निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार पेन्शनर असुन गैरअर्जदार क्र.1 ही कुरिअर सेवा देणारी कंपनी आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपली शाखा आदर्श नगर बीड येथे उघडली आहे. ती गैरअर्जदार क्र.2 चालवतात.
तक्रारदाराचा मुलगा मो.जुनेद याने सिव्हील इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला असून तो नोकरीच्या शोधात आहे. त्यांना समजल की, श्री.जहरुल हसन यांचे मुलीची मुंबई येथे कन्स्ट्रक्शनप कंपनी आहे म्हणून मो.जुनेद यांचे शैक्षणीक कागदपत्रे व बायोडाटा “ श्रीमान जहरुल हसन सेवा निवृत्त नायब तहसीलदार, 215, जवाहर कॉलनी, धार रोड, परभणी ” या पत्त्यावर दि.06.07.2012 रोजी गैरअर्जदार यांच्या कुरिअर कंपनी मार्फत पाठवले. गैरअर्जदार यांनी त्यांची रु.20/- फि घेतली व दिलेल्या पत्त्यावर कुरिअर दोन दिवसांत मिळेल अशी हमी दिली. तक्रारदार यांनी दि.10.07.2012 रोजी श्रीमान हसन यांना कुरिअर मिळाले का यांची चौकशी केली असता त्यांना सदर कुरिअर मिळाले नाही असे समजले. तक्रारदारांनी गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे फोनवर चौकशी केली. तेव्हा त्यांनी तुमचे कुरिअर चुकीने पुणे येथे गेले आहे. आम्ही दोन दिवसांत ते दिलेल्या पत्त्यावर पोहोचते करु असे सांगितले.
दि.20.07.2012 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांच्या ऑफिसवर गेला असता तुमचे कुरिअर परत आले आहे असे सांगून त्यांनी एक बंद लिफाफा तक्रारदारांना दिला. तक्रारदाराने घरी जाऊन पाहिले असता सदर लिफाफा अर्जदाराचा नव्हता व त्यात कागदपत्रेही नव्हती.
गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराच्या मुलाची कागदपत्रे योग्य त्या व्यक्तीकडे न पोहोचवल्याने त्याला नौकरी पासून वंचित रहावे लागले. अर्जदाराने निष्काळजीपणाने वागून सेवेत कसूर केलेली आहे.
तक्रारदाराने दि..21.09.2012 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून रु.25,000/- एवढया नुकसान भरपाईची मागणी केली परंतु गैरअर्जदार क्र.1 व 2 यांस नोटीस मिळूनही त्यांनी तक्रारदाराची मागणी फेटाळून लावली. म्हणून सदरच्या तक्रारीद्वारे तक्रारदार मंचासमोर येऊन शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- ची मागणी करत आहेत.
गैरअर्जदार क्र.1 व 2 मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल कले. त्यांच्या लेखी म्हणण्यानुसार या मंचाला सदरची तक्रार चालवण्याचा अधिकार नाही. तक्रारदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक नाही. त्यांनें गैरअर्जदारांकडून कोणतीही सेवा घेतलेली नाही. तक्रारदाराने गैरअर्जदाराला Carriage By Road Act,. 2007 नुसार आवश्यक असणारी नोटीस पाठवलेली नाही. तक्रारदाराने मागितलेली नुकसान भरपाई रु.25,000/- अवाजवी आहे. त्यांच्या पृष्टयर्थ त्याने काहीही पुरावा दिलेला नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार खारिज करण्यात यावी.
तक्रारदाराचे वकील श्री.तांगडे यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. गैरअर्जदारांना संधी देऊनही ते युक्तीवादासाठी गैरहजर राहिले.
तक्रारदाराच्या वकिलांनी दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले.
तक्रारदारांच्या वकिलांनी गैरअर्जदारांतर्फे मंहमद जहरुल, परभणी यांच्या नांवाने दाखल केलेली कुरिअरची पावती दाखल केली आहे. त्यात त्यांनी रु.20/- कुरिअर फि दिल्याचे दिसते आहे. त्याचप्रमाणे त्यांनी गैरअर्जदार यांनी त्यांना परत केलेले पाकीट ही दाखल केले आहे. त्यावरा सय्यद मतीन कुरेशी असे नांव आहे व गुलजार कॉलनी, धार रोड असा पत्ता आहे व उपरोक्त पावतीची कार्बन कॉपी त्यांला जोडलेली आहे.
गैरअर्जदारांनी तक्रारदाराकडून रु.20/- एवढी फि घेतलेली दाखल पावती वरुन दिसते. त्यावरुन तक्रारदारांनी गैरअर्जदारांकडून सेवा विकत घेतली होती ही बाब स्पष्ट होते. दाखल पावती वरील पत्ता महंमद जहरुल, परभणी असा होता व प्रत्यक्षात गैरअर्जदारांनी तक्रारदाराला परत केलेल्या पाकीटावर सय्यद मतीन कुरेशी असा वेगळाच पत्ता दिसतो आहे. म्हणजे गैरअर्जदाराने तक्रारदाराकडून रु.20/- एवढी फि घेतली परंतु त्याचे पत्र योग्य त्या व्यक्तीला पोहोचवलेच नाही. तसेच शेवटी तक्रारदाराला दुस-याच व्यक्तीच्या नांवाचे पाकिट त्यांना परत केले. तक्रारदारांनी कुरिअर केलेल्या मुळ पाकिटाचे काय झाले यांचा काहीही उल्लेख गैरअर्जदारांच्या लेखी जवाबात नाही. यासर्व विवेचनावरुन गैरअजर्दार क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला दयावयाच्या सेवेत कसूर केलेली आहे असे मंचाचे मत आहे.
तक्रारदार म्हणतात की, त्यांनी पाठवलेल्या पाकीटात त्यांच्या मुलाचा बायो-डाटा इ. शैक्षणीक कागदपत्रे व नोकरीसाठीचा अर्ज इ. कागदपत्रे होती. ती गहाळ झाली व त्यांचे मुलाला नोकरीपासून वंचित रहावे लागले. परंतु पाकीटात केवळ नोकरीसाठीचा अर्ज होता. मुलाखतीसाठीचे बोलावणे अथवा नेमणूक पत्र अशी नोकरीची निश्चिती सांगणारी कागदपत्रे नव्हते. त्यामुळे तक्रारदार यांनी मागितलेलेली रु.25,000/- एवढी नुकसान भरपाईची रक्कम तक्रारदाराला देता येणार नाही असे मंचाचे मत आहे.
परंतु गैरअर्जदारांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत निश्चितपणे कसूर केलेला आहे. कुरिअरच्या पाकीटाचे काय झाले. यांची चौकशी करण्याकरता तक्रारदारांना वारंवार गैरअर्जदारांकडे खेपा घालावयास लागल्या. त्यामुळे त्यांना शारीरिक व मानसिक त्रासही सहन करावा लागला. म्हणून नुकसान भरपाईची एकत्रित रक्कम म्हणून त्यांना रु.5,000/- देणे न्यायोचित ठरेल असे मंचाचे मत आहे. तसेच सदरच्या तक्रारीचा खर्च म्हणून रु.2,000/- देणे न्यायोचित ठरेल असे मंचाला वाटते.
सबब, मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी नुकसान भरपाई रक्कम
म्हणून तक्रारदारांना रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त)
एवढी रक्कम आदेश मिळाल्यापासून तिस दिवसांचे आंत द्यावी.
3. सदर रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास 9 टक्के व्याज दरासहीत
रक्कम द्यावी.
4. गैरअर्जदारांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना तक्रारीचा
खर्च म्हणून रु.2,000/- (रुपये दोन हजार फक्त) आदेश
मिळाल्यापासून तिस दिवसाचे आत द्यावा.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड