निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार हा वाहन ट्रक क्रमांक एम एच 04/एच 1612 या वाहनाचा मालक आहे. सदरील ट्रक हा दिनांक 21.08.2012 रोजी लाकडी भुसा भरुन काचिकुडा येथून नांदेड येत असतांना रात्री अंदाजे 11 वाजता संबंधीत वाहनाचा चालक श्री.गोपालसिंगने हयगयी व निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे सदरील वाहनास अपघात झाला. त्यानंतर श्री.जमदाडे दिलीप यांनी पोलीस स्टेशन मदमुरा जिल्हा निजामाबाद येथे सदरील अपघात बाबत तक्रार दिली व वाहनाचे चालक श्री.गोपालसिंग यांचे विरुध्द भा.द..वि. चे कलम 337 प्रमाणे गुन्हा नोंद झाला. सदरील अपघात झाला तेव्हा ट्रकमध्ये श्री.गायकवाड राहूल व श्री.गायकवाड महादू हे दोघे होते. त्या दोघांनाही किरकोळ जखमा झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालय वांसकाडा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर अर्जदाराने गैरअर्जदार यांचे कार्यालयाशी संपर्क साधून त्याच्या ट्रकचा अपघात झालेला असल्याचे कळविले. गैरअर्जदार यांनी अर्जदारास संपर्क करुन घटनास्थळाला भेट दिली व अर्जदारास दिलासा दिला की, तुमच्या ट्रकचे नुकसान लवकरात लवकर आम्ही भरुन काढू. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या मागणीनुसार गैरअर्जदार यांना पॉलिसीची प्रत,आर.सी.बुकची प्रत, फिटनेस प्रमाणपत्राची प्रत इत्यादी महत्वाची कागदपत्रे दिली. अर्जदाराने दिनांक 30.10.2012 रोजी गैरअर्जदार यांचेकडे जाऊन विमा रक्कम मिळणेसाठी विनंती केली असता गैरअर्जदार यांनी आपणास कोणत्याही प्रकारची विम्याचा फायदा देऊ शकत नाही त्यासाठी आपण न्यायालयात तक्रार दाखल करु शकतात असे सांगितले. अर्जदाराने सदरील ट्रक हा युनायटेड मोटार्स,नांदेड यांचेकडून दुरुस्त करवून घेतला. सदरील ट्रक दुरुस्तीसाठी अर्जदारास रक्कम रु.4,78,000/- खर्च आलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून सदरील ट्रकची विमा पॉलिसी घेतलेली असून पॉलिसीचा कालावधी दिनांक 16.10.2011 ते दिनांक 15.10.2012 असा आहे. पॉलिसीच्या कालावधीमध्ये अर्जदाराचे ट्रकचा अपघात झालेला असल्याने गैरअर्जदार हा अर्जदारास अपघातामध्ये ट्रकची झालेली नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहे. परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदारास सदरील रक्कम न दिल्यामुळे अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडून वाहनाचे नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.4,78,000/- व मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- इत्यादी रक्कमेची मागणी तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना मंचाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार हे आपल्या वकीलामार्फत हजर होऊन आपले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
4. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे तक्रारीतील संपुर्ण कथन अमान्य केलेले असून गैरअर्जदार यांचे म्हणणे असे आहे की, अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक नाही. गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेमध्ये कमतरता दिलेली नाही. अर्जदाराने अपघात झाल्याबाबत माहिती दिल्यानंतर गैरअर्जदार यांनी सर्व्हेअरची नेमणुक केली होती. सर्व्हेअरने अपघातस्थळी भेट देऊन स्थळ पाहणी केलेली आहे. अर्जदाराने गैरअर्जदार यांचेकडे कागदपत्रे जमा केलेली नाहीत. सदरचे ट्रकची आसन क्षमता ही 1+1 असून अपघाताच्या वेळेस सदर वाहमनामध्ये 3+1 व्यक्ती प्रवास करीत होत्या. त्यामुळे अर्जदाराने विमा पॉलिसीच्या नियम व अटींचे उल्लंघन केलेले आहे. तसेच अर्जदाराने ट्रकचा कर अपघाताच्या दिवशी भरलेला नव्हता. त्याबाबतचा खुलासा गैरअर्जदार यांनी अर्जदारास मागीतला होता. परंतु अर्जदार यांनी आजपर्यंत खुलासा केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार हे अर्जदारास देणे लागत नाही. सदरील प्रकरणामध्ये गैरअर्जदार यांनी श्री.पी.पी.शेलोणकर यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केलेली होती. सर्व्हेअर यांनी अर्जदाराच्या ट्रकचे नुकसान भरपाईची रक्कम रु.1,64,530/- अशी अहवालामध्ये नमुद केलेली आहे. या व्यतिरिक्त कोणतीही रक्कम मागणेचा अर्जदारास अधिकार नाही. त्यामुळे अर्जदाराची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती लेखी जबाबाव्दारे गैरअर्जदार यांनी केलेली आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र व कागदपत्र दाखल केली आहेत. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. दोन्ही बाजुंनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता पुढील बाबी स्पष्ट होतात.
6. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून वाहनाची पॉलिसी घेतलेली असल्याची बाब दोन्ही बाजूस मान्य आहे. तसेच अर्जदाराचे वाहनाचा अपघात पॉलिसी कालावधीमध्ये झालेला असून अपघातामध्ये वाहनाचे नुकसान झालेले असल्याची बाब दोन्ही बाजूस मान्य आहे. अर्जदार यांचे म्हणणेनुसार अर्जदाराचे वाहनाचे नुकसान हे रक्कम रु.4,78,000/- झालेले असल्याचे अर्जदाराने नमुद केलेले आहे. त्यासाठी अर्जदाराने युनायटेड मोटार्स,नांदेड यांचे एस्टीमेट लेबर चार्जेस कागदपत्रे दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांनी लेखी जबाब दाखल केल्यानंतर अर्जदाराने युनायटेड मोटार्स,नांदेडच्या मेकॅनिकचे शपथपत्र दाखल केलेली आहे. सदरील शपथपत्रामध्ये अर्जदाराच्या वाहन दुरुस्तीचा खर्च रक्कम रु.4,78,000/- आलेला असून अर्जदाराने सदरील रक्कम नगदी स्वरुपात युनायटेड मोटार्स,नांदेड यांना दिलेली असल्याचे शपथपत्रामध्ये नमुद केलेले आहे. सदरील शपथपत्र दाखल केल्यानंतर गैरअर्जदार यांनी सदरील मेकॅनिकची उलटतपासणी घेण्याचा अर्ज दिला,त्यावर मंचाने आदेश पारीत करुन गैरअर्जदार यांनी मेकॅनिकची उलटतपासणीसाठी प्रश्नावली दाखल करावी व सदर प्रश्नावलीचे उत्तरे साक्षीदाराने द्यावी असा आदेश दिलेला होता. त्यानुसार गैरअर्जदार यांनी दिनांक 09.03.2015 रोजी साक्षीदारासाठी प्रश्नावली दाखल केली. आजपर्यंत अर्जदाराने साक्षीदारासाठी दिलेल्या प्रश्नावलींचे उत्तरे मंचासमोर दाखल केलेली नाही. त्यामुळे अर्जदारास उत्तरे दाखल करावयाची नाहीत असे समजून प्रकरणात युक्तीवाद ऐकला. अर्जदाराने दाखल केलेल्या लेखी युक्तीवादाचे अवलोकन केले. अर्जदार यांचे म्हणणेनुसार अर्जदाराच्या वाहनाचे दुरुस्तीसाठी रक्कम रु.4,78,000/- इतका खर्च आलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर सर्व्हेअरची नेमणूक केली होती. सर्व्हेअर यांनी दिलेला अहवाल व सर्व्हेअरचे शपथपत्र गैरअर्जदार यांनी मंचासमोर दाखल केलेले आहे. सदरील अहवालाचे व शपथपत्राचे अवलोकन केले असता सर्व्हेअरचे अहवालानुसार अर्जदाराच्या वाहनाचे नुकसान हे रक्कम रु.1,64,530/- झाले असल्याबद्दलचा अहवाल दिलेला आहे. सदरील अहवालावर अर्जदार यांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. मा. वरिष्ठ न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निवाडयानुसार सर्व्हेअरचा अहवाल हा महत्त्वाचा कागदपत्र असल्याने मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1. अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. गैरअर्जदार यांनी अर्जदारास वाहनाची नुकसान भरपाईची रक्कम रु.1,64,530/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत दयावेत.
3. गैरअर्जदाराने अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.3000/- व दावा खर्चापोटी रु. 2000/- आदेश तारखेपासून 30 दिवसांच्या आत दयावेत.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल
करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.