जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक :191/2011 दाखल तारीख :19/07/2011
निकाल तारीख :05/02/2015
कालावधी : 03वर्षे 07म.16 दिवस
श्रीमती विमल ऊर्फ विजयमाला शेषेराव पाटील,
वय 45 वर्षे, धंदा घरकाम,
रा. उजनी ता. औसा जिल्हा लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी लि.
गोरक्षण समोर, पंचवटी हॉटेल जवळ,
मेन रोड, लातूर.
2) व्यवस्थापक,
कबाल इंशुरन्स सर्व्हीस प्रा.लि.
विनित आठल्ये, भास्करायण,
एच.डी.एफ.सी. लोन बिल्डींग,
प्लॉट नं.7, टाऊन सेंटर सेक्टर ई,
सिडको औरंगाबाद.
3) तालुका कृषी अधिकारी,
कृषी कार्यालय औसा, जि. लातूर.
4) जिल्हा कृषी अधिकारी,
जिल्हा कृषी कार्यालय लातूर जि. लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.एस.जी. पाटील
गै.अ.क्र.1 तर्फे : अॅड. एस.व्ही. तापडीया.
गै.अ.क्र.2,3 व 4 तर्फे : स्वत:
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्री.अजय भोसरेकर, मा. सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा उजनी ता. औसा येथील रहिवाशी असून त्याच्या मयत पतीच्या नावे गट क्र.127 व 130 मध्ये एकुण 3 हे. 42 आर जमीन आहे ती वारसा हक्काने तक्रारदाराच्या नावे करण्यात आली आहे. दि. 13.11.2009 रोजी दुपारी 12 वा. चे सुमारास तक्रारदाराचा मुलगा मोटारसायकल क्र. एम.एच. 24/आर 6318 यावर पाठीमागे त्याचा मित्र शाहुराज तुकाराम दळवे यांच्या सोबत लातूर येथे बाजार करुन परत उजनीकडे येत असतांना बोरफळ ता. औसा येथे सायंकाळी 8.15 वा.च्या सुमारास औसा ते तुळजापुर जाणा-या रोडवर ट्रक क्र. एम.एच.36/एफ 5177 रस्त्याच्या मध्यभागी निष्काळजीपणे उभी केली होती. रात्रीच्या आंधारामुळे ट्रक दिसू न शकल्याकारणाने ट्रकच्या मागील बाजुस तक्रारदाराच्या मुलाची मोटार सायकल आदळुन अपघातात जागीच मृत्यू झाला. सरकारी दवाखाना औसा येथे मयताचे शवविच्छेदन करुन शव तक्रारदराच्या कुटूंबाच्या स्वाधीन केले, सदर घटनेची नोंद पोलिस औसा पोलिस स्टेशन येथे गुन्हा क्र. 136/2009 नुसार करण्यात आली.
तक्रारदाराने शेतकरी अपघात विम्याचा लाभ मिळण्याच्या उद्देशाने सामनेवाला क्र.3 यांचेकडे दि. 06.10.2010 रोजी क्लेम फॉर्म व त्यास नियमानुसार आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडुन सादर केला. सामनेवाला क्र.3 यांच्याकडे तक्रारदाराने चौकशी केली असता तुमचा विमा प्रस्ताव सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे पाठवण्यात आल्याचे सांगीतले. तक्रारदाराने सामनेवाला यांच्याकडे चौकशी केली असता, क्लेम मंजुर केला नाही व उडवाउडवीची उत्तरे दिली या कारणाने तक्रारदाराने दि. 30.12.2010 रोजी सामनेवाला यांना कायदेशीर नोटीस पाठवली. सदर नोटीसचे उत्तर सामनेवाला यांनी न दिल्यामुळे सदर तक्रार या न्यायमंचात दाखल करण्यात आली. तक्रारदाराने शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- त्यावर अपघात तारखेपासुन 12 टक्के व्याज, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 5000/- मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 24 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाला क्र. 4 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त झाली, त्यांचे लेखी म्हणणे दि. 31.12.2011 रोजी दाखल झाले असून, त्यात त्यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव दि. 20.10.2010 रोजी जा.क्र. 5188 अन्वये सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे वर्ग केल्याचे म्हटले आहे.
सामनेवाला क्र. 2 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 31.12.2011 रोजी दाखल झाले असून तक्रारदारास दि. 02.11.2010 व दि. 06.12.2010 रोजी विमा प्रस्तावातील त्रूटीबाबत पत्र सामनेवाला क्र. 4 यांच्याकडे पाठवल्याचे म्हटले आहे. सदर प्रस्तावातील त्रूटीची पुर्तता न झाल्यामुळे दि. 21.12.2010 रोजी सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे अपुर्ण प्रस्ताव लिहुन वर्ग केला. तो आजपयंत प्रलंबित असल्याचे म्हटले आहे.
सामनेवाला क्र. 3 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 31.12.2010 रोजी दाखल झाले असून , सामनेवाला क्र. 2 यांनी त्रूटीबाबत पाठवलेल्या पत्राची माहिती तक्रारदारास कळवल्याचे म्हटले आहे. तक्रारदाराने सदर प्रस्तावातील त्रूटींची पुर्तता सांगुन ही न केल्यामुळे सामनेवाला क्र. 1 यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव बंद करण्यात आला आहे असे म्हटले आहे.
सामनेवाला क्र. 1 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 16.01.2015 रोजी दाखल झाले असून, त्यात त्यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा 90 दिवस कालावधी संपुष्ठात आल्यानंतर दाखल झाला असल्यामुळे शेतकरी अपघात विमा योजनेच्या नियम व अटी नुसार तक्रारदारास विमा प्रस्ताव मंजुर करता येत नसुन, सामनेवाला क्र. 2 यांनी सामनेवाला क्र. 4 यांच्याकडे त्रूटीतील पुर्तता करण्या बाबत कळवले असतांना ती न केल्या कारणाने सामनेवाला क्र. 2 यांनी अपुर्ण विमा प्रस्ताव या शे-याने प्रस्ताव दि. 21.12.2010 रोजी मिळाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तक्रारदाराचा अपुर्ण प्रस्ताव प्रलंबित असल्या कारणाने न देवुन आम्ही कोणतीही सेवेत त्रूटी केली नसल्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणण्याचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 04 कागदपत्रे दाखल केले आहेत.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व सोबतची कागदपत्रे आणि दोघांचाही तोंडी युक्तीवाद व सामनेवाला क्र. 1, 2 व 4 यांचे लेखी म्हणणे यांचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा योग्य प्रकारे सामनेवाला क्र. 3 यांच्याकडून सामनेवाला क्र. 4 यांच्याकडे आल्याचे म्हटले आहे. आणि सामनेवाला क्र. 2 व 1 यांनी अपुर्ण प्रस्ताव प्रलंबित असल्याचे म्हटले आहे व सामनेवाला क्र. 3 यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्ताव सामनेवाला क्र. 1 यांनी बंद केल्याचे त्यांचे लेखी म्हणण्यात म्हटले आहे, या बाबत कोणताही ठोस पुरावा , पुरावा कायदयानुसार योग्य असेल असा, या न्यायमंचात सादर केलेला नाही. यावरुन तक्रारदारास दयावयाच्या सेवेत सामनेवाला क्र. 3 यांनी लेखी म्हणण्यात असत्य कथन केले व सामनेवाला क्र. 1 यांनी प्रस्ताव प्रलंबित ठेवला आहे हे दिसून येते. म्हणुन तक्रारदार हा शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- , तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 5000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 3000/- मिळण्यास पात्र आहे असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबक न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- सामनेवाला क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
- सामनेवाला क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास, त्यावर तक्रार दाखल तारखेपासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- सामनेवाला क्र. 1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 5000/- व तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु. 3000/-, आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
- सामनेवाला क्र. 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदाराचे प्रस्ताव प्रलंबित असतांना प्रस्ताव बंद केल्याचे लेखी उत्तरात असत्य कथन कोणताही पुरावा न देता कल्या कारणाने तक्रारदारास रक्कम रु. 1000/- व ग्राहक साहाय्यता निधीमध्ये रक्कम रु. 500/-, आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**