::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 29.12.2011) अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक सरंक्षण अधिनियमचे कलम 12 अन्वये तक्रार दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. गैरअर्जदार क्र.1 हे हिरो होंडा वाहनाचे अधिकृत विक्रेता असून, गैरअर्जदार क्र.2 हे गैरअर्जदार क्र.1 चे एजंट आहेत. अर्जदार यांनी, गैरअर्जदाराकडून दि.24.5.2011 रोजी हिरो होंडा स्पेलंडर प्रो मोटार सायकल चेसीस क्र.MBLHA10ACB9E00914 व इंजिन क्र.HA10EHB9E06399 ही गैरअर्जदार क्र.1 यांचे शोरुम मधून रुपये 49,810/- नगदी स्वरुपात भरुन खरेदी केलेली आहे. मोटार सायकल खरेदी करतेवळी गैरअर्जदारानी, अर्जदाराला गाडीचे मुळ कागदपञ, रजिस्ट्रेशन बुक, विमा पॉलिसी व गाडी खरेदीचे मुळ कागदपञे दिले नाही. अर्जदार व त्यांचे मिञ श्री निलेश पांडूरंग डोंगरकार यांचे वाहन आर.टी.ओ.कडून पासिंग करण्यात आले. अर्जदाराचे मिञ निलेश पांडूरंग डोंगरकार यांना त्याच्या गाडीचे खरेदीचे कागदपञ व इतर दस्ताऐवज पुरविण्यात आले. परंतु, अर्जदार यांना त्यांच्या गाडीचे नंबर किंवा गाडी खरेदीचे कागदपञ व इतर दस्ताऐवज पुरविण्यात आले नाही. अर्जदार यांनी, गैरअर्जदार क्र.1 ला गाडीचा नंबर व गाडीचे मुळ दस्ताऐवज देण्याची विनंती केली. परंतु, गैरअर्जदारानी अर्जदाराला त्याच्या गाडीचा नंबर किंवा दस्ताऐवज दिले नाही. 2. अर्जदार यांनी, दि.23.8.2011 रोजी वकीला मार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना रजिस्टर्ड पोष्टाने नोटीस पाठविला. परंतु, गैरअर्जदार यांनी नोटीस प्राप्त होऊनही मोटार सायकलचा नंबर व गाडीचे मुळ दस्ताऐवज दिले नाही व नोटीसाला उत्तर ही दिले नाही. त्यानंतर, अर्जदाराने, गैरअर्जदार यांना दि.6.9.11 ला ई-मेल व्दारे व दि.7.9.11 रोजी फॅक्सव्दारे दि.11.8.11 च्या पञाची प्रत पाठविली. परंतु, गैरअर्जदार यांचे फॅक्स मशीन बंद ठेवल्याने No Answer म्हणून उत्तर आले. गैरअर्जदार यांनी सेवेत न्युनता केली आहे. अर्जदार यांना दि.24.5.11 रोजी मोटार सायकल खरेदी करुनही गाडीचा नंबर व मुळ कागदपञ न मिळाल्यामुळे वाहनाचा उपभोग घेता आलेला नाही. त्यामुळे, गैरअर्जदार यांनी, अर्जदाराला गाडी नंबर, गाडी खरेदीचे मुळ कागदपञे, रजिस्ट्रेशन बुक, विमा पॉलिसी व इतर दस्ताऐवज देण्याचे आदेश व्हावे. अर्जदार यांना झालेल्या नुकसान भरपाई म्हणून रुपये 10,000/- गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी द्यावे. गैरअर्जदार यांनी दिलेल्या सेवेत न्युनता असल्यामुळे रुपये 25,000/- अर्जदाराला द्यावे. अर्जदारास झालेल्या शारीरीक, मानसिक, आर्थिक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रार खर्चापोटी रुपये 10,000/- गैरअर्जदारांनी देण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली आहे. 3. अर्जदाराने नि.क्र. 4 नुसार 18 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 हजर होऊन नि.क्र. 14 नुसार लेखी उत्तर व नि.क्र. 15 नुसार 5 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ला गैरअर्जदार क्र.1 मार्फत नोटीस तामील होऊन सुध्दा हजर झाला नाही. त्यामुळे, त्याचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्यात यावे, असा आदेश नि.क्र.1 वर दि.23.11.2011 ला पारीत करण्यात आला. 4. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराचे हे म्हणणे खरे आहे की, गैरअर्जदार क्र.1 हे हिरो होंडा वाहनाचे अधिकृत विक्रेता आहे. हे म्हणणे नाकबूल की, गैरअर्जदार क्र.2 हे गैरअर्जदार क्र.1 चे एजंट आहेत. हे म्हणणे खरे आहे की, अर्जदार यांनी गैरअर्जदार कडून दि.24.5.2011 रोजी हिरो होंडा स्प्लेंडर प्रो मोटार सायकल चेसिस क्र.एमबीएलएचए 10 एसीबी 9इ 00914 व इंजिन क्र.एच.ए.10 इएचबी9इ06399 ही गैरअर्जदार क्र.1 चे शोरुम मधून रुपये 49,810/- नगदी स्वरुपात भरुन खरेदी केली. हे म्हणणे खरे नाही की, मोटार सायकल खरेदी करतेवेळी गैरअर्जदारांनी, अर्जदाराला गाडीचे मुळ कागदपञ रजिस्ट्रेशन बुक, विमा पॉलिसी व गाडी खरेदीचे मुळ कागदपञ दिले नाही. हे म्हणणे खरे नाही की, अर्जदार यांनी दि.23.8.2011 रोजी वकीला मार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना रजिस्टर्ड पोष्टाने नोटीस पाठविला. हे म्हणणे नाकबूल की, सदर नोटीस गैरअर्जदार यांना प्राप्त होऊनही, मोटार सायकल नंबर किंवा नोटीसाला उत्तर दिले नाही. हे म्हणणे नाकबूल की, गैरअर्जदारांनी न्युनता पूर्ण सेवा दिल्यामुळे, आजपावेतो अर्जदाराला सदर वाहनाचा उपभोग घेता आला नाही. अर्जदाराची प्रार्थना नाकबूल, ती मागण्याचा अर्जदाराला अधिकार नाही. 5. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराला, गैरअर्जदार क्र.1 चे विरुध्द सदर तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही कारण घडलेले नाही. जिल्हा परिवहन अधिकारी यांचेकडे गाडीचे पंजिकरण करणे, नंबर मिळविणे, गाडीचा विमा काढणे ह्या प्रकारची विशेष सोय, ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्राहकांकडून त्यासाठी अधिकचा मोबदला न घेता, गैरअर्जदार क्र.1 पुरवीत असतात. गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराचे नांव वाहनाचे पंजिकरण करण्याकरीता अर्ज दि.1.7.11 ला जिल्हा परिवहन अधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयात अर्जदाराने जि.प.का. उपस्थित रहावे, असा संदेश पाठवून जमा केला. परंतु, अर्जदार जिल्हा परिवहन अधिकारी यांचे कार्यालयात स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी आवश्यक असणा-या बाबी करीता उपलब्ध नसल्यामुळे होऊ शकल्या नाही, तथा अर्जदाराने गाडीचा ताबा घेतल्या दिवसापासून गैरअर्जदार क्र.1 ला जिल्हा परिवहन कार्यालयात करावयाच्या बाबींकरीता सहकार्य केलेले नाही. जि.प.का. अर्जदाराचे उपस्थितीविना आवश्यक असणा-या बाबींची पुर्तता त्वरीत न झाल्यामुळे अर्ज प्रलंबित म्हणून राखून ठेवला, कालांतराने सदरहू अर्ज अर्जदाराचे असहकार्यामुळे तथा योग्य ती कार्यवाही त्वरीत न केल्यामुळे जि.प.कार्यालयात दिसेनासा झाला. अशी परिस्थिती, अर्जदारामुळे निर्माण झाली असतांना, गैरअर्जदार क्र.1 ने पुनश्च अर्जदाराचे वाहनाचे पंजिकरण करणेसाठी आवश्यक कार्यवाही सुरु केली, त्यासाठी अर्जदाराची उपस्थिती आवश्यक असल्यामुळे त्याला उपस्थित राहण्यासाठी, आवश्यक त्या ठिकाणी सह्या करणेसाठी गैरअर्जदार क्र.1 ने निरोप पाठविले. अर्जदाराचे वाहन खरेदी केलेल्या तथा वाहनाचा ताबा घेतलेल्या दिवसापासून गैररअर्जदार क्र.1 शी सहकार्याची भुमिका नसल्यामुळे गाडीचे पंजिकारणाचे कामाला विलंब झाला, त्यासाठी अर्जदार स्वतःच जबाबदार आहे. अर्जदाराला गैरअर्जदार क्र.1 चे विरुध्द नुकसान भरपाई मागण्याचा कायदेशिर अधिकार नाही. गैरअर्जदार क्र.1 ने आवश्यक असणारी सेवा कुठल्याही अडथळ्याविना अर्जदारास वेळोवेळी पुरविलेली आहे. अर्जदाराने तक्रार वाईट समजुतीने गैरअर्जदार क्र.1 चे कडून काहीही झालेले नसतांना तक्रार दाखल केली आहे. न्यायीक दृष्टीकोणातून विचार करता, गैरअर्जदार क्र.1 चे विरुध्द दाखल केलेली तक्रार खर्चासह खारीज करण्यांत यावी. 6. अर्जदाराने तक्रारीच्या कथना पृष्ठ्यार्थ पुरावा शपथपञ नि.18 नुसार दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तीरालाच पुरावा शपथपञ समजण्यात यावा अशी पुरसीस नि.17 नुसार दाखल केली. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरासोबत नि.15 नुसार 5 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्द प्रकरण एकतर्फा असल्यामुळे उपलब्ध रेकॉर्डवरुन तक्रार गुणदोषावर निकाली काढण्यात यावे, असा आदेश नि.1 वर पारीत करण्यांत आला. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ आणि अर्जदारातर्फे अधि.ठाकूर यांनी केलेला युक्तीवाद, तसेच गैरअर्जदार क्र.1 तर्फे अधि.दिवसे यांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे : उत्तर
1) गैरअर्जदार यांनी सेवा देण्यात न्युनता केली : नाही. आहे काय ? 2) तक्रार मंजूर करण्यांस पाञ आहे काय ? : नाही. 3) या तक्रारीचा अंतिम निकाल काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
// कारण मिमांसा // मुद्दा क्र. 1 व 2 : 7. अर्जदार यांनी, गैरअर्जदार क्र.1 कडून दि.24.5.2011 रोजी हिरोहोंडा स्प्लेंडर प्रो मोटार सायकल रुपये 49,810 मध्ये विकत घेतले, याबद्दल वाद नाही. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 कडून मोटार सायकल विकत घेतल्यानंतर त्याची नोंदणीचे दस्ताऐवज दिले नाही, तसेच वाहनाची नोंदणी करुन दिली नाही. त्यामुळे, अर्जदारास वाहन चालविता आले नाही. त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी गैरअर्जदाराकडून केली आहे, त्याचप्रमाणे वाहनाचे दस्ताऐवज देण्यात यावे, अशी मागणीबाबत वाद आहे. 8. गैरअर्जदार क्र.1 हा हिरोहोंड मोटार सायकलचा अधिकृत विक्रेता असून, गैरअर्जदार क्र.2 त्याचा एजंट आहे. प्रस्तूत प्रकरणातील नोटीस गैरअर्जदार क्र.2 ला गैरअर्जदार क्र.1 मार्फतच तामील करण्यांत आले. परंतु, गैरअर्जदार क्र.2 हा हजर झालेला नाही आणि आपले लेखी म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे, त्याचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्यांत आलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी, गैरअर्जदार क्र.2 हा एजंट असल्याचे नाकबूल केले आहे. अर्जदार यांनी, गैरअर्जदार क्र.2 चा भ्रमण ध्वनीवर वारंवार फोन करुन, वाहनाचे दस्ताऐवज व नोंदणी करुन मागीतली, तसेच गैरअर्जदार क्र.1 च्या कार्यालयातील टेलीफोन क्रमांकावर फोन करुन दस्ताऐवजाची मागणी केली. परंतु, गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराची मागणी पूर्ण केली नाही. अर्जदार यांनी, याबाबत गैरअर्जदारांना फोन केल्याचे दस्ताऐवज अ-9 वर दाखल केलेले आहे. सदर दस्ताचे अवलोकन केले असता, भ्रमणध्वनी क्रमांक 8888822585 या क्रमांकावरुन केल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. सदर दस्ताऐवजानुसार हा भ्रमणध्वनी क्रमांक वसंतराव डी.गंधारे यांच्या नावाने आहे. अर्जदाराने वसंतराव गंधारे हा त्याचा सासरा असल्याबाबत शपथपञ रेकॉर्डवर आणलेला नाही. तसेच, वसंतराव गंधारे हे कुठे राहतात ते अर्जदारासोबत राहतात किंवा काय, याबद्दलही कुठलाही पुरावा रेकॉर्डवर आणला नाही, किंवा त्याचे शपथपञ दाखल केला नाही. त्यामुळे, त्याचे भ्रमणध्वनी वरुन गैरअर्जदारास वारंवार फोन करुन कागदपञाची मागणी केली, हे अर्जदाराचे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ नाही. 9. अर्जदाराने दुसरा असाही पुरावा सादर केला नाही की, गैरअर्जदार क्र.2 चा मोबाईल क्र.9766863022 हा त्याचे नावाने आहे व तो गैरअर्जदार क्र.1 कडे एजंट म्हणून काम करतो. गैरअर्जदार क्र.2 चे विरुध्द प्रकरण एकतर्फा असले तरी त्याचा भ्रमणध्वनी क्र.9766863022 हा आहे हे ग्राह्य धरण्यासारखा पुरावा रेकॉर्डवर नाही, तसेच वसंतराव गंधारे याचा शपथपञ रेकॉर्डवर नाही, त्यामुळे त्यांचे भ्रमणध्वनीवरुन वारंवार गैरअर्जदार क्र.1 व 2 शी संपर्क केला, हे अर्जदाराचे म्हणणे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास पाञ नाही. 10. अर्जदाराने, गैरअर्जदार क्र.1 कडून दि.24.5.2010 ला मोटार सायकल खरेदी केल्यानंतर गैरअर्जदाराशी भ्रमणध्वनीवर आणि टेलीफोन क्रमांकावर वारंवार संपर्क केला आणि गैरअर्जदार यांनी सुध्दा संपर्क करण्यांस सांगीतले होते, असे अर्जदाराचे म्हणणे आहे. परंतु, अर्जदाराने दि.24.5.2010 पासून ई-मेल पञ दि.6 सप्टेंबर 2011 पर्यंत, आणि 16 ऑगष्ट 2010 पर्यंत कुठलाही पञव्यवहार केला नाही. एवढे दिवस अर्जदाराने गैरअर्जदाराशी कां संपर्क केला नाही, याचे काहीही स्पष्टीकरण नाही. अर्जदाराने, दि.24.5.2010 नंतर नवीन वाहन घेतल्यावर त्याचा नोंदणी क्रमांक मिळण्याकरीता जास्त आतुरतेने वारंवार गैरअर्जदाराशी संपर्क साधून घेणे अपेक्षीत असतांनाही 16 ऑगस्ट पर्यंत कां विलंब केला, हे न समजणारे कोडे आहे. यावरुन, अर्जदाराचे तक्रारीत सत्यता दिसून येत नाही, असे या न्यायमंचाचे मत आहे. 11. अर्जदार यांनी, आपले तक्रारीत असे कथन केले आहे की, त्याचे सोबत त्याचदिवशी त्याचा मिञ निलेश पांडूरंग डोगंरकार यांनी मोटार सायकल घेतली व त्याचे दस्ताऐवज गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यास दिले आहे. परंतु, अर्जदार यांनी असे सांगितले नाही की, निलेश डोंगरकार हा आर.टी.ओ.ऑफीसला न जाता त्याचे वाहनाची नोंदणी गैरअर्जदार क्र.1 यांनी नोंदणी करुन दिले. वास्तविक, गैरअर्जदार क्र.1 चे म्हणणे नुसार अर्जदाराच्या असहकार्यामुळेच वाहनाला नोंदणी क्रमांक मिळण्यास विलंब झाला. गैरअर्जदार क्र.1 यांचे हे म्हणणे दाखल दस्ताऐवजावरुन आणि अर्जदाराच्या कथनावरुन सिध्द होतो. अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडे वाहन घेवून आर.टी.ओ.कार्यालयात नोंदणी करता गेला, परंतु गैरअर्जदार क्र.1 नी नोंदणी करुन दिली नाही आणि सेवेत न्युनता केली, हे सिध्द केले नाही. वास्तविक, अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडे वाहन नोंदणी करण्याकरीता गेला नाही, त्यामुळेच वाहनाला नोंदणी क्रमांक मिळवून देण्यात आला नाही. नवीन वाहनाची नोंदणी करण्याकरीता स्वतः खरेदीदार व वाहन, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात हजर असणे आवश्यक आहे, हे गैरअर्जदार क्र.1 चे म्हणणे संयुक्तीक व रास्त आहे. 12. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, गैरअर्जदार क्र.1 यांनी वाहनाची नोदणी क्रमांक न मिळवून दिल्यामुळे, तसेच मुळ कागदपञ न मिळाल्यामुळे वाहनाचा उपभोग घेता आला नाही, आणि भद्रावती येथे वरोरावरुन जाणे-येणे करावयास बसच्या भाडयाचे जास्तीचा खर्च करावा लागला, तसेच एक-एक तास बसची वाट पाहावी लागून कार्यालयात जायला उशीर झाला. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास नुकसान भरपाईची मागणी द्यावी अशी मागणी केली, परंतु अर्जदाराची ही मागणी गैरकायदेशिर असून मंजूर करण्यास पाञ नाही. नौकरी मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता दुसरीकडून जाण्यास विलंब होत होता व कार्यालयात जाण्यास विलंब झाला, या गैरकायदेशीर कृत्याकरीता, कायदेशिररित्या संरक्षण अर्जदारास देता येणार नाही. यावरुन, अर्जदाराच्या या कथनात काहीही तथ्य नाही आणि कायदेशीररित्या ग्राह्य धरण्यास पाञ नाही. उलट, अर्जदाराने स्वतः असहकार्य केल्यामुळे आणि स्वतः गैरअर्जदाराकडे गेला असल्याचा पुरावा दाखल केलेला नसल्यामुळे, गैरअर्जदार यांनी सेवा देण्यात न्युनता केली, हे सिध्द होत नाही. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे. 13. अर्जदाराचे वकीलांनी युक्तीवादात असे सांगितले की, गै.अ.यांनी अर्जदारास वाहन नोंदणी करण्याकरीता बोलविण्याबाबत भ्रमणध्वनी केला किंवा पञ पाठवून उपस्थित राहण्याबाबत सांगितले, याबाबतचा कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. या गै.अ.च्या म्हणण्यात तथ्य नाही. उलट पक्षी, अर्जदाराने वसंतराव गंधारे यांचा भ्रमणध्वनी दाखविला, जेंव्हा की, स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला नाही आणि दूसरी महत्वाची बाब अशी की, नवीन वाहन घेतल्यानंतर स्वतः जावून मुळ कागदपञाची मागणी केली आणि वाहन घेवून जाऊन नोंदणी करुन मागीतले, अशी बाब आणलेली नाही. अश्यास्थितीत, गैरअर्जदार यांनी सेवा देण्यात न्युनता केली हे सिध्द होत नाही, त्यामुळे तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही.
14. एकंदरीत, अर्जदार स्वतःच मुळ कागदपञ न मिळण्यास व नोंदणीचे कागदपञ न मिळण्यास जबाबदार असल्यामुळे आणि नोंदणी करीता अर्जदाराची उपस्थिती व सह्या आवश्यक असल्याने, अर्जदाराशिवाय उप प्रादेशिक परिवहन अधिका-याकडून नोंदणी करुन दिली नाही, हे अर्जदाराचे म्हणणे संयुक्तीक नसल्याने, गैरअर्जदार यांनी सेवेत न्युनता केली नाही, त्यामुळे तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे. मुद्दा क्र.3 : 15. वरील मुद्दा क्र. 1 व 2 च्या विवेचने वरुन, तक्रार मंजूर करण्यास पाञ नाही, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्याने, तक्रार नामंजूर करुन, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज. (2) अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपआपला खर्च सहन करावा. (3) अर्जदार व गैरअर्जदार यांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यांत यावी. चंद्रपूर, दिनांक :29/12/2011 |