::: निकालपत्र :::
(निकाल तारीख :19/03/2015 )
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्ष.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार हा मौ. मुरढव ता. रेणापुर जि. लातूर रहिवाशी आहे, अर्जदारास मौ. मुरढव येथे गट क्र. 279 मध्ये 0 हे. 57 आर एवढी जमीन आहे तसेच गट क्र. 288 मध्ये 35 आर व 291 मध्ये 30 आर एवढी जमीन आहे. अर्जदार हा कुटूंबाचा प्रमुख कर्ता आहे. अर्जदार हा मयताचा मोठा मुलगा आहे. दि. 04.04.2010 रोजी मोटार सायकल क्र. एम.एच.24/ टी. 2861 वरुन अहमदपुर येथुन साखरपुडयाचा कार्यक्रम झाल्यानंतर अर्जदाराचे वडील नारायण सावंत व अच्युत बाबुराव पांढरे हे मोटार सायकलवरुन अहमदुपर वरुन लातूरकडे येत असतांना भातागळी पाटी समोर रोडवर टायर फुटल्याने मोटार सायकलच्या पाठीमागे (बसलेले) अर्जदाराचे वडील नारायण सावंत हे खाली पडले त्याचे डोक्यास व पाठीमागे मार लागला. उपचारासाठी लातूर येथील लोकमान्य अतिदक्षता विभागात दाखल केले असता, उपचार चालु असतांना दि. 09.04.2010 रोजी ते मयत झाले. अर्जदाराचे वडील नारायण सावंत हे दि. 04.04.2010 रोजी झालेल्या अपघातामुळे दि. 09.04.2010 रोजी मयत झाले, अर्जदाराचे वडील हे अपघात झाल्यानंतर 4 दिवसांनी मयत झाले.
गैरअर्जदार क्र. 1 ने दि. 23.03.2011 रोजी पत्र पाठवुन अर्जदारास कळवले की, सदरचा क्लेम संबंधीत कागदपत्रे पॉलिसी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत न दिल्यामुळे आम्ही तुमचा नुकसान दावा देता येत नाही. म्हणुन सदरचा क्लेम नाकारला आहे. म्हणुन अर्जदाराने विनंती केली की, गैरअर्जदाराने अर्जदारास शेतकरी अपघात योजनेचा लाभ रक्कम रु. 1,00,000/- ही 12 टक्के व्याज दराने संपुर्ण रक्कम अर्जदाराचे पदरी पडे पर्यंत देण्याचा आदेश करण्यात यावा, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 20,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 5000/- देण्याचा आदेश व्हावा.
सदर केसमध्ये अर्जदार क्र. 2 करुणा सावंत यांचा अर्ज दि. 24.11.2014 रोजी आलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जदार हा तिचा सावत्र मुलगा आहे. तेंव्हा मयताची ती कायदेशीर पत्नी आहे. या अर्जदार सामनेवाला यांचे म्हणणे घेतले असता अर्जदाराची आई वारल्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले जी करुणा सावंत ही वडिलाची दुसरी पत्नी असून, आपल्यावर पुर्ण कुटूंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी आहे तेंव्हा सावत्र आईला अर्जदार म्हणुन पार्टी करण्यात येवु नये, असा उजर दिलेला आहे. मात्र या न्यायमंचाने अर्जदाराचा हा अर्ज पार्टी करण्याचा मंजुर करुन अर्जदार करुणा सावंत हीला सदर केसमध्ये अर्जदार क्र. 2 ची सुधारणा करण्यात येते असे अर्जदार क्र. 2 ने दाखल केलेला कागदोपत्री पुराव्या वरुन सांगीतलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 3 कबाल इंशुरन्स कंपनीचे म्हणणे आले असून, त्यांच्या म्हणण्यानुसार नारायण ज्ञानोबा सावंत हा मुरढव या गावचा राहणारा असून, ता. रेणापुर जि. लातूर येथील आहे. अर्जदाराच्या वडिलाचा मृत्यू हा दि. 04.04.2010 रोजी आहे, वत्याचा क्लेम प्राप्त दि. 13.08.2010 रोजी त्रूटीयुक्त मिळालेला आहे. त्यातील त्रूटीपुर्ण करण्यासाठी दि. 03.11.2010, 06.12.2010 व दि. 05.10.2010 रोजी स्मरणपत्रे पाठवलेली आहे. दि. 21.12.2010 रोजी नागपुर येथे पाठवलेले आहे.
गैरअर्जदार क्र. 4 तालुका कृषी अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार दि. 30.03.2012 रोजी सदरील शेतक-याचा प्रस्ताव त्रूटीची पुर्तता न केल्यामुळे फाईल नाकारण्यात आली , असा शेरा देवुन कार्यालयास कळवले आहे. येथे सदरचा क्लेम पाठवण्यात आला व युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनीने सदरचा क्लेम हा दि. 23.03.2011 रोजी बंद केला , त्यातील त्रूटीपुर्ण केलेले नसल्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 यांच्या म्हणण्यानुसार सदरचा क्लेम फॉर्म त्यांच्याकडे 90 दिवसानंतर आला म्हणुन अर्जदाराचा तक्रार अर्ज हा मुदतीत न आल्यामुळे तक्रार अर्ज बंद करण्यात आला आहे. तरी ही सदरचा तक्रार अर्ज हा फेटाळण्यात यावा, असे विमा कंपनीचे म्हणणे आहे.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे , मौजे मुरढव येथे त्याला गट क्र. 279 मध्ये शेती असून त्याचे वडिल मृत्यूपुर्वी शेतकरी होते व शेतकरी जनता अपघात विम्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने त्याचा विमा भरलेला आहे त्याचा पॉलिसी क्र. 230200/47/10/99/00000067 असा आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, अर्जदाराचे वडिल दि. 04.04.2010 रोजी मोटार सायकल क्र. एम.एच. 24/टी 2861 ने अहमदपुर येथुन साखरपुडयाचा कार्यक्रम झाल्यानंतर अर्जदाराचे वडिल नारायण सावंत व अच्युत बाबुराव पांढरे हे मोटार सायकल वरुन अहमदपुर वरुन लातूरकडे येत असतांना भातांगळी पाटीसमोर रोडवर टायर फुटल्याने मोटार सायकलच्या चालकाच्या पाठीमागे बसलेले अर्जदाराचे वडिल खाली पडले त्यांच्या डोक्यास व पाठीमागे मार लागला. उपचारासाठी लातूर येथील लोकमान्य अतिदक्षता विभागात दाखल केले असता, उपचारा दरम्यान दि. 09.04.2010 रोजी मयत झाले. तसेच सदरचा मृत्यू हा अपघाती स्वरुपाचा असून अर्जदाराचे वडिल हे शेतकरी होते. अर्जदाराचे वडिलाचे नावे मौजे मुरढव येथे गट क्र 279 मध्ये 0 हे. 57 आर जमीन आहे , अर्जदाराने केवळ 6 ड व फेरफार दिलेला नव्हता म्हणुन अर्जदारास ती कागदपत्रे मागण्यात आली , यावरुन असे दिसून येते की, अर्जदाराचे सर्व कागदपत्र असतांना फक्त एखादया कागदपत्रासाठी त्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवुन तो बंद करणे म्हणजे अर्जदाराच्या सेवेत गैरअर्जदाराने केलेली त्रूटी दिसून येते. सदरचा कागदपत्र नसल्याचे कबाल इंशुरन्स कंपनीने अर्जदारास कळवलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार (5) अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादे कागदपत्रा अभावी प्रस्ताव परिपुर्ण होत नसल्यास प्रस्ताव दाखल करुन घेवुन तालुका कृषी अधिकारी हे संबंधीत यंत्रणेचे जबाबदार अधिकारी असल्याने त्यांचेशी संपर्क साधुन कागदपत्राची पुर्तता करुन घेण्यास सहकार्य करावे. म्हणुन हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज मंजुर करत आहे. अर्जदार व मयताची दुसरी पत्नी करुणा सावंत या उभयतांत पॉलिसीची रक्कम रु. 1,00,000/- समान हिश्यात गैरअर्जदार क्र. 2 यांनी दयावे, तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 4000/- व दाव्याच्या खर्च रु. 2000/- देण्यात यावा.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारदार क्र. 1 व 2 यांना रक्कम रु. 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्त्) समान हिश्यात , आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावे.
- गैरअर्जदार क्र. 2 यांनी आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास, त्यावर तक्रार दाखल तारखे पासुन द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देणे बंधनकारक राहील.
- गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारदार यांना मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु. 4000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 2000/- आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत देण्यात यावे.