निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. श्री. आर.एच.बिलोलीकर, सदस्य)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार सरोज भ्र. गोपाळराव वाघमारे ही निसान मायक्रो कंपनीचे चार चाकी वाहन ज्याचा नोंदणी क्रमांक एम.एच.26/व्ही 6350 ची मालक असून अर्जदार यांनी सदरील वाहनाची पॉलिसी गैरअर्जदार यांचेकडे योग्य ती फी भरुन काढली आहे, ज्याचा पॉलिसी क्रमांक 3362/00788878/000/00 असा असून त्याचा कालावधी दिनांक 27.11.2012 ते 26.11.2013 पर्यंत आहे.
दिनांक 29.11.2012 रोजी नांदेडहून औरंगाबादकडे जात असतांना अचानक अपघाती रोडवरील खडडयात आदळल्यामुळे वाहनाचे जवळपास रक्कम रु.1,50,000/- चे नुकसान झाले. सदरील घटनेची माहिती अर्जदार यांनी लगेचच विमा कंपनीस फोनव्दारे कळविले. त्यानंतर गैरअर्जदार यांनी सर्व्हेअर व लॉस असेसर मार्फत पंचनामा व वाहनाचे किती नुकसान झाले याची पाहणी करुन अहवाल तयार केला. गैरअर्जदार यांचे सुचनेप्रमाणे अर्जदार यांनी वाहन घटनास्थळावरुन काढून नेऊन दुरुस्त केले व सर्व बीले, क्लेम फॉर्म गैरअर्जदार यांचेकडे दाखल केला व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे वाहन दुरुस्तीचे एस्टीमेट प्रमाणे रक्कमेची मागणी केली परंतु गैरअर्जदार यांनी या-ना-त्या कारणाने टाळत राहिले. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे वाहनाचे नुकसानीची मागणी केली तेव्हा दिनांक 04.12.2012 रोजी अर्जदारास गैरअर्जदार यांनी एसएमएस करुन अर्जदाराचा क्लेम रेफरन्स क्रमांक 1108732 असल्याचे कळविले. त्यानंतर अर्जदाराने ब-याचवेळा गैरअर्जदार यांचेशी संपर्क केला असता तुमचा क्लेम अंडर प्रोसेस आहे असे वेळोवेळी कळविले. शेवटी दिनांक 08.01.2013 रोजी पत्र पाठवून “You had not given us any opportunity to inspect the vehicle immediately following the accident” म्हणून वाहनाचा क्लेम देणेस नाकारले. अर्जदाराने घटना घडल्यानंतर लगेचच गैरअर्जदार यांना घटनेची माहिती दिली व त्यांच्या सुचनेप्रमाणे अर्जदार यांनी वाहन घटनास्थळावरुन काढून नेऊन दुरुस्त केले. गैरअर्जदार यांचे सर्व्हेअर व लॉस असेसर यांनी घटनास्थळावर येऊन पाहणी केली तरीपण चुकीच्या व बेकायदेशीररीत्या अर्जदाराचा क्लेम नामंजूर करुन गैरअर्जदार यांनी अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. त्यामुळे अर्जदार कर्जबाजारी झाला आहे व त्याला मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी विम्याची रक्कम रु.1,50,000/- दिनांक 29.11.2012 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह गैरअर्जदार यांचेकडून अर्जदारास देण्याचा आदेश करावा अशी मागणी केली आहे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार नोटीस तामील झाल्यानंतर तक्रारीत हजर झाले परंतु संधी देऊनही व गैरअर्जदार यांनी आपला लेखी जबाब व शपथपत्र तक्रारीत दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांचेविरुध्द ‘’नोसे’’ चा आदेश पारीत करण्यात आला.
5. गैरअर्जदार यांनी ‘’नोसेचा’’ आदेश रद्य करणेसाठी अर्ज केला. परंतु सदर अर्ज नामंजूर करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
6. अर्जदार सरोज भ्र. गोपाळराव वाघमारे ही गैरअर्जदार यांची ग्राहक आहे हे अर्जदार यांनी दाखल केलेल्या पॉलिसी शेडयुल्ड कम सर्टीफीकेट च्या प्रतीवरुन स्पष्ट आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे त्यांचे वाहन क्रमांक एम.एच.26/व्ही 6350 ला झालेल्या नुकसानीची भरपाई मागीतली होती. त्यावर गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 08.01.2013 रोजी पत्र पाठवून “You had not given us any opportunity to inspect the vehicle immediately following the accident” असे कारण देऊन अर्जदारास विमा रक्कम देण्यास इन्कार केला. अर्जदाराने मंचात अर्ज दिला की, गैरअर्जदार यांनी सदर प्रकरणातील सर्व्हेअरचा अहवाल सादर करणेसाठी आदेश करावा. सदर अर्जावर मचाने दिनांक 05.12.2014 रोजी आदेश पारीत करुन सदर अहवाल पुढील तारखेपर्यंत दाखल करण्याचा आदेश दिला होता. परंतु गैरअर्जदार यांनी सदर अहवाल दाखल केलेले नाही किंवा सर्व्हेअरची नेमणुक केलेली नाही असेही सागितलेले नाही. याउलट अर्जदाराने तक्रारीतील परिच्छेद क्र. 5 मध्ये सर्व्हेअरची नियुक्ती केलेली असल्याचे सांगितलले आहे. त्यामुळे गैरअर्जदार यांनी दावा नाकारण्याचे दिलेले कारण चुकीचे व अयोग्य आहे.
सदर अहवाल मंचासमोर नसल्यामुळे अर्जदाराच्या वाहनाचे नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज येत नाही. अर्जदारानेही त्याच्या वाहनास दुरुस्तीसाठी लागलेल्या खर्चाची बीले दाखल केलेली नाहीत. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे वाहनाचे नुकसान भरपाईबद्दल सर्व्हेअरच्या अहवालानुसार रक्कम आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत द्यावीत.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
5. वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारांनी निकालाच्या तारखेपासून 45 दिवसांच्या आत मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी ठेवण्यात यावे.