::: आ दे श :::
( पारित दिनांक : 27/12/2017 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये विरुध्द पक्षाने दोषपूर्ण सेवा पुरविल्याचे नमूद करुन, दाखल केलेली आहे.
तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिऊत्तर व उभय पक्षाचा लेखी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निर्णय पारित केला.
2) तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद असा आहे की, त्यांचे विरुध्द पक्षाच्या बॅंकेत खाते आहे. त्यातून विरुध्द पक्ष बॅंकेकडून पिक कर्ज व शासनाकडून मिळणारे लाभ घेत असतो. तक्रारकर्त्याने त्याच्याकडे असलेल्या शेत जमीनीबाबत विरुध्द पक्षाकडे सन 2013-14 च्या हंगामा करिता पिकविमा म्हणून दिनांक 12/08/2014 रोजी 11.00 हेक्टर आर जमिनीवर रुपये 3,520/- पिकविमा भरला होता व शेतात सोयाबीन, तूर, उडीद पिके पेरली होती. परंतु सन 2013-14 च्या हंगामामध्ये नापिकीमुळे पिकाचे ऊत्पन्न झाले नाही. तक्रारकर्त्या सोबत पिकविमा भरलेल्या सर्व कास्तकारांना विम्याची रक्कम विरुध्द पक्षाने दिलेली आहे. परंतु तक्रारकर्त्यास विमा रक्कम देण्यास विरुध्द पक्ष टाळाटाळ करीत आहे. तक्रारकर्त्याने दिनांक 28/12/2015 रोजी माहिती अधिकाराअन्वये माहिती मागवुन पिक विम्याची रक्कम मिळावी व पिक विमा भरलेली पावती मिळावी, यासाठी अर्ज केला होता. परंतु विरुध्द पक्षाने कोणतीही माहिती दिली नाही. ही सेवा न्युनता आहे. म्हणून प्रार्थनेनुसार तक्रार मंजूर करावी, अशी विनंती, तक्रारकर्त्याने केली आहे.
3) यावर विरुध्द पक्षाचा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्ते त्यांचे खातेदार आहे. परंतु त्यांनी दिनांक 12/08/2014 रोजी किंवा त्या कालावधीत पिकविम्याची रक्कम ( प्रिमीयम ) त्यांचेकडे जमा केलेली नाही व ती रक्कम भरल्याशिवाय विमा लाभ मिळू शकत नाही, व विमा रक्कम मिळण्यासाठी तक्रारकर्ता या विरुध्द पक्षाचा ग्राहक होऊ शकत नाही. विरुध्द पक्षाने दिनांक 01/08/2014 ते 19/08/2014 पर्यंतचा बचत खात्याचा खाते ऊतारा दाखल केला आहे, त्यावरुन देखील दिसून येते की, तक्रारकर्त्याने विमा रक्कम जमा केली नाही, म्हणून तक्रार खारिज करावी.
4) अशाप्रकारे उभय पक्षांचा युक्तिवाद एैकल्यानंतर मंचाचे यावर असे मत आहे की, तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर सन 2013-14 चा पिकविमा मिळण्यासाठी विमा राशी विरुध्द पक्षाकडे भरली होती का? ही बाब तक्रारकर्ते येनकेन प्रकारे मंचासमोर सिध्द करु शकले नाही. विरुध्द पक्षाने दिनांक 01/08/2014 ते 19/08/2014 पर्यंतचा तक्रारकर्त्याचा बचत खात्याचा ऊतारा दाखल केला आहे. त्यातून देखील, तक्रारकर्त्याने पिक विमा प्रिमीयम रक्कम विरुध्द पक्षाकडे भरल्याचा बोध होत नाही. तक्रारकर्ते यांनी संबंधीत विमा कंपनीला पक्ष केले नाही. तसेच तक्रारकर्ते यांनी माहिती अधिकाराखाली विरुध्द पक्षाकडून पिक विमा रक्कम भरल्याची पावती मिळावी, असा अर्ज केला, असे तक्रारकर्ते यांचे म्हणणे आहे. परंतु रेकॉर्डवर त्या अर्जाची प्रत दाखल नाही किंवा त्यावर विरुध्द पक्षाने कोणतीही माहिती दिली नसल्यावर, तक्रारकर्ते यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार विरुध्द पक्षावर अपीलीय कार्यवाही करता आली असती. त्यामुळे तक्रारकर्ते विरुध्द पक्षाचे खातेदार/ग्राहक जरी असले तरी, पिकविमा मिळण्यासाठीच्या कार्यवाहीबद्दल तक्रारकर्ते यांच्याजवळ पिकविमा राशी भरल्याची पावती नसल्यामुळे त्याबद्दल विरुध्द पक्षाचे ग्राहक होवू शकत नाही. म्हणून तक्रारकर्ते यांची तक्रार खारिज करणे, क्रमप्राप्त ठरते.
सबब, अंतिम आदेश खालीलप्रमाणे पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार, सिध्दतेअभावी खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यांत येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निःशुल्क पुरवाव्या.
( श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri