जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 63/2011 तक्रार दाखल तारीख –02/05/2011
भिमराव पि.लक्ष्मण लाड
वय 60 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.राहेरी ता.गेवराई जि.बीड
विरुध्द
1. मा.शाखा व्यवस्थापक,
भुविकास बँक मुंबई
उप शाखा गेवराई ता.गेवराई जि.बीड सामनेवाला
2. व्यवस्थापक,
बीड जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउददेशीय
विकास बँक, मुंबई, मुख्य शाखा बीड.
3. मा.जिल्हा उपनिबंधक,
महाराष्ट्र सहकारी संस्था, बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एल.वाय.कूलकर्णी
सामनेवाला क्र.1 ते 3 तर्फे ः- अँड.एम.एम.जायगुडे
निकालपत्र
(घोषित द्वारा ः- अजय भोसरेकर,सदस्य)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा राहेरी ता.गेवराई येथील रहिवासी असून तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांचेकडून शेती सुधारणा करण्यासाठी पाईपलाईन करिता कर्ज दहा वर्षाच्या फेडीच्या तत्वावर 1996 साली कर्ज घेतले. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांस कर्जाची रक्कम रु.40,700/- एवढे कर्ज मंजूर केली. त्यापोटी तक्रारदाराने त्यांचा गट क्रमांक 217 व 221 या शेत जमिनीचे गहाण खत करुन दिले. तक्रारदाराने 1998 ते 2007 या दरम्यान भरलेली रक्कम रु.69,233.60 पैसे भरणा केली आहे. 2008 साली केंद्र शासनाच्या कृषी थकीत कर्ज माफी योजना अंतर्गत तक्रारदारास रु.62,024/- थकबाकी पोटी माफी मिळाली आहे व तक्रारदाराने रु.69,233.60 एवढी रक्कम परतफेड केलेली असल्यामुळे तक्रारदारास सामनेवाला क्र.1 यांचे बददल संशय उत्पन्न झाला व हिशोबाची मागणी केली. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास हिशोबाचा बँक खाते उतारा दिला नाही. त्याऐवजी सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.3 यांना खोटी माहीती दिली व त्याआधारे सामनेवाला क्र.3 यांनी तक्रारदारास दि.03.06.2010 रोजी सामनेवाला क्र.3 यांचे कार्यालयात हजर राहून तक्रारदाराकडे रक्कम रु.15,551/- एवढी थकबाकी असल्याची नोटीस पाठविली. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास दि.24.3.2009 रोजी रक्कम रु.18,962/- एवढया रुपयाची मागणी करणारी नोटीस पाठविली. त्यामुळे तक्रारदारास सदर तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले म्हणून तक्रारदारांने या न्यायमंचात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांनी बेबाकी प्रमाणपत्र दयावे, तसेच सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी तक्रारदारास मानसिक त्रास दिला म्हणून नूकसान भरपाईपोटी रु.1,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.7500/-मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले लेखी म्हणणेचे पृष्टयर्थ तिन कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी आपले लेखी म्हणणे दि.15.09.2011 रोजी दाखल केले असून त्यात त्यांनी तक्रारदास 1996 साली प्रतिवर्ष एक हप्ता याप्रमाणे 11 हप्त्यामध्ये परतफेड करण्याचे कराराने रक्कम रु.40,700/- एवढे कर्ज तक्रारदारास शेती सुधारणासाठी पाईपलाईन करिता मंजूर केले. त्यांचा प्रतिवर्ष हप्ता रक्कम रु.7776.54 एवढा ठरला. त्यानुसार तक्रारदारांने सामनेवाला क्र.1 यांचेकडे 2007 पर्यत रु.70,315/- भरणा केली आहे असे म्हटले आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी शिखर बँकेचे परिपत्रक क्रमांक 2004-2005/165 दि.05.08.2004 च्या आधारे थकीत कर्जदाराच्या कर्ज खात्याची पुर्नगठन करण्याचे निर्देश प्राप्त झाले म्हणून तक्रारदाराचे मुळ खाते क्रमांक 55/56 यातुन तक्रारदाराचे 2004 पर्यतचे थकीत कर्ज व व्याज सदर परिपत्रकाच्या आधारे पूर्नगठन योजने अंतर्गत तक्रारदाराचे नवीन खाते क्रमांक 62/24 अन्वये दि.31.01.2008 पर्यत तक्रारदाराची थकीत रक्कम रु.11,916/- एवढी भरणे होती. त्यानुसार हा 2008 च्या केंद्र शासनाच्या शेतकरी थकबाकीदार कर्ज माफी योजनेनुसार तक्रारदार हा रु.11,076/- एवढया माफीस पात्र झाला.व उर्वरित रु.840/-बँकेने तक्रारदारास सुट देऊन खाते क्रमांक 62/24 हे पुर्णपणे कर्जमुक्त झाले.
तक्रारदाराने 1998 ते 2007 या दरम्यान रक्कम भरणा केली परंतु तक्रारदार हा प्रत्यक्ष 2008-2009 या कालावधीचे दोन हप्ते भरण्यास पात्र असताना ते त्यांने भरले नाही म्हणुन सामनेवाला क्र.1 यांनी सामनेवाला क्र.3 यांच्या मार्फत सहकार संस्था अधिनियम 1960 च्या कलम 137 (1) अन्वये नोटीस देऊन तक्रारदाराकडून दि.31.1.2009 रोजी रक्कम रु.15,551/- एवढे येणे आहे या संबंधी तक्रारदाराचे म्हणणे ऐकण्यासाठी सामनेवाला क्र.3 यांचे कार्यालयात दि.3.6.2010 रोजी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानंतर सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदाराकडून रक्कम वसुली करण्याच्या उददेशाने खाते क्र.55/56 यासाठी सामनेवाला क्र.3 यांचेमार्फत दि.24.9.2009 रोजी 65/2009 नुसार रक्कम रु.18,962/-दाखवुन वसुलीसाठीचे प्रमाणपत्र सामनेवाले क्र.3 यांनी सामनेवाला क्र.1 यांना दि.21.7.2010 रोजी दिले.
तक्रारदार हा थकीत कर्जदार आहे व तक्रारदाराकडून सन 2008 व 2009 या दोन वर्षाचे प्रतिवर्ष रु.7776.54 पैसे एवढी रक्कम तक्रारदाराकडून येणे असल्याचे तक्रारदाराने सामनेवाला यांना थकीत दोन हप्ते व कर्ज माफीची सविस्तर माहीती घेऊन सदर दोन थकलेले हप्ते 15 दिवसांत भरण्याबददलची हमी दि.23.03.2009 रोजी सही करुन सामनेवाला क्र.1 यांचे हक्का मध्ये लिहून दिली आहे. याबददलचे पत्र सामनेवाले क्र.1 यांनी न्यायमंचात दाखल केले आहे. तक्रारदाराने चुकीची तक्रार दाखल केलेली असल्यामुळे व बँकेचे उर्वरित थकीत हप्ते भरावे लागु नये अशा उददेशाने दाखल केलेली असल्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणण्याचे पृष्टयर्थ एकूण आठ कागदपत्र दाखल केली आहेत.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतचे कागदपत्रे, सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व सोबतचे कागदपत्रे, दोघांचा तोंडी युक्तीवाद ऐकून त्यांचे बारकाईने अवलोकन केले असता,
तक्रारदार यांने सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.40,700/- हे 11 वर्ष 23 महिने या मुदतीच्या तत्वावर व सन 1998 ते 2009 या कालावधीसाठी प्रतिवर्ष रु.7776.54 पैसे एवढया रक्कमेच्या हप्त्याने परतफेड करण्याचे ठरले होते. तक्रारदाराने या कालावधीत सन 1999 व 2001 या दोन वर्षाचे हप्ते भरल्याचे दिसुन येत नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास सन 2008 च्या केंद्र शासन शेतकरी थकबाकीदार कर्जदाराचे माफी योजने अंतर्गत व शिखर बँकेच्या परिपत्रक 2004-2005/165 दि.5.8.2004 च्या थकबाकीदार कर्जदाराचे पुर्नगठन अंतर्गत तक्रारदाराचे रु.11916/- सामनेवालेचे येणे होते. त्यापोटी सामनेवाले यांनी तक्रारदाराचे 62/24 असे पुर्नगठन खाते सुरु करुन 2008 च्या केंद्र शासनाच्या शेतकरी थकीत कर्जदार माफी योजने अंतर्गत तक्रारदारास रक्कम रु.11,076/- एवढी रक्कम माफीस पात्र झाली व सदर खात्यातील शिल्लक रक्कम रु.840/- सामनेवाला क्र.1 यांनी सुट देऊन खाते क्र.62/24 निरंक केले. तक्रारदाराने दाखल केलेल्या पावत्या यांचे बारकाईने अवलोकन केले असता तक्रारदाराने रु.70,315/- एवढी रक्कम भरणा 2007 पर्यत केलेली दिसून येत आहे. तसेच तक्रारदाराने दि.25.03.2009 रोजीचे जा.क्र.384 चे सामनेवाला क्र.1 यांनी दिलेले पत्रावरुन तक्रारदारास रक्कम रु.62,024/- एवढी रक्कम कर्ज माफी दिल्याचे म्हटले आहे. आणि त्यांच पत्रात तक्रारदारा कडून रक्कम रु.18,962/- एवढी येणे बाकी असल्याचे ही म्हटले आहे. परंतु सामनेवाला यांनी दाखल केलेला तक्रारदाराच्या खाते उता-यावरुन 31 जानेवारी 2008 व 31 जानेवारी 2009 या दोन वर्षाचे प्रतिवर्ष रक्कम रु.7776.54 एवढे तक्रारदार सामनेवाले क्र.1 यांना देणे लागतो. तक्रारदाराने दि.25.3.2009 रोजीच्या पत्रास सामनेवाला यांच्या सक्षम अधिका-यासमोर आव्हान दिलेले आहे. याबाबतचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदारांने दि.23.03.2009 रोजी सामनेवाले यांच्यात कर्जदार भेट नोंद वहीवर सही करुन सामनेवाला क्र.1 यांचे हक्कात सदर थकबाकीबाबत संमती दिली आहे. म्हणजेच तक्रारदाराने सर्व माहीती सामनेवालाकडून समजून घेऊन संमती दिल्यावर तक्रारदारास दि.25.03.2009 च्या पत्रावर मिळणारी कर्ज माफीची रक्कम रु.62,024/- ही परत मागणे अयोग्य आहे व एकदा सोडलेला हक्क त्याबाबत तक्रारदारास परत तक्रार प्रचलित कायदयानुसार मागता येणार नाही.
तक्रारदार हा सामनेवाला क्र.1 यांचा रक्कम रु.15,551/- एवढया रक्कमेचा सन 2008 व 2009 या वर्षाचा थकबाकीदार आहे. सामनेवाला क्र.1 यांनी दि.25.03.2009 रोजी तक्रारदारास कर्ज माफी व थकबाकी याबददल उल्लेख केलेली रक्कम रु.62,024/- व रु.18,962/- चे पत्र दिले आहे. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या लेखी म्हणण्यात सदर बाबीचा ऊहापोह असताना सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यात याबददल काहीही स्पष्ट उल्लेख केलेला नाही व या पत्रातील मजकूर ही नाकारलेला नाही. बँकेचा थकबाकीदार हा व त्यांस सामनेवाला क्र.3 यांनी सहकार कायदयाच्या कलम 137 नुसार वसुली प्रमाणपत्र दिले आहे. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांच्या हक्कात दि.23.03.2009 रोजी थकीत कर्ज व केंद्र शासनाच्या 2008 च्या कर्ज माफीची माहीती समजून घेऊन कर्जदार भेट नोंद वहीवर सही केली आहे. ही बाब तक्रारदारास मान्य आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार रदद करणे योग्य व न्यायाचे होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड