(घोषित दि. 03.11.2014 व्दारा श्रीमती. नीलिमा संत, अध्यक्ष)
प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अंतर्गत सेवेतील कमतरतेसाठी केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, ते जालना येथे राहतात त्यांचे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे बॅंकेत बचत खाते क्रमांक 20127541573 असे आहे. त्यांनी त्यांची मुलगी आरती पटवर्धन यांना दिनांक 16.04.2013 रोजी धनादेश क्रमांक 843565 काही तातडीच्या कामासाठी दिला. प्रस्तुत धनादेश आरती यांनी पुणे येथे दिनांक 17.04.2013 रोजी वटवण्यासाठी दिला.
तक्रारदारांच्या खात्यात पुरेसे पैसे असून देखील त्या धनादेशाचा खात्यात पुरेसे पैसे नाहीत हे कारण दाखवून ना-आदर करण्यात आला. तक्रारदारांनी दिनांक 13.05.2013 रोजी वरील घटनेबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांना पत्र पाठवून तक्रार दिली. परंतु आजतागायत गैरअर्जदारांनी त्याबाबत काहीही उत्तर दिलेले नाही. तक्रारदारांना तातडीने गाडी भाडयाने घेवून पुणे येथे जावे लागले व पैशांची व्यवस्था करावी लागली.
तक्रारदारांच्या मुलीने वरील धनादेश गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या बॅंकेच्या खाते क्रमांक 30784110279 मार्फत वटवण्यासाठी दिला होता व तो अपुरे पैसे या शे-यासह परत आला आहे. तक्रारदार म्हणतात की, अशा रितीने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 या दोघांनीही त्यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केलेली आहे.
तक्रारदार गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचेकडून रुपये 2,00,000/- ऐवढी रक्कम नुकसान भरपाई पोटी मागत आहेत.
तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबत वरील धनादेशाची व गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या बॅंकेच्या पावतीची छायांकीत प्रत व त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना दिलेले पत्र अशी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 मंचा समोर हजर झाले. त्यांनी आपला लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या जबाबानुसार तक्रारदार हे त्यांचे ग्राहक आहेत ही गोष्ट त्यांना मान्य आहे. परंतु इतर सर्व बाबी ते माहिती अभावी नाकारतात. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी वरील धनादेशाचा ‘खात्यात पुरेसे पैसे नाहीत’ म्हणून अनादर केला ही बाब त्यांना माहिती नाही. तक्रारदारांनी त्यांना कोणतेही पत्र पाठवलेले नाही.
दाखल कागदपत्रांवरुन त्यांना समजले की, आरती पटवर्धन यांनी वरील धनादेश गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे वटवण्यास दिला व तो गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी खात्यात पुरेसे पैसे नाहीत म्हणून त्यांच्या नियामांनुसार अनादरित केला. परंतु वरील धनादेश गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी कधीही गैरअर्जदार क्रमांक 1 यांना परत केला नाही. त्यामुळे त्यांनी तो वटवण्याचा प्रश्नच उदभवत नाही. याबाबत त्यांनी तक्रारदारांनाही सांगितले होते. गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे जर धनादेश वटवण्यास आला असता व तो त्यांनी न वटवता तक्रारदारांना परत केला असता तर धनादेश परत करण्याबाबत फी त्यांनी आकारली असती अशी फी आकारलेली नाही. त्यावरुनच वरील धनादेश त्यांचेपर्यंत पोहोचलेला नाही ही गोष्ट स्पष्ट होते. त्यांचेकडून तक्रारदारांना द्यावयाच्या सेवेत काहीही त्रुटी झालेली नाही. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार नामंजूर करावी व तक्रारदारांना रुपये 10,000/- दंड करावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या जबाबानुसार खातेदार जेंव्हा त्यांना प्राप्त झालेला धनादेश वटवण्यासाठी बॅंकेत सादर करतात तेंव्हा बॅंक खात्यात विशिष्ट प्रमाणात रक्कम म्हणजे धनादेश ज्या बॅंकेवर काढलेला आहे त्यांचेकडून रक्कम वसुल करण्यासाठी व खात्यात ती रक्कम जमा करण्यासाठी लागणारी रक्कम जमा असणे आवश्यक असते. ती नसल्यास बॅंक धनादेश वटवण्यासाठी इतर बॅंकांकडे पाठवू शकत नाही. वरील नियामांनुसारच बॅंकेतील संगणक प्रणाली काम करते त्यामुळे श्रीमती आरती पटवर्धन यांनी सादर केलेला धनादेश क्रमांक 843565 हा गैरअर्जदार क्रमांक 2 ही बॅंक गैरअर्जदार क्रमांक 1 या बॅंकेकडे पाठवू शकली नाही. परंतु वरील कारण समजण्यात गैरसमज झाल्यामुळे तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे यात त्यांचेकडून सेवेत त्रुटी झालेली नाही.
प्रस्तुत प्रकरणात तक्रारदारास तक्रार दाखल करण्याचा काहीही अधिकार नाही. कारण तक्रारदार हे गैरअर्जदार क्रमांक 2 या बॅंकेचे ग्राहकच नाहीत. सदर तक्रार गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या ग्राहकाने म्हणजे श्रीमती पटवर्धन यांनी केलेली नाही. वरील धनादेश गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या पुणे येथील शाखेत सादर करण्यात आला व तो पुणे येथेच अनादरित झाला. त्यामुळे या मंचाला तक्रार चालवण्याचे अधिकारक्षेत्र नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदारांची तक्रार फेटळण्यात यावी व तक्रारदारांना रुपये 5,000/- एवढा दंड करण्यात यावा.
तक्रारदारांतर्फे विव्दान वकील श्री.एम.एस.धन्नावत व गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे विव्दान वकील श्री.व्ही.जी.चिटणीस यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रे व मंचापुढील युक्तीवाद यावरुन खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले.
मुद्दे निष्कर्ष
1.गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या
सेवेत काही कमतरता केली आहे का ? नाही
2.तक्रारदारांना गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विरुध्द
तक्रार दाखल करता येईल का ? नाही
3.काय आदेश ? अंतिम आदेशा नुसार
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 साठी – तक्रारदारांचे गैरअर्जदार क्रमांक 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र, जालना शाखा येथे बचत खाते क्रमांक 843565 हे खाते होते. त्यांनी दिनांक 16.04.2013 रोजी श्रीमती आरती पटवर्धन यांना धनादेश क्रमांक 843565 हा रुपये 2,00,000/- चा धनादेश दिला. श्रीमती पटवर्धन यांनी तो दिनांक 17.04.2013 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांच्या पुणे शाखेत वटवण्यासाठी दिला. तो ‘Insufficient balance to collect the Instrument’ म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा पुणे यांनी त्याच दिवशी अनादरित केला. या सर्व गोष्टी दाखल कागदपत्रांवरुन दिसतात व त्या उभयपक्षी मान्य आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 बॅंक ऑफ महाराष्ट्र जालना शाखा यांच्या जबाबानुसार वरील धनादेश त्यांचेकडे वटवण्यासाठी आलाच नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी देखील वरील धनादेश गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे धनादेश पाठवलाच नाही असे नमूद केले आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदारांना द्यायच्या सेवेत काहीही त्रुटी केलेली नाही असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
मुद्दा क्रमांक 2 साठी – तक्रारदारांचे बचत खाते गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या बॅंकेत होते. त्यांनी धनादेश श्रीमती आरती पटवर्धन यांचे नावे दिला तो श्रीमती आरती यांनी पुणे येथील गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या शाखेत वटवण्यासाठी टाकला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनीच त्यांच्या पावतीवर ‘Insufficient balance to collect the instrument’ असे नोंदवून तो पुणे येथेच अनादरित केला. अशा प्रकारे सेवेत जर काही कमतरता असेल तर ती गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून झालेली आहे. परंतु तक्रारदार हे गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे ग्राहक नाहीत. गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडील खाते श्रीमती आरती पटवर्धन यांच्या नावाचे आहे श्रीमती पटवर्धन यांनी धनादेश वटवण्यासाठी दिला व धनादेश त्यांच्या खात्यात पुरेसे पैसे नसल्याने अनादरित झालेला आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांना गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विरुध्द तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही असा निष्कर्ष मंच काढत आहे.
म्हणून मंच खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
- तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.