तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द दाखल केली असून, तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे आहे.
तक्रारकर्ता हा दोन चाकी गाडी विक्री करण्याचाव्यवसाय करतो. त.क. हा वि.प. 4 यांच्याकडून सुजुकी कंपनीच्या दोन चाकी मोटार सायकल ग्राहकांना विकत देण्यासाठी घेत होता. वि.प. क्रं. 4 यांचे मोठे शोरुम आहे. त.क.नुसार वि.प. क्र. 4 यांचे अॅक्सिस बँक, शाखा- चंद्रपूर IFSC –UTIB0000651 खाते क्रं. 651010200000596 आहे. त.क. हा नेहमी वि.प. 1 मार्फत वि.प.4 ला रक्कम पाठवित होता. त.क.चा खाते क्रमांक 60104647953 हा वि.प. क्रं. 1 यांच्याकडे सन 2012 पासून होता. त.क.नुसार त्यांनी याच खाते क्रं. मार्फत वि.प. 4 यांना दि. 18.12.2012 रोजी रु.2,00,000/-, दि. 07.01.2013 रोजी रुपये 1,26,631/- , दिनांक 14.01.2013 रोजी रुपये 49,650/-, दि. 19.01.2013 रोजी रुपये 32,500/-, दि. 22.01.2013 रोजी रुपये 98,500/- असे एकूण 5,07,381/- रुपये वि.प. 4, ‘श्री सनमती ऑटोमोबाईल प्रा.लि. मु. बापट नगर, चंद्रपूर यांना पाठविले.
तक्रारकर्ता यांनी शेवटी दि. 22.01.2013 रोजी पाठविलेल्या रक्कमेबद्दल वि.प. 4 यांना सूचना दिली तेव्हा वि.प. 4 यांनी दि. 18.12.2012, दि. 07.01.2013, 14.01.2013, 19.01.2013 व 22.01.2013 या तारखांना एकही रक्कम वि.प. 1 मार्फत प्राप्त झाली नाही असे कळविले. वि.प. 1 यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी रक्कम (Rs. 5,07,381/-) चुकिच्या खात्यात जमा झाले असे दिनांक 29.01.2013 ला सूचना पत्राद्वारे कळविले.
त.क. ने पुढे नमूद केले की, दि. 29.01.2013 रोजी वि.प. 1 यांनी सूचना पत्र दिल्यानंतर त.क. वारंवार वि.प.यांच्याकडे गेला व रक्कम परत करण्याची मागणी केली. तरी देखील वि.प. यांनी काहीही दाद दिली नाही. त्यामुळे दि. 23.02.2013 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून रुपये 5,07,381/- IFSC- Code No. UTIB0000651 वि.प. क्रं. 4 यांच्या बँकेत खाते जमा न होता चुकिने वि.प. क्रं. 3 यांच्या खात्यात वि.प. 2 मार्फत जमा झाल्याचे वि.प. क्रं. 1 यांच्या रेकॉर्डवरुन समजले. त्यामुळे त.क. यांनी वि.प. 2 व 3 यांना सुध्दा नोटीस पाठविली. त.क.नुसार कोणत्याही विरुध्द पक्षाने त्याला सहकार्य केले नाही. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, वि.प. 3 यांनी सदर रक्कम परत देतो असे कबूल केले.
तक्रारकर्त्याने नमूद केले आहे की, IFSC- Code No.UTIB0000651 नुसार वि.प. 4 च्या खात्यात पाठवावयाची रक्कम त.क. ने चुकिचा खाते क्रमांक लिहिला म्हणून वि.प. 2 यांच्या खात्यात जमा झाली व त्याचा फायदा घेऊन वि.प. 3 यांना लागेच सर्व रक्कम वि.प. 2 यांच्याकडून उचल केली.
तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, वि.प. क्रं. 1 यांनी सेवेत निष्काळजीपणा केला. वि.प. 2 व 3 यांनी सुध्दा निष्काळजीपणा केला. त्यामळे त.क.ला आर्थिक नुकसानीला समोर जावे लागले. त.क. यांनी आपल्या तक्रारीत त्याच्या नुकसान भरपाईकरिता प्रथमता वि.प. 1 हाच सर्वस्वी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. वि.प. 2 व 3 हे देखील संयुक्त जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्यामुळे त.क.ने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असून वि.प. 1 यांच्याकडून योग्य सेवा मिळाली नाही. म्हणून रुपये 5,07,381/- 18% व्याजासह मागणी केली आहे. तसेच रुपये
50,000/-शारीरिक, मानसिक त्रासाबद्दलची मागणी केली असून व्याजाची सुध्दा मागणी केली आहे.
सदरची तक्रारीची नोटीस वि.प. यांना मंचामार्फत बजाविण्यात आली. वि.प.1 व 2 यांनी सदर तक्रारीला उत्तर दाखल केले.तर विरुध्द पक्ष 3 व 4 यांनी नोटीस प्राप्त होऊन ही ते मंचासमक्ष उपस्थित न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फी प्रकरण चालविण्याचा आदेश दि.17.02.2014 रोजी पारित करण्यात आला.
वि.प.क्रं. 1 यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, सदर प्रकरणामध्ये त.क. यांनी चुकिची माहिती भरली . त.क. व वि.प.क्रं. 4 यांची जबाबदारी होती की, त्यांच्या खात्यात रक्कम बरोबर जमा होत आहे की नाही, याबाबतची पडताळणी करावयास पाहिजे होती. त्यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट नमूद केले की, सदर प्रकरणात त.क.यांचा निष्काळजीपणा आहे.त्यांनी पुढे नमूद केले की, त्यांनी त.क. च्या नोटीसला उत्तर दिले असून त्यांनी आपल्या उत्तरात नमूद केले की, .त.क.यांनी वि.प. 4 चा पत्ता व IFSC- Code No.UTIB0000651 बरोबर लिहिला होता. परंतु खाते क्रमांक चुकिचा लिहिला होता. त्यामुळे ती रक्कम वि.प. 4 यांना न मिळता वि.प. 3 यांच्याकडे वळती झाली. यामध्ये त्यांचा कोणताही निष्काळजीपणा नाही. त्यांनी आपल्या विशेष कथनात नमूद केले की, भारतीय रिजर्व बँकेच्या सर्कुलर RBI-2010/11-25 टी प्रमाणे एका बँकेकडून रक्कम दुस-या बँकेला पाठविण्यात येते. त्या पूर्ण कार्यवाहीमध्ये ही रक्कमेच्या बाबत फक्त खाता क्रमांकावर अवलंबून असते. त्यांनी तक्रारीतील त.क. चे इतर सर्व म्हणणे माहिती अभावी नाकारले असून तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.
वि.प. 2 यांनी आपल्या लेखी उत्तरात खालीलप्रमाणे नमूद केले की, परिच्छेदातीलबहुतांश भाग माहिती नसल्याने त्याचा सदर व्यवहाराशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या उत्तरात पुढे नमूद केले की, त्यांच्याकडे विरुध्द पक्ष क्रमांक 3 यांच्या नावाने रक्कम जमा होत होती व ती वि.प. 3 हा बँकेतून काढून घेत होता. यासर्व बाबतीत त.क. यांची चूक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच त.क. यांनी पैसे पाठविले त्यांच्याकडे विचारणा केली नाही व सतत निष्काळजीपणा केला. यामध्ये वि.प. 2 व 3 चे दोष नसल्याबाबतचे नमूद केले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, खाते क्रं. 601010200000596 हे मे. मेडियासिटी यांचे असून त्या खात्यामध्ये दि. 29.01.2013 रोजी रुपये 4,253.01 पैसे एवढी रक्कम शिल्लक होती. त्यामुळे सुरक्षिततेकरिता लिन मार्क करण्यात आले. त्यांनी पुढे नमूद केले की, रिजर्व बँकेच्या परिपत्रकानुसार खाते क्रं. बघूनच रक्कम वळती करण्यात येते. त्याबाबत त्यांनी RTGS/NEFT मुंबई यांचे मार्गदर्शक तत्वानुसार रक्कम वळती करण्यात येते असे नमूद केले. त्यांनी तक्रारकर्त्याचे इतर म्हणणे नाकारले असून सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे.
मंचाने दोन्ही पक्षांचे कथन, युक्तिवाद व त्यांनी दाखल केलेले दस्ताऐवजांचे मंचाने अवलोकन केले असता, खालील बाबी विचारार्थ उपस्थित झाल्या.
कारणे व निष्कर्ष
तक्रारकर्ता यांचे विरुध्द पक्ष 1 यांच्या बँकेत खाता आहे ही बाब उभय पक्षाने मान्य केली आहे. तसे त.क. ववि.प. 1 यांचे कथन व दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. तक्रारकर्ता वि.प.क्रं. 4 यांना अॅक्सिस बँक शाखा चंद्रपूर IFSC- Code No.UTIB0000651 खाते क्रं. 651010200000596 या क्रमांकावर वि.प. 4 यांना रक्कम अदा करीत होता. वि.प. 2 यांच्या शाखेमध्ये त.क. यांनी वि.प. 4 यांना पाठविण्याकरिता रक्कम पोहचताकरीत होता. वि.प. 3 यांनी अदा रक्कम त्यांची नसतांना सुध्दा खात्यातून काढली असा व्यवहार सदर प्रकरणामध्ये असल्यामुळे मंचाच्या मते त.क. हा वि.प. 1 यांचे ग्राहक असून विरुध्द पक्ष क्रं. 2, 3 व 4 हे आवश्यक पक्षकार आहे. कारण तक्रारकर्ता यांचे खाते विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांचेकडे आहे व ते वि.प.क्रं. 1 ची सेवा घेतात. तर वि.प.क्रं. 2 हे अप्रत्यक्षपणे सेवा देत आहेत. तर वि.प. क्रं. 3 यांनी रक्कम उचलली असून सदर रक्कम वि.प.क्रं. 4 करिता होती.
त.क. यांचा सुजुकी दोन चाकी मोटार-सायकल विकण्याचा व्यवसाय असून त्याकरिता वि.प. 4 यांच्याकडून वाहन खरेदी करतात व त्याबाबत त.क. हे वि.प. 1 मार्फत वि.प. 4 यांच्या अॅक्सिस बँक, चंद्रपूर शाखा येथे रक्कम पाठवित असतात ही बाब सुध्दा दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते.
त.क. याचे खाते क्रं. 60104647953 मार्फत विरुध्द पक्ष 4 यांचे IFSC- Code No.UTIB0000651 खाते क्रं. 651010200000596 या खात्यामध्ये रक्कम नियमित पाठवित असल्याचे दस्ताऐवजावरुन स्पष्ट होते. त.क. यांनी सदर प्रकरणासोबत दाखल केलेले दस्ताऐवज पान क्रं. 101 वरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्ता जेव्हा-जेव्हा विरुध्द पक्ष क्रं. 1 मार्फत रक्कम पाठवित होता व ती रक्कम विरुध्द पक्ष क्रं. 4 जेव्हा काढत होते (Debit) त्यावेळी वि.प.क्रं. 4 चे नांव विवरणपत्रामध्ये नमूद होत होते.
त.क. यांनी वि.प. क्रं. 4 यांना वि.प.क्रं. 1 मार्फत दि. 18.12.2012 रोजी रु.2,00,000/-, दि. 07.01.2013 रोजी रुपये 1,26,631/- , दिनांक 14.01.2013 रोजी रुपये 49,650/-, दि. 19.01.2013 रोजी रुपये 32,500/-, दि. 22.01.2013 रोजी रुपये 98,500/- पाठविले तेव्हा त्यांनी वि.प.क्रं. 1 यांच्याकडे सदर रक्कम पाठविण्याकरिता नि.क्रं. 4 दस्ताऐवज 7 नुसार फॉर्म भरुन दिला. त्यामध्ये तक्रारकर्त्याचे नांव, त.क.चा खाते क्रं.वळती करावयाची रक्कम तसेच लाभार्थ्याचे नांव (वि.प.4) बँकेचे नांव व शाखेचे नांव IFSC- Code No. व खाते क्रं. इत्यादी भरुन माहिती द्यावयाची होती. तक्रारकर्त्याने सदर विवरणपत्रात (फॉर्म) संपूर्ण माहिती योग्य व अचूक लिहिली असून फक्त अनावधनाने विरुध्द पक्ष क्रमांक 4 यांचा खाते क्रं. 651010200000596 ऐवजी 601010200000596 हा लिहिला. दोन्ही क्रमांकामधील फरक हा फार सूक्ष्म असून 651010200000596ऐवजी 601010200000596 इतका फरक आहे. सदर प्रकरणामध्ये वि.प. 1 यांनी त.क. यांनी दिलेली माहिती न बघता तसेच विवरण पत्राचे अवलोकन न करता सदर रक्कम खाते क्रमांक 601010200000596 या खात्यात वळती केली. विरुध्द पक्ष यांनी या प्रकरणात लेखी उत्तर दाखल करीत असतांना रक्कम ही खाते क्रमांक बघूनच वळती केल्या जाते त्यामुळे वि.प. 1 यांचा सदर प्रकरणामध्ये कोणताही निष्काळजीपणा नसल्याचे म्हटले आहे. परंतु मंचास स्पष्टपणे जाणवते की, जर खाते क्रमांकानुसारच रक्कम वळती करावयाची होती तर लाभार्थ्याचे नांव, बँकेचे नांव, बँक शाखा व IFSC- Code No. याबाबतची माहिती मागण्याची काय गरज होती? याबाबतचा कोणताही खुलासा वि.प. 1 यांनी केलेला नाही.
त.क. व वि.प. क्रं. 1 यांनी युक्तिवादाच्या वेळी भारतीय रिजर्व बँकेचे परिपत्रक दाखल केले असून त्यामध्ये (RBI, 2010-11/235, Dt. 14.10.2010)यांचे परिच्छेद क्रं. 3 मध्ये नमूद आहे की,..........“ Bank are generally expected to match the name and account number information of the beneficiary before affording credit to the account”.याचा सरळ निष्कर्ष निघतो की, लाभार्थ्याच्या खाती रक्कम वळती करीत असतांना बँकेने लाभार्थ्याचे नांव व खाते क्रमांक जुळवून बघायला पाहिजे. तसे या प्रकरणात झालेले दिसत नाही. अन्यथा त.क. यांनी दिलेले लाभार्थ्याचे नांव व त्याचे अनावधनाने चुकिने दिलेला खाते क्रमांक जुळवून आला नसता तर रक्कम चुकिच्या खात्यात वळती झाली नसती. त.क. यांनी भारतीय रिजर्व बँकेचे दि. 12.10.2012 चे परिपत्रक क्रं. RBI/2012-13/244 दाखल केले. त्याच्या परिच्छेद क्रं. 3 (ii) मध्ये नमदू केले आहे की, “Where the customer has provided both the IFS Code as well as branch details of the beneficiary branch, the bank should ensure that these details match. In case of any mismatch, the same may be brought to the notice of the customer for rectification before originating the transaction”. यावरुन जर दिलेली माहिती ही बरोबर जुळत नसेल तर ग्राहकाला सूचना देऊन दुरुस्ती (Rectification)बँकेने मागविणे आवश्यक आहे. त्यानंतरच रक्कमेचे हस्तातंरण अथवा स्थानांतरण किंवा वळती करणे याबाबी बँकेने करावयास पाहिजे.
भारतीय रिजर्व बँकेने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी स्वतःच न करता त.क. यांनी खाते क्रमांक चुकिचा लिहिला म्हणून रक्कम चुकिच्या खात्यात वळती झाली व त्यामध्ये त्यांचा कोणताही दोष नाही व सर्व जबाबदारी ही ग्राहकाची आहे असा वि.प. यांनी केलेला युक्तिवाद अमान्य करण्यात येतो. कारण भारतीय रिजर्व बँकेने ज्याबाबत ग्राहकांवर जबाबदारी टाकली आहे ती Electronic payment products lmplementation of core banking slolutions (CBS). या प्रणालीवर टाकली असून त्या प्रणालीचा वापर त.क.ने सदर प्रकरणात केला नसून त.क. ने वि.प. 1 यांच्याकडे वि.प. 4 यांना रक्कम देण्याकरिता सेवा घेतली व ती सेवा वि.प. क्रं. 1 यांनी योग्यप्रकारे दिली नाही व सेवेत निष्काळजीपणा केला असे सदर प्रकरणावरुन स्पष्ट होते.
सदर प्रकरणामध्ये वि.प.क्रं. 2 यांनी सुध्दा त्यांची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला, ही बाब त्यांच्या उत्तरावरुन स्पष्ट होते. वि.प. 2 यांनी सदर रक्कम ज्यांच्या खात्यात जमा झाली आहे त्यांच्याकडून ती वसूल करण्याकरिता केलेले खाते लिन व कार्यवाही केल्याचे दस्ताऐवजावरुन व कथनावरुन दिसते. त्यामुळे ती कारवाई वि.प. 2 यांनी करुन सदर रक्कम वि.प.क्रं. 1 यांच्याकडे वळती करणे आवश्यक होते. तसे त्यांनी केले नाही ही सुध्दा वि.प. 2 यांची सेवेतील त्रृटी आहे.
सदर प्रकरणात बैकिंग लोकपाल यांचे पत्र असून त्यामध्ये सुध्दा “It is observed from the bank’s submission that they are in the process of filling a police complaint against the holder of the account to which the credit has gone wrongly”. या निष्कर्षावरुन ही बाब स्पष्ट होते की, चुकिने रक्कम जमा करण्यात आली होती. त्याबाबत बँक लोकपाल कार्यालय यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन सुध्दा वि.प. 1 व 2 यांनी केले नाही. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये सदर रक्कम ही चुकिच्या खात्यात जाण्याकरिता किंवा वळती होण्याकरिता वि.प. 1 यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यामुळे त.क. यांना झालेले आर्थिक नुकसानीकरिता वि.प.1 हेच जबाबदार आहेत. मंचाचे असे मत आहे की, त.क. यांना झालेल्या संपूर्ण आर्थिक नुकसान विरुध्द पक्ष क्रं. 1 यांच्या निष्काळजीपणामुळे झाले. त्यामुळे तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांनी रुपये 5,07,381/- परत द्यावे किंवा तक्रारकर्त्याचा त्यांच्याकडे असलेल्या खात्यात जमा करावी. सदर कारवाई आदेश पारित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावी. तसे न केल्यास सदर रक्कमेवर द.सा.द.शे. 10%दराने प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत व्याजसह देय राहील.
त.क. यांनी सदर प्रकरणामध्येशारीरिक, मानसिक त्रास व व्यवहारात झालेले नुकसान व तक्रारीचा खर्च म्हणून याकरितारु.50,000/- चीमागणी केलेली आहे. सदर मागणी अवास्तव असल्यामुळे त.क. हा आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता तसेच तक्रारीचा खर्च म्हणून रु.15000/- मिळण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
सदर प्रकरणामध्ये वि.प. 2 यांनी आवश्यक ती सर्व कारवाई करुन चुकिच्या व्यक्तिला दिलेली रक्कम त्याच्याकडून वसूल करुन विरुध्द पक्ष क्रं. 1 यांच्याकडे वळती करावी. इतर विरुध्द पक्षां विरुध्द तक्रारीत कोणताही आदेश पारित करण्यात येत नाही. कारण त्यांचा प्रत्यक्ष अथवा निष्काळजीपणा केला असा काहीही संबंध नसून त.क. ने तशी मागणी देखील केलेली नाही.
वरील निष्कर्षाच्या आधारे मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) विरुध्द पक्ष क्रमांक 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्ता यानां रुपये 5,07,381/- ही रक्कम अदा करावी किंवा तक्रारकर्ता यांचे खाते क्रमांक 60104647953 मध्ये 30 दिवसाच्या आत जमा करावी. अन्यथा सदर रक्कमेवर द.सा.द.शे.10%दराने व्याज प्रत्यक्ष रक्कम तक्रारकर्ता यांना प्राप्त होईपर्यंत किंवा तक्रारकर्ता यांचे खात्यात जमा होईपर्यंत व्याजसह देय राहील.
3) विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक, मानिकस त्रासा व तक्रारीचा खर्च म्हणून रु.15000/- द्यावे.
4) विरुध्द पक्ष क्रं. 2 यांनी चुकिच्या व्यक्तिने केलेली उचल रक्कम कायदेशीर मार्गाने वसूल करुन ती विरुध्द पक्ष क्रं. 1 यांच्याकडे वळती करावी.
5) विरुध्द पक्ष क्रं. 3 व 4 यांच्या विरुध्दची तक्रार आदेशा अभावी निकाली काढण्यात येते.
6) मा.सदस्यांसाठीच्या ‘ब’ व ‘क’ फाईल्स संबंधितांनी परत घेवून जाव्यात.
निकालपत्राच्या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्तव व उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात याव्यात.