जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 311/2011 तक्रार दाखल तारीख – 19/12/2011
निकाल तारीख - 20/02/2015
कालावधी - 03 वर्ष , 02 म. 01 दिवस.
1) श्रीमती यशोदाबाई अंगद कांबळे,
वय – 36 वर्षे, धंदा – घरकाम,
2) श्रीमती भारतबाई गोरख कांबळे,
वय – 61 वर्षे, धंदा – नील,
दोघे रा. अचवला, ता. देवणी,
जि. लातुर हा.मु.उदगीर. ....अर्जदार
विरुध्द
व्यवस्थ्कापक,
भारतीय जीवन विमा निगम,
शहर शाखा क्र. 2 (98 एच)
माऊली संकुल, खर्डेकर स्टॉप,
पोस्ट बॉक्स नं. 12 , औसा रोड,
लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. ए.एम.के.पटेल.
गैरअर्जदारातर्फे :- अॅड.एन.बी.देशपांडे.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मौजे अचवला, ता. देवणी जि. लातुर हा.मु. उदगीर येथील रहिवाशी असून तक्रारदार क्र. 1 हे मयत अंगद गोरख कांबळे यांची पत्नी असुन कायदेशीर वारसदार आहे. तक्रारदार क्र. 2 हे मयत अंगद गोरख कांबळे यांची आई असून कायदेशीर वारसदार आहे. दि. 04/06/10 रोजी अपघाती मृत्यू झालेला आहे. तक्रारदारानी अंगद गोरख कांबळे याचा अपघाती मृत्यू झाल्याबद्दल भारतीय जीवन विमा योजनेचा लाभ मिळण्याकरीता तक्रारदाराने तक्रार दाखल केलेली आहे. मयत अंगद गोरख कांबळे यांनी दोन विमा पॉलीसी काढलेल्या आहेत. पॉलीसी क्र. 1 ज्याचा क्र. 982429042 कालावधी 24 वर्षे विमा हप्ता रु. 184/- नॉमीनी म्हणून यशोदाबाई पत्नीचे नाव आहे. तसेच पॉलिसी क्र. 2 ज्याचा क्र. 982430407 कालावधी 20 वर्षे विमा हप्ता रु. 284/- भारतबाई (आई) तसेच सदर जीवन विमा निगमने अपघाती मृत्यू झाल्यास जोखीम म्हणून पॉलीसीचे संपुर्ण रक्कम + डब्बल अॅक्सीडेंट बेनीफीट (DAB)ची रक्कम रु. 50,000/- प्रत्येकी पॉलीसी म्हणजेच एकूण रु. 1,00,000/- चा लाभ तक्रारदारास मिळायला हवा परंतु सामनेवाला यांनी तक्रारदार यांना डबल अॅक्सीडेंट बेनीफीटचा लाभ अदयाप पावेतो दिलेला नाही. तक्रारदार क्र. 1 यांचे पती व तक्रारदार क्र. 2 चे मुलगा यांचा मयत अंगद गोरख कांबळे यांचा दि. 03/06/10 ते 04/06/10 च्या मध्यरात्री बिदर गेटजवळ उदगीर येथे रेल्वे लोहमार्गावर रेल्वे ट्रॅक पायी ओलांडत असताना अचानक रेल्वेचा अपघात होवून रेल्वेखाली सापडुन जागीच मरण पावलेला आहे. सदर अपघाती घटनेची उदगीर पोलीस स्टेशन येथे नोंद क्र. 30/10 कलम 174 फौ.व्य.सं. करण्यात आलेली आहे. अर्जदाराने सर्व कागदपत्रे गैरअर्जदाराकडे पाठवलेले आहेत. तरीही गैरअर्जदाराने सर्व कागदपत्रे पाठवूनही अर्जदारास पैसे मिळालेले नाहीत. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणून रु. 1,00,000/- अपघात तारखेपासुन 15 टक्के व्याज दराने दयावेत. मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 10,000/- व दाव्याचा खर्च रु. 7,000/- दयावेत.
तक्रारदाराने तक्रारी सोबत तालुका दंडाधिकारी यांचे पत्र, पोलीसांचा अंतिम चौकशी अहवाल, वैदयकीय अधिका-यांचे मृत्यू प्रमाणपत्र, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदनाकरीता पाठविलेचा अहवाल, शवविच्छेदन अहवाल, नोटीस रजिस्टर पोस्टद्वारे व पोष्टाची पावती, डाक परत पोहच पावती, सामनेवाला यांचे नोटीसीचे उत्तर, सामनेवाला यांचे पत्र इत्यादी कागदपत्र दाखल केली आहेत.
गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराने योग्य ती कागदपत्रे दिलेली नसल्यामुळे सदरचा दावा फेटाळण्यात यावा. गैरअर्जदाराने हे मान्य केले आहे की, अर्जदाराने त्यांच्याकडुन पॉलीसी नं. 982429042 व 982430407 अशा आहेत. व अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा दि. 04/06/10 रोजी रेल्वे ट्रॅकवर झालेला आहे. सदरचा मृत्यू हा संशयीत असल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास एफ.आय.आर, मॅजीस्ट्रेटचा मृत्यू बाबतचा अहवाल, व शवविच्छेदन अहवाल मागितलेला आहे. तसेच गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार अर्जदाराचा मृत्यू हा त्या दिवशी अर्जदाराने दारु प्राशन केले होते म्हणून झालेला असल्यामुळे विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीनुसार क्र. 41 नुसार सदरचा मृत्यू हा त्यात बसत नसल्यामुळे अर्जदार हा लाभार्थी होवू शकत नाही. म्हणून सदरची तक्रार फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. व अर्जदाराच्या पतीने अंगद कांबळे याने गैरअर्जदाराकडुन पॉलीसी क्र. 982429042 व 982430407 अशा घेतलेल्या आहेत. ही बाब गैरअर्जदारास मान्य आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून गैरअर्जदारांनी पोलीसांनी दिलेल्या पंचनाम्यातील मजकुर वाचून अर्जदार हा मृत्यू समयी दारु पिलेला होता हे समजुन त्यास मॅजीस्ट्रेटचा अपघाती मृत्यूचा अहवाल मागितलेला आहे, जो सर्व चुकीचा आहे. पोलीसांच्या जबाबानुसार ज्यावर गैरअर्जदार पुर्णत: निर्भर आहे. तो असा दि. 15/06/10 रोजी व तो दारु पिण्याचे सवईचा होता. आणि दारुच्या नशेतच तो रेल्वे ट्रॅक्टरवर गेल्याने अचानक रेल्वेच्या धडकेने मरण पावला असा आहे. परंतु ही बाब CA च्या अहवालाने अथवा इतर कोणत्याही कागदोपत्री पुराव्यावरुन गैरअर्जदार सिध्द करु शकलेला नाही. तसेच मृत्यू समयी तो एकटाच होता.
गैरअर्जदाराने याच ओळीवर पुर्णत: निर्भर राहिलेला आहे. यापुढे एफ.आय.आर मध्ये अखेरच्या परिच्छेदात असे नमुद केलेले आहे. एकंदरीत सदर आ.मृ चे तपासात यातील मयत नामे अंगद गोरख कांबळे वय – 42 वर्षे रा. अचवला हा. मु उदगीर हे रेल्वेच्या धडकेने अपघात होवून गंभीर जखमी होवून मरण पावला आहे. त्यामुळे यात मयत हा रेल्वेच्या धडकेने गंभीर जखमी होवून मृत्यू या सदराखाली समरी मंजुर होणेस विनंती आहे. असे लिहिले आहे. सदर केसमध्ये अर्जदाराच्या पतीने मृत्यूसमयी दारु पिला होता ही बाब सिध्द करणे गैरअर्जदाराने गरजेचे आहे. तसेच सदर केसमध्ये दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार सदरचा मृत्यू हा probable cause of death is cardio respiratory arrest secondary to hemorrhagic shock तसेच या शवविच्छेदन अहवालात प्रत्येक अवयवाचे विश्लेषण केलेले असून यात कुठेही अल्कोहोल शब्द दिसुन येत नाही. तसेच त्याचे कोणतेही अवयव CA साठी पाठवलेला नाही. जेव्हा डॉक्टरांनी आपल्या अहवालात अल्कोहोल मृत व्यक्तीने पिला होता असे लिहीलेले नाही. तेव्हा त्याच्यावर असा संशय घेवून त्याच्या पॉलीसीचे पैसे न देता गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केलेली आहे. मयत हा 42 वर्षाचा होता. तसेच मृत्यूसमयी तो एकटाच होता त्याचे नातेवाईक कोणीही सोबत नव्हते. तेव्हा इतर नातेवाईकांना मृत्यू समयी त्याच्या जवळ कोणीच नसल्यामुळे अर्जदाराच्या पती बद्दल अर्जदार सुध्दा तो दारु पीत होता त्यास सवय होती हे म्हणणे चुकीचे आहे. दारु पिण्याची सवय असणे व मृत्यू समयी दारु पिलेला असणे या दोन्ही बाबी भिन्न आहेत. तसेच सदरचे AD ज्यावर हे वाक्य वाढीव टाकलेले आहे ते दि. 15/06/2010 रोजीचे असून त्या अगोदर म्हणजेच दि. 04/06/10 रोजीचे शवविच्छेदन अहवाल घटनास्थळ पंचनामा व मरणोत्तर पंचनामा हे सर्व कागदपत्रे आहेत. सदरचे वाक्य देखील परिच्छेद संपताना वाढीव टाकून आणि जोडून तो दारु पिण्याच्या सवईचा होता असे म्हटलेले आहे. यावरुन ही बाब सिध्द गैरअर्जदार करु शकला नाही की अर्जदाराच्या पतीने मृत्यू समयी दारु पिलेला होता.तसेच घटनास्थळ पंचनाम्यात इन्क्वेस्ट पंचनामा सर्व कागदोपत्री पुराव्यात ही बाब नमुद नसल्यामुळे डॉक्टरांनी दिलेला शवविच्छेदन अहवालावरील मृत्यू अभिप्राय हा निष्णात व्यक्तीचा असल्यामुळे तो गृहीत धरण्यात येतो. व सदर अर्जदार क्र. 1 व 2 हे सदर पॉलीसीचा मोबदला मिळण्यास पात्र आहे. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास रु. 1,00,000/- देण्यात यावेत. तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/- व दाव्याचा खर्च रु. 3,000/- देण्यात यावा.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदार क्र. 1 व 2 यांना रक्कम रु.
1,00,000/-(अक्षरी एक लाख रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या
आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न
केल्यास तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज
देण्यास जबाबदार राहतील.
4) गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदार क्र. 1 व 2 यांना मानसीक व
शारिरीक त्रासापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) व तक्रारीच्या
खर्चापोटी रु. 3,000/- (अक्षरी तीन हजार रुपये फक्त) आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.