ग्राहक तक्रार क्र. : 141/2013
दाखल तारीख : 08/10/2013
निकाल तारीख : 01/07/2015
कालावधी: 01 वर्षे 09 महिने 07 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. संजय दत्तात्रय बागल,
वय - 40 वर्षे, धंदा – शेती,
रा.सांगवी, ता.तुळजापूर, जि. उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. एल. अॅण्ड टी. फायनान्स लि.,
तर्फे : - मॅनेजर, एल. अॅण्ड टी. फायनान्स लि.
मधुमिरा कॉम्पलेक्स,
पहिला मजला मेन रोड प्लाय ओव्हर जवळ,
मित्र नगर लातुर ता.जि.लातूर.
2. मधूबन ट्रॅक्टर्स, येडशी रोड, उस्मानाबाद. ....विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधीज्ञ : श्री.एम.एस.पाटील.
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : श्री.एस.ए.कुलकर्णी.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : एक्सपार्टी.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री.एम.व्ही.कुलकर्णी यांचे व्दारा:
1) ट्रक्टर खरेदी विरुध्द पक्षकार क्र.2 कडून (विप) घेण्यासाठी विप क्र.1 कडून वित्त पुरवठा घेतला असताना विप क्र.1 यांनी बेकायदेशीरपणे ट्रॅक्टर ओढून नेला व सेवेत त्रूटी केली म्हणून ट्रॅक्टरचा ताबा व नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक्रारकर्ता (तक) यांनी ही तक्रार दिलेली आहे.
2. तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पूढीलप्रमाणे आहे, तक हा शेतकरी असून सन 2010 मध्ये त्यांला जॉनडिअर कंपनीचा जेडी 5310 55 एच. पी. हा ट्रॅक्टर घेण्याचा होता. तक कडे स्वराज कंपनीचा मॉडेल 855 हा ट्रॅक्टर होता त्याची किंमत रु.3,20,000/- होती. विप क्र.2 जॉनडिअर कंपनीचा विक्रेता आहे. त्यांने त्यांचा ट्रॅक्टर रु.7,30,000/- किंमतीला देण्याचे कबूल केले. त्यापैकी तक यांचा स्वराज ट्रॅक्टर हा विप क्र.2 यांने घेण्याचा होता. किसान गौरव योजने अंतर्गत विप क्र.1 कडून रु.4,00,000/- कर्ज पूरवठा घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे तक ने ट्रॅक्टर क्र.एम.एच.25-एस-3367 चेसीस नंबर टीवाय 531050 53157 इंजिन नंबर पीवाय 30290233533 हा खरेदी घेतला. विप क्र.1 शी तारण करार दि.8.9.2010 रोजी झाला. कर्ज पाच वर्षामध्ये व्याजासह परत फेडण्याचे होते. विप क्र.1 ने तक यांला सहा माहीचे 11 हप्ते पाडून दिले पैकी 3 ते 11 हे हप्ते रु.65,480/- चे होते. विप क्र.1 ने तक कडून उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तुळजापूर शाखेचे कोरे चेक घेतले. हप्ता वेळेवर न फेडल्यास दंड व्याज द.सा.द.शे 36 दराने आकारण्याचे कबूल करण्यात आले. तक ने ट्रॅक्टरची आर.टी.ओ. ऑफिस उस्मानाबाद येथे नोंद केली.
3. तक ने ठरल्याप्रमाणे दि.10.12.2010 रोजी रु.30,000/- चा हप्ता दिला. दि.04.03.2011 रोजी रु.35,480/-,दि.10.09.2011 रोजी रु.30,000/-, दि.19.09.2011 रु.35,800/- दि.21.07.2012 रोजी रु..48,350/- अशी रक्कम जमा केली. एका रकमेची पावती हरवली आहे. तक ने एकूण रक्कम रु.2,00,000/- विप क्र.1 कडे जमा केलेले आहेत. तक कडे काही हप्ते थकीत होते मात्र विप क्र.1 ने कोरे चेक बॅकेत जमा केले नाहीत.
ब) 1. विप क्र.1 ने कसलीही पूर्व कल्पना न देता दि.07.08.2013 रोजी सांगवी मांर्डी तालुका तुळजापूर येथील तक चे शेतातून त्यांचा ट्रॅक्टर परस्पर नेला व लातूर येथील कार्यालयामध्ये लावून ठेवला आहे. तक यांने विप क्र.1 ला भेटून दि.10.09.2013 पर्यतची थकीत रक्कम व्याजासह भरण्याची तयारी दर्शवली. विप क्र.1 यांने संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय ट्रॅक्टर ताब्यात देणार नाही असे सांगितले व ट्रॅक्टर विकण्याची धमकी दिली. विप क्र.1 ने तक ला दि.12.08.2013 रोजी नोटीस पाठविली. तक ने त्यांना दि.03.09.2013 रोजी उत्तर दिले. थकीत रक्कम भरुन घेऊन ट्रॅक्टरचा ताबा द्यावा अशी विनंती केली. तथापि विप क्र.1 ने दि.25.09.2013 रोजीची नोटीस पाठवून थकीत रुपये रु.1,28,000/- नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसांचे आंत जमा करावे असे कळविले. तक ने ईमेल पाठवून रक्कम भरण्यास तयार असल्याचे कळविले व ट्रॅक्टर ताब्यात देण्याची विनंती केली. मात्र विप ने नकार दिला. तसेच ट्रॅक्टर ची ऑन लाईन विक्री केल्याचे सांगितले. तक ने दि.25.09.2013 रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उस्मानाबाद यांचेकडे ट्रॅक्टर कोणाच्याही नांवे हस्तातंरण करु नये म्हणून अर्ज दिला.
2. तक हा शेतकरी असून शेतातील कामासाठी ट्रॅक्टर ची जरुरी आहे. तक ने साखर कारखान्या सोबत ऊस वाहतूकीचा करार केलेला आहे. अशा प्रकारे ट्रॅक्टर पासून तक ला दररोज रु.1,000/- चे निव्वळ उत्पन्न मिळते. विप ने ट्रॅक्टर नेल्यामूळे तक चे नुकसान झाले ते रु.75,000/- विप कडून मिळणे जरुर आहे. तसेच ट्रॅक्टर चा ताबा विप क्र.1 कडून मिळणे जरुर आहे त्यासाठी तक्रार दि.13.03.2014 रोजी दाखल केलेली आहे.
3. तक्रारीसोबत तक ने दि.02.09.2010 रोजीचे तक व विप क्र.2 मधील कराराची प्रत हजर केली आहे. ट्रॅक्टर चे आर. सी. बूकाची प्रत, विप क्र.1 चे दि.12.08.2013 चे पत्र, दि.04.09.2010 चे टर्म अॅन्ड कंडीशनचे पत्र, रिपेमेंट शेडयूल, दि.10.09.2011 ची रु.30,000/- ची पावती, दि.19.09.2011 ची रु.35,800/- ची पावती, दि.04.03.2011 ची रु.35,480/-‘ ची पावती, दि.10.12.2010 ची रु.30,000/- ची पावती, दि.21.06.2012 ची रु.48,350/- ची पावती दि.03.09.2013 चे नोटीस उत्तर त्यांची पावती, दि.25.9.2013 ची नोटीसची प्रत, दि.01.10.2013 चे नोटीस उत्तर त्यांची प्रत, दि.25.09.2013 रोजी आर.टी.ओ. ला दिलेल्या अर्जाची प्रत, इत्यादी कागदपत्रे हजर केली आहेत.
क) विप क्र.1 यांनी हजर होऊन दि.03.02.2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक च्या तक्रारी अमान्य केलेल्या आहेत. या विप ने सेवेत कोणतीही त्रुटी केली नाही असे म्हटलेले आहे. कराराप्रमाणे श्री. मनोज डी.दळवी यांना आर्बिट्रेटर म्हणून नेमलेले आहे. त्याबद्दलची नोटीस दि.25.09.2013 रोजीची तक तसेच जामीनदार यांना देण्यात आलेली आहे. आर्बिट्रेटर रेफरन्स हाणून पाडावा या उद्देशाने तक ने ही तक्रार दिलेली आहे. आर्बिट्रेटरकडे रेफरन्स दिल्यानंतर प्रस्तूत तक्रार चालणार नाही. करार क्र.1, 9 व 3 प्रमाणे तक ने कर्ज परत फेडण्यास चूक केल्यामुळे विप क्र.1 ने ट्रॅक्टर चा ताबा घेतला आहे. दि.12.08.2013 रोजी ट्रॅक्टर विक्रीची नोटीस काढली. दि.20.09.2013 रोजी जास्तीत जास्त मागणी रु.3,90,000/- या किंमतीला ट्रॅक्टर विकून टाकलेला आहे. अद्यापही तक कडून रु.54,310/- कर्जापोटी येणे आहे. योग्य ती पध्दत अवलंबून या विप ने ट्रॅक्टर विकला आहे. लोकांच्या पैशामधूनच तक यांला या विप ने वित्त पुरवठा केला होता. तक ने वस्तूस्थिती लपवून ठेऊन प्रस्तूतची तक्रार दिली ती रद्द होण्यास पात्र आहे.
ड) विप क्र.2 याला नोटीस बजावूनही हजर न झाल्यामुळे विप क्र.2 विरुध्द तक्रार एकतर्फा चाललेली आहे.
इ) तक ची तक्रार त्यांने दिलेली कागदपत्रे व विप चे म्हणणे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील प्राथमिक मुद्दा निघतो आम्ही त्याचे उत्तर त्याचे समोर खालील कारणासाठी लिहीली आहेत.
प्राथमिक मुद्दा उत्तर
1) आर्बिट्रेटर रेफरन्स चा या तक्रारीवर काय परिणाम होईल ? तक्रार चालणार नाही.
2) आदेश कोणता ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
1) मुद्दा 1 व 2 -
1. तक ने म्हटले की, प्रथम विप क्र.1 ने दि.12.08.2013 रोजी तक व जामीनदार यांना नोटीस पाठविली. नोटीस तक ला दि.30.08.2013 रोजी मिळाली. तक ने त्यांला दि.03.09.2013 रोजी उत्तर पाठवले. दि.12.08.2013 रोजीची नोटीस असे म्हणते की रु.4,49,872/- सात दिवसांचे आंत भरण्यात यावे. नाहीतर ट्रॅक्टर विक्री करण्यात येईल या नोटीसीला तक ने दि.03.09.2013 चे उत्तर दिल्याचे दिसते. दरम्यान दि.07.08.2013 रोजी विप क्र.1 ने ट्रॅक्टर ओढून नेल्याचे म्हटले आहे. दिलेल्या चेकद्वारे कर्ज वसूल करावे असे उत्तरात म्हटले होते. तसेच ग्राहक मंचामध्ये जाण्याचा मानस कळविला होता. दि.25.09.2013 चे विप क्र.1 चे नोटीसीमध्ये असे कळविले की, दि.13.08.2013 पर्यत रु.1,08,827/- येणे होते त्यामुळे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन विकण्याचा विप क्र.1 ला अधिकार होता. जर तक ने पैसे भरले नाही तर कराराप्रमाणे आर्बिट्रेटर श्री. मनोज दळवी यांना रेफरन्स केला जाईल असे म्हटले होते.
2. अग्रीमेंट विप क्र.1 ने हजर केले आहे. पॅरा क्र.1,9 व 3 प्रमाणे कर्ज परत फेडण्यात चूक झाल्यास वित्त पुरवठादाराला ट्रॅक्टर ताब्यात घेण्याचा हक्क होता व विकण्याचा हक्क होता. कलम 12 (1) व (2) प्रमाणे वाद उत्पन्न झाल्यास तो आर्बिट्रेटरकडे सोपवण्याचा होता. त्यांचा अवार्ड पक्षकारावर बंधनकारक राहण्याचा होता. तक ने आर्बिट्रेटरबद्दल चकार शब्दही काढलेला नाही. विप क्र.1 ने दि.09.09.2014 रोजी लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, लवाद अधिकारी यांनी अवार्ड पारीत केलेला आहे.
3. हे खरे आहे की, विप क्र.1 यांनी लवाद अवार्डाची प्रत हजर केलेली नाही. मात्र तक यांने लवाद नेमणूकीबद्दल पूर्णपणे मौन बाळगले आहे व अवार्ड झाला नाही असे प्रतिज्ञापत्र दिलेले नाही. विप क्र.1 तर्फे मा.राष्ट्रीय आयोगाचा निवाडा इन्स्टॉलमेंट सप्लाय लि. विरुध्द कांगरा एक्स सर्व्हीस मेन ट्रान्सपोर्ट I (2007)CPJ 34 यावर भर दिलेला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जेथे आर्बिट्रेशन अवार्ड झाला असेल तेथे ग्राहक तक्रार निवारण मंचाला ज्यूरिसडीक्शन येत नाही. प्रस्तूत प्रकरणी विप क्र.1 चे म्हणणे प्रमाणे आर्बिट्रेशनचा अवार्ड झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या मंचाला या तकारी संबंधी कार्यक्षेत्र येत नाही असे आमचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देतो व खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक ची तक्रार रद्द करण्यात येते.
2. खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.