणे निर्माता कंपनीने आपले उत्तराचे समर्थनार्थ खालील मा.वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिवाडयाच्या प्रती दाखल केल्यात-
- 2012(3) CPR-238 “Mahyco Seed Ltd.-Versus-Shard Motiram Kankale.
- 2014 (1) CPR-543 “Maharashtra Hybrid Seeds –Versus-Garapati Srinivas Rao.
- 2016 (1) CPR-371 “Mahyco Vegitable Seeds Ltd.-Versus-Ishwarbhai Baburao Thakar.
- 2015(2)CPR-670 “Indian Farmers Fertilizaers Co-Op.Ltd.-Versus-Jagadish.
- 2016 (2) CPR-140 “M/s Rasi Seeds Pvt.Ltd.-Verus-M/s.Diwan chand and Anr.
- 2016 (4) CPR-755 “Prena-Versus-M/s Seeds works India Pvt. Ltd.”
- 2017 (2) CPR-238 “Kuber Agro Corporation-Versus-Guruneet Singh & others.
- 2018(2) CPR-398 “Zimidara Agro Center & Anr.-Versus-Sukhadeo Singh and Another.
उपरोक्त नमुद मा.वरिष्ठ न्यायनिवाडयांचे आम्ही सुक्ष्मरित्या वाचन केले, त्यामधील थोडक्यात सारांश असा आहे की, पिक उत्पादनाची घट येण्यासाठी अन्य कारणे सुध्दा आहेत, ज्यामध्ये अयोग्य जमीनीची प्रत, किटकनाशके व खतांचे मात्राचा जास्त वापर, अयोग्य हवामान, अपुरा पाऊस, अयोग्य तापमान इत्यादी घटक आहेत. तसेच केवळ मोका पाहणी अहवाला व्यतिरिक्त बियाणे दोषपूर्ण असल्या बाबत शास्त्रज्ञांचा त्याच बरोबर प्रयोगशाळे कडून सक्षम पुरावा दाखल करणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले.
हातातील प्रकरणात तक्रारदारांनी शेतीची योग्य मशागत केली, योग्य मात्रे मध्ये खते व किटकनाशके दिलीत, पिकाला बोअरवेलव्दारे योग्य प्रमाणात पाणी पुरवठा केला या बाबत सक्षम पुरावा दाखल केला. तापमान चांगले असलयामुळे धान पिकांची वाढ सुध्दा झाली परंतु रोपांमध्ये 60 टक्के गर्भधारणा झालेली नसल्याने अपेक्षीत उत्पादनामध्ये 60 टक्के घट आल्याचा निष्कर्ष तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने काढलेला आहे, ज्यामध्ये कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ इत्यादी व्यक्तींचा समावेश होता. अशाप्रकारे पुरेश्या प्रमाणावर योग्य तो पुरावा ग्राहक मंचा समोर आलेला आहे. ज्या अर्थी धान पिकांची वाढ होऊन त्यात काही अंशी गर्भधारणा झाली परंतु ती केवळ 40 टक्के झाली त्याअर्थी बियाणे हेच दोषपूर्ण होते असा अर्थ काढणे सहज शक्य आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे, त्यामुळे उपरोक्त न्यायनिवाडयांचा विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीला उपयोग होणार नाही.
12. तक्रारदार यांचे तक्रारी प्रमाणे त्यांनी शेतीची योग्य ती मशागत व नांगरणी करुन सदर बियाणे दिनांक-25.11.2016 व 26.11.2016 रोजी शेतात पेरले. शेतातील बोअरवेलने वेळोवेळी पाणी दिले. परंतु काही कालावधी नंतर पिकांना लोंबीच व गर्भधारणा झाली नाही .धानाचे उत्पादनाची कापणी मे महिन्यात करण्यात आली होती परंतु तक्रारदारांना फक्त 08 क्विंटल एवढेच निकृष्ट दर्जाचे उत्पादन झाले. सदर निकृष्ट धानाचे बियाण्या बाबत तक्रारदार यांनी कृषी अधिकारी, पवनी, तालुका पवनी, जिल्हा भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-25 एप्रिल, 2017 रोजी लेखी तक्रार दिली होती, ती पान क्रं 15 व 16 वर दाखल आहे. त्यानुसार अध्यक्ष, तालुका तक्रार निवारण समिती तथा उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा आणि विद्यापीट व महाबीज अकोला यांचे प्रतिनिधी यांनी उभय पक्षांचे उपस्थितीत तसेच उपस्थित पंचा समक्ष दिनांक-05 मे, 2017 रोजी प्रत्यक्ष मोक्यावर अर्जदारांचे शेताची पाहणी केली आणि त्याच दिवशी अहवाल तयार केला. सदरचा अहवाल पान क्रं 17 ते 21 वर दाखल आहे. तालुका तक्रार निवारण समितीने आपल्या अहवालात असे नमुद केले की, बियाणे निर्माता कंपनीचे माहितीपत्रका प्रमाणे पिकाचा कालावधी 120 ते 125 दिवस असताना सदर धान पिकास 159 दिवस उलटूनही धान पिक पूर्णपणे परिपक्व झालेले नाही व परिपक्व होण्यास अजूनही 15 ते 20 दिवस लागणार आहेत त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिलेली तक्रार योग्य आहे व त्यामुळे तक्रारकर्ता यांचे आर्थिक नुकसान संभवते असा शेरा नमुद केलेला आहे. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीचे अहवालावर संबधित अधिकारी व पंचाच्या तसेच बियाणे निर्माता कंपनीच्या प्रतिनिधीच्या सहया आहेत.
13. तालुका स्तरीय तक्रार निवारण समितीच्या अहवालात विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीचे एकूण 09 किलो बियाणे विकत घेतल्याचे नमुद असून लागवड 0.60 हेक्टर आर क्षेत्रात केल्याचे नमुद आहे तसेच पूर्व मशागत केल्याचे नमुद असून पारंपारीक रोवणी प्रमाणे दिनांक-26.11.2016 रोजी पेरणी केल्याचे नमुद आहे. पेरणीची तारीख 26.11.2016 अशी नमुद असून सिंचनाची सुविधा बोअरवेलव्दारे असल्याचे नमुद आहे. पिकास दिलेल्या खताचा तपशिल युरीया आंतरमशागत, किटकनाशकाचा वापर केल्याचे नमुद असून धानामध्ये फलधारणा झाली परंतु धान 60 टक्के भरले नाही त्यामुळे 60 टक्के घट अपेक्षीत असल्याचे नमुद केलेले आहे. तक्रारदारांनी सुध्दा औषधी किटकनाशके पिकास दिल्याचे अहवालात नमुद आहे.
14. तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती मध्ये उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा जे अध्यक्ष आहेत तसेच महाबिजचे अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती, कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ इत्यादींचा समावेश असतो. सदर समितीचे गठन महाराष्ट्र शासनाचे परिपत्रका नुसार करण्यात आलेले आहे आणि त्यांचे अहवालात तक्रारदार शेतक-यांनी पारंपारीक पध्दतीने शेती केलेली असून शेतीची योग्य ती मशागत केल्याचे तसेच पिकांना योग्य प्रमाणावर पाणी, खते, किटकनाशके दिल्याचे नमुद केलेले आहे, त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीने आपले लेखी उत्तरात नमुद केले की, योग्य पाणी पुरवठा, किटकनाशके, खते, योग्य ती मशागत हे घटक पिकासाठी महत्वाचे आहेत तयासंबधी पुरावा द्यावा. परंतु पिकासाठी या सर्व घटकांची पुर्तता तक्रारदारांनी पूर्ण केली असल्याचे सदर अहवालात नमुद केलेले आहे तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने विरुध्दपक्षक्रं 1 बियाणे निर्माता कंपनी निर्मित धान हे बियाणे पूर्ण कालावधी होऊन सुध्दा पूर्णपणे फळधारणा झालेली नसून धान 60 टक्के दाणे भरले नसल्याने 60 टक्के घट अपेक्षीत असल्याचे नमुद केलेले आहे. सदर तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती ही शासना मार्फत निर्माण केलेली निःपक्ष समीती असून त्यामध्ये शासनाचे अधिकारी व शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी दिलेल्या अहवालावर ग्राहक मंचास विश्वास न ठेवण्याचे कोणतेही प्रयोजन उदभवत नाही.
15. विरुध्दपक्ष क्रं 1 सिजेंटा इंडीया लिमिटेड या बियाणे निर्माता कंपनीचे माहितीपत्रक तक्रारदारांनी पान क्रं 32 वर पुराव्यार्थ दाखल केले, त्यामध्ये बियाण्याचे प्रमाण एक एकर साठी 5 ते 6 किलो असल्याचे नमुद आहे. तक्रारदारांनी दिड एकरात पेरणी केलेली असलयामुळे एकूण 9 किलो विकत घेतलेले बियाणे योग्य प्रमाणात आहे तसेच पिक फक्त 120-125 दिवसात कापणीसाठी तयार असल्याचे सुध्दा नमुद केलेले आहे.
16. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांना रजिस्टर पोस्टाने धानाचे पिकामुळे झालेल्या नुकसानी बाबत दिनांक-19.05.2017 रोजी रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या नोटीसच्या प्रती पुराव्यार्थ दाखल केली तसेच वि.प.क्रं 1 व 2 यांना नोटीस मिळाल्या बाबत रजि.पोस्टाच्या पोच, पुराव्यार्थ अभिलेखावर दाखल केल्यात. विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीने नोटीसला दिलेले उत्तर दाखल केले.
17. तालुका स्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीच्या अहवाला प्रमाणे उभय तक्रारदारांना विरुध्दपक्ष क्रं 1 सिंजेटा इंडीया लिमिटेड निर्मित धानाचे बियाण्याची दिड एकर शेतीमधील क्षेत्रात पेरणी करुन आणि योग्य ती मशागत करुन तसेच योग्य मात्रेत खत व किटकनाशक औषधी देऊन सुध्दा अपेक्षीत उत्पन्न आले नाही. अपेक्षीत उत्पादनाच्या 60 टक्के घट झाली त्यामुळे उभय तक्रारदारांचे अपेक्षीत उत्पन्नाचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे कंपनी निर्मित धानाचे बियाणे तक्रारदारांना विकून दोषपूर्ण सेवा दिली तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 निर्माता कंपनीने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची बाब सिध्द होते.
18. तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 धान निर्माता कंपनीचे वाणाचे प्रती एकरी 40 क्विंटल अपेक्षीत उत्पादन येते परंतु असे अपेक्षीत उत्पादन येते या बाबत कोणताही सक्षम असा लेखी पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. तक्रारदारांचे म्हणण्या प्रमाणे त्यांना केवळ 08 क्विंटल एवढेच उत्पादन दिड एकरामध्ये झाले या बाबत सुध्दा कोणताही लेखी पुरावा दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदार यांना त्यांचे शेतात एकरी 40 क्विंटल धानाचे उत्पादन येते हे दर्शविण्यासाठी मागील वर्षाचे कोणतेही दस्तऐवज दाखल केलेले नाहीत, केवळ विरुध्दपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेत्याने त्यांना एकरी 40 क्विंटल धानाचे उत्पादन येत असल्याची खात्री दिली होती हे तक्रारदार यांनी तक्रारीतून केलेले विधान जसेच्या तसे कोणताही सक्षम असा पुरावा नसताना ग्राहक मंचा व्दारे स्विकारणे अयोग्य आहे, त्यामुळे तक्रारदारांची पारंपारीक शेती पध्दती आणि बोअरवेलव्दारे केल्या गेलेले जलसिंचन आणि केलेली मशागत, रासायनिक औषधी व किटकनाशकाचा केलेला वापर पाहता ग्राहक मंचा तर्फे धानाचे प्रति एकर सरासरी 18 क्विंटल एवढे अपेक्षीत उत्पन्न हिशोबात धरण्यात येते, त्यानुसार तक्रारदारांचे दिड एकर शेतीसाठी 27 क्विंटल अपेक्षीत उत्पादन हिशोबात धरण्यात येते. तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीच्या अहवाला प्रमाणे अपेक्षीत उत्पादनाच्या 60 टक्के घट आल्याची बाब लक्षात घेता 16 क्विंटल 20 किलोग्रॅम एवढया उत्पादनाची घट आलेली आहे.
19. सन 2016 चे हंगामात जे धानाचे उत्पादन झाले ते धान शासकीय विक्री केंद्रात प्रतीक्विंटल दर रुपये-1600/- प्रमाणे असून त्यावर शासना कडून त्या वर्षा करीता प्रतीक्विंटल रुपये-200/- बोनस मिळालेला आहे. यानुसार प्रतिक्विंटल दर आणि बोनस हिशोबात घेतले तर प्रतीक्विंटल दर 1800/- एवढे येते. त्या हिशोबा नुसार तक्रारदार यांना 16 क्विंटल 20 किलोग्रॅमसाठी रुपये-29,160/- एवढी नुकसान भरपाई अपेक्षीत उत्पन्नासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीकडून मंजूर करणे योग्य व न्यायोचित आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 निर्मित दोषपूर्ण बियाण्यामुळे तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- एकूण रुपये-15,000/- विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनी कडून तक्रारदारांना मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे मंचाचे मत आहे. विरुदपक्ष क्रं 2 बियाणे विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं 3 कृषी अधिकारी यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिल्याचे तक्रारदारांचे म्हणणे नाही वा तसा कोणताही पुरावा ग्राहक मंचा समोर आलेला नसल्याने त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
20. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-
:: आदेश ::
- तक्रारदारांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 सिजेंटा इंडीया लिमिटेड या धान बियाणे निर्माता कंपनी यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं (1) सिजेंटा इंडीया लिमिटेड या धान निर्माता कंपनीने धानाचे अपेक्षीत उत्पन्नाचे नुकसानीपोटी तक्रारदार यांना रुपये-29,160/- (अक्षरी एकोणतीस हजार एकशे साठ फक्त) एवढी नुकसान भरपाईपोटीची रक्कम प्रस्तुत तक्रार दाखल दिनांक-12.07.2017 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्के व्याज दरासह अदा करावी.
- विरुध्दपक्ष क्रं-(1) बियाणे निर्माता कंपनीने तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 बियाणे निर्माता कंपनीने प्रस्तुत निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- सदर अंतिम आदेशातील मुद्या क्र. 2 मधील धानाचे अपेक्षीत उत्पन्नापोटी नुकसान भरपाईची रक्कम विरुध्द पक्ष क्रं. 1 बियाणे निर्माता कंपनीने तक्रारदारांना विहीत मुदतीत न दिल्यास, विरुध्दपक्ष क्रं. 1 निर्माता कंपनी ही नमुद नुकसान भरपाईची रक्कम मुदती नंतर पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने दंडनीय व्याजासह येणारी रक्कम तक्रारदारांना अदा करण्यास जबाबदार राहिल.
- निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- तक्रारदारांना “ब” व “क” फाईल्स परत करण्यात याव्यात.