न्या य नि र्ण य : (व्दाराः- मा. सौ. रुपाली डी. घाटगे, सदस्या)
1) प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा, 1986, चे कलम 12 प्रमाणे वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केलेली आहे.
2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन वि.प. यांना नोटीसीचा आदेश झाला. वि.प. नं. 1 बँक व नं. 2 विमा कंपनी वकिलामार्फत मंचापुढे उपस्थित राहून त्यांनी म्हणणे दाखल केले. तक्रारदार तर्फे व वि.प. बँक व विमा कंपनी तर्फे वकिलांचा तोंडी अंतिम युक्तीवाद ऐकला.
3) तक्रारदारांची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे-
यातील तक्रारदार क्र. 4 चे पती व तक्रारदार क्र. 1, 2, 3 व 5, 6 चे वडील कै. श्री. मारुती शिवाजी दळवी दि. 7-04-2013 रोजी मोटार अपघातामध्ये मरण पावले. यातील तक्रारदार हे मयत श्री मारुती शिवाजी दळवी यांचे वारसदार आहेत. तक्रारदाराचे पती व वडील यांनी त्यांचे प्लॉटवर घर बांधणेसाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती. त्याकरिता वि.प. नं. 1 यांनी त्यांचे प्लॉटवर घर बांधणेसाठी कर्ज पुरवठा करणेचे मान्य केले. त्यामुळे तक्रारदारांनी वि.प. नं. 1 चे कर्जाचे अटी व शर्ती समजून तसेच योग्य ती कागदपत्रे वि.प. नं. 1 यांचेकडे जमा केली. वि.प. नं. 1 यांनी कागदपत्रांची पडताळणी करुन तक्रारदाराचे पती/वडिलांस कर्ज मंजूर केले. तक्रार सदर कर्जाची नियमितपणे परतफेड करीत होते. वि.प. नं. 1 यांनी तक्रारदाराचे वडिलांना कर्जाची जोखीम म्हणून स्वत:चा वैयक्तीक अपघात विमा व घराचा आग विमा असे दोन्हीही समाविष्ट असणारी ‘निवास बिमा योजना (वैयक्तिक)’ पॉलिसी वि.प. नं. 1 यांचेकडून दि. 4-06-2008 रोजी रक्कम रु. 4,27,000/- च्या जोखीमसाठी घेणेस भाग पाडले. त्याचा प्रिमियम रक्कम रु. 2349/- वि.प. नं. 2 यांनी भरुन घेतला. सदरची पॉलिसी ही दि. 10-02-2008 ते 9-07-2013 असा कालावधी पर्यंत वैध असून पॉलिसीचा नं. 270801/48/08/9500000667 असा होता. सदरची पॉलिसी घेतेवेळी वि.प. नं. 1 व 2 नी सांगितले होते की, सदर पॉलिसी काळामध्ये विमाधारकाचा अपघाती मृत्यू झालेस सदर पॉलिसीची संपुर्ण रक्कम ही पॉलिसीधारकाच्या वारसांना मिळते त्या रक्कमेमधूनच कर्जाची असणारी रक्कम वजा केली जाते व उवरीत रक्कम ही वारसांना अदा केली जाते. सदरची पॉलिसी तक्रादारांचे वडिलानी घेतली होती. सदर पॉलिसी घेतलेनंतर तक्रारदाराचे पती/वडिलांनी वि.प. नं. 1 चे कर्जाचे हप्ते वेळेवर भरणे चालू ठेवले होते. तसेच दि. 29-08-2009 रोजी वि.प. नं.1 यांनी पुर्वी काढलेला विमा कमी पडतो असे सांगून जास्त रक्कमेचा विमा काढणे सांगितलेमुळे रक्कम रु. 4,44,500/- इतक्या जोखीमीचा विमा वि.प. नं. 2 कडून घेणेचे ठरवून त्याचा प्रिमियम रु. 4,401/- वि.प. नं. 2 कडे भरुन ‘निवास बिमा योजना (वैयक्तिक)’ पॉलिसी दिली. तिचा पॉलिसी नं. 270801/48/08/950001072 असून पॉलिसीचा कालावधी दि. 12-09-2009 ते 11-09-2020 असा होता. सदर पॉलिसी घेतेवेळी वि.प. नं. 2 नी तुम्हाला दोन्हीही पॉलिसी रक्कमेची जोखीम पॉलिसीच्या कालावधीमध्ये जर अपघाती मरण आले किंवा घराचे आगीमुळे नुकसान झालेस सदर दोन्हीही विम्याची रक्कम तुम्हास मिळेल असे सांगितले. त्यांनतर तक्रारदाराचे वडिलानी वि.प. नं. 1 कडून घेततेल्या कर्जाचे हप्ते नियमितपणे भरणे चालू ठेवले. तक्रारदारांच्या दोन्ही विमा पॉलिसी चालू होत्या व वैयक्तीक अपघात विम्याची एकूण रक्कम रु. 8,71,500/- इतकी जोखीम वि. प. नं. 2 यांनी घेतली होती.
तक्रारदार त्यांचे तक्रारीत पुढे नमूद करतात की, तक्रारदाराचे वडील दि. 7-04-2013 रोजी बेळगांव ते अंबोली या रस्त्यावर सावंतवाडीला मोटर सायकलने जात होते त्यावेळी माडखोल ता. सावंतवाडी गावाजवळ मोटर सायकलला समोरुन येणा-या एम.एच. 09 एज 7934 ट्रक जोरदार धडकला व त्यामध्ये तक्रारदाराचे वडिलांना अपघाती मृत्यू झाला. सदरची नोंद सावंतवाडी पोलिस स्टेशनला झाली. व शवविच्छेदन करुन अपघाताचा रितसर तपास केला असता ट्रकचे चालकाचे चुकीने अपघात झालेचे निष्पन्न झाले. ट्रक चालकाचे विरुध्द सावंतवाडी न्यायालयामध्ये दोषारोपत्र दाखल केले. तक्रारदाराचे वडिल अपघातामध्ये मयत झालेनंतर वि.प. नं. 1 यांनी तक्रारदारास कर्ज फेडणेचे व कायदेशीर कारवाईचे करणेचे बजावले. वि.प. नं. 1 यांनी कर्जाची रक्कम रु. 94,733/- इतकी रक्कम बेकायदेशीररित्या तक्रारदाराकडून भरुन घेतली. तक्रारदाराकडून वि.प. नं. 2 नी क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे घेतली व त्यावेळी पॉलिसीची रक्कम पहिल्यांदा कर्जास वर्ग करतो व राहिलेली रक्कम अदा करतो असे सांगितले. त्याप्रमाणे वि.प. नं. 1 यांना रक्कम रु. 2,34,971/- इतकी रक्कम वर्ग केली. उर्वरीत क्लेमबाबत विचारणा केली असता कर्जाची थकीत रक्कम वर्ग केलेचे सांगितले. त्यानंतर वि.प. नं. 1 व 2 कडे विचारणा केली असता समाधनकारक उत्तर दिली नाहीत त्यामुळे तक्रारदारांनी वि.प. नं. 1 व 2 यांना दि. 16-07-2015 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली. तक्रारदारांचे संपूर्ण कर्ज फिटूनही कर्ज खात्यास रक्कम रु. 42,768.83 जादा रक्कम भरुन घेतली. व दि. 16-04-2015 रोजी रक्कम रु. 901/- इतके व्याज भरुन घेतले. वि.प. नं. 1 याची सदरची कृती ही बेकायदेशीर असून सेवतील त्रुटी आहे. अशाप्रकारे वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेने तक्रारदारांनी वि.प. नं. 1 कडुन रक्कम रु. 94,733/- कर्ज परतफेड करणेसाठी भरलेली रक्कम, रु. 990/- वसुल केलेले व्याजाची घेतलेले रक्कम तसेच वि.प. नं. 2 कडुन रक्कम रु.6,36,529/- इतकी रक्कम दोन्ही पॉलिसीच्या एकूण रक्कमेतून कर्जास अदा झालेनंतर वि.प. नं. 2 कडे राहिलेली रक्कम द.सा.द.शे. 18 % व्याजासह मिळावी व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 10,000/- व वकील फी खर्च रु. 10,000/- वि.प. नं. 1 व 2 यांचेकडून मिळावी अशी तक्रार अर्जात तक्रारदारांनी विनंती केली आहे.
4) तक्रारदारांनी तक्रारीसेाबत 11 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदारांचे वडिलांची इन्शुरन्स दोन्ही पॉलिसीच्या प्रती, तक्रारदाराचे वडिलाचा मृत्यूचा दाखला, तक्रारदाराचे वडिलांचे अपघाती मृत्यू झालेबाबत सावंतवाडी पोलिस स्टेशनला झालेली नोंद, तक्रारदाराचे वडिलांचा कर्जाचा खाते उतारा, तक्रारदाराचे वडिलाचे शवविच्छेदन केलेचा वैद्यकीय दाखला, तक्रारदारांनी वि.प. नं. 1 व 2 यांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, व त्याची नोटीस पोहाचलेची रजि.ए.डी. पावती, व पोहच पावत्या, वि.प. नं. 1 यांना नोटीस मिळालेबाबतचे पत्र, व वि.प. नं. 2 यांनी पाठविलेले नोटीसीला उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच दि. 21-03-2016 रोजीचे तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे.
5) वि.प. नं. 1 यांनी दि. 6-02-2016 रोजी तक्रारदारांचे तक्रार अर्जास म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदाराची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. कर्जदार मयत कै. मारुती शिवाजी दळवी यांनी त्यांचे मालकीचे कळसगाडे ता. चंदगड मिळकत क्र. 51 मधील आर.सी.सी. इमारतीचे बांधकामाकरिता कर्ज मिळणेसाठी दि. 1-05-2008 रोजी दिलेला अर्जावरुन वि.प. यांनी रक्कम रु. 3,00,000/- दि. 6-05-2008 रोजी कर्ज मंजूर केले. कर्जदारांनी वि.प. बँकेचे हक्कात डी.पी. नोट, पे बेअरर लेटर, टर्म लोन अॅग्रीमेंट इत्यादी कागदपत्रे दि. 7-06-2008 रोजी लिहून दिलती. तसेच वि.प. बँकेच्या हक्कात त्यांचे मालकीचे मिळकत क्र. 51 चा दस्त क्र. 833/2008 दि. 7-06-2008 रोजी तारणगहाण दस्त लिहून दिला. सदरचे कर्जास श्री मोहन रामचंद्र पाटील हे जामीनदार आहेत. व वि.प. चे हक्कात जामीनखत लिहून दिले. वि.प. बँकेकडून कर्जदार मारुती शिवाजी दळवी यांनी गृहकर्ज रु. 3,00,000/- उचल केली. कर्ज कागदपत्रांमधील व तारण गहाण दस्तातील शर्ती व अटीनुसार मयत मारुती शिवाजी दळवी यांनी स्वत:हून बांधकाम करीत असले इमारतीचा विमा वि.प. नं. 2 यांचेकडून दि. 110-07-20078 ते 9-07-2013 रक्कम रु. 4,27,000/- व व त्यांनतर दि. 12-09-2009 ते 11-09-2020 करिता रु. 4,44,500/- चा विमा उतरविला असून त्याचा विमा हप्ता रक्कम अनुक्रमे रु. 1,978/- व 2,427/- वि.प. बँकेने कर्जदार यांचे सुचनेवरुन त्यांचे कर्जखाती नावे टाकून वि.प. नं. 2 यांचेकडे जमा केली. कर्जदार यांनी कर्जाची रक्कम मासिक रु. 3,923/- प्रमाणे हप्त्याने भागविणेची होती. कर्जदार यांनी नियमितपणे कर्जखातेमध्ये हप्ते रक्कम जमा केली नाही.
वि.प. नं. 1 त्यांचे म्हणण्यात पुढे नमूद करतात की, कर्जदार मारुती शिवाजी दळवी यांचा दि. 7-04-2013 रोजी अपघाती मृत्यू झालेमुळे त्यांचे कर्ज खाते मे-2013 पासून अनियमित झाले. वि. प. चे प्रतिनिधी थकीत कर्जाबाबत विचारणेसाठी गेले असता काही रक्कम कर्ज खाती जमा केली. दरम्यान वि.प. नं. 1 यांचेकडून माहिती घेऊन वि.प. नं. 2 कडे आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन रक्कम रु. 2,24,971/- चा क्लेम मंजूर करुन घेतला. त्यासाठी वि.प. नं. 1 बँकेने मदत केली आहे. त्यानंतर कर्जाचे रक्कम वसुलीनंतर रक्कम रु. 41,778.83 वि.प. बँकेने दि. 28-12-2015 रोजी मयत मारुती शिवाजी दळवी यांचे सेव्हींग्ज खातेवर जमा केली. विमा क्लेमच्या रक्कमेतून कर्ज भागविणेची कायदेशीर जबाबदारी तक्रारदार यांची होती. वि.प. नं. 1 बँकेस रक्कम वसुल करण्याचा कायदेशीर हक्क व अधिकार होता. वि.प. हे रिझर्व्ह बँकेचे मार्गदर्शक तत्वानुसार कामकाज करीत असते. वि.प. नं. 1 यांनी तक्रारदार यांना सेवा पुरविण्यामध्ये कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. तक्रारदारांनी तक्रार अर्जात नमूद केलेली मागणी चुकीचे असलेने नामंजूर करणेत यावी. तक्रारदारांनी चुकीची तक्रार दाखल केलेने तक्रारदारांकडून रक्कम रु. 20,000/- वि.प. बँकेस मिळावेत. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा.
6) वि.प. नं. 1 यांनी 4 कागदपत्रे दाखल केलेली असून कर्जदार मारुती शिवाजी दळवी यांनी वि.प. नं. 1 यांचे हक्कात लिहून दिलेले टर्म लोन अॅग्रीमेंट, तसेच दस्त क्र. 833/2008 दि. 7-06-2008 रोजी लिहून दिलेले तारणगहाण दस्त, तसेच कर्जदार मारुती शिवाजी दळवी यांचा कर्ज खाते नं. 091275110000011 चा खाते उतारा, तसेच सेव्हिंग्ज खाते नं. 091210100012714 चा खाते उतारा इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच दि. 2-07-2016 रोजी पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. सदर शपथपत्रासोबत एकूण 8 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
7) वि.प. नं. 2 यांनी दि. 10-02-2016 रोजी म्हणणे दाखल केलेले असून तक्रारदारांची तक्रार परिच्छेदनिहाय नाकारलेली आहे. वि.प. नं. 2 यांनी श्री. मारुती शिवाजी दळवी यांचे वारसांकडे वारंवार मागणी करुनही कांही कागदपत्रे व माहिती शेवटपर्यंत दिलेली नाही. वि.प. यांनी तक्रारदारांचे वकिलाच्या नोटीसीस उत्तर दिले असून तक्रारदार यांना कळवूनही मागणी केलेली कागदपत्रे व माहिती देण्याची पुर्तता केली नाही. तक्रारदार यांचे वडील कै. मारुती शिवाजी दळवी हे दि. 7-04-2013 रोजी मोटार अपघातामध्ये मयत झालेची माहिती वि.प. कंपनीस नाही. वि.प. नं. 1 यांनी तक्रारदार यांच्या मयत वडिलांना कर्जाची कर्जाची जोखीम म्हणून सदर प्लॉटवर घर बांधण्यासाठी कर्ज पुरवठा करीत असताना त्यांचा स्वत:चा वैयक्तीक अपघात विमा व बांधले असणारे घराचे आग विमा या दोन्ही बाबी समाविष्ट असणारी ‘निवास बिमा योजना’(वैयक्तीक ) पॉलिसी ही वि.प. नं. 2 विमा कंपनीकडून दि. 4-06-2008 रोजी रक्कम2,35 रु. 4,27,000/- च्या जोखीमसाठी घेतली व त्याचा प्रिमीयम रक्कम रु. 2,349/- इतकी वि.प. नं. 2 यांनी भरुन घेतली व पॉलिसीचा नं. 270801/48/08/9500000667 असून कालावधी दि. 10-02-2008 ते 9-07-2013 असा होता. तसेच तक्रारदारांनी वि.प. नं. 2 कडे वि.प. नं. 1 चे आवश्यकतेनुसार दुसरी एक निवास बिमा योजना पॉलिसी नं. 270801/48/08/950001072 पॉलिसी कालावधी दि. 12-09-2009 ते 11-09-2020 करिता उतरविली होती त्याचा प्रिमीयम रु. 4,401/- असा होता. वि.प. यांनी जरी दोन विमा पॉलिसी उतरविल्या असल्या तरी मयत श्री. मारुती दळवी यांचे वारसांना एकूण पाच कागदपत्रांची पुर्तता करणेस कळवूनही त्यांनी पुर्तता केलेली नाही. कारण मयत श्री. मारुती दळवी यांचे ड्रायव्हिंग लायसेन्स पोलिस रिपेार्टमध्येही नमूद नाही. तसेच इन्व्हेस्टिगेटर यांनाही अदा केलेले नाही. विमा पॉलिसीतील अटी व शर्तींचा भंग केल्याची बाब तक्रारदार लपवू पाहत आहेत. वि.प. नं. 2 हे दोन्ही पॉलिसीच्या बदल्यात कांहीही देणे लागत नव्हते. वि.प. नं. 1 यांचेकडे गृहकर्जातील रक्कम रु. 2,34,971/- इतकी रक्कम कर्जास जमा केलेली आहे. सदरची रक्कम स्विकारण्यास तक्रारदार यांनी मे. कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर मान्यता दिली असल्याचे शपथपत्राची बाब लपवू पाहत आहेत. तसेच तक्रारदारांचे वडिलांचा दि. 7-04-2013 रोजी बेळगांव ते अंबोली या रस्त्याने सावंतवाडीला मोटर सायकलवरुन जात असताना माडखोल ता. सावंतवाडी या गावाजवळ त्यांना समोरुन येणारे एम.एच.09 एल 7934 या ट्रकने जोरधार धडक दिल्याने अपघाती मयत झाले हे वि.प. यांना माहिती नाही. तक्रारदार यांनी वि.प. नं. 2 यांना त्रास देणेचे हेतूने सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रार अर्ज कलम 8 व 9 मधील मजकूर खोटा व रचनात्मक असून तक्रारदार यांनी मुद्दामच लपवून ठेवून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. तक्रार अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. वि.प. नं. 2 यांनी विमा पॉलिसीचे मयताकडून उल्लंघन झाले असले तरी सहानुभूतीखातर वि.प. नं. 1 यांचेकडे कर्जाची देय असणारी रक्कम भरली आहे. सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा.
7) वि.प. नं. 2 यांनी 5 कागदपत्रे दाखल केली आहेत. वि.प. यांना दि. 6-02-2014 रोजीचे नोटीसीस वि.प. नं. 2 यांनी दिलेले उत्तर, वि.प. नं. 2 यांनी वि.प. नं. 1 यांना दि. 20-12-2013 रोजीचे पत्र व पत्राची प्रत तक्रारदार यांना पाठवून कागदपत्रांचे पूर्ततेबाबत कळविले ते पत्र, वि.प. नं. 1 यांनी वि.प. नं. 2 कंपनीस तक्रारदार यांचे मयत श्री. शिवाजी दळवी यांचे हौसिंग लोनच्या अकौंटमधील दि.0 7-04-2013 अखरेची देय रक्कम अदा करणेबाबतचे विनंती पत्र, निवास योजना पॉलिसीच्या अटी व शर्तीसह योजनेची माहिती, तक्रारदार यांचे मे. कार्यकारी दंडाधिकारी, चंदगड यांचे समोरील प्रतिाज्ञपत्र व दि. 5-08-2016 रोजी वि.प. नं. 2 यांचे पुराव्याचे शपथपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
8) तक्रारदारांची तक्रार, वि.प. यांचे म्हणणे दाखल तक्रार कागदपत्रांचा विचार करता, तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे काय ? | होय |
2 | तक्रारदार वि. प. नं. 1 यांचेकडून नुकसानभरपाई रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
3 | तक्रारदार वि. प. नं. 2 यांचेकडून विमा रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय |
4 | तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम पात्र आहेत काय ? | होय |
5 | आदेश काय ? | अंशत: मंजूर |
का र ण मि मां सा -
मुद्दा क्र. 1, 2, व 3 –
1) तक्रारदार नं. 1,2,3 व 5 चे वडील व तक्रारदार नं. 4 यांचे पती कै. मारुती दळवी यांनी वि.प. नं.1 यांचेकडून घर बांधण्यासाठी दि. 1-05-2008 रोजी रक्कम रु. 3,00,000/- इतके कर्ज घेतले होते. व घराच्या सुरक्षिततेकरिता तसेच वैयक्तीक आयुष्याच्या सुरक्षेची जोखीम म्हणून वि.प. नं. 2 यांचेकडे “निवास विमा योजना (वैयक्तीक) पॉलिसी “ दि. 4-06-2008 रोजी रक्कम रु. 4,27,000/- व दि. 29-08-2009 रोजी रक्कम रु. 4,44,500/- इतक्या रक्कमेच्या दोन पॉलिसी उतरविलेल्या होत्या. प्रस्तुतच्या पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नाही. सदरचे पॉलिसीचे क्र. 270801/48/08/9500000667 व 270801/48/08/950001072 असे आहेत.
दि. 7-04-2013 रोजी तक्रारदाराचे वडील मोटार अपघातामध्ये ट्रक चालकाने जोरात धडक दिलेने मयत झाले. तक्रारदारांचे वडील मयत झालेनंतर वि.प.नं. 1 यांनी कर्जाचे सुरक्षिततेपोटी मयताची विमा पॉलिसी असलेचे माहित असूनदेखील व सदर पॉलिसीचे मुळ कागदपत्रे वि.प. नं. 1 यांचेकडे असतानादेखील तक्रारदारास कर्जाची उर्वरीत सर्व रक्कमेची परतफेड करणेस सांगितले. तसेच वि.प. नं. 2 यांचेकडे सदरचे दोन्ही पॉलिसीची रक्कम मागणी केली असता वि.प. नं. 2 यांनी वि.प. नं. 1 यांचेकडे दि. 7-04-2013 रोजी रक्कम रु. 2,34,971/- इतकी कर्ज रक्कम अदा करुन उर्वरीत रक्कम तक्रारदारांना दिलेली नाही.
सबब, वि.प. नं.1 यांनी सदर कर्जाचे सुरक्षिततेपोटी विमा पॉलिसी माहित असूनदेखील कर्जाची उर्वरीत रक्कम तक्रारदार यांचेकडून स्विकारुन तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? तसेच तक्रारदार यांनी वि.प. नं. 2 यांचेकडून दोन्ही पॉलिसीच्या रक्कमेतून कर्जाची रक्कम अदा करुन उर्वरीत रक्कम वि.प. नं. 2 यांनी तक्रारदारांना आजतागायत न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. त्याअनुषंगाने या मंचाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता अ.क्र. 1 व 2 ला पॉलिसी प्रत आहे. सदरचे दोन्ही पॉलिसीची प्रिमियम तक्रारदाराचे वडिलानी/पतीनी वि.प. नं. 2 यांचेकडे भरलेल्या आहेत. सदरची बाब वि.प. नं. 1 व 2 यांनी नाकारलेली नाही. सदरचे पॉलिसी क्र. 270801/48/08/9500000667 व ही विमा पॉलिसी (वैयक्तीक) पॉलिसी असून तिचा कालावधी दि.10-07-2008 ते 9-07-2013 रोजीपर्यंत तसेच पॉलिसी नं. 270801/48/08/950001072 याचा कालावधी दि. 12-09-2009 ते 11-09-2020 रोजीपर्यंत असून सदरची पॉलिसीवरुन विमा उतरविण्याच्या व्यक्तीच्या अपघाताची जोखीम तसेच घराची जोखीम वि.प. नं. 2 यांनी स्विकारलेची दिसून येते. अ.क्र.4 ला तक्रारदाराचे पती/वडील यांची दि. 7-04-2013 रोजी अपघाती मृत्यू झालेबाबतची सावंतवाडी पोलिस ठाणेस झालेची नोंद दाखल आहे. सदर नोंदीवरुन तक्रारदाराचे वडील दि. 7-04-2013 रोजी मोटारसायकलला समोरुन येणा-या ट्रकने जोरदार धडक दिलेने तक्रारदारांचे वडिलांचा अपघाती मृत्यू झालेचे दिसून येते. सदरचा अपघात हा ट्रक चालक चुकीमुळे झालेचे पोलिसांचे तपासात निष्पन्न झालेने ट्रक चालकास प्रथमदर्शनी दोषी ठरविलेचे दोषापत्र दाखल झालेचे दिसून येते. सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे वडिलांचा अपघाती मृत्यू असून सदरचे दोन्ही पॉलिसीमधील पॉलिसीचे कालावधीमध्ये झालेचा दिसून येते. तथापि वि.प. नं. 2 यांनी तक्रारदार यांचा वारसांना एकूण पाच कागदपत्रांची पुर्तता करणेस कळवूनही त्यांनी केली नाही. मयताचे ड्रायव्हिंग लायसेन्स पोलिस रिपोर्टमध्ये नाही त्याकारणाने पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग असतानादेखील सहानुभुतीखातर रक्कम रु. 2,34,971/- इतकी रक्कम कर्जास जमा केली आहे. सदरची रक्कम तक्रारदार यांनी मा. कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर मान्यता दिली आहे असे वि.प. यांनी तक्रारदारांचे तक्रारीत आक्षेप घेवून म्हणणे दाखल केलेले आहे. वि.प. यांनी दि. 27-10-2014 रोजी तक्रारदाराचे सदरचे मा. कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर केलेले प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सदरचे प्रतिज्ञापत्रावर नमुद रकमेच्या इथे खाडाखोड दिसून येते. खाडाखोड ठिकाणी तक्रारदारांचा सही/अंगठा दिसून येत नाही. तसेच सदरचे प्रतिज्ञापत्रामध्ये माझे पतीकडे ड्रायव्हिंग लायसेन्स होती पण ती आम्हाला घटनास्थळी मिळाली नाही असे कथन केलेले आहे. म्हणजेच तक्रारदारांचे मयत पतीचे लायसेन्स होते ही बाब नाकारता येणार नाही. तसेच पोलिस तपासाअंती ट्रक चालकास प्रथमदर्शनी दोषी ठरवून दोषारोपत्र दाखल आहे. तक्रारदारांचे प्रतिज्ञापत्रावरुन मयताचे वाहन चालविणेबाबतचा परवाना त्यांचेसोबतच असलेचे कथन केले आहे. तसेच सदर प्रतिज्ञापत्राची कर्जाची रक्कम देणेस हरकत नाही असे कथन केले आहे. याचा अर्थ असा नाही विमा पॉलिसी रक्कम रु. 2,34,971.17 इतकी वि.प. नं.1 बॅक यांना देऊन उर्वरीत रक्कमेशी तक्रारदार यांचा संबध राहणार नाही. सबब, दाखल कागदपत्रावरुन तक्रारदारांचे पती/वडील यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. त्याकारणाने मयताचे वारस या नात्याने तक्रारदार हे सदरची विमा पॉलिसीची संपूर्ण रक्कम मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
2) प्रस्तुत कामी तक्रारदार यांनी वि.प. नं. 1 यांचेमार्फत वि.प. नं. 2 यांचेकडे पॉलिसीची रक्कम मागणी केली आहे. त्यानुसार वि.प.नं. 2 यांनी दाखल केलेल्या दि. 10-11-2014 रोजीचे पत्राचे अवलोकन केले असता, सदरचे पत्राअन्वये वि.प. नं. 1 यांनी वि.प.नं. 2 यांना The outstanding balance is on 7-04-2013 was Rs. 2,34,971.17 म्हणजेच तक्रारदारांचे पती/वडील यांचे मृत्यूदिवशी दि. 7-04-2013 रोजी अखेर कर्जाची मागणीची रक्कम केलेली आहे. वास्तविक वि.प. नं. 2 यांचेकडे तक्रारदाराचे पती/वडील यांचा विमा अपघात उतरविलेला असून वि.प. नं.2 यांनी कर्जाची सर्वस्वी जोखीम स्विकारलेली होती. त्याकारणाने वि.प. नं. 1 यांनी कर्जाची सर्व रक्कमेची माहिती वि.प. नं. 2 यांना न देता फक्त दि. 7-04-2013 रोजीची कर्जाची रक्कमेची मागणी केली आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत तक्रारदाराचे वडील/पती यांचा वि.प. नं. 1 यांचेकडे असलेल्या कर्जाचा उतारा दाखल केलेला आहे. सदर कर्ज खाते व उता-यावरुन तक्रारदारानी सदरचे कर्जाची हप्त्यांची रक्कम वि.प. नं. 1 यांचेकडे जमा केलेची दिसून येते. तसेच वि.प. नं. 1 यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये थकीत खातेची रक्कम भरणेबाबत विचारणा केली असता तक्रारदार यांनी काही रक्कम कर्ज खाती जमा केलेचे मान्य केलेले आहे. त्याकारणाने वि.प. नं. 1 यांनी कर्जाची सर्व रकमेची माहिती वि.प. नं. 2 यांना न देता फक्त दि. 7-04-2013 रोजीचे कर्जाची मागणी करुन उर्वरीत रक्कम तक्रारदार यांचेकडून स्विकारुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. तसेच वि.प. विमा कंपनी कर्जाची रक्कम रु. 2,34,971/- अदा करुनही, संपुर्ण कर्ज फेडूनही सदरचे कर्जाचे खात्यातील रक्कम रु. 42,768.83 इतके रक्कम देणे लागत असतानादेखील त्या रक्कमेवर दि. 16-04-2015 रोजी रु.901/- व्याज आकारलेले आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. नं. 1 यांचेकडून विमाधारकाचे मृत्यूनंतर कर्जाची परतफेड करण्यासाठी भरलेली रक्कम रु. 94,733/- व व त्यावरील व्याज रु. 901/- अशी एकूण रक्कम रु. 95,723/- व सदर रक्कमेवर दाखल दि. 6-11-2015 रोजीपासून सदरची रक्कम संपुर्ण रक्कम मिळोपावेतो द.सा.द.शे. 6 % प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत.
3) प्रस्तुत कामी सदरच्या पॉलिसी वि.प. नं. 1 यांना त्यांचे कर्जाचे कागदपत्रांना आवश्यक असलेमुळे मुळ पॉलिसीचे कागदपत्रे वि.प. नं. 1 यांचेकडे असलेचे तक्रारदार यांनी कथन केले आहे. तक्रारदारांचे वडिलांचे दोन विमा पॉलिसी होत्या त्यामुळे त्याचा वैयक्तिक अपघात विम्याची एकूण रक्कम रु. 8,71,500/- इतकी जोखीम वि.प. नं. 2 यांनी घेतलेची दिसून येते. सदरचे पॉलिसीचे एकरकमी विमा हप्ता रक्कम रु. 1,978/- व रक्कम रु. 2,427/- वि.प. नं. 1 बँकेने वि.प. नं. 2 यांचेकडे जमा केलेचे मान्य केलेले आहे. तक्रारदाराचे पती/वडील यांचा अपघाती मृत्यू झालेचे दाखल कागदपत्रावरुन शाबीत होते. वि.प. नं. 1 यांचेकडून तक्रार विमाधारकाने घेतलेल्या कर्जाची जोखीम वि.प. नं. 2 यांनी स्विकारली आहे. ती पुर्ण परतफेड करणेची जबाबदारी वि.प. नं. 2 यांचेवर आहे. तथापि वि.प. नं. 1 यांनी तक्रारदारांचे पती/वडील मृत्यूपश्चात तक्रारदार यांचेकडुन कर्जाची र्काची रक्कम परतफेड करुन घेतली आहे. सदर एकूण विमा रकमेपैकी वि.प. नं. 2 विमा कंपनीने तक्रारदाराचे मयत विमाधारकाचे कर्जाची रक्कमरु. 2,34,971/- वि.प. नं. 1 यांना अदा केलेली आहे. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. नं. 2 यांचेकडून वैयक्तीक अपघात विम्याची एकूण रक्कम रु. 8,71,500/- पैकी कर्जास अदा झालेली एकूण रक्कम रु. 2,34,971/- वजा जाता अशी उर्वरीत रक्कम रु. 6,38,529/- इतकी रक्कम व सदर रक्कमेवर तक्रार दाखल दि. 6-11-2015 रोजीपासून ते सदरची संपुर्ण रक्कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 % प्रमाणे व्याज मिळणेस पात्र आहेत.
4) मुद्दा क्र. 4 :-
उपरोक्त मुद्दा क्र. 1 2 व 3 मधील विवेचनाचा विचार करता वि.प. नं. 1 व 2 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे. त्याकारणाने तक्रारदार हे वि.प. नं. 1 व 2 यांचेकडून संयुक्तिकरित्या मानसिक त्रासाचे रक्कम रु. 15,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 5,000/- मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
5) मुद्दा क्र. 5 :- सबब, प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. सबब, आदेश.
- आ दे श -
1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प. नं. 1 यांचेकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी तक्रारदारांनी भरलेली रक्कम रु 94,733/- (रक्कम रुपये चौ-यानऊ हजार सातशे तेहतीस फक्त) व तसेच सदरचे कर्जाची रक्कम पुर्ण परतफेड झालेनंतर व्याज चालू ठेवून तक्रारदारास परत अदा करावयाचे रक्कमेतून वर्ग करुन घेतलेली रक्कम रु. 990/- अशी एकूण रक्कम रु. 95,723/- (रक्कम रुपये पंच्यानऊ हजार सातशे तेवीस फक्त) वि.प. नं. 1 यांनी तक्रारदारास अदा करावी व सदर रक्कमेवर तक्रार दाखल दि. 6-11-2015 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 % प्रमाणे व्याज अदा करावे.
3) वि.प. नं. 2 यांनी तक्रारदार यांना दोन्ही विमा पॉलिसींच्या एकूण रक्कमेतून कर्जास अदा केलेनंतर वि.प. नं. 2 यांचेकडील सदर दोन्ही विम्याची पॉलिसीची उर्वरीत विमा रक्कम रु. 6,36,529/- (रक्कम रुपये सहा लाख छत्तीस हजार पाचशे एकोणतीस फक्त) इतकी रक्कम तक्रारदारांना अदा करावी व सदर रक्कमेवर तक्रार दाखल दि. 6-11-2015 रोजीपासून सदरची संपूर्ण रक्कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 % प्रमाणे व्याज अदा करावे
4) वि. प. नं. 1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 15,000/-(रक्कम रुपये पंधरा हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- (रक्कम रुपये पाच हजार मात्र) अदा करावेत.
5) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.
6) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
7) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.