::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 20/05/2016 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .
तक्रारकर्ते यांनी एप्रिल 2013 मध्ये मारुती कंपनीची स्वीफ्ट डिझायर व्ही.डी. हे वाहन विकत घेतले, त्याचा नोंदणी क्र. एमएच 30 ए एफ 2599 असा आहे. त्यावेळी सदर वाहनाचा ईफको टोकिया जनरल इन्शुरंस कंपनी मर्यादित यांचेकडून गाडीचा विमा काढला होता. त्यानंतर तक्रारकर्त्याने सदर वाहनाचा विमा विरुध्दपक्षाकडून काढला, ज्याचा पॉलिसी नंबर 2311200739736600000 असून कार्यकाल दि. 22/4/2014 ते 21/4/2015 असा आहे. दि. 16/6/2014 रोजी वरील गाडीला अपघात होऊन त्यामध्ये काही प्रमाणात गाडीचे नुकसान झाले. तक्रारकर्त्याने संपुर्ण कागदपत्रांसह विरुध्दपक्षाकडे दि. 17/6/2014 रोजी क्लेम दाखल केला. त्यानुसार विरुध्दपक्ष यांचेतर्फे निरीक्षक यांनी नुकसान भरपाईची पाहणी केली व त्यांचा अहवाल विरुध्दपक्षाकडे सादर केला. परंतु विरुध्दपक्ष यांनी दि. 20/8/2014 रोजी तक्रारकर्त्यास पत्र पाठवून नुकसानीची रक्कम देता येणार नाही, असे कळविले. सदर गाडीचा आधी असलेल्या इफको टोकीयो कंपनीच्या पॉलिसीमध्ये “नो क्लेम बोनस” घेतला असल्या कारणाने व सदर पॉलिसी श्री नरेंद्र रमेश भुतीया यांचे नावाने असल्याचे कारणाने सदर दावा नामंजुर करण्यात आला. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 22/9/2014 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून नुकसानाची मागणी केली. परंतु विरुध्दपक्षाने नोटीसची पुर्तता न करता दि. 13/8/2014 रोजी खोटे उत्तर दिले. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार मंजुर करण्यात यावी व तक्रारकर्त्यास सदर गाडी दुरुस्ती खर्चाची रक्कम रु. 18302/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 50,000/- देण्याचा आदेश व्हावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 09 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष यांनी सदर प्रकरणात लेखी जबाब दाखल करुन तक्रारीतील आरोप नाकबुल करुन अधिकचे कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्त्यास प्रकाश एस देशमुख या नावाने सदर पॉलिसी देण्यात आली होती. सदर पॉलिसी ही ईफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनीच्या मागील पॉलिसीवरुन पुढे सुरु करण्यात आली होती, सदर इफको टोकीयो कंपनीची सदर पॉलिसी नरेंद्र रमेश भुडिया या व्यक्तीस इश्यु करण्यात आली होती, त्याचा क्र. 88317433 असा होता, व सदर पॉलिसी तक्रारकर्ता म्हणजेच प्रकाश देशमुख यांच्या नावे ईफको टोकीया कंपनीकडून इश्यु करण्यात आली नव्हती. तक्रारकर्त्याने ह्या गोष्टी जाणीवपुर्वक विरुध्दपक्षापासून लपवून ठेवल्या. तसेच तक्रारकर्त्याने नो क्लेम बोनस बाबत विरुध्दपक्षाकडे खोटे अकाउंट स्टेटमेंट सादर केले. त्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचा क्लेम खारीज केला. म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. तक्रारकर्ते यांची तक्रार, सोबत दाखल कलेले सर्व दस्तऐवज, विरुध्दपक्षाचा लेखी जबाब व तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तीवाद, यांचे काळजीपुर्वक अवलोकन करुन खालील निष्कर्ष, कारणे देवून पारीत केला.
सदर प्रकरणात विरुध्दपक्षाला संधी देवूनही त्यांनी युक्तीवाद केला नाही. त्यामुळे त्यांच्या तर्फे दाखल असलेल्या कागदपत्रांचा विचार अंतीम आदेश पारीत करतांना केला.
या प्रकरणात उभय पक्षाला मान्य असलेल्या बाबी अशा आहेत की, तक्रारकर्ते यांनी त्यांच्या वाहनाचा विमा हा सदर वाहन विकत घेतल्यानंतर पहील्यांदा ईफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्याकडून दि. 22 एप्रिल 2013 ते 21 एप्रिल 2014 या कालावधीकरीता काढला होता. त्यानंतर तक्रारकर्त्याने त्याच गाडीचा विमा दि. 22/4/2014 ते 21/4/2015 या कालावधीकरिता विरुध्दपक्षाकडून काढला होता. ही बाब विरुध्दपक्षाला मान्य असल्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे, असा निष्कर्ष मंचाने काढला आहे. उभय पक्षाला हे देखील मान्य आहे की, सदर गाडीचा अपघात दि. 16/6/2014 रोजी झाला होता. सदर अपघातात गाडीला जे नुकसान झाले, त्याबद्दलचा विमा दावा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दाखल केला होता व विरुध्दपक्षाने गाडीचे नुकसान किती झाले हे पाहण्याकरिता त्यांच्या अधिकृत निरीक्षकास पाठविले होते. विरुध्दपक्षाला हे मान्य आहे की, निरीक्षकांनी त्यांचा अहवाल विरुध्दपक्षाला दिलेला आहे. उभय पक्षात या बद्दल वाद नाही की, विरुध्दपक्षाने पत्र पाठवून तक्रारकर्त्याचा सदर विमा दावा, असे कारण दाखवून नाकारला होता की, तक्रारकर्त्याने त्यांच्या आधीच्या ईफको टोकीयोच्या पॉलिसीमध्ये नो क्लेम बोनस घेतला असल्या कारणाने, तसेच ईफको टोकीयो कंपनीच्या या पॉलिसीची पडताळणी केली असता, असे दिसून आले की, सदर पॉलिसी तक्रारकर्त्याच्या नावे नसून ती नर्मदा रमेश भुडीया च्या नावाने आहे. त्यामुळे ही बाब विरुध्दपक्षाची फसवणुक करणारी ठरते, म्हणून तक्रारकर्त्याचा क्लेम खारीज करण्यात आला.
तक्रारकर्त्याचा यावर असा युक्तीवाद आहे की, त्याने विरुध्दपक्षाची पॉलिसी घेण्याआधी ईफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनीकडील पॉलिसी घेतली होती. त्याबद्दलचे आवश्यक दस्त दाखल केले आहे. त्यामुळे ही विरुध्दपक्षाची सेवा न्युनता आहे. विरुध्दपक्षाने युक्तीवाद केला नाही, तसेच त्यांच्या लेखी जबाबाच्या कथनानुसार कोणतेही दस्तऐवज दाखल केले नाही. या उलट तक्रारकर्त्याने जे दस्त दाखल केले, त्यावरुन विरुध्दपक्षाच्या बचावात मंचाला तथ्य आढळत नाही. कारण तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडील सदर पॉलिसीच्या आधी नमुद वाहनाचीच पॉलिसी नंबर 88317433 ही ईफको टोकीयो जनरल इन्शुरन्स कंपनी लि., कडून तक्रारकर्त्याचे नाव व पत्ता नमुद असलेली दि. 22/4/2013 ते 21/4/2014 पर्यंतच्या कालावधीतील पॉलिसी काढल्याचे दस्त क्र. 3 वरुन दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाची फसवणुक करणारी कोणती कृती केली, हे विरुध्दपक्षाने सबळ पुरावा देवून सिध्द केले नाही. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावरुन ( दस्त क्र. 1 ) असा बोध होतो की, तक्रारकर्त्याला सदर वाहनाच्या दुरुस्तीपोटी रु. 18,302/- इतकी रक्कम बिलानुसार आलेली आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास त्याच्या वाहन विमा दाव्यापोटी गाडी दुरुस्ती खर्चाची रक्कम रु. 18,302/- सव्याज, इतर नुकसान भरपाई व प्रकरणाच्या न्यायिक खर्चासह दिल्यास ते न्यायेाचित होईल. सबब अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे…
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्यास त्याच्या वाहन विम्यापोटी, वाहन दुरुस्ती खर्चाची रक्कम रु. 18,302/- ( रुपये अठरा हजार तिनशे दोन फक्त ) द.सा.द.शे. 8 टक्के व्याज दराने दि. 6/7/2015 ( प्रकरण दाखल तारीख ) पासून प्रत्यक्ष रक्कम अदाई पर्यंत व्याजासहीत द्यावी. तसेच शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पाच हजार फक्त ) व प्रकरणाचा न्यायिक खर्च रु. 2000/- ( रुपये दोन हजार फक्त ) इतकी रक्कम द्यावी.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसात करावे.
4. सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.