द्वारा घोषित श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदारानी स्कॉर्पीओ जीप क्रमांक एमएच 14 टी 10 ही गाडी श्री अशोक गेणुभाऊ कलाटे यांच्याकडून रु 7,10,000/- ला डिसेंबर 2007 मध्ये खरेदी केली. गाडीच्या विमा पॉलिसीचा कालावधी हा दिनांक 13/11/2007 ते 12/11/2008 असा होता. अशोक कलाटे यांच्याकडून तक्रारदाराने गाडी खरेदी केल्याची माहिती सुध्दा गैरअर्जदाराना दिल्याचे तक्रारदार म्हणतात. दिनांक 18/7/2008 रोजी सकाळी 5 वाजता त्यांच्या घराजवळून सदरील गाडी चोरीस गेली. त्यानंतर तक्रारदाराने ब-याच ठिकाणी गाडीचा शोध घेतला नंतर दिनांक 31/7/2008 रोजी तोफखान पोलीस स्टेशन अहमदनगर ला गुन्हा नोंदविला. चोरीची ही बाब तक्रारदाराने अशोक कलाटे यांना सांगितली. त्यानंतर तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे क्लेम प्रपोजल पाठवून दिले. तक्रारदारास श्री अशोक कलाटे यांच्याकडून असे समजले की, गैरअर्जदारानी त्यांचा क्लेम नामंजूर केला आहे. ही बाब गैरअर्जदारानी त्यांना कळविली नाही. गाडी चोरीस गेली त्यावेळेस तक्रारदार हे गाडीचे मालक होते व सदरील कालावधीत विमा पॉलिसी होती. तरी सुध्दा गैरअर्जदारानी तक्रारदारास क्लेमची रक्कम दिली नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार गैरअर्जदाराकडून रु 7,10,000/- 15 टक्के व्याजदराने तसेच रु 50,000/- नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च रु 10,000/- ची मागणी करतात तक्रारदाराने शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदारानी लेखी जवाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार औरंगाबाद जिल्हा मंचाच्या कार्यकक्षेत सदरील तक्रार येत नाही. कारण तक्रारदाराची गाडी ही दिनांक 19/7/2008 रोजी अहमदनगर येथून चोरीस गेली आहे. सदरील गाडीची विमा पॉलिसी ही शंकरसेठ रोड, पुणे येथून घेतलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी ते करतात. स्कॉर्पीओ गाडी श्री अशोक गेणुभाऊ कलाटे रा.वाकड ता.मुळशी जि.पुणे यांनी खरेदी केली होती त्यानंतर अशोक कलाटे यांनी ही गाडी तक्रारदारास दिनांक 20/12/2007 रोजी विकली. अशोक कलाटे यांनी गाडीची पॉलिसी पुणे येथून घेतलेली आहे. परंतु तक्रारदारास सदरील गाडी विकल्याचे विमा कंपनीस कळविलेले नाही. विमा ट्रान्सफर करण्यासाठी तक्रारदारानी ट्रान्सफर फीस भरुन विमा कंपनीकडे पाठवून दिलेला नाही. गाडीची चोरी झाल्यानंतरच ही बाब निदर्शनास आली आहे. गाडीचे मूळ मालक अशोक कलाटे यांच्या नावावरच विमा पॉलिसी आहे तसेच क्लेम फॉर्म सुध्दा अशोक कलाटे यांनीच दिलेला आहे. विमा कंपनीने तक्रारदाराचा क्लेम दिनांक 25/8/2008 रोजी ज्या दिवशी गाडी चोरीला गेली त्या दिवशी अशोक कलाटे हे गाडीचे मालक नव्हते या कारणावरुन नामंजूर केलेला आहे. तक्रारदार विमाधारक नाहीत आणि त्यांनी विमा कंपनीकडे क्लेमही दाखल केलेला नाही. तक्रारदार हे विमा कंपनीचे पॉलिसीधारक व ग्राहक नाहीत. म्हणून ग्राहक संरक्षण कायदयानुसार तक्रारदार हे विमा कंपनीचे ग्राहक होऊ शकत नाहीत. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 157 सब क्लॉज 2 नुसार ज्याच्या नावावर वाहन ट्रान्सफर केलेले आहे त्यांनी 14 दिवसाच्या आत विमा कंपनीस कळवावे लागते आणि पॉलिसीमध्ये त्याप्रमाणे बदल करुन घ्यावा लागतो. प्रस्तूतच्या प्रकरणामध्ये 14 जानेवारी 2008 ला गाडी तक्रारदाराच्या नावावर ट्रान्सफर झालेली आहे. परंतु त्याची माहिती विमा कंपनीस दिलेली नाही. वास्तविक पाहता, ज्याच्या नावावर गाडी ट्रान्सफर झाली म्हणजेच तक्रारदारानी विहीत नमुन्यातील फॉर्म भरुन त्यानी ती पॉलिसी स्वत:च्या नावावर करुन घ्यावयास पाहिजे होती. तक्रारदाराची गाडी दिनांक 19/7/2008 रोजी चोरीला गेली तयानंतर 12 दिवसांनी म्हणजेच दिनांक 31/7/2008 रोजी त्यांनी पोलीसामध्ये गुन्हा नोंदविला आहे. वास्तविक पाहता ताबडतोब पोलीसाकडे त्यांनी जावयास हवे होते. हे सर्व पॉलिसीच्या अटी व शर्तीचे भंग करणारे आहे. या सर्व कारणावरुन तक्रारदाराची तक्रार अमान्य करावी अशी मागणी ते करतात. गैरअर्जदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली आहेत. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्राची मंचानी पाहणी केली. तक्रारदाराचे नांव अर्जून शंकर शिंदे असून त्यांनी अशोक कलाटे यांच्याकडून डिसेंबर 2007 मध्ये सदरील स्कॉर्पीओ जीप खरेदी केली आहे. मूळ मालक अशोक कलाटे पुणे येथे राहणारे असून, गाडी खरेदी व गाडीचा विमा त्यांनी पुणे येथूनच घेतला. गाडी खरेदी केल्यानंतर तक्रारदारानी गाडी स्वत:च्या नावावर करुन घेतली परंतु गाडीचा विमा स्वत:च्या नावार करुन घेतला नाही हे कागदपत्रावरुन दिसून येते. तक्रारदाराची गाडी अहमदनगर येथून त्यांच्या राहत्या घरापासून चोरीला गेली. गाडीची विमा पॉलिसी पुणे येथून घेतलेली आहे. तरी सुध्दा तक्रारदारानी औरंगाबाद मंचामध्ये ही तक्रार दाखल केलेली आहे. तक्रार दाखल करतेवेळेस अहमदनगर येथे बजाज अलियांन्झ कंपनीचे शाखा कार्यालय नसल्याचे आणि औरंगाबादहून पॉलिसी घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. गाडीची चोरी झाल्यानंतर मूळ मालक अशोक कलाटे यांनी विमा कंपनीमध्ये स्वत:च्या नावावर क्लेम दाखल केला. गैरअर्जदारानी तपास केल्यानंतर त्यांना असे आढळून आले की, गाडी ही अशोक कलाटे यांच्या नावावर नसून अर्जून शिंदे यांच्या नावावर आहे. परंतु विमा पॉलिसी मात्र त्यांनी स्वत:च्या नावावर करुन घेतलेली नाही. म्हणून तक्रारदार हे गैरअर्जंदाराचे ग्राहक होत नाहीत. तसेच सदरील तक्रार ही या मंचाच्या कार्यक्षेत्रात येत नाही या कारणावरुन तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. वरील कारणावरुन व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |