निकालपत्र
(द्वारा- मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी)
(१) सामनेवाले यांच्याकडून खरेदी केलेल्या बियाण्यांच्या पिशवीत कमी बियाणे मिळाले या कारणावरुन तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये सदरची तक्रार दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांची देश-शिरवाडे ता.साक्री येथे शेती आहे. दि.१०-०७-२००९ रोजी त्यांनी पिंपळनेर येथील सामनेवाले क्र.२ यांच्या दुकानातून ४६४४ (प्रो-अॅग्रो) हे मक्याचे बियाणे ६ पिशव्या (प्रत्येकी वजन ५ किलोग्रॅम) रु.२,१००/- देऊन खरेदी केले. सामनेवाले क्र.१ यांच्या कंपनीचे हे बियाणे होते. या पिशव्या घरी नेल्यावर तक्रारदार यांच्या असे निदर्शनास आले की, सहापैकी एका पिशवीतील बियाण्याचे वजन कमी आहे. त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी पिंपळनेर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १८ येथे जावून सुनिल दत्तात्रय पगारे यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक वजन काटयावर त्याची मोजणी करुन घेतली. त्यावेळी सहापैकी एका पिशवीचे वजन ३.९८० किलोग्रॅम एवढे आढळून आले. याबाबत त्यांनी सामनेवाले क्र.२ यांना कळविले. त्यावेळी सामनेवाले क्र. २ यांनी असे सांगितले की, सदर बियाणे सामनेवाले क्र. १ यांच्याकडून ज्या स्थितीत आले त्याच स्थितीत मी विकले आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी माझ्यावर नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांच्या कंपनीचे बियाणे खरेदी केल्याने त्यांना सामनेवाले क्र. १ यांनी चांगली सेवा देणे अपेक्षित होते. एका पिशवीत बियाणे कमी निघल्यामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्याचबरोबर जुलै २००९ मध्ये बियाण्यांचा पेराही करता आला नाही. याबाबत तक्रारदार यांनी दि.०७-०६-२०१० रोजी सामनेवाले क्र.१ यांना नोटीस पाठवून रु.३,००,०००/- एवढया भरपाईची मागणी केली. कारण तक्रारदार यांना तीस क्विंटल मक्याच्या उत्पन्नास मुकावे लागले होते. ही भरपाई सामनेवाले क्र. १ यांच्याकडून मिळावी, नुकसानीचा खर्च रु.१,०००/- मिळावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
(३) तक्रारदार यांनी तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्र, बियाणे खरेदी केल्याची पावती, स्वस्त धान्य क्रमांक १८ येथे मोजमाप केल्याबाबतची नोंद, सामनेवाले क्र.१ यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, सामनेवाले क्र.१ यांनी नोटीसीस दिलेले उत्तर, गाव नमुना नं.८, ७/१२ उतारा, पुराव्याचे शपथपत्र, बियाण्यांच्या पिशवीचे सहाय्यक नियंत्रक, वैधमापनशास्त्र यांच्याकडून मोजमाप केल्याबाबतचा अहवाल आदी कागदपत्रे दाखल केली आहेत.
(४) सामनेवाले क्र.१ यांनी हजर होऊन खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, तक्रारदार यांनी तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. सामनेवाले यांनी सेवेमध्ये कमतरता केलेली नाही व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. सामनेवाले हे करीत असलेल्या उत्पादनाचे पॅकिंग यांत्रिक पध्दतीने आपोआप होत असते. त्यामुळे केवळ एका पिशवीत बियाणे कमी भरण्याची कोणतीही शक्यता नाही. तक्रारदार यांनी पिशवीमध्ये बियाणे कमी आहे हे निदर्शनास येताच ती पिशवी वजनमाप विभागाकडे पाठविणे आवश्यक होते. मात्र तक्रारदार यांनी तसे केले नाही. त्यामुळे तक्रारदार यांची तक्रार रद्द करावी अशी मागणी सामनेवाले क्र.१ यांनी केली आहे.
सामनेवाले क्र.२ यांनी स्वत: हजर होऊन खुलासा दाखल केला. त्यात म्हटले आहे की, कंपनीकडून ज्या स्थितीत बियाणे प्राप्त होते त्याच स्थितीत ते ग्राहकाला विकण्यात आले आहे. कंपनीकडून येणा-या एका पोत्यात प्रत्येकी पाच किलोग्रॅम वजनाच्या सहा पिशव्या असतात. तक्रारदार यांना संपूर्ण सहा पिशव्यांचे पोते सिलबंद स्थितीत विकण्यात आले होते. त्यामुळे तक्रारदार यांच्या एका पिशवीचे वजन कमी आढळले असल्यास त्यासाठी सामनेवाले क्र.२ यांना जबाबदार धरता येणार नाही.
(५) तक्रारदार यांची तक्रार व त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, तसेच सामनेवाले क्र. १ व २ यांचा खुलासा, तक्रारदार व सामनेवाले क्र.१ यांच्या विद्वान वकिलांनी केलेला युक्तिवाद ऐकला असता, आमच्यासमोर निष्कर्षासाठी पुढील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दा : | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब) बियाण्याच्या एका पिशवीचे वजन कमी होते हे तक्रारदार यांनी सिध्द केले आहे काय | : होय |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
| | |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून दि.१०-०७-२००९ रोजी ४६४४ प्रॉअॅग्रो या जातीच्या मका बियाण्यांच्या प्रत्येकी पाच किलो वजनाच्या सहा पिशव्या खरेदी केल्या होत्या. त्याची किंमत त्यांनी रु.२,१००/- एवढी अदा केली आहे. या पिशव्या खरेदी केल्याबाबतचे बिल तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केले आहे. या बिलावर उत्पादक कंपनी या रकान्यात सामनेवाले क्र.१ यांचे नांव आहे. तर सामनेवाले क्र.१ व २ यांनीही आपल्या खुलाशात तक्रारदार यांनी मका बियाण्याच्या पिशव्या खरेदी केल्या होत्या ही बाब नाकारलेली नाही. यावरुन तक्रारदार हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते. म्हणूनच मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
- ७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून खरेदी केलेल्या मका बियाण्याच्या ६ पिशव्यांपैकी एका पिशवीचे वजन पाच किलोपेक्षा कमी म्हणजे ३.९८० किलोग्रॅम एवढे आढळून आले. एका पिशवीचे वजन कमी आहे असे जाणवताच तक्रारदार यांनी पिंपळनेर येथील सुनिल दत्तात्रय पगारे यांच्या स्वस्त धान्य दुकान क्र.१८ वर जावून सदर पिशवीचे इलेक्ट्रॉनिक काटयाद्वारे वजन करुन घेतले. त्यावेळी सदर पिशवीचे वजन ३.९८० किलोग्रॅम असल्याचे आढळून आहे. त्याबाबतची नोंद तक्रारदार यांनी तक्रारीसोबत सुनिल दत्तात्रय पगारे यांच्या सहीनिशी आणि स्वस्त धान्य दुकानाच्या शिक्क्यानिशी दाखल केली आहे.
तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन असत्य आहे, असे सामनेवाले क्र.१ यांचे म्हणणे आहे. त्यांनी आपल्या खुलाशात असे नमूद केले आहे की, सामनेवाले यांच्यातर्फे होत असलेल्या उत्पादनांचे पॅकींग यांत्रिक पध्दतीने आपोआप केले जाते. त्यामुळे एका पिशवीतील बियाण्यांचे वजन कमी भरण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. सामनेवाले क्र.१ यांनी या खुलाशात असेही नमूद केले आहे की, तक्रारदार यांना बियाण्यांच्या पिशवीचे वजन कमी आहे असे वाटत होते तर त्यांनी त्याची शासनाच्या वजनमाप खात्याकडून तपासणी करुन घ्यावयास हवी होती. मात्र त्यांनी ती केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांचे तक्रारीतील कथन खोटे आहे, असे सामनेवाले क्र.१ यांचे म्हणणे आहे.
सामनेवाले क्र.१ यांच्या या खुलाशाबाबत तक्रारदार यांनी आपल्या मूळ तक्रारीत आणि त्यानंतर सादर केलेल्या प्रतिखुलाशामध्ये स्पष्टीकरण दिले आहे. या स्पष्टीकरणात तक्रारदार यांनी म्हटले आहे की, सामनेवाले क्र.१ यांचे खुलाशातील कथन बियाण्यांच्या सर्व पिशव्या यांत्रिक पध्दतीने मोजमाप करण्यात येत असल्यामुळे केवळ एका पिशवीत बियाणे कमी आढळले, हे म्हणणे मान्य नाही. तक्रारदार यांनी आजही सदर कमी वजनाची बियाण्यांची पिशवी सांभाळून ठेवली आहे, असेही तक्रारदार यांनी प्रतिखुलाशात नमूद केले आहे.
तक्रारदार यांच्या विनंतीवरुन सदर पिशवी शासनाच्या सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र या विभागाकडे दि.१९-०३-२०१४ रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आली. या विभागाकडून त्याच दिवशी सदर पिशवीचे प्रमाणित काटयाद्वारे वजन करुन अहवाल या मंचाकडे सादर करण्यात आला. या अहवालानुसार सदर पिशवीचे (पिशवीसह बियाण्यांचे वजन) वजन ३ किलो ९७८ ग्रॅम इतके भरले.
तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल केलेली सदर बियाण्यांच्या पिशवीची स्वस्त धान्य दुकान क्रमांक १८ येथे घेण्यात आलेली नोंद आणि सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र विभाग यांनी पिशवीच्या वजनाबाबत दि.१९-०३-२०१४ रोजी दिलेला अहवाल यावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. २ यांच्याकडून दि.१०-०७-२००९ रोजी खरेदी केलेल्या मका बियाण्यांच्या प्रत्येकी पाच किलो वजनाच्या सहा पिशव्यांपैकी एका पिशवीतील बियाण्यांचे वजन कमी म्हणजे ३.९७८ किलोग्रॅम इतके होते. यावरुन तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या मका बियाण्याच्या एका पिशवीचे वजन कमी होते हे सिध्द केले आहे. म्हणूनच मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘क’’ – तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत असे नमूद केले आहे की, त्यांनी खरेदी केलेल्या मका बियाण्याच्या सहा पिशव्यांपैकी एका पिशवीतील बियाण्यांचे वजन ५ किलो ऐवजी ३.९७८ किलोग्रॅम इतके होते. त्यामुळे जुलै २००९ या हंगामात तक्रारदार यांना मका बियाण्यांची पेरणी करता आली नाही. सदर पिशवीचे वजन कमी असल्यामुळे तक्रारदार यांनी ती पिशवी सिलबंद अवस्थेत तशीच ठेवून त्यातील बियाण्यांची पेरणी केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांना सदर पिशवीतील बियाण्यापासून मिळणारे उत्पादन मिळू शकले नाही. परिणामी तक्रारदार यांचे त्या हंगामात रु.३,००,०००/- एवढया रकमेचे नुकसान झाले. ही रक्कम सामनेवाले क्र.१ यांच्याकडून मिळावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
तक्रारदार यांचे हे कथन आणि त्यांनी कागदपत्रांसह सिध्द केलेले पिशवीचे वजन याबाबत या मंचाने बारकाईने विचार केला. त्यावेळी मंचाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या ७/१२ उता-याचेही अवलोकन केले. या उता-यात तक्रारदार यांचे लागवडीचे क्षेत्र ०.८० आर एवढे असून तेवढयाच क्षेत्रावर त्यांनी मका बियाण्याची लागवड केली असल्याचे दिसून येते. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दि.०९-०८-२०११ रोजीच्या ७/१२ उता-यावर ही नोंद आहे.
तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की सामनेवाले यांच्याकडून खरेदी केलेल्या मका बियाण्याच्या एका पिशवीतील बियाण्यांचे वजन कमी आढळल्यामुळे त्यांना त्या वर्षी शेत जमिनीत मका बियाण्याची पेरणी करता आली नाही आणि या कारणामुळे त्यांचे ३० क्विंटल मक्याचे उत्पादन बुडाले, व रु.३,००,०००/ एवढया रकमेच नुकसान झाले. तथापि, तक्रारदार यांच्या ७/१२ उता-याचे अवलोकन केले असता त्यांनी त्यांच्या लागवडीयोग्य असलेल्या ०.८० आर एवढया क्षेत्रावर मका बियाण्याची पेरणी केली असल्याचे दिसून येते. याच कारणामुळे तक्रारदार यांच्या तक्रारीतील बियाण्यांच्या पेरणीबाबतचे कथनामध्ये तथ्य नसल्याचे मंचाचे मत आहे.
मात्र सामनेवाले क्र.२ यांच्याकडून खरेदी केलेल्या ६ मका बियाण्यांच्या पिशव्यांपैकी एका पिशवीतील बियाण्यांचे वजन ५ किलोपेक्षा कमी म्हणजे ३.९७८ किलोग्रॅम इतके होते हेही तक्रारदार यांनी सिध्द केले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडे प्रत्येकी ५ किलो वजनाच्या ६ मका बियाण्यांच्या पिशव्यांचे पैसे रु.२,१००/- अदा केले आहेत. त्याचे बिल तक्रारदार यांनी दाखल केले आहे. या बिलात एका पिशवीचा दर प्रत्येकी रु.३५०/- एवढा दर्शविण्यात आला आहे. सामनेवाले क्र.१ यांनी त्यांच्या बियाण्यांच्या पिशवीवर आतील बियाण्यांचे वजन, सिलबंद केल्याची तारीख, बियाण्यांची मुदत आदी बाबी नमूद केलेल्या असतात. या बाबीप्रमाणेच त्यांनी वितरकाला आणि पर्यायाने ग्राहकांना पुरवठा करणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. यातील एकाही बाबीत दोष आढळल्यास ती सामनेवाले यांची निश्चितच त्रुटी आहे, असे या मंचाचे मत आहे. ही त्रुटी निदर्शनास आल्यावर किंवा ग्राहकाने निदर्शनास आणून दिल्यावर उत्पादक कंपनीने तो दोष दूर करुन ग्राहकाला पैसे परत करणे अपेक्षित आहे असेही आम्हाला वाटते. सदर तक्रारीत तक्रारदार यांनी रु.३,००,०००/- एवढया रकमेची नुकसान भरपाई मागितली आहे. तथापि, तक्रारदार यांनी दाखल केलेला ७/१२ उतारा आणि इतर कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांनी त्यांच्या शेतात उपलब्ध क्षेत्रावर मक्याचे बियाणे पेरणी केले होते हे दिसून येते. त्यामुळे केवळ सामनेवाले क्र.१ यांनी बियाणे कमी दिले म्हणून उत्पादन घेता आले नाही आणि पर्यायाने रु.३,००,०००/- एवढया रकमेचे नुकसान झाले हे तक्रारदार यांचे म्हणणे आणि त्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद न पटण्यासारखा आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याडून मका बियाण्यांच्या सहा पिशव्या खरेदी केल्या. त्यातील योग्य वजन असलेल्या पाच पिशव्यांमधील बियाण्यांची त्यांनी पेरणी केली असावी आणि एका पिशवीतील बियाणे वजनापेक्षा कमी आढळल्यामुळे त्यांनी ती पिशवी सिलबंद अवस्थेत तशीत ठेवून दिली. त्यामुळे त्या पिशवीतील बियाण्यांचा तक्रारदार यांना उपयोग करुन घेता आला नाही. म्हणजेच तक्रारदार यांनी ६ बियाण्यांचे पैसे अदा करुन पाचच पिशव्या त्यांच्या उपयोगी आल्या. ज्या पिशवीतील बियाणे कमी आढळले होते ती पिशवी परत मागवून त्यांचे पैसे तक्रारदार यांना परत करणे सामनेवाले क्र.१ यांच्याकडून अपेक्षित होते, असे आम्हाला वाटते. तक्रारदार यांनी त्यांच्या विनंतीमध्ये रु.३,००,०००/- ची भरपाई मागितली आहे, मात्र ती त्यांना देणे अयोग्य ठरेल असे आम्हाला वाटते. त्याऐवजी सामनेवाले क्र.१ यांनी कमी वजनाच्या बियाण्यांची पिशवी तक्रारदार यांच्याकडून परत घेऊन त्या पिशवीची घेतलेली रक्कम तक्रारदार यांना परत करणे योग्य ठरेल असे आमचे मत बनले आहे. तक्रारदार यांनी बियाणे खरेदीबाबतचे सामनेवाले क्र.२ यांचे बिल दाखल केले आहे. त्यात ६ पिशव्यांची एकत्रित किंमत रक्कम रु.२,१००/ - एवढी दर्शविण्यात आली आहे. याच बिलामध्ये एका पिशवीची रक्कम रु.३५०/- एवढी देण्यात आली आहे, ही रक्कम व्याजासह तक्रारदार यांना सामनेवाले क्र.१ यांनी परत करावी या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. सामनेवाले क्र.१ यांनी पूर्वीच ही कृती केली नाही म्हणून तक्रारदार यांना सदरची तक्रार दाखल करावी लागली. त्याचा खर्च त्यांना मिळायला हवा असे आमचे मत आहे. सामनेवाले क्र.२ यांनी केवळ सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादीत केलेला माल तक्रारदार यांना सिलबंद अवस्थेत विकला आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या बियाण्यांच्या एका पिशवीचे वजन कमी भरले याबाबत सामनेवाले क्र.२ हे पूर्णपणे अनभिज्ञ होते. सामनेवाले क्र.१ यांनी पाठविलेल्या पिशव्या त्याच स्थितीत सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदार यांना विकल्याचे दिसून येते. त्यामुळे सामनेवाले क्र.२ यांच्या विरुध्द कोणतेही आदेश करणे योग्य होणार नाही असे आम्हाला वाटते. म्हणून आम्ही पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
(१) तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(२) सामनेवाले क्र.१ यांनी, हा आदेश प्राप्त झाल्यापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(अ)तक्रारदार यांना बियाण्यांच्या एका पिशवीची किंमत ३५०/-(अक्षरी रक्कम रुपये तिनशे पन्नास मात्र) दि.१०-०७-२००९ पासून ते संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंतचे कालावधीसाठी द.सा.द.शे.९ टक्के प्रमाणे व्याजासह परत करावी.
(ब)सामनेवाले क्र.१ यांनी, तक्रारदार यांना तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम ५००/- (अक्षरी रक्कम रुपये पाचशे मात्र) द्यावेत.
(३) सामनेवाले क्र.२ यांचेविरुध्द कोणतेही आदेश नाहीत.
धुळे.
दिनांक : २७-११-२०१४
(श्री.एस.एस.जोशी) (श्री.व्ही.आर.लोंढे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.