::: निकालपत्र :::
(निकाल तारीख :11/02/2015 )
(घोषित द्वारा: श्री.अजय भोसरेकर, मा. सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा जढाळा ता. चाकुर येथील रहिवाशी असून, तक्रारदाराच्या मयत पतीच्या नावे गट क्र. 119/1 मध्ये 52 आर शेतजमीन आहे. तक्रारदाराच्या पती विहीरीतुन पाणी भरण्यासाठी गेला असता, अचानक विहीरीत पाय घसरुन पडून मृत्यू झाला असे म्हटले आहे. तक्रारदाराने शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी सामनेवाला क्र. 1 ते 4 यांच्याकडे सर्व कागदपत्रांची पुर्तताकरुन विमा प्रस्ताव दाखल केला असे म्हटले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा प्रस्ताव मंजुर केला नाही म्हणुन काहीच न कळवल्यामुळे दि.17.02.2011 रोजी कायदेशीर नोटीस पाठवली. सदर कायदेशीर नोटीसचे उत्तर दिले नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
तक्रारदाराने सदर तक्रार विलंब माफीचा अर्ज सादर केला आहे. विलंब माफीच्या अर्जात तक्रारदाराचा मयत पती दि. 04.10.2008 रोजी विहीरीत पाय घसरुन पडून मयत झाल्या बद्दलचे म्हटले आहे. विलंब माफीच्या अर्जात तक्रारदाराने सुस्पष्ट असा किती दिवसाचा विलंब आहे याचा खुलासा केलेला नाही. तक्रारदाराने शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु. 1,00,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 5000/- मिळण्याची मागणी केली आहे.
सामनेवाला क्र. 2 यांचे चुकीचे नाव असल्यामुळे तक्रारदाराने दुरुस्ती अर्ज दाखल केला आहे. त्यावर दुरुस्तीची परवानगी न्यायमंचाने दि. 27.03.2012 रोजी मंजुरी दिली आहे. परंतु तक्रारदाराच्या वकीलानी मुळ तक्रारीस सदर दुरस्ती न केल्यामुळे सामनेवाला क्र.2 यांना न्यायमंचाची नोटीस पाठवण्यात आलेली नाही.
सामनेवाला क्र. 5 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा सामनेवाला क्र. 1 यांच्याकडे दि. 14.01.2009 रोजी पाठवल्याचे म्हटले आहे.
सामनेवाला क्र. 3 व 6 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असुन, ते गैरहजर असल्याकारणाने त्यांचे विरोधात दि. 25.11.2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला आहे.
सामनेवाला क्र. 1 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून, त्यांचे लेखी म्हणणे दि. 22.06.2011 रोजी न्यायमंचात प्राप्त झाले आहे. त्यात तक्रारदाराचा विमा प्रस्ताव हा दि. 13.11.2009 रोजी मिळाला असून, त्यात त्रूटी असल्या बाबत दि. 03.02.2010 व 03.03.2010 रोजी पत्राद्वारे कळवले असल्याचे म्हटले आहे. सदर चुकीची पुर्तता न झाल्यामुळे तक्रारदाराचा अपुर्ण प्रस्ताव दि. 23.06.2010 रोजी सामनेवाला क्र. 2 यांच्याकडे पाठवला, सामनेवाला क्र. 2 यांनी दि. 24.11.2010 च्या पत्रानुसार तक्रारदाराचा विमा दावा बंद केल्याचे कळवले. सदर पत्र सामनेवाला क्र. 1 यांनी त्यांच्या लेखी म्हनण्या सोबत सादर केले आहे.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार , सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे या सर्वांचे बारकाईने अवलोकन केले असता, तक्रारदाराने त्याच्या मुळ तक्रारीत तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू किती तारखेस झाला, विमा प्रस्ताव सामनेवाला क्र. 5 यांच्याकडे कोणत्या तारखेस दाखल केला, या बाबतचा कोणताही खुलासा शपथेवर सादर केलेला नाही. तक्रारदारास सामनेवाला क्र. 2 यांनी दि. 23.06.2010 राजी मुळ मृत्यू प्रमाणपत्र , 7/12, 8 अ, 6 क, व 6 ड इत्यादी कागदपत्रांची मागणी करणारे पत्र तक्रारदारास मिळाल्या बाबतचे तक्रारदाराने तक्रारी सोबत दाखल केले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदाराने सामनेवाला क्र. 3 यांचे त्रूटीची पुर्तता केल्याचे सामनेवाला क्र. 1 यांचेकडे दाखल केल्याचे पत्र तक्रारदाराने दि. 21.01.2011 दाखल केले आहे. परंतु सामनेवाला क्र. 2 यांचे पत्र सामनेवाला क्र. 1 यांनी दि. 24.11.2010 रोजी प्रकरण बंद केल्याचे दाखल केले आहे. तक्रारदाराने प्रकरण सामनेवाला क्र. 2 यांनी बंद केल्या नंतर त्रूटीतील पुर्तता केलेले दिसून येत आहेत व सामनेवाला क्र. 2 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त नसल्यामुळे सामनेवाला यांनी सेवेत त्रूटी केली आहे हे तक्रारदाराने पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार रद्द करणे योग्य व न्यायाचे होईल, असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाही.
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**